' साडीच्या दुकानात तुटपुंज्या पगारावर काम करणारा बनला ई-कॉमर्स क्षेत्राचा बादशाह! – InMarathi

साडीच्या दुकानात तुटपुंज्या पगारावर काम करणारा बनला ई-कॉमर्स क्षेत्राचा बादशाह!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नव्वदच्या दशकात ई कॉमर्स या संकल्पनेचा उदय होत होता. त्याकाळात अजूनही ऑनलाईन शॉपिंग हे कल्पनेपलीकडचं होतं. मात्र केवळ दशकभरातच ऑनलाईन शॉपिंगच्या या सेक्टरनं जी काही मुसंडी मारलेली आहे ती थक्क करणारी आहे.

ज्यांनी काळाची पावलं ओळखत या क्षेत्रात योग्य वेळी प्रवेश केला त्यापैकी एक नाव, अनुज मुंदडा.

एकेकाळी केवळ चौदाशे रूपयांवर काम करणारे मुंदडा आज देशातल्या लोकप्रिय ईकॉमर्स साईटचे मालक आहेत आणि कोट्यावधींची उलाढाल करत आहेत.

तो काळ साधारण २००१ ते २००३ दरम्यानचा होता. जयपूरमधल्या एका साडी शोरूममधे अनुज मुंदडा नावाचा एक तरूण केवळ चौदाशे रूपयांवर काम करायचा.

 

anuj mundra inmarathi

 

इतक्या तुटपुंज्या पगारात आयुष्य काढता येणं अशक्य असल्याचं ओळखून हळूहळू लहान का होईना, त्यांनी स्वत:च्या व्यवसायाचं स्वप्न बघायला सुरवात केली होती. अखेरीस २००३ मधे साडी शोरूममधली नोकरी सोडून सूट पिसचा व्यवसायास सुरवात केली.

व्यवसाय म्हणजे, इतर दहाजण जे करत तेच अनुज यांनी करायला सुरवात केली. उत्पादकाकंडून घाऊक दरात सूट पिस घ्यायचे आणि ते लहान , किरकोळ विक्रेत्यांना, व्यावसायिकांना विकायचे.

या व्यवसायात बर्‍यापैकी कमाई झाल्यावर त्यांनी जयपूरमध्येच ब्लॉक आणि स्क्रिन पेंटिंगचं स्वत:चं युनिट चालू केलं.

पुढची साधारण आठ नऊ वर्षं हा व्यवसाय उत्तम चाललेला असतानाच एका दिल्ली वारीत त्यांनी जबॉन्ग आणि स्नॅपडिलचं मोठं होर्डिंग बघितलं. त्यांच्यातल्या चाणाक्ष व्यवसायिकानं तिथल्या तिथे जाणलं की भारताचं शॉपिंगचं भविष्य इकॉमर्समधे दडलेलं आहे.

येणारा काळ भारतात ई-शॉपिंगची लाट आणेल हे त्यांनी जाणलं. जयपूरला आल्यावर त्यांनी पहिलं काम काय केलं असेल? तर, आपल्या सीएशी भेट घेऊन ऑर्गनायझेशन गाईडलाईन्स आणि कम्प्लायन्सेसविषयी सखोल माहिती घेतली.

त्यांनी २०१२ मध्ये नंदानी क्रिएशन्स प्रा. लि. ची स्थापना केली आणि इंटरनेटवर जयपूरकुर्ती.कॉम नावानं मार्केटप्लेस तयार केली. पहिल्याच वर्षी ५९ लाखाची उलाढाल त्यांनी या जपूरकुर्ती मधून केली.

 

jaipur kurti inmarathi

 

पुढे जाऊन करोडोंची उलाढाल करणार्‍या या व्यवसायाची सुरवात अनुज यांनी अगदी मर्यादित भांडवलातून केलेली होती. छोटे छोटे व्यावसायिक अवलंबतात तोच मार्ग त्यांनी धरला होता.

मित्रांकडून आणि जवळच्या नातेवाईकांकडून आर्थिक मदत घेणे. या मदतीच्या माध्यमातून परत द्यायच्या बोलीवर त्यांनी पन्नास हजार जमवले आणि धंद्यात गुंतवले.

