' दोघांचं भांडण – सगळ्यांचा लाभ! भावांच्या भांडणातून स्थापन झाले जगप्रसिद्ध शूज ब्रँड्स – InMarathi

दोघांचं भांडण – सगळ्यांचा लाभ! भावांच्या भांडणातून स्थापन झाले जगप्रसिद्ध शूज ब्रँड्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मानवाच्या उत्क्रांतीपासून ते आत्तापर्यंत, वर्चस्वासाठीचे अनेक संघर्ष आपण बघितले, वाचले, ऐकले आहेत. सत्तेत वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसंगी रक्तरंजित होळीही खेळली जाते. विविध कुटनित्या वापरल्या जातात, शह-काटशहाचे वेगवेगळे डाव टाकले जातात. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी, कधी सरळ तर कधी आडमार्गाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो.

महाभारतातला कौरव पांडवांचा संघर्ष असो, की वर्तमानात तुमच्या-आमच्या कुटुंबातला संघर्ष असो, अविश्वासाच्या आगीत गैरसमजाचं इंधन पडलं, की ही परिस्थिती अटळ असते. या परिस्थितीला जो समर्थपणे हाताळतो, तो या संघर्षाच्या परिस्थितीतही उभा राहतो ठामपणे प्रगतीच्या दिशेने.

असेच काहीसे झालेले आहे, खेळाचे साहित्य बनविणाऱ्या आदिदास आणि प्युमा या जगप्रसिद्ध कंपन्यांच्या बाबतीत! जगातल्या तरुणांच्या आणि विशेषतः खेळाडूंच्या आवडीचे उत्पादन बनवणाऱ्या युरोपातल्या सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय असणाऱ्या आदिदास आणि प्युमा या कंपन्यांच्या स्थापनेचा इतिहास खूप रंजक आहे.

 

adidas-puma-inmarathi

 

साल १९१९ चे, नुकतेच पहिले महायुद्ध संपले होते. या महायुद्धात सैनिक म्हणून कर्तव्य बजावलेला एडॉल्फ उर्फ एडी नावाचा तरुण जर्मनीच्या हरजोनाउराच या आपल्या मूळ गावी आला होता. अंगातील सैनिकी रक्त व स्वभावातील शिस्त त्याला काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हती.

युद्धाच्या परिस्थितीत जगण्याची सवय झालेल्या एडीला सैनिकी लगबग, तोफांचे आवाज, प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्याची जिगर सर्वसामान्य आयुष्य जगताना कुठेच दिसत नव्हती. त्यामुळे त्याला युद्धानंतरचं जीवन हे अतिशय निरस, निष्प्रभ, तथ्यहीन वाटायला लागलं.

एडीच्या डोक्यातील कल्पकता, हातातील कौशल्य, अंगातील उर्जा त्याला सतत झेप घेण्यासाठी प्रेरित करत होती. पुन्हा पुन्हा युद्ध होणं शक्य नाही, मग काय करावं? हा विचार त्याच्या डोक्यात सतत पिंगा घालत होता.

घड्याळाच्या काट्यांची वाढत जाणारी टिकटिक, आणि त्याबरोबर विचाराचे चक्र फिरणं, ही गोष्ट नित्याची होऊ लागली. जसजसा वेळ जात होता तशी त्याची व्याकुळता वाढत होती. यातून बाहेर पडण्यासाठी तो बराच वेळ मैदानावर घालवू लागला.

मैदानावर खेळण्यासाठी लागणारे बूटही तो स्वतःच तयार करायचा.

 

sports-shoes-inmarathi

 

एक दिवस असंच स्वयंपाक घरात काम करत असताना, लख्ख वीज चमकावी असा विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला! जे बूट आपण स्वतःसाठी बनवतो, तेच बूट आपण इतरांसाठी बनवले तर? आपलं कौशल्य जर आपलं जगण्याचं साधन होऊ शकलं तर?

अनेक विचार त्याच्या मनात पिंगा घालायला लागले आणि त्यानी ठरवलं, आपण खेळाच्या बुटांची निर्मिती करून, व्यवसाय करायचा!

त्याच्या लेखी, युद्ध आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टींमध्ये साम्य होतं. दिवस-रात्र मेहनत, जिद्द, चिकाटी, सत्ता, संपत्ती हे जसे युद्धातले महत्त्वाचे घटक आहेत, तसेच ते व्यवसायात पण आहेत. अनिश्चिततेच्या छाताडावर पाय रोवून विजयाची पताका युद्धाव्यतिरिक्त, फक्त व्यवसायातच रोवता येते, हे त्याने जाणलं.

डोक्यातल्या विचारांना एडीने कृतीचं स्वरूप दिलं आणि चक्क बूट बनविण्याच्या उद्योगाचा श्रीगणेशा केला! व्यवसायिक म्हणून एडी नवीन असला तरी आपल्या मेहनतीच्या जोरावर अनेक आव्हानांचा सामना तो लीलया पेलत होता.

