' निसर्गाच्या सानिध्यातील स्वयंभू शिवशंकर! रत्नागिरीतल्या नयनरम्य मंदिराला भेट द्याच – InMarathi

निसर्गाच्या सानिध्यातील स्वयंभू शिवशंकर! रत्नागिरीतल्या नयनरम्य मंदिराला भेट द्याच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात जितके देव आहेत, तितक्याच पुराणातल्या कथा आहेत. प्रत्येक देवतेच्या विविध कथा आहेत. भारतीय पुराणात असं मानलं जातं, मानवी जीवनाचे तीन टप्पे मानले जातात, उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणजे जन्म, जीवन आणि मृत्यू. यापेक्षा चौथी गती कोणतीही नाही.

बघा, आपण जन्मतो, जगतो आणि मरुन जातो. या तीन टप्प्यांना सांभाळणारे देव वेगळे आहेत. ब्रह्मा- विष्णु- महेश.. ब्रह्मा उत्पत्ती करतो, विष्णू पालन करतो आणि महेश लय अर्थात मृत्यू करतो.

शंकराच्या भोळ्या स्वभावामुळे त्याचे नाव भोळा सांबही आहे. अतिशय रागावलेला शंकर थोड्याशा स्तुतीने विरघळून भक्ताला हवे ते वरदान देताना मागचा पुढचा विचार न करता मागेल ते देतो. मग रावणाला दिलेलं आत्मलिंग असो, की भस्मासुराचा दिलेल्या वराची कथा. रागाच्या भरात तिसरा डोळा उघडून मनाला जाळून भस्म करणारा शंकर रतीच्या विनवण्यांनी विरघळून त्याला पुन्हा जिवंत पण करतो.

 

shiva 3 InMarathi

 

थोडक्यात काय, तर साधा भोळा शंकर हा सहज पावणारा देव आहे. दागदागिने, रेशमी पितांबर असं काहीही न घालता वाघाचं कातडं वस्त्र म्हणून धारण करणारा, स्मशानातील राख अंगाला लावणारा हा अगदी साधा देव.

त्याच्या मंदिरांची संख्याही जास्त आहे आणि विशेष म्हणजे ही मंदिरे गावाबाहेर किंवा डोंगरावर आहेत. म्हणजे तुम्हाला देवाला जायचं असेल तर थोडेसे का होईना कष्ट करण्याची तयारी हवी. शंकराची जितकी मंदिरं आहेत त्या तुलनेत विष्णू आणि ब्रह्मा यांची मंदिरे कमी आहेत.

===

हे ही वाचा : भारतातील २०० वर्ष जुनं शिवमंदिर या प्राण्याच्या ‘पाठीवर’ उभं आहे!

===

खिद्रापूरचा कोपेश्वर असो, की काशीचा काशी विश्वेश्वर. बारा ज्योतिर्लिंग मंदिरे शंकराचीच आहेत. काही माणसाने बनवली, बांधली.. तर काही स्वयंभू आहेत. कितीतरी शिवलिंगं स्वयंभू आहेत. यापैकी एक मंदिर आहे मार्लेश्वर!

कोल्हापूरहून गणपतीपुळ्याला जाताना हे मंदिर लागते. कोल्हापूरपासून अंदाजे ९३ किलोमीटर अंतरावर हे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे. गुहेत असलेलं‌ हे शिवाचं मंदिर कधी बांधलं याचा उल्लेख कुठंही सापडत नाही.

हिरवाईने वेढलेलं हे मंदिर अतिशय नयनरम्य परिसरात आहे. पावसाळ्यामध्ये हे निसर्ग सौंदर्य अजूनच खुलून दिसतं. सह्याद्रीच्या कडेकपारीत असलेला अंबा घाट. पावसाचं विपुल प्रमाण आणि असलेलं सृष्टी सौंदर्य…अंबा घाटातील लहान मोठे धबधबे आणि हे मार्लेश्वराचं मंदिर यांनी हा परिसर खूप रम्य आणि पवित्र बनला आहे.

 

marleshwar inmarathi2

 

मार्लेश्वर मंदिरात पोहचण्यासाठी जवळपास ३०० ते ५०० पायऱ्या चढून जावं लागतं. जर का तुम्ही या परिसरातील निसर्ग सौंदर्य अनुभवायला जाऊ इच्छित असाल तर सप्टेंबर महिन्यात ठरवा.. तोच काळ उत्तम! कारण हा भाग कोकणपट्टीमध्ये आहे आणि इथं पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. तो केवळ कोकणातील लोकच सहन करु शकतात.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात इथला ऋतू अतिशय सुखद असतो. पाऊस कमी झालेला असतो. सुखद गारवा असतो आणि नुकताच पावसाळा होऊन गेल्यामुळे डोंगर हिरवाईने नटलेले असतात.

मार्लेश्वराचं मंदिर बघायला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा.. इथं शिवलिंगाभोवती, गुहेत, मंदिरात साप सहजपणे फिरत असतात. घाबरुन जाऊ नका… आजवर कसलीही दुर्घटना घडली नाही. कुणालाही सापानी दंश केला आणि कुणी मेलंय असं ऐकीवात नाही.

मकर संक्रांतीच्या वेळी मार्लेश्वर गावात मार्लेश्वर आणि गिरीजा देवी म्हणजे शंकर पार्वती यांचा विवाह सोहळा दरवर्षी उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. श्रावण महिना, नागपंचमी आणि महाशिवरात्री या काळात खूप भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.

मार्लेश्वरचा धबधबा-

 

marleshwar inmarathi

 

बाव नदीत उगमस्थान असलेला हा धबधबा मार्लेश्वर किंवा धारेश्वर धबधबा म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात असणारा झकास धबधबा असंच या धबधब्याचं वर्णन. या धबधब्याचे पाणी औषधी गुणधर्म युक्त आहे असं मानलं जातं.

या पाण्यात गंधकाचा अंश आहे. बरेचसे त्वचारोग या पाण्यामुळे कमी होतात अशी मान्यता आहे. हे पाणी तहान लागली तर प्यायला हरकत नाही, पण तुम्ही बाटलीत भरून नेलं तर नंतर त्याची चव कडू झालेली असते. धबधब्यानं या मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय आणि आकर्षक बनला आहे.

===

हे ही वाचा : चमत्कारिक : या अद्भुत मंदिरात गेली ९ वर्ष फक्त पाण्याने दिवा लावला जातोय

===

मार्लेश्वरला कसे जाल?

 

marleshwar inmarathi1

 

तुमची स्वतःची गाडी असेल तर कोल्हापूर पासून ९३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्लेश्वरला जाण्यासाठी तुम्ही कोल्हापूर ते पन्हाळामार्गे अंबाघाटात जाऊ शकता आणि मार्लेश्वरला पोहोचू शकता.

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर रत्नागिरी येथे जाणाऱ्या बसेसची सोय आहे. तिथून तुम्ही बसनेही जाऊ शकता. काही लोक रत्नागिरी येथे जाताना देवरुखला उतरतात. मार्लेश्वर पासून १५ किलोमीटर अंतरावर हा फाटा आहे, पण तो फार लांबचा प्रवास होतो. त्यापेक्षा पन्हाळा मार्गे जाणं केव्हा ही चांगलं.

खरंच एकदा जाऊन तो निसर्गाच्या शांत सानिध्यात असलेला शिवशंकर मार्लेश्वर नक्की बघा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?