' बिकिनीवर चक्क ‘टिकली-गजरा’; संस्कृती जपत तिने गाजवलं भारताचं नाव! – InMarathi

बिकिनीवर चक्क ‘टिकली-गजरा’; संस्कृती जपत तिने गाजवलं भारताचं नाव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर #NoBindiNoBusiness नावाचं वादळ घोंगावतं होत. ‘ती’ची टिकली हा केवळ अलंकार की तिची ओळख असा प्रश्न काहींनी उपस्थित केला तर काहींनी या वादळाला रोखण्याचाही पुरेपुर प्रयत्न केला.

मतमतांतरे काहीही असो हा विषय सध्या वा-याच्या वेगाहूनही अधिक वेगाने प्रवास करून व्हायरल झाला होता.  मात्र टिकलीवरून गदारोळ होण्याचं हे काही पहिलं प्रकरण नाही. यापुर्वीही अनेकदा या छोट्याशा टिकलीनं समाज ढवळून निघाला होता.

खोटं वाटतंय? मग हा लेख तुम्ही वाचायलाच हवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हल्ली मुलींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावं यासाठी पालकांकडूनच नव्हे, तर संपूर्ण समाजातून प्रोत्साहन दिलं जातं. आपली मुलगी फॅशनविश्वात प्रसिद्ध होताना पाहून पालकांचे डोळे पाणावतात, ऊर अभिमानाने भरून येतो आणि समाजातील सर्वच स्तरातून तिची पाठ थोपटली जाते.

मात्र ही कथा त्या काळातील आहे, ज्या काळात मुलींनी रॅम्पवर चढणं म्हणजे जणू काही गुन्हाच! फॅशनविश्वातील मुली म्हणजे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला काळीमा फसणाऱ्या, लोक-लाज विसरलेल्या याच प्रतिक्रिया ऐकू यायच्या.

अशा परिस्थितीतही भारताच्या एका सौंदर्यवतीने ठसठशीत कुंकू आणि पांढराशुभ्र गजरा या थाटात रॅम्प गाजवला आणि इतकंच नव्हे तर ‘हम भी किसीसे कम नही’ म्हणत सौंदर्यक्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे पहिले पाऊल पडले ते तिच्यामुळेच.

जगभरातून सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या होत्या, मात्र भारतात अजूनही त्यांची सुरवात व्हायची होती. त्या काळात एका स्त्रीनं दाखविलेल्या धाडसामुळे नंतर आपल्याला सुस्मिता सेन, लारा दत्ता अशा विश्वसुंदरी लाभल्या. कोण होती ही महिला?

=

=

indrani rahman inmarathi2

 

भारतातर्फे पहिल्या विश्वसुंदरी स्पर्धेची ऑफिशियल एण्ट्री म्हणून जिला निवडलं गेलं, ती विवाहित तर होतीच शिवाय एका मुलीची आईही होती. या २२ वर्षीय महिलेचं नाव होतं, इंद्राणी रहमान.

मुळची मद्रासची असलेली इंद्राणी अमेरिकन आई आणि भारतीय वडिलांची स्वतंत्र विचारांत वाढलेली मुलगी होती. वयाच्या पंधराव्या वर्षी ती जगतविख्यात स्थापत्यविशारद हबिब रहमान यांच्या प्रेमात पडली.

हबिब तिच्यापेक्षा वयानं बरोबर दुप्पट होते. स्वभावानं बंडखोर आणि सामाजिक बंधनं न पाळणार्‍या इंद्राणीनं हबिब यांच्यावरचं प्रेम लपवलं तर नाहीच, पण अगदी खुलेआम विवाहही केला. त्या काळातलं रोमॅण्टिक कपल म्हणून या जोडीची ख्याती होती.

इंद्राणीला नृत्याची आवड होती. ती चार प्रकारची क्लासिकल नृत्यं शिकली होती आणि त्यात पारंगतही होती. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच तिनं भरतनाट्यम शिकण्यास सुरवात केली होती. त्यानंतर कुचिपुडी, ओडिसा या नृत्यप्रकारातही तिनं प्राविण्य मिळवलं.

