' एका स्पर्धेतून जन्म झालेल्या, गांधीजींच्या प्रिय ‘सत्याग्रह’मागचा अज्ञात इतिहास! – InMarathi

एका स्पर्धेतून जन्म झालेल्या, गांधीजींच्या प्रिय ‘सत्याग्रह’मागचा अज्ञात इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताची ओळखच ज्या शब्दामुळे आहे तो शब्द म्हणजे सत्याग्रह. भारतीय स्वातंत्र्य ज्या शब्दाच्या पायावर उभं आहे, असा हा शब्द आणि महात्मा गांधी हे अतूट समीकरण आहे. मात्र हा शब्द मुळात सुचला कसा? हे जाणून घ्या-

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींनी एक नवं शस्त्र भारतालाच नव्हे तर सबंध जगाला दिलं. हे शस्त्र होतं सत्याग्रहाचं! दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरोधातील लढ्यासाठी गांधीजींना एक नवा शब्द हवा होता. त्यांनी यासाठी एक स्पर्धाच आयोजित केली. या स्पर्धेचं फलस्वरूप म्हणजे जगाला सत्याग्रह हा शब्द मिळाला.

सत्याग्रह म्हणजेच सत्याचा आग्रह. सत्य त्याचा आग्रह करणे, पाठपुरावा करणे म्हणजे सत्याग्रह. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरूध्द कायदेभंग आंदोनल छेडलं गेलं. यात मुख्यत्वे विनाशस्त्र लढ्यावर भर दिला गेला. याचं मुख्य कारण हे होतं की, जर शत्रू आपल्यापेक्षा बलवान असेल, त्याच्याकडे शस्त्रास्त्रं आपल्यापेक्षा जास्त असतील तर त्याच्याशी शस्त्रानं लढण्यात काही अर्थ नसतो.

 

south-africa-satyagrah-inmarathi

 

अशावेळी शत्रूला नि:शस्त्रपणे हरविण्यातच शहाणपण असतं. इंग्लंडमध्ये महिलांनी त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी अशाच प्रकारे शस्त्राविना लढा दिला आणि तो यशस्वीही केला. मात्र हे करतानाही तीन प्रकारची कूटनिती अवलंबली जाते.

एक तर त्याला शस्त्रानं विरोध न करता इतर प्रकारांनी सतत त्रास देत रहाणं, कपट कारस्थानं रचून शत्रूला हैराण करणं किंवा शत्रूच्या शत्रूशी मैत्री करून आपला हेतू साध्य करणं. मात्र गांधीजींना या प्रकारची कारस्थानं मंजूर नव्हती. अशा प्रकारे वाईट पद्धतीने दिलेला लढा त्यांना मंजूर नव्हता.

दक्षिण आफ्रिकेतील लढ्याचं स्वरूपच निराळं असल्यानं त्यासाठी एखाद्या अभिनव शब्दाच्या ते शोधात होते.

यासाठी मग त्यांनी ‘इंडियन ओपिनियन’ या नियतकालिकातून एक स्पर्धा आयोजित केली. अनेकांनी विवध शब्द सुचवले, मात्र गांधीजींना भावला तो मगनलाल गांधी यांनी सुचवलेला शब्द. मगनलाल यांनी सुचवलेला तो शब्द होता, “सदाग्रह”.

 

indian-opinion-inmarathi

 

याचा अर्थच होता की आपल्या मागण्यांसाठी सतत आग्रही रहाणे. गांधीजींनी यात थोडासा बदल करून सदाग्रह ऐवजी सदाग्रही असा शब्द केला. पुढे जाऊन तो अधिक योग्य असा सत्याग्रह झाला.

हा शब्दप्रयोग सविनय कायदेभंगाच्या चळवळीला साजेसा होता.

गांधीजींना सत्याग्रहाचा जो अर्थ अपेक्षित होता तो असा, ‘प्रेमानं सत्याचा आग्रह’ धरणे. यात वैरभावना न बाळगणे हा अध्याहृत अर्थ आहे. लॉर्ड इंटर यांना सत्याग्रहाचा अर्थ समजावताना गांधीजींनी त्याची फोड अशी केलेली होती – हे एक असं आंदोलन आहे ज्याचा पाया सत्यावर आधारलेला आहे.

अहिंसेनं दिला जाणारा, मात्र मागे हटायचं नाही असं म्हणणारा हा लढा आहे. सत्याप्रती पोहोचण्याचा आणि तिथे चिरकाल टिकण्याचा एकमेव रस्ता म्हणजे सत्याचा अवलंब! हे सत्य जर अहिंसेची साथ घेऊन आलं तर ते शाश्र्वत होतं. कारण सत्य म्हणजेच तिथे कपटाला थारा नाही आणि जिथे कपट नाही तिथे असत्याचा अंधार नाही.

सत्याग्रह ही सक्रिय प्रेमाची विधायक वृत्ती आहे. सत्य आणि अहिंसेच्या लढ्यात महत्वाचं शस्त्र आहे, उपोषण. मात्र हादेखील अंतिम उपाय आहे. ज्या उपोषणानं शत्रूलाही वेदना होतील ते उपोषण गांधीजींना अमान्य होतं. आपली बाजू मांडण्यासाठीचा मार्ग म्हणूनच उपोषण अवलंबलं जायला हवं याबाबत ते आग्रही होते.