त्यानंतर बँकेतून कर्ज काढत यात गुंतवणूक करत गेले. या पैशातून त्यांनी कुर्ती शिलाईसाठी दहा शिलाई मशिन्स घेतली. अनुज यांच्या पत्नी, वंदना मुंदडा या कुर्त्यांचं डिझाईनिंग करत असत.

डिझाईनिंग, डायिंग, शिलाई, प्रिंटिंग असं सगळं गरजेचं काम जयपूरमधल्या कर्तारपूर इंडस्ट्रियल एरियात असणार्‍या मॅन्युफ़ॅक्चरिंग युनिटमधे केलं जायचं.

जबॉन्ग आनि स्नॅपडिलवर लिस्टेड होत त्यांनी स्वत:च बनवलेले कुर्ते, पंजाबी सूट विक्रीस ठेवले.

 

jabong inmarathi

 

अनुज सांगतात, सुरवातीच्या काळात स्पर्धा कमी होती. ऑनलाईन विक्रित फारसे नामांकित, प्रस्थापित ब्रॅण्ड उतरले नव्हते त्यामुळे स्पर्धा कमी असली तरिही ऑनलाईन दुकान चालवणं तितकं सोपंही नव्हतं. कुरियर ते बारकोडिंग सगळंच बघावं लागत असे.

शिपिंग ते एक्स्चेंज सगळंच आव्हानात्मक होतं. इतकंच नाही तर रिटर्नचा खर्चही बराच जास्त येत असे. त्या काळात मुळातच लोक ऑनलाईन शॉपिंगच्या तंत्राला अजून फारसे सरावलेले नव्हते.

रेडिमेड कपड्यांमधे आपल्याला फिट होणार्‍या मापाचा ड्रेस निवडणं ग्राहकांना जमतंच असे असं नाही. त्यातही कुर्त्याचे कटिंग आणि फिटिंगनुसार साईझही बदलत असल्यानं गोंधळ उडायचा.

या सगळ्या आव्हानांमधून कंपनीची वाटचाल चाललेली असतानाच अदिदास, बिबा, विल्स अशा कंपन्यादेखील ऑनलाईन शॉपिंगमधे उतरल्या.

यामुळे स्पर्धा वाढली तरिही दुसर्‍या बाजूला फायदा असा झाला की, या ब्रॅण्डचा एक ग्राहकवर्ग होता, ज्याला हे ब्रॅण्ड ऑनलाईन शॉपिंगकडे वळवत होते. हाच ग्राहक व्हरायटिसाठी म्हणुन सहज इतर ब्रॅण्डही बघू लागला होता.

याचा परिणाम असा झाला की, अनायसाच नवा ग्राहक वर्ग जयपूर कुर्तीला मिळत गेला. या सगळ्यासोबत जयपूर कुर्तीनं एका अभिनव उपक्रमास सुरवात केली.

पॅकिंग करताना ब्रॅण्डची माहिती, डिस्काऊंड व्हाउचर्स आणि कस्टमर केअर नंबर यांची माहिती असलेली पत्रकं घालायला सुरवात केली. याचा फायदा असा झाला की, लोकांमधली या ब्रॅण्डची विश्वासार्हता वाढत गेली.

आज या ब्रॅण्डतर्फे रेडिमेड सुट्स, बॉटम्स, कुर्तीज, फ्यूजन वेअर आणि इतर रेडिमेड कपडे विकले जातात. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही या ब्रॅण्डनं आपले पाय रोवले आहेत.

 

nandani creations inmarathi

 

अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि इतर काही देशात आज या ब्रॅण्डनं लोकप्रियता मिळवलेली आहे. या सुटची किंमतही परवडणारी आहे.

इथंपर्यंतचा प्रवास स्वबळावर उत्तमच चाललेला होता. व्यवसायात अडचणीही येतच होत्या, मात्र त्यावर मात करत नुकसान होऊ न देता ब्रॅण्डची वाटचाल तशी उत्तमच चाललेली होती.