 

 

indrani rahman inmarathi3

 

कलकत्त्यातल्या एका संध्याकाळची गोष्ट. ब्रोकेडच्या किंवा सळसळत्या शिफ़ॉनच्या साड्यातल्या चाळीस सुंदर्‍या ओळीनं उभ्या होत्या आणि स्टेजवर आता यांच्यापैकी एकीच्याच डोक्यावर मुकुट चढणार होता. हा मुकुट होता मिस कलकत्ताचा.

हळुहळु सायंकाळ आणि स्पर्धा रंगत गेली आणि मग तो निर्णायक क्षण आला. माया गुहा यांना फर्स्ट रनर अप आणि इंद्राणीला मिस कलकत्ता म्हणून घोषित करण्यात आलं. ज्या क्षणाला तिच्या डोक्यावर मुकुट आला त्या क्षणी तिच्याभोवती फोटोग्राफर्सचा गराडा पडला होता.

काही मिनिटांपूर्वीचं तिचं आयुष्य क्षणात बदललं होतं. पत्रकार एकदम प्रश्न विचारून तिला भंडावून सोडत होते आणि ती जे जे बोलत होती ते सगळं भराभर कागदावर लिहूनही घेत होते. हे सगळं इतकं अचानक घडलं होतं, की ती गर्दी, तो गोंधळ बघून इंद्राणीसोबत ती स्पर्धा बघायला आलेली तिची चिमुरडी मुलगी घाबरूनच गेली.

तिला वाटलं की तिचे वडिल या क्षणी तिथे असायला हवे होते. अर्थात हा सगळा स्पर्धाप्रकार महिलांच्या सामाजिक कार्याचा भाग असल्यानं आणि इंद्राणीनंही हे सगळं फार गांभिर्यानं न घेतल्यानं तिनं मिस्टर रहमान यांना सोबत आणण्याचा प्रश्नच नव्हता.

अखेरीस त्या गर्दीतून डोक्यावरचा मुकुट हातानं सांभाळत इंद्राणी कशीबशी वाट काढली आणि हसत मुलीच्या, रागिणीच्या दिशेनं आली. मिस कलकत्त्याचा मुकुट एक आई कौतुकानं आपल्या मुलीला दाखवत होती आणि दोघी मायलेकी हे यश साजरं करायला फिरपोज या कलकत्त्यामधील उच्चभ्रू हॉटेलमधे गेल्या.

या दोघी घरी परतल्यावर घरातले नोकर काम संपवून घरी गेल्यानं घरी कोणीच नव्हतं आणि रहमान आराम खुर्चीतच गाढ झोपले होते. रेडिओवर रवींद्र संगीत तसंच चालू होतं. इंद्राणी उत्साहानं घरात आली. तिनं आधी रेडिओ बंद केला आणि रहमानना उठवून गळ्यातला सॅटिनचा मिस कलकत्ताचा सॅश दाखवला.

एक दिवस ती पहिल्या भारतसुंदरी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुंबईला विमानानं रवाना झाली. कलकत्त्यातल्या पेपरमधले रकानेच्या रकाने या इंद्रायणीच्या संबधित बातम्यांनी भरले होते. देशभरातून या स्पर्धेला विरोधही होत होता, जागोजागी निदर्शनं होत होती आणि स्पर्धेसंबंधी उलटसुलट बातम्याही वाचायला मिळत होत्या.

संस्कृतीरक्षकांचं असं म्हणणं होतं, की शालिनता हा भारतीय स्त्रिचा अलंकार आहे, तिनं परक्यांपुढे त्या शालिनतेचा बाजार मांडू नये. या सौंदर्य परेडमधे सहभागी होऊन शालिनता उघडी पाडू नये. इतक्या सगळ्या निगेटिव्ह पब्लिसिटिनंतर किंबहुना त्या निगेटिव्ह पब्लिसिटिमुळेच मुंबईत जिथे ही स्पर्धा भरवली गेली होती ते ब्रेबोर्न स्टेडियम खचाखच भरलं होतं.

