आदियोगी भगवान शंकराच्या ११२ फुटी उंच अर्धप्रतिमेची गिनीज बुकमध्ये नोंद!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
हिंदू धर्मातील अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे मनाला हरखून टाकाव्यात असे देव देवता…!
एकीकडे राम-कृष्ण-हनुमान हे “अवतार” मर्त्य मानवाला उत्कृष्ट वर्तनाचे धडे देतात. तर दुसरीकडे महाकाली मातेसारख्या रौद्र रूपातील देवी आपल्याला दुर्जनांच्या विनाशाची ग्वाही देतात.
तिसरीकडे : इंद्र-वरुण-अग्नी अश्या वैदिक देवतांचं महात्म्य विविध यज्ञादी कर्मकांडांतून समोर येत रहातं! एकीकडे लहानग्यांना प्रेमात पाडणारा बाल गणेश असतो तर दुसरीकडे बलोपासनेचा प्रेरणास्रोत बलभीम असतो…!
ह्या सर्वांत आणखी वेगळा भासणार देव म्हणजे, भगवान शंकर!
कैलास पर्वतावर असणारा हा निलकण्ठ एक वेगळंच गूढ वलय घेऊन भक्तांच्या मनावर गरुड घालतो. आपल्याकडे विविध ठिकाणी देवाधिदेव महादेवाच्या उत्तुंग मूर्ती आहेत.

भगवान शंकरांच्या अनेक उंचच उंच, भल्याथोरल्या, प्रचंड प्रतिमा भारतामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पण या सर्वात सरस आणि अद्वितीय ठरली भगवान शंकराची एक अर्धप्रतिमा!

जगातील सर्वात मोठा अर्धपुतळा म्हणून ईशा योग फाउंडेशनद्वारा स्थापित भगवान शंकराच्या आदीयोगी रुपाच्या ११२ फुट उंच अर्धप्रतिमेला थेट गिनीज बुक मध्ये स्थान मिळालं आहे.
गिनीज बुक तर्फे त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर याची घोषणा करण्यात आली आहे. ही अर्धप्रतिमा तामिळनाडूच्या कोइम्बतुर शहराबाहेर उभारण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात या प्रतीमेचे अनावरण करण्यात आले होते.

ही प्रतिमा पूर्णत: स्टीलची आहे हे विशेष! या अर्धप्रतिमेचे डिजाईन तयार करण्यास तीस महिन्यांचा कालावधी तर ही प्रतिमा उभारण्यास आठ महिन्यांचा कालावधी लागल्याचे सांगण्यात येत आहे.

ईशा फाउंडेशनचे संचालक अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव सांगतात की,
दररोज हजारो भाविक या भव्य दिव्य शंकराच्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून येतात आणि ही अर्धप्रतिमा आदियोगी भगवान शंकरांच्या ११२ योगांच्या पद्धती दर्शवते.

अश्या अजून तीन अर्धप्रतिमा उभारण्याचा ईशा फाउंडेशनचा मानस आहे. ही दुसरी वेळ आहे जेव्हा ईशा फाउंडेशनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.
यापूर्वी ८.५२ लाख रोपटी लावण्याचा जगातील पहिला उपक्रम राबविल्याबद्दल देखील ईशा फाउंडेशनला गिनीज बुक मध्ये स्थान प्राप्त झाले आहे.

अश्या या विक्रमी अर्धप्रतिमेला संधी भेटल्यास नक्की भेट द्या!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.