' 'पंचायत' मधील सचिवजी: हा प्रवास तुमच्यापैकी प्रत्येकाला नक्कीच प्रेरणा देईल

‘पंचायत’ मधील सचिवजी: हा प्रवास तुमच्यापैकी प्रत्येकाला नक्कीच प्रेरणा देईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, अर्थात, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) म्हणजे भारतातील अग्रगण्य शिक्षणसंस्थांपैकी एक. इथून बाहेर पडणाऱ्या अभियंत्यांना देशातीलच नव्हे, तर जगभरातील विविध क्षेत्रांतील कंपन्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या देण्यास तयार असतात.

आयआयटीमधून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज जगातील नावाजलेल्या कंपन्यांमध्ये उच्चतम पदावर कार्यरत आहेत. हे जेवढे खरे आहे, तसेच इतरांप्रमाणे मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांची आस न धरता अन्य क्षेत्रांत नाव कमावलेले आयआयटीयन्सही कमी नाहीत.

काहीजण ज्या क्षेत्रात शिक्षण घेतले, त्याच्याशी फारकत घेत नव्या वाटा चोखळून, स्टार्टअप्स सुरू करून नवीन कल्पनांच्या जोरावर यशस्वी उद्योजक झालेले पहावयास मिळतात. साहित्य, संगीत, कला, राजकारण, खेळ या क्षेत्रांत आज अनेक आयआयटीयन्सनी नाव कमावलेले दिसून येते.

जितेंद्र कुमार हा ३० वर्षांचा युवा कलाकार याच जातकुळीतला आहे. सगळ्या आयआयटींमधील प्रतिष्ठित अशा आयआयटी खडकपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या जितेंद्र कुमारने अभिनयाच्या ध्यासाने कलाक्षेत्रात यायचे ठरवले.

 

jitendra kumar inmarathi

 

गेल्या वर्षीच एका चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केल्यावर अमेझॉन प्राईम वरील ‘पंचायत’ या मालिकेतील अभिनयाबद्दल डिसेंबरमध्ये त्याला ओटीटी प्लेटफॉर्मवरील सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील खैरथाल हे जितेंद्र कुमारचे मूळ गाव. त्याचे सगळे बालपण गावातच गेले. लहानपणापासूनच गावातील रामलीलेसारख्या कार्यक्रमांमुळे नकळत त्याच्यावर अभिनयाचे संस्कार होतच होते.

इतरांप्रमाणे भरपूर अभ्यास करून आयआयटी मधून एरोनॉटिकल इंजिनिअर बनण्याचे जितेंद्रचे स्वप्न होते, पण काही गुण कमी पडल्यामुळे त्याला हव्या त्या शाखेला प्रवेश मिळू शकला नाही.

आयआयटी खडकपूरला त्याने स्थापत्य अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. हवे ते क्षेत्र न मिळाल्यामुळे तो काहीसा नाराज झाला खरा, पण त्याच वेळेस तो आयआयटीमधील नाट्यकर्मींच्या संपर्कात आला आणि इथूनच त्याच्यातील कलागुणांचा विकास होण्यास खऱ्या सुरुवात झाली.

 

iit kharagpur inmrathi

 

तेथील हिंदी नाट्य संस्थेच्या माध्यमातून रवींद्रनाथ टागोर, महेश दत्तानी आणि विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये काम करण्याची संधी जितेंद्रला मिळाली. रंगभूमीवर काम करण्याचा अनुभव असणे, ही कोणत्याही नटासाठी जमेची बाजू असते. नाटकात काम केल्याने जितेंद्रला अभिनयाचे पुरेपूर धडे मिळाले.

२०१२ साली जितेंद्र पदवीधर झाला, पण दुर्दैवाने त्याला कॅम्पसमधून थेट नोकरी मिळू शकली नाही. आयआयटीमधील त्याचा एक मित्र ‘द व्हायरल फिवर’ नावाच्या एका कंपनीत लेखक म्हणून काम करू लागला होता. युट्युब झपाट्याने पसरू लागले होते आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्म सुद्धा प्रचलित झाले नव्हते.

ही कंपनी युट्युबवर ५-१० मिनिटांची विनोदी प्रहसने बनवत असे. जितेंद्रही आपल्या मित्राच्या सांगण्यावरून मुंबईत आला आणि ‘द व्हायरल फिवर’ मध्ये त्याने अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली, पण ३ महिन्यातच फारसे काम न मिळाल्यामुळे त्याने आपल्या पदवीच्या जोरावर नोकरी मिळविण्याचे ठरवले.

