' योगेंद्रजींच्या ‘सलीम’ या नावामागचा इतिहास: फसलेल्या सर्वधर्मसमभावाची ‘यादवी’! – InMarathi

योगेंद्रजींच्या ‘सलीम’ या नावामागचा इतिहास: फसलेल्या सर्वधर्मसमभावाची ‘यादवी’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान घमंडे

===

पाळण्यातील नाव किंवा टोपण नाव ही बाब भारतीयांसाठी नवी नाही. अगदी दोन-चार वर्षं वय असलेल्या लहानग्यांपासून ते सत्तरी गाठलेल्या प्रौढांपर्यंत प्रत्येक व्यक्तीचं, मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी एखादं वेगळं नाव असतं.

त्याच नावाने सहसा त्याला हाक मारली जाते. या नावाचा जन्म दाखल्यावरील नावाशी काहीही संबंध नसतो.

टोपणनावाची त्या व्यक्तीला इतकी सवय झालेली असते, की कधी कधी तर खऱ्या नावाने हाक मारल्यावर सुद्धा ती व्यक्ती ओ देत नाही. कुटुंबात कधीतरी टोपण नावाने हाक मारल्यावर, नक्की कुणाला बोलावलं आहे हे त्या माणसाच्या ओळखीतील इतर व्यक्तींना कळतच नाही.

या अशा दुसऱ्या नावामुळे अनेक किस्से घडतात. मजेशीर आठवणी आणि धमाल या नावांबरोबर आपसूकपणे येतेच. ‘नावात काय आहे?’ असं शेक्सपिअर म्हणून गेला असला, तरी नावात बरंच काही आहे, हे तथ्य विसरून चालत नाही.

 

shakespeare-inmarathi

 

नावाची गंमत ही त्या व्यक्तीला आणि तिच्या कुटुंबाला ठाऊक असते. मात्र तुम्ही जर एखादी नावाजलेली आणि खूप प्रसिद्ध असलेली व्यक्ती असाल, तर या नावामागचं गौडबंगाल अनेकांना माहित असतं. ते माहित नसेल, तर जाणून घेण्याची इच्छा सुद्धा असते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीमधील माजी सदस्य आणि त्यांचे तत्कालीन निकटवर्ती योगेंद्र यादव यांच्या नावाची सुद्धा अशीच गंमत आहे.

सध्या पुन्हा चर्चेत आलेले अण्णा हजारे यांच्यासह समाजासाठी योगेंद्र यांनी काम केलेलं आहे. आम आदमी पार्टीचे सदस्य बनून राजकारणात आलेले आणि सध्या ‘स्वराज इंडिया’ या पक्षाचे सदस्य असलेले योगेंद्रजी त्यांचं ‘चांगलं नाव राखून आहेत’.

 

yogendra-yadav-inmarathi

 

राजकीय बातम्या आणि भारताचं राजकारण यात रस असेल, तर योगेंद्र यांचं सलीम हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. या सलीम नावामागे असलेला खास इतिहास मात्र कदाचित तुम्हाला माहित नसेल.

सलीम हे योगेंद्रजींचं पाळण्यातील नाही, तर कागदावरील नाव होतं. होय, त्यांच्या लहानपणी सलीम हे नाव घेऊन वावरत असत.

एवढंच नाही, तर त्यांची सख्खी बहीण नीलम तिच्या लहानपणी नजमा या नावाने ओळखली जात असे. या दोघं यादव भावंडांच्या ‘मुस्लिम’ नावांमागे सुद्धा एक रंजक इतिहास आहे.

पूर्वी एकदा हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्वतः योगेंद्र यादव यांनी हा इतिहास सगळ्यांसमोर उघड केला होता. मतं मिळवण्यासाठी सलीम नाव धारण केल्याच्या आरोपाचं खंडन यात योगेन्द्रजींनी केलेलं आढळतं.