सैनिकी शिस्त आणि गुणांचा पुरेपूर फायदा एडीला त्यात झाला भरीस भर की काय विक्रीत अत्यंत तरबेज असणारा त्याचा मोठा भाऊ रुडी डॅझलर हा पण मदतीला धावला. छोटेखानी असणाऱ्या या व्यवसायाचे अल्पावधीतच “डॅझलर ब्रदर्स शू फॅक्टरी”मध्ये रूपांतर कधी झालं हे कळलंच नाही.

 

adolf-rudolf-dassler-inmarathi

 

या व्यवसायातून डॅझलर बंधूंनी आपल्या प्रगतीची एक-एक शिखरं सर केली. जर्मनीत त्यांना या व्यवसायामुळे एक नवी ओळख निर्माण झाली. प्रामाणिक, कष्टाळू, नवउद्योजक म्हणून त्यांचा लौकिक वाढत होता. विविध बैठका, संमेलनं, चर्चासत्रात, डॅझलर बंधूचा वावर वाढत होता. व्यवसायाच्या निमित्ताने अनेक खेळाडूंशी त्यांचा संपर्क असायचा, जो त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता.

एडी- रूडी डॅझलरने आपल्या कल्पकतेने खेळाडूंसाठी अनेक उत्पादनं उपलब्ध करून दिली. त्याचा खूप फायदा खेळाडूंना त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी आत्मविश्वास देऊन गेला.

१९१९ ला स्वतःच्या गरजेपोटी सुरु केलेला उद्योग अनेक खेळाडूंची गरज पूर्ण करत होता. यात १९३६ साल कधी उजाडलं ते त्या दोघांना सुद्धा कळलं नाही. १९३६ साली Garmish partenkirchen नाझी जर्मनी या ठिकाणी ऑलम्पिक स्पर्धेचे तुतारी फुंकली गेली. जगातील २८ देशांमधून सुमारे ६५० खेळाडू या स्पर्धेसाठी येणार होते. ऑलम्पिक म्हणजे खेळाडूंचा कुंभ मेळाच!

 

1936-olympics-inmarathi

 

यासाठी पूर्ण जर्मनी देश सज्ज झाला होता. ही संधी नेमकेपणाने हेरुन आपल्या उत्पादनाची माहिती जगातल्या सगळ्या खेळाडूंपर्यंत पोचवणं, सहज शक्य होईल या अपेक्षेने एडीने तडक ऑलिम्पिक गाव गाठलं.

या स्पर्धेचं सोन्याहूनही सोनं करायचं या तडफेनं एडी त्याठिकाणी खेळाडूंना, त्यांच्या मार्गदर्शकांना भेटत होता. त्यांना त्यांच्या उत्पादनाची उपयुक्तता पटवून देत होता. नवीन बदल टिपत होता.

एक दिवस त्याची भेट अमेरिकेचा प्रसिद्ध धावपटू ओवेन्सशी झाली. एडीने त्याला आपण तयार केलेले बूट किती फायदेशीर आहेत हे पटवून दिलं आणि ओवेन्सने ते बूट स्पर्धेत वापरण्याचं मान्यही केलं.

इथेच एडीने व्यवसायातील अर्धी लढाई जिंकली होती. हीच कृती येणाऱ्या सुवर्णकाळाची नांदी ठरणार होती आणि झालंही तसंच!

त्या स्पर्धेत डॅझलर बंधूंचे बूट वापरुन ओवेन्सने चक्क चार सुवर्णपकांची कमाई केली व एक नवा विक्रम प्रस्थापित केला. क्रीडास्पर्धेत शारीरिक मेहनत व कौशल्याबरोबरच तुम्ही स्पर्धेत ‘कसे? कोणते? कोणाचे?’ साहित्य वापरता यावरही यश अवलंबून असतं हा महत्वाचा फरक त्याने जगाला दाखवून दिला.

 

jesse-owens-inmarathi

 

यामुळे डॅझलर बंधूंचे यश व महत्त्व आता अधिक ठळकपणे लोकांना जाणवू लागलं. म्हणूनच जगभरातून त्यांच्याशी संपर्क केला जाऊ लागला. डॅझलर बंधूंचा हा व्यवसाय अधिक वेगाने वाढला. क्रीडाविश्वाला त्यांनी दिलेला एक नवा दृष्टीकोन आता सर्वमान्य झाला होता.

नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. या यशाची हवा डॅझलर बंधूंच्या डोक्यात शिरली. त्यांना व्यवसायातलं यश पचवता आलं नाही.

मोठ्या उमेदीने उभ्या केलेल्या व्यवसायाला आता ग्रहण लागत होतं. कौटुंबिक कलह वाढायला सुरुवात झाली. शब्दाला शब्द, वादानं वाद वाढत होते. छोट्या कुरबुरीचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं. पैसा मिळवता येतो पण तो टिकवता येतो का? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला होता.

अशातच १९३९ ला दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजायला सुरुवात झाली. जशी हलगी वाजली की पैलवानांचे अंग फुलतं, तसंच युध्द सुरू झालं, की सैनिकाची तळमळ वाढते. या दोघांनीही नाझी दलात सामील होण्याचा निर्णय घेतला.

