' “माझ्यासाठी हा फोटो म्हणजे अब्जावधींची श्रीमंती आहे” – InMarathi

“माझ्यासाठी हा फोटो म्हणजे अब्जावधींची श्रीमंती आहे”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका – सानिका कुसूरकर

===

कोणत्याही कामाविना इंटरनेटशी मैत्री केली तर काहीतरी भन्नाट गवसतं याचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे का? सोशल मिडीयावरील चॅटिंग, ट्रोलिंग, वाद-प्रतिवाद, भडकत्या पोस्ट यापलिकडील…

 

twitter inmarathi

 

काही दिवसांपुर्वी सहजचं ट्विटरवर नजर टाकली. ट्विटरनं आपलं कर्तव्य करत मला व्हॉट्स हॅपनिंग विचारलं मात्र माझ्याकडे त्यादिवशी सांगण्यासारखं काहीच नसल्याने अखेर ट्विटरनीच माझ्याशी संवाद साधायला सुरुवात केली.

कोरोनाच्या लसींचं राजकारण, नारायण मुंडेंना मिळालेलं मंत्रीपद, तिस-या लाटेचा संभाव्य धोका अशा अनेक बातम्यांचा भडीमार सुरु झाला.

काही मिनिटांपुर्वी वृत्त वाहिन्यांवर याच बातम्या पुन्हा दिसताच मी माझा कर्सर वेगाने फिरवला आणि मात्र एका फोटोवर माझी नजरचं नाही तर कर्सरही आपोआप स्थिरावला.

एका अनोळखी युजरनी पोस्ट केलेल्या या फोटावरून काही केल्या माझी नजर हटेना. आजुबाजुला फिरणा-या भडक बातम्या कधी अंधूक, पुसट झाल्या हे कळलंच नाही.

 

farmer inmarathi

 

हा फोटो मुळ कोणी, कधी पोस्ट केला होता? ठाऊक नाही, अर्थात समोरचं हे बोलकं, जिवंत चित्र पाहिल्यानंतर त्याच्या रुक्ष डिटेल्सकडे जाण्यात रसही उरला नव्हता.

गावाकडील एका शेतक-याच्या खांद्यावर विसावलेले त्याचे दोन सोबती आणि त्यांच्या प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघणारा तो बळीराजा.

जन्म, शिक्षण, करिअर हे सारं धावत्या मुंबईतच झाल्याने गाव ही संकल्पना फक्त काही ग्रामिण साहित्यातून अनुभवली होती. गावाचा पार, चुलीवरचं खमंग जेवण, विहीरीचं थंडगार पाणी, हिरवाईतील टुमदार घरं म्हणजे गाव गाव यापलिकडे फारशी ओळख नव्हती.

मात्र या एका फोटोनी विचारांची चक्र वेगात फिरु लागली.

प्रेम म्हणजे काय? असा प्रश्न हल्ली कुणी विचारला तर नेमकं काय उत्तर द्यावं यासाठी डोकं खाजवावं लागतं. मग आपल्या हिंग्लिश डिक्श्नरीची मान चाळली की त्यातून जे भपकेबाज शब्द गवसतात ते प्रश्न विचारणा-याकडे भिरकावले जातात. अन्कडिशनल, पॅशनेट, फिअरलेस आणि असे अनेक…

हे ही वाचा – पारंपरिक चुलीवरच जेवण बनवून हे शेतकरी हिट ठरले यूट्यूबवर!! वाचा

 

love inmarathi

 

काळानी आपल्या वेगवान चक्रात सामावलेल्या असंख्य गोष्टींपैकी एक म्हणजे आपल्या भावना आणि त्या मांडण्याची भाषा. आपल्या भावना मांडतानाही आपली इमेज, भाषा, देहबोली यांचा अतिरिक्त विचार करत बसल्याने प्रेम व्यक्त करण्याचा आपल्याला पडलेला विसर या फोटोनी अधोरेखित केला.

जितक्या जास्त वेळा मी फोटो पहात होते, तितक्याचे जास्त अर्थ उमगत होते. कदाचित तुम्हालाही असाच अनुभव येईल.

