' शिक्षण अर्धवट सोडून सुतारकाम करणारा, बनलाय सगळ्यात मोठा एडिटर!

शिक्षण अर्धवट सोडून सुतारकाम करणारा, बनलाय सगळ्यात मोठा एडिटर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपली भाषा टिकवायची असेल तर, आपलं आपल्या भाषेवर प्रेम हवं. आपले सगळे व्यवहार आपल्या मातृभाषेतून व्हायला हवेत. हे आता फक्त भाषणात ठोकून द्यायचे मुद्दे झाले आहेत.

भारतात तरी केवळ इंग्रजीला अवास्तव महत्त्व आलेलं आहे. म्हणजे यात इंग्रजी भाषेचा द्वेष नाही, पण त्याबरोबर इतर भाषांचे महत्त्व कमी होत आहे ही गोष्टही नाकारून चालणार नाही. एक भाषा मरते त्यावेळेस ती संस्कृतीदेखील मरते. म्हणूनच काही लोक आपली भाषा टिकवण्यासाठी आग्रही असतात आणि त्यासाठी ते प्रयत्नही करतात.

सध्याचे जग हे इंटरनेटने व्यापलेलं आहे आणि इंटरनेटवर चालणारी महत्त्वाची भाषा म्हणजे इंग्रजी. कुठलीही माहिती हवी असल्यास ती इंग्रजी भाषेत तात्काळ मिळते.

 

english-language-inmarathi

 

हीच गोष्ट एका हिंदी भाषाप्रेमी व्यक्तीला खटकली. त्याचं नाव राजू जांगिड. भारतात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी आणि इंटरनेटवर कोणतीही माहिती हिंदीमध्ये उपलब्ध नसायची.

म्हणजे बघा विकिपीडिया उघडला तर आपल्याला सगळी माहिती इंग्रजीमध्ये मिळते. राजूने ठरवलं की इंटरनेटवरची सगळी माहिती हिंदीत उपलब्ध करून द्यायची. तसं म्हटलं तर त्याच्यासाठी ही शिवधनुष्य पेलण्यासारखीच अवघड गोष्ट होती.

आता तुम्ही म्हणाल की त्यात अवघड काय आहे! एखादा कॉम्प्युटर घ्यायचा किंवा लॅपटॉप घ्यायचा आणि हवी ती माहिती तज्ञ व्यक्तीकडून पटापट भाषांतरित करून, टाईप करून पाठवून द्यायची. एखाद्या व्यक्तीला जर भरपूर पैसे दिले, त्या कामाचा योग्य मोबदला दिला तर कुणीही हे काम सहज करेल. पण इथेच खरी ग्यानबाची मेख आहे.

 

computer-science-marathipizza

 

ज्याने विकिपीडिया हिंदीत आणायचं ठरवलं तो राजू जांगिड हा कोणीही तज्ञ माणूस नव्हता, आणि हे काम त्याने करावं असं कोणीही त्याला सुचवलं नव्हतं. किंवा त्या कामाचा त्याला मोबदला दिला जाईल याचं आश्वासनही त्याला कुणी दिलं नव्हतं.

हे सुद्धा वाचा – `ही’ व्यक्ती नसती तर ‘विकिपीडियातून’ आपल्याला हवी असलेली माहिती क्षणार्धात मिळाली नसती

तर मग हा राजू जांगिड कोण आहे? तर तो एक आर्थिक अडचणीमुळे शाळा सोडून दिलेला विद्यार्थी होता. घरच्या आर्थिक अडचणीमुळे ज्याने सुतारकाम चालू केले आणि घरी आर्थिक मदत पुरवली तो विद्यार्थी. ज्याने सॅमसंग s5610 हा बेसिक मोबाईल वापरून विकिपीडियावरची ५७,००० पेजेस हिंदीत अनुवादीत केली, आणि १८०० लेख लिहिले. जो आता विकिपीडियावरचा हिंदी भाषेचा एडिटर झाला आहे.

 

raju-jangid-inmarathi

 

राजू जांगिड राजस्थान मधील जोधपूर येथील थाडीया नावाच्या छोट्याशा खेड्यात राहतो. घरची परिस्थिती तशी बेताचीच. सुतारकाम हा घरातला पारंपारिक व्यवसाय.

राजू तिथल्या शाळेत जायचा. आठवीत असताना त्याने पहिल्यांदा इंटरनेटवर आपल्या गावाची माहिती मिळते का हे शोधले. त्यावेळेस त्याच्या लक्षात आले की आपल्या गावाची माहिती हिंदी भाषेत उपलब्धच नाहीये.

