' आव्हान ‘व्हॅक्सिन हेजिटन्सी’चं! लसीकरणाची मोहीम फत्ते करण्यासाठी हे आहे गरजेचं! – InMarathi

आव्हान ‘व्हॅक्सिन हेजिटन्सी’चं! लसीकरणाची मोहीम फत्ते करण्यासाठी हे आहे गरजेचं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : स्वप्निल श्रोत्री

===

एके काळी गुहेत राहणार्‍या मानवाने बुद्धीच्या जोरावर आजचे विश्व उभे केले आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यात अनेक नवीन शोध लागले. काळानुरूप मानवाने या गोष्टी आत्मसात केल्या, परंतु कोणताही नवीन शोध लागल्यावर माणवाने तो सहजासहजी मान्य केला आहे. असे इतिहासात फार क्वचितच सापडते.

नोवल करोना महामारीचाचा जगभर उद्रेक होऊन एक वर्षांहून जास्त काळ उलटून गेला आहे, ह्या महामारीत करोडो लोक बाधित होऊन लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. शिवाय आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक नुकसान झाले ते वेगळेच.

अशावेळी जगभर पसरलेल्या या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीची आवश्यकता भासू लागली. त्यासाठी जगभरातील वैज्ञानिक कामाला लागले. शेवटी अनेक प्रयत्नांअंती लस बाजारात आली.

 

covid vaccine inmarathi

 

भारतात कोरोना लसीकरणाला दि. १६ जानेवारी पासून सुरुवात झाली. अमेरिकेपाठोपाठ दुसरी सर्वात मोठी कोरोना बाधितांची संख्या असलेल्या भारतात लसीकरणाला पहिल्या दिवसापासून उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली.

हाती आलेल्या आकडेवारीनुसार तमिळनाडूत पहिल्या दिवशी नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी फक्त १६ टक्के लोकांनी लस टोचून घेतली, तर इतरांनी लस घेण्यास नकार दिला. केरळ आणि महाराष्ट्रातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.

तमिळनाडू,केरळ, महाराष्ट्र ही देशातील विकसित राज्ये म्हणून ओळखली जातात. अशा राज्यांमध्ये लसीकरणाला जर अत्यल्प प्रतिसाद मिळत असेल तर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांची परिस्थिती काय असेल याची कल्पना न केलेलीच बरी.

भारताला लसीकरण हे काही नवीन नाही. अनेक मोठ्या आजारांवर भारताने लसीकरणाने मात केली असून त्यासाठी विशेष ‘ कॅम्पेन’ देशभर राबवले गेले आहेत. ‘दो बुंद जिंदगी के’च्या माध्यमातून भारत सरकारने देशभर जनजागृती करून भारताला ‘पोलिओ मुक्त’ देश बनविले.

 

polio vaccine inmarathi

 

याशिवाय डायरिया,कॉलरा, टायफाईड अशा इतर अनेक आजारांवर देशात यशस्वीपणे लसीकरण झालेले असून नागरिकांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिला आहे.

आताची परिस्थिती वेगळी आहे. आताचे युग हे समाज माध्यमांचे युग आहे. काही समाजकंटक अफवा, चुकीच्या बातम्या जाणून बुजून समाजात पेरत असतात. परिणामी, नागरिकांच्या मनात एखाद्या सरकारी उपक्रमाबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या संस्थेबद्दल काल्पनिक भीती तयार होते. नागरिकांचे जितके सहकार्य अपेक्षित असते, तितके ते मिळत नाही.

जनजागृती आवश्यक

 

covid vaccine inmarathi

 

भारतीय लसीकरणाचा पूर्व इतिहास पाहता, भारत सरकारने लसीकरणात सुरुवात करण्याआधी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक होते. टेलिव्हिजन, वर्तमानपत्रे, रेडिओ, पथनाट्य घरोघरी जाऊन पत्रके वाटणे, सामाजिक माध्यमे, टेलिफोन मोबाईल इ. माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचून लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे.

नागरिकांचा सर्वोत्तम प्रतिसाद हवा असेल तर नागरिकांच्या लसीकरणाबाबत असलेल्या शंकांचे व समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.

भारतात लसीकरणाला सुरुवात होऊन साधारणपणे दहा दिवस उलटले असून अजूनही वेळ गेलेली नाही. नियोजनबद्ध आणि पद्धतशीर प्रयत्न भारताला १०० टक्के लसीकरणापर्यंत घेऊन जावू शकतात.

माध्यमाने जबाबदारीचे भान बाळगणे आवश्यक

माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधले जाते. अनेक अर्थांनी ते योग्यच आहे, परंतु अलीकडच्या काही काळात माध्यमे आपली जबाबदारी विसरलेली दिसतात.

लसीकरण केलेल्या दोन व्यक्तींच्या मृत्यूनंतर माध्यमांनी जो उच्छाद मांडला तो लाजीरवाणा होता. कोणतीही शहानिशा न करता, कोणतीही माहिती न घेता, कोणतीही शहानिशा न करता सदर २ व्यक्तींचा मृत्यू हा कोरोनाची लस घेतल्याने झाला असल्याचे जाहीर करून देशातील माध्यमांनी दिवसभर ‘टॉक – शो’ केले.

दुसऱ्यादिवशी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर सदर व्यक्तींचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे निष्पन्न झाले. देश संकटात असताना देशाच्या बाजूने माध्यमांनी उभे राहणे अपेक्षित असते. सरकारचे जेथे चूकते तेथे चूक दाखवून देणे व जेथे बरोबर आहे तेथे सरकारच्या बाजूने उभे राहणे म्हणजे खरी पत्रकारिता.

व्हॅक्सिन हेजिटन्सी म्हणजे काय?

 

covid vaccine inmarathi2

 

कोणत्याही एका आजारावर तयार झालेली लस नागरिक भीतीपोटी घेण्यास नकार देतात त्याला व्हॅक्सिन हेजिटन्सी असे म्हणतात. मग ही भीती सामाजिक, धार्मिक किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी असू शकते.

भारत हे लोकशाही प्रधान राष्ट्र असून लोकशाहीत चर्चेला महत्व असते. नागरिकांच्या आयुष्याशी निगडित कोणताही उपक्रम राबविताना नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणात देशातील नागरिकांचा जास्तित जास्त सहभाग असेल तरचं हे लसीकरण यशस्वी होईल अन्यथा नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?