' कुंती – द्रौपदीची पाककला परीक्षा : पाणीपुरीचा असाही महाभारतकालीन इतिहास… – InMarathi

कुंती – द्रौपदीची पाककला परीक्षा : पाणीपुरीचा असाही महाभारतकालीन इतिहास…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

पाणीपुरी‘ हा पदार्थ प्रत्येकाच्या आवडीचा आहे. भारताने जगाला दिलेल्या चविष्ट पदार्थांपैकी एक म्हणजे पाणीपुरी म्हणता येईल. दिसायला तसा सोपा, पण तरीही प्रत्येक व्यक्तीने बनवलेली पाणीपुरी ही चवीला वेगळी असते हे खादाड मंडळी लगेच मान्य करतील.

पाणीपुरी खायला गेल्यावर त्या विक्रेत्याची ‘गती’ यावरून सुद्धा त्याचे ग्राहक ठरत असतात. तो किती पटकन कांदा चिरतो, पाणी तिखट किंवा गोड करून देतो, एकाच वेळी पाच-सहा लोकांना पुरी सर्व्ह करतो, मोजतो आणि हे सगळं करताना नेहमी स्माईल करतो या काही गोष्टी त्या विक्रेत्याकडे गर्दी करत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पाणीपुरी ही गाडीवर मिळणाऱ्या इतर पदार्थांपेक्षा लोकप्रिय का? याचं कारण त्याची प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे बदलू शकणारी चव हे सुद्धा असेल. इतर कोणतेही पदार्थ जसं की समोसा, वडापाव हे एकदा तिखट झाले की तिखट किंवा खारट झाले की खारट असतात, पण पाणीपुरी मात्र खाणाऱ्या व्यक्तीच्या आवडीनुसार बदलू शकणारी असते.

 

panipuri-inmarathi02

 

त्यामुळेच कोणत्याही गाड्यावर “भैय्या, थोडी तिखी पानीपुरी बनाओ” किंवा “सुकी पुरी पर मसाला कम देना” किंवा “थंड पाणीपुरी मिळेल का?” असे सगळे प्रयोग रोज सुरू असतात. इतर वेळी ‘भैय्या’ लोकांना नावं ठेवणारे लोकसुद्धा त्यांच्याच गाड्यावर पाणीपुरीचा मनसोक्त आस्वाद घेतांना आपण बघत असतो.

आपल्या सर्वांना भुरळ घालणाऱ्या या पाणीपुरीची सुरुवात कुठून झाली असेल? कोणत्या व्यक्तीचा हा प्रयोग असेल जो की सातासमुद्रापार गेला आहे आणि चवीने खाणाऱ्यांना इतका आनंद देत आहे? याबद्दल उपलब्ध असलेल्या माहितीचं संकलन सादर करत आहोत.

सुरुवात कुठून झाली?

 

panipuri-inmarathi

पाणीपुरीची सुरुवात जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं ‘फ्लॅशबॅक’ मध्ये जावं लागेल. फार वर्षांपूर्वी भारतवर्ष मध्ये ‘मगध’ नावाचं एक राज्य होतं. गंगा नदीच्या तीरावर वसलेल्या या राज्याची ‘पाटलीपुत्र’ ही राजधानी होती.

असं सांगितलं जातं, की मगध राज्यातील एका व्यक्तीने आपल्या राजाला ‘काही तरी वेगळं’ देण्यासाठी ‘फुलकी’ या नावाने पाणीपुरीसारखा पदार्थ तयार केला होता.

त्या काळात ‘चितबा’, ‘पिथथो’, ‘तीलबा’ हे काही लोकप्रिय स्नॅक्स उपलब्ध होते असा उल्लेख ग्रीसच्या इतिहासकार ‘मगस्थेनेस’ने आपल्या पुस्तकात केला आहे.

पाणीपुरीचा जन्म हा हस्तिनापुरमध्ये झाला असा पण एक उल्लेख आहे. ‘चाट’ म्हटलं, की आपल्याला जसं दिल्लीचं नाव समोर येतं त्या संदर्भाने आपण याकडे बघू शकतो.

