' माउंट एव्हरेस्ट: नाव परदेशी असलं, तरी एका भारतीयाने त्याला ‘मोठं’ केलंय! – InMarathi

माउंट एव्हरेस्ट: नाव परदेशी असलं, तरी एका भारतीयाने त्याला ‘मोठं’ केलंय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगातलं सर्वोच्च शिखर म्हणून ओळख असणार्‍या माऊंट एव्हरेस्टला गिर्यारोहकांच्या जगतात विशेष महत्व आहे. या पर्वत शिखराचं नाव हिंदुस्थानचे सर्वे जनरल असणार्‍या सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नावावरून देण्यात आलं आहे. मात्र याला सर्वोच्च ठरविण्यासाठी त्याची उंची मोजलेली व्यक्ती अजूनही फारशी कोणाला माहित नाही!

नेपाळ, चीन आणि तिबेट यांच्या सीमेजवळ असणारा माऊंट एव्हरेस्ट हा निसर्गाचा एक चमत्कार म्हणजे हिमालयाची शान आहे. ८,८४८.८६ मीटर (२९,०३१.६९ फूट) उंची असलेलं, जगातलं सर्वात उंच पर्वतशिखर, म्हणून ज्या हिमालायाच्या पर्वतराजीची ओळख आहे तो माऊंट एव्हरेस्ट अनेकांना भुरळ पाडतो.

 

mount-everest-inmarathi

 

माऊंट एव्हरेस्ट सर करणं हे एखाद्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवणं यासाठी वाक्प्रचार म्हणून वापरलं जाण्याचं कारण त्याची उंची हेच आहे.

एव्हरेस्ट सर करणं हे अर्थातच अत्यंत कठीण काम आहे. सतत बदलणारं हवामान, चढाईला कठीण असे सुळके, हिमवादळांचा धोका, ऑक्सिजनचं विरळ असणं या सगळ्या कारणांमुळे एव्हरेस्ट चढायचं तर कष्टही तितकेच घ्यावे लागतात आणि चिकाटीही असावी लागते. त्यातल्या त्यात सोपा समजला जाणारा मार्ग, साऊथ कोल हादेखील भल्याभल्या गिर्यारोहकांना जेरीस आणतो.

जगातील सर्वात उंच असं हे शिखर सर करण्याचं स्वप्न जगातल्या प्रत्येक गिर्यारोहकाचं असतं. यासाठी अक्षरश: भरमसाठ किंमतही मोजली जाते (एका मोहिमेचा अंदाजे खर्च- २५ हजार डॉलर्स माणशी). हे शिखर सर्वात उंच असलं तरीही K2 किंवा कांचगंगा यांच्या तुलनेत कमी अवघड आहे.

इथली खरी परीक्षा असते ती खराब हवामान. यामुळेच आजवर मोहिमेदरम्यान अनेक गिर्यारोहक मृत्यूमुखी पडले आहेत. या शिखरावर सर्वात पहिली चढाई एडमंड हिलरी आणि भारतीय-नेपाळी असणार्‍या शेरपा तेनसिंग नोर्गे यांनी केली.

 

edmand-hillary-tensing-norgay-inmarathi

 

ब्रिटिश राजवटीत १८५६ साली भारतीय सर्वेक्षण विभागानं घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणात या शिखराची उंची निश्चित करण्यात आली. यापूर्वी हे शिखर पीक एक्सव्ही या नावानं ओळखलं जात असे. या सर्वेक्षणात राधानाथ सिकदर यानी सिध्द केलं की याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे आणि हे हिमालयाचे पंधरावे शिखर जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे.

हे सुद्धा वाचा – एव्हरेस्ट विजेत्या तेनसिंगच्या प्रत्यक्ष भेटीचा असाही अनुभव!

या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथ यांचा सत्कार केला. मात्र त्यावेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे मुख्य अधिकारी असणार्‍या (सर्वेयर जनरल) ॲण्ड्र्यु वॉ यांनी आपल्या १८४३ मधेच निवृत्त झालेल्या साहेबाचं, सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचं नाव या शिखराला दिले.

 

george-everest-inmarathi

 

सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या देखरेखीखाली या त्रिमितीय सर्वेक्षणाचं काम चालू झालं होतं. १८६५ पासून हे शिखर एव्हरेस्ट शिखर म्हणून जगभरात ओळखलं जाऊ लागलं.

भारतातील उष्ण तापमान ब्रिटिश अधिकार्‍यांना सहन व्हायचं नाही. इथल्या हैराण करणार्‍या उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी ब्रिटिशांनी इथल्या हिलस्टेशन्सचा आसरा घेतला. याच कारणामुळे भारतातली अनेक हिल स्टेशन्स ब्रिटिशांनी शोध लावलेली आहेत.