 

jitendra kumar inmarathi2

 

बंगलोर मध्ये एका जपानी कन्स्ट्रक्शन कंपनीत त्याला नोकरी मिळाली. ‘द व्हायरल फिवर’मधील ३ महिन्यांच्या काळात त्याने त्याच्या मित्रानेच लिहिलेल्या ‘मुन्ना जझबाती’ नावाच्या एका विनोदी प्रहसनात काम केले होते, पण काही कारणांमुळे ते प्रसिद्ध होऊ शकले नव्हते.

जितेंद्रने नोकरी करण्यास सुरुवात केल्यावर काही दिवसांनी ते प्रहसन युट्युब वर प्रसारित केले गेले. अनपेक्षितरीत्या त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला. एवढा, की त्यातील काम बघून जितेंद्रला काही कास्टिंग करणाऱ्या एजन्सीचे फोन येण्यास सुरुवात झाली. जितेंद्रने यामुळेच नोकरी सोडून पुन्हा मुंबईत यायचे ठरवले.

जितेंद्रला आयआयटीत रंगभूमीवर काम केल्याने अभिनयाचा थोडाफार अनुभव होता, पण त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याच्या हेतूने त्याने नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा अर्थात, एनएसडी किंवा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अर्थात, एफटीआयआय यांपैकी एखाद्या संस्थेत प्रवेश घ्यायचे ठरवले,

मुलाखतीदरम्यान त्याची निवड होऊ शकली नाही. यामुळे निराश न होता त्याने ‘द व्हायरल फिवर’ मध्ये काम करणे सुरूच ठेवले. लहान लहान व्हिडिओजमधून तो कामे करीत होता.

सन २०१४-१५च्या दरम्यान भारतात ओटीटी प्लेटफॉर्मचा प्रवेश झाला आणि युट्युबही सारख्या माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसिरीज व तत्सम साहित्य येण्यास सुरुवात झाली. जितेंद्रसाठी ही चांगली संधी होती.

 

jitendra kumar inmarathi3

 

अशातच ‘द व्हायरल फिवर’ने ‘पिचर’ नावाची एक मालिका सुरू केली. जितेंद्रच्या दृष्टीने हा एक टर्निंग पॉईंट होता असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. द व्हायरल फिवरचा हा कार्यक्रम भलताच लोकप्रिय झाला. या कार्यक्रमामुळे जितेंद्रचा चेहरा सर्वत्र पोचला.

जितेंद्रच्या घरच्यांचा त्याच्या अभिनयाला पूर्णपणे विरोध होता असेही नाही. एनएसडी सारख्या ठिकाणी जायचे जेव्हा त्याने ठरविले, तेव्हा घरच्यांचा त्याला पाठिंबा होताच, पण मुळात आयआयटीतून पदवीधर झालेल्या जितेंद्रने चांगल्या पगाराची नोकरी करावी ही तर अपेक्षा त्यांना होतीच. त्यामुळे जितेंद्रचे नोकरी सोडून मुंबईत परतणे त्याच्या घरच्यांना फारसे रुचले नव्हते.

जितेंद्र द व्हायरल फिवरमध्ये काम करीत होताच, पण त्याबरोबरच स्वतः आयआयटीयन असल्याने मुंबईत आल्यापासून २ वर्षं त्याने १२ वीच्या मुलांना भौतिकशास्त्र हा विषय शिकविण्याचेही काम केले. अभिनयातून मिळणाऱ्या पैशांबरोबरच आणखी हातभार लागावा हा त्यामागचा हेतू होता.

आतापर्यंत जितेंद्रने बरेचसे काम ओटीटी प्लॅटफॉर्मवर केले आहे, ज्यात त्याला वेगवेगळ्या प्रकारची पात्रे साकारण्याचा अनुभव मिळाला. ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटात तो आयुष्यमान खुरानासोबत सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत होता

 

jitendra kumar inmarathi1

 

पंचायत’ या अमेझॉन प्राईमवरील मालिकेत तो मुख्य भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी त्याला नुकताच फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. आगामी काळातही वेगवेगळ्या विषयांवर आधारित भूमिका करण्याचा जितेंद्रचा मानस आहे.

आयआयटीतून बाहेर पडलेला एक तरुण, पण इतरांप्रमाणे पैशाच्या मागे न धावता, आपल्या स्वप्नाच्या मागे धावला आणि त्याने अपेक्षित यशही मिळवले. जितेंद्र कुमारची ही कथा म्हणजे एखाद्या चित्रपटात शोभेल अशीच आहे.

चिकाटीने आपल्या ध्येयाच्या मागे लागल्यास यश नक्कीच प्राप्त होते हाच संदेश आपल्याला जितेंद्रकडून मिळतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?