' सरकारने जिवंतपणी मारलं म्हणून त्यांनी थेट पंतप्रधानांविरुद्ध निवडणूक लढवली! – InMarathi

सरकारने जिवंतपणी मारलं म्हणून त्यांनी थेट पंतप्रधानांविरुद्ध निवडणूक लढवली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बऱ्याचदा सिनेमांमध्ये रंजकता किंवा गमतीदार प्रसंग आणण्यासाठी एखादा माणूस मृत घोषित करतात. पण तो जिवंत असतो आणि मग तो आल्यावर जे काही घडतं, ती धमाल सिनेमामध्ये रंगवलेली असते.

असे काहीतरी प्रसंग घेऊन सिनेमात रंगत आणली जाते. पण जर एखाद्या माणसाला मृत घोषित केलं असेल आणि तो माणूस जिवंत असेल तर! त्याला मी स्वतः जिवंत आहे हे जगाला ओरडून सांगावं लागत असेल तर, आणि ही घटना खरोखर घडली असेल तर!

मग तर हा सिनेमाचा विषय नक्कीच होऊ शकतो. तर अशाच एका खऱ्या घटनेवर सिनेमा आलाय कागज, या नावाचा. त्याचं दिग्दर्शन सतीश कौशिकने केले आहे, तर यातील जिवंत असलेल्या मृत व्यक्तीची म्हणजेच लालबिहारी यांची भूमिका पंकज त्रिपाठी यांनी केली आहे.

 

kaagaz inmarathi

 

तर हे लालबिहारी कोण आहेत? ज्यांनी, ‘मी जिवंत आहे’ हे सांगण्यासाठी १८ वर्ष लढा दिला. त्यानंतर भारतातल्या नोकरशाही आणि भ्रष्टाचाराचा सामना करताना काय झालं याचाच थोडक्यात आढावा घेऊयात.

त्या लालबिहारी यांचा जन्म १९५५ मध्ये उत्तर प्रदेशातील खलीदाबाद येथे झाला. ते केवळ आठ महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या आईने दुसरे लग्न केले आणि ते आजमगड मधल्या मुबारकपूर येथे शिफ्ट झाले.

जुजबी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बनारसी साड्या बनवण्याचे शिक्षण घेतले. ते खरतर बालकामगार म्हणूनच कामाला लागले.

बनारसी साड्या बनवता बनवता त्यांच्या मनात आपलाच हँडलूमचा व्यवसाय सुरु करावा असा विचार आला. त्यांच्या वयाची एकवीस वर्षे पूर्ण झाली होती त्यामुळे स्वतःचं हॅण्डलूम सुरु करायला काही हरकत नव्हती.

 

lal bihari mritak inmarathi

 

मग स्वतःचे हॅण्डलूम सुरू करण्यासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता होती. त्याकरिता कर्ज मागण्यासाठी ते बँकेत गेले. बँकेत गेल्यावर त्यांना जातीचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, तारण म्हणून काही प्रॉपर्टी असल्यास त्याचे कागदपत्र आणण्यास सांगितलं गेलं.

ही कागदपत्रे आणण्यासाठी ते त्यांचा जन्म झालेल्या गावी म्हणजेच खलीदाबादला गेले. त्यासाठी ते तहसील कार्यालयात गेले आणि तिथे त्यांना समजलं की ते मृत म्हणून घोषित केले गेले आहेत. हा त्यांच्यासाठी मोठाच धक्का होता.

त्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने त्यांना ३० जुलै १९७६ रोजी तुमचा मृत्यू झाला आहे असे सांगितले आणि ते त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसले होते. अर्थात त्यांच्या काकानेच प्रॉपर्टीमध्ये हिस्सा द्यायला लागू नये म्हणून त्यांचा मृत्यू झाला आहे असे घोषित केले होते.

आता कागदोपत्री जर एखाद्याचा मृत्यू झाला आहे तर तो माणूस जिवंत कसा होईल? अशा माणसाला कोण मदत करेल? आपल्या ढिम्म प्रशासनाने त्यांना कोणतीही मदत करण्याचे नाकारले.

म्हणून मग शेवटी कायद्याने आपण जिवंत आहोत हे दाखवण्यासाठी ते एका वकिलाकडे गेले. ते वकील अजूनच अतरंगी. हिंदीत म्हणतात ना, ‘सिर्फ मजाक बना के छोडा’.

लालबिहारी यांच्याकडून पैसे घेणे आणि त्यांची खिल्ली उडवणे या पलिकडे त्या वकिलाने काहीच केले नाही.

लालबिहारी देखील आता इरेला पेटले होते. काहीही करून आपलं नाव रेकॉर्ड वरती आलं पाहिजे आणि मी जिवंत आहे हे कागदोपत्री सिद्ध झालं पाहिजे याकरिता त्यांनीही नाना तऱ्हेचे मार्ग अवलंबले.

 

lal bihari 2 inmarathi

 

आपण जिवंत आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या काकांच्या मुलाचं अपहरण केलं आणि पोलिसांनी पकडल्यावर आपल्यावर एफआयआर दाखल होईल असा त्यांचा होरा होता. पण याचाही काहीच फायदा झाला नाही.

