' मोठा पगार, स्टेटसचा जॉब असलेल्या 'आयटी' सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांच्या व्यथा!

मोठा पगार, स्टेटसचा जॉब असलेल्या ‘आयटी’ सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांच्या व्यथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : व्यंकटेश कल्याणकर

===

एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत तो मागील आठ दिवसांपासून इंटर्नशिपसाठी जॉईन झाला होता. एका बॅंकेच्या प्रोजेक्‍टसाठी ‘यूआय’ तयार करणाऱ्या टीमला अस्टिट करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. टीमसोबत त्याची नुकतीच ओळख होत होती.

प्रत्येकजण आपापल्या कामात एक्‍सपर्ट होता. टीममधला एक मेंबर आज दौऱ्यानिमित्त बाहेर गेला होता. तो आज परतणार होता. तो आला त्यावेळी संपूर्ण टीम एका मिटिंगसाठी गेली होती. फक्त हा नवा पोरा डेस्कवर काम करत होता. मेंबर आला आणि नव्या पोराला हाय-हॅलो करून त्यानं त्याचा कॉम्प्युटर सुरू केला. नाव-गाव वगैरे विचारलं.

 

 

नव्या पोराची थोडी मजा घ्यावी म्हणून त्याने त्याला हाक मारली आणि गप्पा सुरु केल्या. ‘‘चल, तुला एक पझल टाकतो. फक्त प्रोग्रामिंग पझल आहे.’’ नव्या पोराने माईंडला रिफ्रेश केले आणि ‘‘ओके’’ म्हणाला. ‘‘विथआऊट युजिंग थर्ड व्हेरिएबल हाऊ टू एक्‍सचेंज व्हॅल्यूज्‌ ऑफ टू व्हेरिएबल्स’’ मेंबरने सवाल टाकला.

काही क्षण विचार करून नव्या पोराने कागदावर लिहून दाखवले, ‘‘दोन्ही व्हेरिएबलची ऍडिशन पहिल्या व्हेरिएबलला असाईन करून त्या व्हॅल्यू एक्‍सचेंज करायच्या. हे असं’’  म्हणत त्यानं लिहिलेला कागद दाखवला.

a = 2;
b = 3;
a = a + b;
b = a – b;
a = a – b;

‘‘एक्‍सलंट’’ म्हणत मेंबर खूश झाला. तरीही त्याने पुढचा सवाल केला, ‘‘इनपुट केलेल्या एखाद्या भारतीय नावावरून जनरली ते नाव मुलीचे आहे की मुलाचे ठरवता येईल का?’’ त्याने पुन्हा 5-10 मिनिटे विचार केला आणि उत्तर दिले.

‘‘तसे नेमके सांगता येत नाही. पण बहुतांश मुलींच्या नावातील शेवटचे अक्षर हे व्हॉवेल अर्थात स्वर असते. त्यामुळे शेवटचे अक्षर आयडेंटिफाय करून ते चेक करून व्हॅलिडेट करता येऊ शकेल. पण ते 100 टक्के बरोबर असणार नाही. कारण काही नावांना हा प्रोग्राम अपवाद ठरू शकेल’’ त्याने आपले उत्तर दिले. आता

मात्र मेंबर अधिकच खूश झाला. आणि, ‘‘चल, मला कॉलेजच्या लाईफची आठवण करून दिलीस. खाली टपरीवर जाऊन चहा पिऊ’’ दोघेही खाली टपरीवर आले.

मेंबरने त्याला आवड-निवड विचारली. नव्या पोराला बऱ्याच आवडी निवडी होत्या. तो हुशारच होता. आता त्यांच्यात दोस्ती निर्माण होत होती. ‘‘तुम्ही तर बऱ्याच वर्षांपासून येथे आहात. तुमच्याकडे फोर व्हिलर असेल, बंगला असेल, महिन्याला पगारही जमा होतो. एसीमध्ये आवडीचं अन्‌ इंटरेस्टिंग काम. तुम्ही खूप सुखी आणि समाधानी असाल ना?’’ असा सवाल करत नव्या पोराने मेंबरच्या नेमक्‍या मर्मावर बोट ठेवले.

त्यानंतर काही मिनिटे शांततेतच गेली. आणि मेंबर आपली व्यथा सांगू लागला, ‘‘अरे, सुखी आहे, खूप सुखी आहे. पण ते जगाला दाखवण्यासाठी. महिन्याला 50-60 हजारापेक्षा जास्तच पैसे पडतात पगार म्हणून. पण खर्चही तेवढाच. कर्जाचे हप्ते, लाईफ स्टाईल मेंटेनन्स वगैरे वगैरे.