संयोजकांनी ग्वाही दिल्यानुसार सगळ्या स्पर्धक अगदी सभ्य पेहरावात म्हणजे साड्यांमधे होत्या. संयोजक आणि प्रायोजकांत स्पर्धेला मिळालेल्या निगेटिव्ह पब्लिसिटीमुळे चिंतेचं, घबराटीचं वातावरण होतं. स्पर्धेदरम्यान काही अनुचित प्रकार घड्तील अशी धास्ती होती, मात्र प्रत्यक्षात झालं उलटंच.

सर्वच प्रेक्षकांनी संयम राखला आणि सहभागी मुलींचा अपमान होईल अशा कोणत्याही हीन टिपण्ण्या केल्या नाहीत. स्पर्धा अगदी दृष्ट लागण्याजोगी सुरळीत ठरविलेल्या कार्यक्रमानुसार चालू होती. अखेर तो अंतिम क्षण आला. मुंबईचे तत्कालिन मेयर एक. के. पाटील यांनी मोठ्यानं विजेतीच्या नावाची घोषणा केली.

देशाला त्याची पहिली मिस इंडिया मिळाली होती आणि ती होती २२ वर्षाची एका मुलीची आई इंद्राणी. त्याकाळचं हिंदी सिनेमातलं सुप्रसिध्द जोडपं नर्गिस-राज कपूर हे इंद्राणीच्या डोक्यावर मुकुट चढविताना स्टेजवर हजर होतं.

 

indrani rahman inmarathi

 

सोनेरी रत्नजडीत मुकुट घालून भारताची पहिली मिस इंडिया कलकत्त्याला परतली. चेहर्‍यावर जिंकलेलं समाधानी हसू आणि हातात सोनेरी ट्रॉफ़ी अशी इंद्राणी घरी परतली.

देशभरातून सतत येणारे फोन्स, पत्रं, सिनेमाच्या ऑफ़र्स, त्याकाळचे सुपरस्टार दिलिप कुमार, देव आनंद, राज कपूर यांच्याही कौतुकासोबतच सोबत काम करावं हे सांगायला येणारे फोन, पत्रं…. हे सगळं बघून एखादी हुरळून गेली असती आणि आयत्या पायघड्या घातलेलं फ़िल्मी करियर करायला मुंबईला गेली असती.

 

indrani rahman inmarathi6

 

इंद्राणी मात्र या अचानक आलेल्या प्रसिध्दीच्या चकाचक झोतानं बावरली होती. तिला मनातून असं वाटत होतं, की आता कुठे शास्त्रीय नृत्यांगना होण्याचं तिचं स्वप्न साकारत असतानाच फिल्मी जगानं तिला आपल्याकडे ओढलं तर तिचं करियर संपुष्टात येईल. ती या प्रकारापासून अलिप्त रहायला बघत होती.

मात्र ती जितकी या सौंदर्य स्पर्धेच्या झोतातून दूर होण्याचा प्रयत्न करत होती, तितकीच ती याकडे खेचली जाऊ लागली कारण यानंतर पहिली विश्वसुंदरी स्पर्धाही आयोजित करण्यात आली आणि भारताची पहिली ऑफिशियल एण्ट्री म्हणून इंद्राणीची निवड झाली.

जगभरातून आलेल्या तीस निवडक सौंदर्यवतींशी तिची स्पर्धा होती. या स्पर्धेत मात्र स्विमसूट राउंड बंधनकारक होता. या राउंडमधे इंद्राणीने अत्यंत अनोख्या पध्दतीनं सहभागी होत जगभराच्या नजरा आपल्याकडे वळवल्या.

 

indrani rahman inmarathi5

 

बिकिनी घालून इंद्राणीनं चक्क केसांचा आंबाडा बांधला आणि भरगच्च गजरा माळला. कपाळावर ठसठशीत टिकलीही लावली. या स्पर्धेनंतर मात्र इंद्राणीनं दुनियेला राम राम ठोकत आईसोबत नृत्यसाधनेला वाहून घेतलं.

ही गोष्ट आता वाचताना सोपी वाटत असली, तरी निभावताना भयंकर अवघड असते. काळाच्या पुढे जाऊन या स्त्रियांनी विचार केला आणि म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करायलाच हवा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?