मात्र अनुज यांच्या आता लक्षात येऊ लागलं होतं की अजून मोठं व्हायचं असेल तर मात्र कंपनिचा पसारा वाढवायला हवाय. जास्तीत जास्त फंडची गरज लागणार आहे हे तर दिसतच होतं.

या सगळ्याचा विचार करून २०१६ मधे जयपूरकुर्तीनं अखेर पब्लिक सेक्टरमधे प्रवेश केला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मधे स्टार्ट अप आणि मिड साईझ्ड कंपन्याच्या वर्गवारीत जयपूरकुर्तीची वर्गवारी झाली. २०१६ मधे नंदानी क्रिएशन्सनं त्यांचा पहिला आयपीओ जाहिर केला.

सुरवातीला स्वत:ची वेबसाईट असावी याची त्यांना गरजच वाटली नव्हती कारण एकतर तिचा निर्मितीचा खर्च, मेन्टेनन्सचा खर्च आणि त्याच्या कटकटीत अडकण्याची इच्छा नव्हती.

याशिवाय जबॉन्ग, स्नॅपडिल आणि नंतर नंतर टाटा क्लिक, फ़्लिपकार्ट, मिन्त्रा वगैरेसारखे इतर प्लॅटफॉर्म जयपूर कुर्तीसाठी पुरेसे वाटत होते.

सुरुवातीला ९९.९ टक्के विक्री आम्ही इतर पोर्टलवरूनच करत होतो. हळूहळू आम्ही प्रयत्न न करताच या पोर्टलवरून आमच्या पोर्टलवर ग्राहक आपोआप येऊ लागले. आम्ही काहीही प्रयत्न न करताच हे घडत होतं.

आम्ही व्यवसायाला सुरवात केली तेंव्हाचा ऑनलाईन शॉपिंग करणारा ग्राहक आणि आताचा ग्राहक, यात फरक पडलेला आहे. आताचा ग्राहक जास्त जागरूक आणि स्मार्ट बनला आहे.

 

online shopping inmarathi

 

नेमकी काय आणि कशाची खरेदी करायची आहे? हे आता त्याला माहित असतं, याचा परिणाम म्हणजे आमची रिटर्नची टक्केवारी ५० टक्क्यांवरून ३५ टक्क्यांवर आलेली आहे.

२०१९ मध्ये कंपनीने जयपूरमधे पहिलं शोरूम चालू केलं, अमैवा नावानं. मात्र ग्राहकांनी याला फारसा प्रतिसाद दिला नाही. २०२० च्या जानेवारीत या शोरूमचं नाव बदलून जयपूर कुर्ती डॉट कॉम असं करण्यात आलं.

आता मात्र ग्राहकांची वर्दळ वाढली आणि जयपूरकुर्ती हा ब्रॅण्ड खरोखरच ग्राहकांना किती जवळचा वाटतो हे आम्हाला समजलं. या शोरूमचा प्रतिसाद इतका अभूतपूर्व होता की, अल्पावधीतच आम्ही जयपूरमध्येच दोन शोरूम्स उघडली.

अनुज सांगतात, जेंव्हा ते या व्यवसायात आले तेंव्हा भारतीय एथनिक पेहरावाचे ब्रॅण्ड फारसे अस्तित्वात नव्हते. आज बिबा, फॅबइंडिया, श्री, एथनिसिटि, ग्लोबल देसी असे अनेक ब्रॅण्ड मार्केटमधे आहेत.

 

anuj mundra featured inmarathi

 

अलिकडेच करोनानं सर्वच व्यवसायांवर परिणाम केला. मात्र अनुज म्हणतात की ही देखिल व्यवसायाच्या दृष्टिनं इष्टापत्तीच ठरली. कारण आऊटलेट बंद पडलेली असल्या काराणानं ग्राहकांना ऑनलाईन खरेदी हा एकमेव मार्ग होता.

जून २०१९ मध्ये कंपनीची उलाढाल ७.१२ कोटींची होती तर जून २०२० मधे ७.३७ कोटीचा पल्ला गाठला.

ते देखिल लॉकडाऊन असताना. वर्षभराचा एकूण टर्नओव्हर ४३.७ कोटिंचा होता अर २०२३ पर्यंत तो १०० करोड करण्याचा अनुज यांचा मानस आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?