 

 

शिवाय सतत माणसाला समजेल अशी नव्हे तर मशिनला, कॉम्प्युटरला समजेल अशा भाषेत प्रोग्राम लिहायचा. त्यातच दररोज काय काय नवीन येते त्याचे अपडेटस्‌ ठेवायचे. वर तुमच्यासारखी नवीन कमी पगारात काम करणारी हुशार पोरं आली की आणखी सावध रहावं लागतं’’ त्याला मध्येच थांबवत नवा पोरा म्हणाला, ‘‘पण तुम्हाला वेळेचं काही बंधन नसतं ना?’’

मेंबर पुन्हा व्यथा सांगू लागला, ‘‘कदाचित ते असतं तर बरं झालं असतं. मात्र तसं नाहीए. आम्हाला प्रोजेक्‍ट पूर्ण करण्याचं टार्गेट असतं. कमी वेळ आणि जास्त काम. त्यामुळे दररोजच ओव्हर टाईम काम करावं लागतं. शिवाय अंतिम टप्प्यात तर प्रत्यक्ष आयुष्यातले “एरर’’ दूर ठेऊन प्रोग्राममधले “एरर’’ शोधत कधी कधी 30-30 तासही बसावं लागतं.

घर, ऑफिस, प्रवास सगळीकडे कॉम्प्युटरच्या लॉजिकचा विचार करावा लागतो. माणसांशी केवळ आभासी जगातूनच भेटता येतं. प्रत्यक्ष भेट फार कमी वेळा होते. त्यामुळे इतरांचे गैरसमजही होतात.’’

 

 

आता नवा पोराही समजू लागला होता. त्याने आता एक शेवटचा प्रश्‍न विचारायचं ठरवलं, ‘‘मग, एवढं सगळं असताना तुम्हाला दुसरी संधीही मिळत असेल ना! तुमच्यापैकी बरेच जण अमेरिकेतही जातात. काही जण काही वर्षे नोकरी करून पैसे कमवून सोडून देतात’’ त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या.

त्यामुळेच मेंबरही अगदी मनातून उत्तरे देत होतो. मेंबर म्हणाला, ‘‘खरं आहे. नोकरी बदलू शकतो. परदेशी जाऊ शकतो. सोडूनही देऊ शकतो. पण ते ‘ऐट’ म्हणून ‘‘आयटी’’त नोकरी करणाऱ्यांसाठी ठीक आहे. आपल्यासारख्या सॉरी माझ्यासारख्या ‘पगारा’ची वाट पाहत महिना काढणाऱ्यांसाठी नाही.

कारण, महिन्याला कर्जाच्या हप्त्याची टांगती तलवार माझ्यावर लटकलेली असते. नोकरी बदलायला किंवा बाहेरच्या देशात जायला काहीतरी परफॉर्मन्स दाखवावा लागतो. त्यात पुन्हा ‘‘पॉलिटिक्‍स वगैरे…’’ पुन्हा काही काळ शांतता पसरली.

 

 

‘‘पण एवढं करूनही तुम्ही दोन वेळा सुखाची भाकरी एसीमध्ये बसून खाऊ शकता ना? मी तर मेरिटवर इंजिनिअरिंगला आलो. घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे एखादं दिवशी जर मेसला सुटी असेल तर उपाशीही रहावं लागतं‘’ नवा पोराची उत्सुकता ताणली.

त्यावर मेंबर पुन्हा बोलू लागला, ‘‘पण माझ्या कॉलेजच्या दिवसात असाच काहीवेळा उपाशी झोपलो आहे. मजा यायची तेव्हा. आता ‘एसी’त बसलो तरी ‘‘मेस’’मधील मित्र-मैत्रिणींसोबतच्या जेवणाची रंगत नाही येत. तुला एक सल्ला देतो. ऐकायचं का नाही ते तू ठरव.

इथं नक्की जॉईन हो. पण काही वर्षांसाठी. कर्जाच्या चक्रात अडकून राहून एसीमध्ये पिझ्झा खाण्यापेक्षा गावाकडे आईच्या हातची चुलीवरची भाकरी आयुष्यभर खाऊ शकशील एवढेच पैसे कमव. आणि आयुष्य जगायला शिक‘’ मेंबरने सहजपणे मोठा संदेशच नव्या पोराला दिला होता.

चहा पिऊन दोघेही पुन्हा ऑफिसच्या दिशेने निघून गेले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?