मग मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःचीच शोकसभा आयोजित केली, अंत्ययात्रा काढली. व्हिजिटर्स पास घेऊन विधानसभेत प्रवेश केला. आणि तिथल्या प्रश्नोत्तराच्या तासाला मुझे जिंदा करो अशा घोषणा दिल्या. तिथून त्यांना धक्के मारून हाकलण्यात आले.

पण त्यामुळे त्यांच्याकडे मुलायम सिंग यादव यांचे लक्ष वेधले गेले. लाल बिहारी यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्र लिहिले. स्थानिक स्तरावर आंदोलन केले, पण तरीही त्यांना जिवंत असण्याचे प्रमाणपत्र मिळत नव्हतं.

इतक्या सगळ्या करामती केल्या नंतर त्यांचं नाव वर्तमानपत्रात येत राहिलं पण तरीही कागदोपत्री ते जिवंत होत नव्हते. हे सगळं करताना त्यांच्या लक्षात आलं की उत्तर प्रदेशात ते केवळ एकटेच मृत, जिवंत नव्हते तर अशा अनेक केसेस तिथे अस्तित्वात होत्या.

अनेक जिवंत लोकांना मृत घोषित केलं गेलं होतं. अशा सगळ्या लोकांना लालबिहारी यांनी एकत्र करायचं ठरवलं आणि त्यांच्या नावाने “मृतक संघ” नावाची संघटना काढली.

मी जिवंत आहे हे दाखवण्या करिता त्यांनी १९८८ मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकात सहभाग नोंदवला.

बरं हा सहभाग केवळ एका ठिकाणी उभे राहून नव्हता, तर चक्क भारताचे त्यावेळेसचे पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्याविरुद्ध लालबिहारी यांनी अर्ज भरला आणि चक्क १६०० मतं देखील मिळवली.

 

v p singh inmarathi

 

त्याकाळात ते प्रसिद्धही झाले नंतर मग त्यांनी राजीव गांधी यांच्याविरुद्ध देखील निवडणूक लढवली. शेवटी १९९४ मध्ये मुलायम सिंग यादव यांनी त्यांची मदत केली.

त्यांनी कागदोपत्री लालबिहारी यांना जिवंत करा असे आदेश दिले आणि त्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांना जिवंत असण्याचे सर्टिफिकेट दिलं.

अठरा वर्षाच्या संघर्षाने लाल बिहारी यांना बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्यांचा संघर्ष इथेच संपला नाही. उत्तर प्रदेशात ज्या जिवंत लोकांना मृत घोषित केलं होतं त्यांच्यासाठी मग त्यांनी काम चालू केलं.

त्यांचा मृतक संघ आजही कार्यरत आहे. ज्या लोकांना मृत घोषित केलं आहे त्यांना न्याय देण्याचं काम हा संघ करतो. त्यांच्या या लढ्याचा परिणाम हाच झाला की शेवटी न्यायालयाने त्यांच्या या लढ्याची दखल घेतली.

आणि उत्तर प्रदेशात ज्या अशा घटना घडल्या आहेत, ज्या लोकांना मृत घोषित केलं गेलं आहे, त्या सगळ्या घटनांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

अशा व्यक्तींना पुढे येण्याचे, वर्तमानपत्रात जाहिरात देण्याचे आव्हान देखील न्यायालयाने केले. आपल्या या संघाच्या सहाय्याने लाल बिहारी यांनी आतापर्यंत २५००० लोकांना मदत केली आहे.

त्यांना कागदपत्रे देऊन जिवंत केलं आहे. त्यांनी स्थानिक स्तरावर आणि राज्यस्तरावर सहा वेळा निवडणूक देखील लढवली आहे.

त्यांना मृत घोषित करुनही सक्रीय राहिल्याबद्दल, नोकरशाहीच्या विरोधात दिलेल्या लढ्याबद्दल शांततेचे आय जी नोबेल प्राइज २००३ मध्ये लाल बिहारी यांना मिळाले आहे.

 

lal bihari nobel inmarathi

 

ते कागदोपत्री जिवंत झाले पण यासाठी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची १८ वर्षे मात्र वाया गेली. म्हणूनच त्याच्याविरोधात त्यांनी आलाहाबाद कोर्टात याचिका दाखल केली आहे.

माझ्या वाया गेलेल्या वर्षांचा मोबदला मला मिळायला हवा अशी त्यांची मागणी आहे. सध्या मोबदला म्हणून आपल्याला २५ कोटी रुपये रुपये मिळावेत अशी त्यांची मागणी आहे आणि त्या २५ कोटी रुपयांची त्यांना प्रतीक्षा आहे.

आताही ते मुबारकपूर मधल्या अमोली मध्ये आपल्या पत्नी आणि मुलासमवेत राहतात. पण जिवंतपणी मरण भोगणे हे त्यांच्या बाबतीत अक्षरशः खरे ठरले आहे. म्हणूनच हा एका सिनेमाचा विषय झाला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?