सलीम आणि नजमा या नावांची कहाणी जाणून घेण्यासाठी, विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात थेट १९३६ मध्ये जावं लागेल. त्यावेळी योगेंद्र यांचे वडील ७ वर्षांचे होते. त्या ७ वर्षांच्या कोवळ्या मुलाने त्यावेळी अनुभवलेली घटना फारच हृदयद्रावक होती.

योगेंद्र यांचे आजोबा त्यावेळी शाळेत मुख्याध्यापक होते. एका मुस्लिम समूहाने शाळेत शिरण्याचा प्रयत्न चालवला होता. या मुस्लिम समूहाला शाळेच्या आवारात येऊ न देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पुढाकार घेतला होता. मात्र नियतीच्या मनात काहीतरी भलतंच होतं.

शाळेत शिरू पाहणाऱ्या या समूहाच्या हातून शाळेच्या मुख्याध्यापकांची हत्या झाली. ७ वर्षांच्या कोवळ्या मुलासाठी, त्याच्या वडिलांचा मृत्यू हा फार मोठा मानसिक धक्का होता.

भारत स्वतंत्र झाला त्याकाळात भारताची झालेली फाळणी, प्रक्षोभक झालेला समाज आणि हिंदू मुसलमान यांच्यात झालेल्या दंगली, या परिस्थितीबद्दल सुद्धा आपण सगळे जाणून आहोत. असंख्य निष्पाप व्यक्तींनी त्यावेळी आपले प्राण गमावले आहेत.

 

india-partition-riots-inmarathi

 

वयाच्या ७ व्या वर्षी वडिलांचा मृत्यू झाला होता, त्या मुलाने धार्मिक वादातून घडलेल्या या असंख्य निष्पाप जीवांच्या कत्तली पाहिल्या. यामुळेच योगेंद्रजींच्या वडिलांना सर्वधर्मसमभाव आपलासा वाटू लागला असं म्हणता येईल.

याची परिणीती म्हणून यादव यांनी आपल्या मुलांना मुस्लिम नावं देण्याचा निर्णय घेतला. यामागे त्यांचा स्वच्छ हेतू होता, तो सर्वधर्मसमभाव हाच!

म्हणूनच आपल्या मुलांना सलीम आणि नजमा अशी मुस्लिम नावं त्यांनी दिली, पण घडलं मात्र भलतंच. समाजातील इतर व्यक्तींना त्यांचा हा ‘सर्वधर्मसमभाव’ रुचला नाही.

हे सुद्धा वाचा – अरविंद केजरीवाल सारखे झुंडशहा कुठे धडा शिकतात? : भाऊ तोरसेकर

सलीमला इतर मुलांकडून सतत त्रास सहन करावा लागला. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत त्यांनी हा त्रास सहन केला. अखेर नाईलाजाने योगेंद्र यांच्या वडिलांना त्यांचा निर्णय बदलावा लागला.

सर्वधर्मसमभावाची मनातील भावना बाजूला ठेवत इच्छेला मुरड घालून, योगेंद्र आणि नीलम असं मुलांचं नामकरण करणं त्यांना भाग पडलं.

त्यामुळे कागदावरील मुस्लिम नावं बदलली जाऊन ती केवळ पाळण्यापुरती मर्यादित राहिली. अर्थात, ‘सुंभ जाळला तरी पीळ जात नाही’ असं मनुष्यस्वभावाबद्दल म्हटलं जाणारं वाक्य योगेंद्र यांच्या नावाच्या बाबतीत खरं ठरलं.

योगेंद्र यांनी राजकारण आणि समाजकारणात मोठं नाव कमावलं, मात्र सलीम हे लहानपणी चिकटलेलं नाव त्यांना लांब ठेवता आलं नाही.

अवघ्या जगासाठी योगेंद्र यादव ठरलेला हा राजकारणी, मित्रमंडळी आणि कुटुंबीयांमध्ये मात्र सलीमच राहिला. काय सांगावं, कदाचित आजही त्यांना त्यांच्या घरातील मंडळी ‘बेटा सलीम’ म्हणूनच हाक मारत असतील…!!

 

yogendra-yadav-action-inmarathi

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?