म्हणूनच बहुतेक थंड हवेची ठिकाणं आणि तिथली भेट देण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं ब्रिटिश अधिकार्‍यांच्या नावानंच ओळखली जाऊ लागली. विशेष म्हणजे, आजही ती त्याच नावांनी ओळखली जातात.

ब्रिटिश भारतातून जाऊन एका पिढी इतका काळ आता उलटला आहे मात्र आजही ही सर्व ठिकाणं ब्रिटिशांच्या नावांनीच ओळखली जातात. म्हणजे देशातून ब्रिटिश गेले तरीही जाताना त्यांची भाषा आणि हिलस्टेशनच्या रुपानं त्यांच्या पक्क्या खुणाही कायमच्या ठेवून गेले आहेत.

 

matheran-toy-train-inmarathi

 

एव्हरेस्टच्या बाबतीत सुद्धा काहीसं असंच झालं. त्रिमितीय समितीचं काम चालू असण्याचा तो काळ होता, १८५२ मधील. एका सकाळी राधानाथ सिकदर, घाईनं सर ॲण्ड्र्यु वॉ यांच्या ऑफिसमधे आले. त्यांचा चेहरा अत्यानंदानं चमकत होता.

त्यावेळी त्यांनी एका दमात त्यांच्या साहेबाला सांगितलं, “सर मी जगातलं सर्वात उंच पर्वतशिखर शोधलं आहे” व्यवसायानं गणितज्ज्ञ असणारे राधानाथ तत्कालिन ब्रिटिशराजमधील सर्वेक्षण खात्यात काम करत होते.

तत्कालिन सरकारनं हिमालयातील शिखरांची उंची मोजण्यासाठी भूगोलतज्ज्ञ आणि गणितज्ज्ञ यांचा अभ्यासगट नेमला होता. या प्रकल्पाचं नाव होतं, द ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सर्व्हे (महा त्रिकोणमितीय सर्वेक्शण). राधानाथ हे या अभ्यास गटात सहभाग असणारे एकमेव भारतीय होते.

कोण होते राधानाथ?

राधानाथ सिकदर यांचा जन्म १८१३ साली कोलकत्त्यात झाला. लहानपणापासूनच त्यांना गणित विषयात विशेष रुचि होती. त्रिकोणमिती हा विषय त्यांचा विशेष लाडका! गणितावर त्यांचे लेखही प्रसिध्द होत असत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पुढे ब्रिटिश सरकारनं त्यांना त्रिमितीय समितीत सहभागी करून घेतलं.

भारतीय सर्वेक्षण खात्यात प्रगणक या पदावर ते रूजू झाले तेव्हा ते एकमेव भारतीय तर होतेच, शिवाय त्यावेळेस त्यांचं वय होतं अवघं १९ वर्षं.

त्यांची या क्षेत्रातील गती आणि ज्ञान इतकं थक्क करणारं होतं की देशातच नाही तर विदेशातही त्यांचा हात धरू शकणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. भारतीय सर्वेक्षण खात्यातील अनमोल रत्न असा त्यांचा गौरवानं उल्लेख होऊ लागला.

 

radhanath-sikdar-inmarathi

 

हवामान आणि भौतिकशास्त्र या क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केलं. वेधशाळेच्या कार्यपध्दतीत बदल करून हवेच्या दाबाच्या आकड्यांचे शून्य अंश सेल्सिअस तापमानासाठी रूपांतर करण्यासाठी म्हणून गणिती सूत्र शोधलं.

खरंतर एव्हरेस्ट या शिखराला राधानाथांच्या नावानं ओळखलं जाणं जास्त योग्य होतं. तत्कालिन सरकारनं जरी एव्हरेस्ट यांचा सन्मान म्हणून या शिखराला त्यांचं नाव दिलं असलं, तरीही हे श्रेय पूर्णार्थानं राधानाथ यांनाच द्यायला हवं.

हे सुद्धा वाचा – एव्हरेस्ट शिखर दोनदा सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिलेची थरकाप उडवणारी कथा

या गोष्टीची दखल घेत भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकाळात या शिखराचं नाव बदलून माउंट सिकदर करावं असं ठरवलं होतं. तसा प्रस्तावही त्यांनी मांडला होता. पुढे हा प्रस्ताव बारगळला आणि त्यानंतरच्या सरकारनी याबाबतीत फारसा उत्साह न दाखवल्यानं सिकदर हे नाव आजही अज्ञानात आहे.

 

atal-bihari-vajpayee-inmarathi

 

त्रिमितीय समितीच्या स्थापनेच्या द्विशताब्दीच्या निमित्तानं सिकदर आणि तेनसिंग यांचं पोस्ट तिकिट काढून २७ जून २००४ साली अंशत: दखल घेतली गेली. मात्र, आजवर माउंट एव्हरेस्ट हे नाव बदलून त्याचं माउंट सिकंदर असं नामकरण मात्र झालं नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?