मुळात सैनिकी बाणा असलेल्या या भावंडांनी दुसऱ्या महायुद्धात मोठं कर्तुत्व गाजवलं. त्यातल्या त्यात एडी अधिक महत्त्वाचा झाला. याचा राग रुडीच्या मनात अधिक गडद होत गेला.

 

rudolf-dassler-inmarathi

 

या युध्दात अमेरिकी सैन्याने रूडीला अटक केली, तेव्हा हे संबंध अधिकच ताणले गेले. रूडीचा असा गैरसमज समज झाला की त्याचा भाऊ एडीने त्याला अटक करण्यात मदत केली.

दोन भावांमधले मनभेद आता मतभेदांत बदलले होते. त्यांचे नाते गैरसमज, आरोप-प्रत्यारोप, हेवेदावे, तिरस्कार, यात गुरफटून गेले होते.

सांमजस्यापेक्षा कटुता वाढत गेली. सहज बोललेले शब्द सुद्धा तीक्ष्ण हत्यारचं रूप घेत होते. महायुद्धादरम्यान झालेल्या हल्ल्यात हे दोघे बंधू विस्थापित झाले असता आसरा शोधत फिरत होते. एडी आणि त्याची बायको एका ठिकाणी असताना तेथे रुडी व त्याच्या बायकोची भेट झाली.

या प्रसंगी दोघांनी समन्वय साधायला पाहिजे होता. कौटुंबिक कलहामुळे व्यवसायाचे नुकसान होत असताना, हे दोघे बंधू आपल्या मतावर अडून बसले होते. जसे काविळ झालेल्या व्यक्तीला सगळे जग पिवळे दिसते तशीच गत या दोघांची झाली होती.

हे सुद्धा वाचा – अब्जावधी रुपयांचा महाघोटाळा केलाय सहारणपूरच्या “तीन भावांनी”!

बालपणापासून एकत्र असलेले दोघे बंधू आज एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकत होते. घट्ट मुठीतून वाळूचा एक-एक कण सुटावा तसे नात्याचे बंध सैल होत होते. दोघांच्या मनातून तुटलेले नाते प्रत्यक्षात तुटण्याचे कारण शोधत होते अन् ते सापडलं सुद्धा! एडीने एक वाक्य उच्चारलं, The dirty bastards back again.

हे वाक्य त्याने बाँम्ब हल्ल्याच्या संदर्भात वापरलं होतं. नेमका त्याचवेळी रुडी तिथे आला. त्याचा असा गैरसमज झाला, की एडीने त्याला उद्देशून तसं म्हटलं. ‘डॅझलर ब्रदर्स शू फँक्टरी’ या मोठ्या कष्टाने उभारलेल्या लोकप्रिय व्यावसायिक भागीदारीचा शेवट झाला. ते साल होतं १९४७!

जवळपास तीस वर्षांचा कौटुंबिक व व्यावसायिक संसार मोडून दोन सख्खे भाऊ आता वेगळे झाले. सुरुवातीला छोटे वाटणारे गैरसमज किती टोकापर्यंत जातात याचं हे उदाहरण होतं. हे सगळं इथपर्यंतच थांबलं नाही, तर दोघेजण स्वतंत्र झाल्यावरही कायम राहिलं.

 

adolf-and-rudolf-dassler-inmarathi

 

परस्परांच्या खच्चीकरणासाठी, वर्चस्वासाठी, एकमेकांना स्वतःपेक्षा कमी दाखविण्यासाठी ही लढाई सुरुच राहिली.

आपल्या पूर्वानुभवाच्या जोरावर दोघांनी एकच व्यवसाय केला. तो म्हणजे बूट बनवण्याचा! औरिच नदीच्या अगदी आमने-सामने आपापल्या व्यवसायाची उभारणी केली. या दोन भावातील संघर्ष आता सामूहिक गटाचा झाला होता.

एडी डॅझलरने त्याच्या नावाचा शॉर्टफॉर्म करून आदिदास ADIDAS हे नाव त्याच्या कंपनीला दिले. तसंच रुडी डासलर डॅझलरनेही केलं. त्याच्या कंपनीचं नाव रुडा (RUDA) ठेवलं. पण त्यांनी ते नाव अल्पावधीतच बदलून ‘प्युमा’ (PUMA) असं केलं.

संपत्तीच्या वादावरून हे दोघे भाऊ एकमेकांच्या जिवावर उठले नाहीत, तर आपल्या कर्तुत्वाच्या, आत्मविश्वासाच्या, गुणवत्तेच्या जोरावर यशस्वी झाले. तेही स्वतंत्रपणे.

जगभरातील खेळाडूंच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या दोन प्रसिद्ध कंपन्या त्यांच्या उत्पादनासाठी जितक्या प्रसिद्ध आहेत तितक्याच त्यांच्या स्थापनेच्या इतिहासासाठीही प्रसिद्ध आहे.

काय मग मंडळी, आवडला ना हा रंजक इतिहास! मग तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा हा सांगा, आमचं हे आर्टिकल शेअर करून…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?