 

pani puri inmarathi

 

दिल्ली आणि हस्तिनापूर (उत्तर प्रदेश)चं अंतर हे केवळ १२५ किलोमीटर आहे. हस्तिनापूरमध्ये झालेला पाणीपुरीचा उगम याचा पुरावा कोणाकडेच नाहीये, पण तिथल्या भागात एक कथा फार प्रचलित आहे. एक गंमत म्हणून आपण ही कथा वाचू शकतो:

महाभारतामध्ये द्रौपदीचं जेव्हा पाच पांडवांसोबत लग्न झालं, तेव्हा कुंतीने तिच्या स्वयंपाक कौशल्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. कुंतीला हे पण बघायचं होतं, की कमीत कमी गोष्टी असतांना द्रौपदी कसा रुचकर पदार्थ तयार करू शकते का?

कुंतीने द्रौपदीला बटाट्याची भाजी आणि गव्हाचं पीठ दिलं आणि त्यापासून काही तरी ‘वेगळं’ तयार करण्यास सांगितलं ज्यामुळे पाचही पांडवांची भूक भागेल. आजच्या सारखे तेव्हा रेसिपी चॅनल्स तर तेव्हा अर्थातच नव्हते. मग काय? नववधूने कणिक मळली आणि त्याचे गोल करून ‘पुरी, बटाट्याची भाजी आणि पाणी’ ही डिश सर्वांना ऑफर केली.

सर्वांना हा प्रयोग आवडला आणि कुंतीने आपल्या सुनबाईला परीक्षेत उत्तीर्ण म्हणून घोषित केलं आणि हा पदार्थ हस्तिनापूरचे लोक सुद्धा करू लागले.

प्रयोग म्हणून तयार झालेल्या या पदार्थात कालांतराने बदल होत गेले आणि पाण्याची जागा चिंचेच्या पाण्याने घेतली, खमंग आवडणाऱ्या लोकांनी त्यात तिखट पाण्याची भर टाकली आणि असं करत करत एक रुचकर पदार्थ तयार झाला आणि त्याने इथपर्यंत प्रवास केला.

या कथेबद्दल कोणताही पुरावा नाहीये, तेव्हा पाणीपुरीच्या पुरीप्रमाणे या कथेला सुद्धा ‘हलक्यानेच’ घ्यावे ही विनंती आहे.

आपल्या लाडक्या पाणीपुरीला प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने ओळखलं जातं. उत्तर भारतात ‘गोलगप्पा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पदार्थाला ‘गुपचूप’, ‘पानी के पताशे’ किंवा ‘फुलकी’ या नावाने सुद्धा ओळखलं जातं.

 

panipuri-inmarathi04

 

पाणीपुरी तयार करण्याच्या पद्धतीत सुद्धा प्रत्येक राज्यात फरक बघायला मिळतो. महाराष्ट्रात काही ठिकाणी ‘गरम रगडा’ हा पाणीपुरीमध्ये बटाट्या सोबत दिला जातो, तर गुजरातमध्ये मुगाच्या डाळीचं वरण हे पुरीमध्ये दिलं जातं. कर्नाटकात पुरीमध्ये कांदा चिरून दिला जातो, जो आपल्याकडे वेगळा दिला जातो.

मध्यप्रदेशच्या होशंगाबादमध्ये पाणीपुरीला ‘टिक्की’ या नावाने ओळखलं जातं, तर ‘टिक्की’ हे नाव उत्तर भारतात बटाट्याच्या कुरकुरीत पॅटिसला देण्यात आलं आहे.

पश्चिम बंगाल मध्ये पाणीपुरीला ‘पुचका’ हे नाव देण्यात आलं आहे. हलक्या पुरीचा लगेच होणारा चुरा यामुळे हे नाव दिलेलं असावं असं म्हणतात.

 

panipuri-inmarathi03

 

इतिहास काहीही असो, ‘पाणीपुरी ही आपली आवडती डिश आहे’ हे निर्विवाद आहे. ऑफिस मधून निघाल्यावर बस स्टॉपकडे जातांना किंवा कार चालवताना रस्त्यालगत असलेल्या गाडीवर ती रोज विराजमान असते आणि आपल्याला बोलवत असते आणि आपली पाऊलं तिकडे वळत असतात.

पाणीपुरी ही गाडीवरची असो किंवा कधी घरात आपण मसाला आणून तयार केलेली असो, प्रत्येकवेळी ती आपल्याला तितकाच आनंद देत असते. शोध लावणाऱ्या व्यक्तीचे आभार मानावेत तितके कमीच आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?