आपल्या प्रियकरांच्या खांद्यावर डोकं ठेवणारी निवांत प्रेयसी, किंवा वडिलांच्या खांद्यावर पहुडलेली लहानगी हे चित्र शहरात दिसून येतं. ते पाहिल्यावर ‘सो क्युट’ ही ठरलेली प्रतिक्रिया देत आपण ते नजरेआडही करतो. मात्र एका शेतक-याच्या खांद्यांवर विसावलेल्या बैलांची जोडी हे समीकरण काही औरचं.

हे चित्र मला नेमकं काय सांगतंय याचा विचार केला तर त्याचे वेगवेगळे कंगोरे उलगडत गेले. एकमेकांच्या खांद्यावर आयुष्याची भिस्त असणारे हे तिघेजण पाहिल्यावर डोळ्यात पाणी आलं नाही तरच नवल!

आईवडिल थकले की मुलांच्या खांद्यावर घराची जबाबदारी सोपवली जाते, मात्र त्याचवेळी मुलाच्या भक्कम खांद्यावर एका निवांत संध्याकाळी आपणही विसावू शकतो ही पालकांची अपेक्षा बहुतांश वेळा अपुर्णच राहते.

ज्या घरात नात्यांमध्ये अशा अदृश्य भिंती उभ्या केल्या जातात अशा सर्वांसाठी हा फोटो अंजन घालणारा ठरतोय.

हा फोटो केवळ दृश्य स्वरुपात असला तरी संवेदनशील मन असेल तर त्यातील संवाद तुम्हाला नक्की ऐकू येईल. कदाचित शेतकरी म्हणतोय की ” खांदे थकले तरी मी हाय रं गड्या. संकटं येतील, महामारीचं वादळ येईल, निसर्ग थैमान घालेल, शासकीय योजना येऊन तोंडाला पानं पुसतील. आपणच पिकवलेलं सोनं लुटण्यासाठी दलालांच्या टोळ्या धाड टाकलीत, या सगळ्यात माझा खिसा आणि आसवं गाळणारे डोळे रिते होतील आणि त्यावेळी हे सारं संपवण्याखेरीज दुसरा मार्ग नसेल, पण त्याच वेळी माझे खांदे तुझ्या प्रेमाची, जबाबदारीची आठवण करून देतील आणि मग आयुष्य संपवण्याचे धाडस मी करु शकणार नाही “.

 

the bull inmarathi

 

शेतक-यांच्या दयनीय अवस्थेबद्दल लंब्याचौड्या गप्पा मारल्या जातात, आर्थिक मदतीच्या स्वरुपात आपल्याल अन्नदात्याला भीक घातली जाते.

आत्महत्या करणा-या शेतक-याची इतकी भीषण चित्र रंगवली जातात की आज परदेशी नागरिकांच्या डोळ्यापुढेही ‘गाव म्हणजे कर्जात बुडालेला शेतकरी’ हेच चित्र उभं राहतं.

मात्र उदानिस, हतबल शेतक-याची प्रतिमा रंगवताना आपल्या सक्षम खांद्यावर कुटुंबाचेच नव्हे तर आपल्या मुक्या साथीदारांचंही ओझं समर्थपणे वाहणारा हा शेतकरी व्हायरल का केला जात नाही?

आजपर्यंत शेतकरी म्हणजे त्यांच्या समस्या, कर्जाचे डोंगर, कृषी कायद्याच्या बदलासाठी रात्रंदिवस सरकारी यंत्रणांपुढे ठिय्या देणा-या किसान संघटना हे माझ्या मनातील गैरसमज या फोटोमुळे क्षणात पुसले गेले.

या फोटोतील शेतक-याच्या बॅंक अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे? घरात सोनंनाणं किती? मुलांचं शिक्षण इंटरनॅशनल शाळेत होतंय की जिल्हा परिषदेच्या शाळेत? भविष्याची तजवीज किती? सरकारकडून कर्जाची किती रक्कम थकीत आहे? या सगळ्या प्रश्नांच्या पलिकडे जात हा शेतकरी मला अब्जावधींचा धनी वाटतो.

 

farmers inmarathi

 

बैलांची जोडी आणि बळीराजाच्या या भावूक क्षणाला नेमकी काय उपमा द्यावी हे मांडाताना शब्दही अपुरे पडतात. त्यांच्यातील प्रेम, विश्वास, दिलासा, कृतज्ञता हे शब्दही खुजे वाटतात. काही नात्यांना नाव नसतं हेच खरं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?