 

gandhiji-fast-inmarathi

 

गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात हा उपोषणाचा मार्ग अनेकदा अवलंबून भल्याभल्यांना गर्भगळीत केलेलं होतं. यातच त्यांच्या या आयुधाची परिणामकारकता दिसून येते.

सत्याग्रह हे गांधीजींनी शोधलेलं काहीतरी नवीन किंवा पूर्वी अस्तित्वात नसलेलं असं काही होतं का? तर अजिबातच नाही. हिंदू धर्मात ही संकल्पना पूर्वापार चालत आलेली आहे. प्राचीन भारतीय वाङ्मयात, पौराणिक कथांत याची उदाहरणं आढळतात. यामध्ये सत्यवत, सत्यनिष्ठा असे उल्लेख आहेतच.

हे सुद्धा वाचा – आणि महात्मा गांधींनी क्रिकेटचं मैदान गाजवलं!

भक्त प्रल्हादानं सुद्धा आत्मक्लेषाचा मार्ग अवलंबला किंवा राजा हरिश्चंद्र, वनवासातील सीतामाई यांनी अशा प्रकारे विरोध केले असा उल्लेख आहेतच. हिंदूधर्माव्यतिरिक्त येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस, बुध्द यांनी सत्यासाठी आयुष्य वाहिले.

 

raja-harishchandra-inmarathi

 

या सगळ्याचा परिपाक आणि त्याचं विस्तृत रूप म्हणजे गांधीजींची सत्याग्रहाची व्याख्या आहे. राजनैतिक, सामाजिक क्षेत्रात या सत्याचा आग्रही वापर केल्याची उदाहरणं मात्र विरळाच.

गांधीजींचं महत्त्व इथे अधोरेखित होतं. त्यांनी कधीही कौटुंबिक, वैयक्तिक पातळीवर असणार्‍या सत्याग्रहाला राजनैतिक हत्यार बनवलं नाही. त्यांचा सत्याग्रह ही त्यांची एक वृत्ती आहे. कुटुंबात ज्याप्रमाणे मागण्या मान्य करवून घेण्यासाठी प्रेमानं, मायेनं, नात्यांत कटुता येऊ न देता मात्र आग्रही राहात कृती केली जाते, तिचाच अवलंब त्यांनी केला.

गांधीजींनी त्यांच्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ या पुस्तकात ही संकल्पना कशी सुचली? याबाबत विवेचन केलेलं आहे. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या मनावर “अपकाराचं उत्तर उपकारानं” देण्याचे संस्कार शामलभटांच्या गुजराती कवितेमुळे ठसले होते.

पत्नीकडून मी सत्याग्रहाचे धडे शिकलो. ती कुटुंबातल्या समस्या ज्या प्रकारे सोडवत असे त्याचाच अवलंब थोड्या व्यापक प्रकारे करत मी दक्षिण आफ्रिकेत आंदोलनाला दिशा दिली असं गांधीजी म्हणायचे.

 

gandhiji inmarathi

 

भगवत गीता, बायबल आणि टॉलस्टॉय यांच्या सखोल अभ्यासानं त्यांच्या विचारांना बळकटी मिळत गेली. कृतीतून, शांतताप्रिय मार्गानं बलप्राप्ती करणं म्हणजेच सत्याग्रह ही अचूक व्याख्या कालांतराने बनत गेली.

राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात अहिंसेचा आणि सत्याचा आग्रह धरत हा सिध्दांत त्यांनी आग्रहीपणे अंमलात आणला.

अहिंसक अशा सत्याग्रहाला सामाजिक शक्तीचे स्वरूप देत स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एक प्रभावी हत्यार बनवलं. सत्याग्रहाला त्यांनी तात्विक भूमिकी अधिष्ठान देत एक असं प्रभावशाली शस्त्र बनवलं, ज्याच्यापुढे भल्या भल्या सेनाही गारद व्हाव्यात.

मनुष्याची मुळात असलेली नैसर्गिक अशी सत्पप्रवृत्ती आणि प्रेम यावर आधारित अशी ही निष्ठा आहे. ही वृत्ती जगभरातल्या प्रत्येक मनुष्यजीवात असते आणि म्हणूनच गांधींजींचा सत्याग्रह जगभरात मान्यही केला गेला आणि अवलंबलाही गेला.

सत्याग्रह शब्द सुचवणारे मगनलाल गांधी कोण होते?

गांधीजी यांचे पुतणे असणारे मगनलाल खुशालचंद गांधी हे महात्मा गांधींचे निस्सिम अनुयायी होते. त्यांना साबरमती आश्रमाचा आत्मा असं म्हटलं जायचं. दुर्दैवाने ३० एप्रिल १९२८ साली पाटण्यात टॉयफॉईडमुळे त्यांचा मृत्यू झाला.

 

sabarmati-ashram-inmarathi

 

त्यांना गांधीजींचे सर्वात पहिले अनुयायी म्हणूनही ओळखलं जातं. दक्षिण आफ्रिकेतील लढ्यासाठी महात्मा गांधी यांनी आपले बंधू खुशालदास यांच्याकडे त्यांच्या मगनलाल आणि छगनलाल या दोन्ही मुलांची मागणी केली होती. तेव्हापासूनच मगनलाल हे महात्मा गांधीजींच्या सोबत असायचे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?