मग त्याने घरात असलेला सॅमसंगचा बेसिक मोबाईल घेऊन विकिपीडियावर हिंदी भाषेत आपल्या गावाची माहिती लिहायला सुरुवात केली.

आठवीत असल्यापासूनच तो विकिपीडियावर लिहीत आहे. पण दहावीत असताना त्याला घरच्या परिस्थितीमुळे शाळा सोडून द्यावी लागली आणि सुतारकाम सुरु करावे लागले. शाळा सोडलेली असली तरी दररोज दहा ते बारा तास सुतार काम करावे लागायचे.

शाळा सुटली, सुतार काम लागले तरी त्याने आपले विकिपीडियावरचं लेखन सोडलं नाही. आपल्याला मिळालेल्या मोकळ्या वेळेत आपला तोच साधा कीपॅडवाला मोबाईल घेऊन तो विकिपीडियावर हिंदी भाषेत माहिती लिहीतच राहिला.

 

samsung-phone-inmarathi

 

आपला हा प्रवास सांगताना राजू म्हणतो की,” मला कीपॅडवाल्या फोनवरून लिहिताना खूप त्रास व्हायचा. कारण त्या कीबोर्डवर आवश्यक असणाऱ्या सगळ्या किजदेखील नसायच्या. पण मला माझ्या गावाची माहिती इंटरनेटवर यायला हवी होती. ती लोकांपर्यंत पोहोचावी अशी माझी इच्छा होती.”

ती सगळी माहिती त्याने विकिपीडियावर लिहिली आहे. तसेच आसपासच्या गावांची ही माहिती त्याने दिली आहे. २०१५ सालापासून राजू विकिपीडियावर लिहीत आहे. तसंच त्यांने आपलं शिक्षणही सुरु ठेवलं आहे.

त्याची इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असल्यामुळे त्याने बाहेरून परीक्षा देऊन दहावी, बारावी तर पूर्ण केलीच, पण बी.ए. ची परीक्षादेखील देऊन तो बीए देखील झाला.

राजूच्या कामाची आवड बघून विकिपीडियाने त्याला २०१६मध्ये नवीन लॅपटॉप आणि फ्री इंटरनेट दिलं होतं. याविषयी इनमराठीने त्याच्याशी संवाद साधला असता त्याने ही माहिती दिली.

“मी त्यावेळी पुण्यात राहायचो. तिथे मी सुतारकाम करायचो. मी जे काम करत होतो, त्यासाठी विकिपीडियाकडून मदत मिळू शकते अशी माहिती मला त्यावेळी मिळाली. म्हणून मग मी विकिपीडियाशी संपर्क साधला. माझी ही मेहनत फळाला आली.  इंटरनेट आणि लॅपटॉप याची मदत मिळणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं.”

राजू आता विकिपीडियावरील अनेक हिंदी प्रोजेक्टवर काम करत आहे. विकिपीडियावरील ‘विकी स्वास्थ्य’ या प्रोजेक्टअंतर्गत तो आरोग्याशी संबंधित आर्टिकल लिहितो.

राजूला लहानपणापासून  क्रिकेटची खूप आवड होती. क्रिकेटविषयी लिहायला सुद्धा त्याला खूप आवडतं. म्हणून त्याने विकिपीडियावर ‘विकी क्रिकेट’ नावाचा हिंदी प्रोजेक्ट सुरू केला. त्यावर क्रिकेट जगतातील सगळ्या अपडेट्स दिल्या जातात. त्या विषयावरही त्याने ७००हून अधिक लेख लिहिले आहेत.

 

test-cricket-inmarathi

 

आपली मनापासूनची इच्छा आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीची तयारी असेल तर माणूस नक्कीच त्या गोष्टी पूर्ण करू शकतो. आज राजूने हे करून दाखवले आहे. आज इंटरनेटवर आणि विकिपीडियावर राजूचा बोलबाला आहे.

हे सुद्धा वाचा – पोलिओशी झुंज देत ती झालीये बिझनेसवूमन! या जिद्दीला सलाम हवाच

राजू जांगिड आता हिंदीतील सगळ्यात बिझी एडिटर झाला आहे. आपली भाषा, ज्ञानभाषा व्हावी यासाठी राजू जांगिड जे प्रयत्न करतोय त्याला खरोखरच तोड नाही. भारतासारख्या या देशात केवळ इंग्रजी न समजल्याने इंटरनेट न पाहणारे लोकही आहेत, पण त्यांच्यासाठी हा माहितीचा खजिना राजूने खुला केला आहे.

 

raju-jangid-fb-profile-inmarathi

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?