' मान नक्की कुणाचा? देवी सरस्वतीचा की ‘यशवंत’ साहित्यिकांचा? – InMarathi

मान नक्की कुणाचा? देवी सरस्वतीचा की ‘यशवंत’ साहित्यिकांचा?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका – सानिका कुसूरकर
===

रोजचा दिवस महाराष्ट्रासाठी नवं वादळ घेऊन येतोय. एकीकडे कोरोनाच्या लसीकरणाची मोहिम वेगात धावत असताना दोन दिवसांपुर्वी राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराच्या आरोपाने राजकीय विश्वात खळबळ माजली.

 

dhananjay munde inmarathi

 

प्रसारमाध्यमांना नवं खाद्य मिळालं. ‘गल्ली ते दिल्ली’ च्या पारावर राजकारण्यांचे अनैतिक संबंध, भरडली जाणारी विवाह व्यवस्था अशा लंब्याचौड्या गप्पांना उधाण आलं.

हे प्रकरण ताजं असतानाच ‘हम भी किसीसे कम नही’ म्हणत आज वादग्रस्त घटनांच्या या स्पर्धेत साहित्य क्षेत्राने मुसंडी मारलीय.

विदर्भ साहित्य संघाने साहित्यिक यशवंत मनोहर यांना जीवनव्रती पुरस्काराने सन्मानित करण्याचा घाट घातला होता. मात्र ऐन पुरस्कार सोहळ्याच्याच दिवशी यशवंत मनोहर यांनी पुरस्कार नाकारला. वरकरणी साहित्यविश्वाला हा हादसा नवा नाही.

 

yashwant manohar

 

आपल्या वैयक्तिक कारणांमुळे एखादा पुरस्कार नाकारण्याची मोठी परंपरा साहित्यक्षेत्राला आहे, मग यावेळी नवे काय ? असा प्रश्न विचारण्यांना ‘पुरस्कार नाकारण्याचे अजब कारण’ आपला प्रश्न मागे घेण्यासाठी पुरेसं आहे.

कोणताही लेखक किंवा कवी साठी “यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त आहे” हे वाक्य तुम्ही नक्की ऐकले असेल, अनेकदा उच्चारलेही असेल. आपल्या लेखणीच्या बळावर कोणतंही युद्ध समर्थपणे लढण्यास तयार असलेल्या साहित्यिकाचे कौतुक करण्यासाठी ही उक्ती वापरली जात असली तरी यावेळी मात्र नेमकी हिच उक्ती पुरस्काराच्या नकाराचे कारण ठरली आहे.

ज्या सोहळ्यात मला गौरवण्यात येणार आहे त्या सोहळ्यात अमुक एक व्यक्ती नको, असा मागणीवजा आदेश अनेक कलाकार, साहित्यिकांकडून दिला जातो. यांमध्ये अनेकदा त्या कलाकाराचे वैयक्तिक हितसंबंध किंवा एखाद्या व्यक्तीशी असलेली तेढ कारणीभूत असते.

अशावेळी ज्याला पुरस्कार द्यायजा आहे, त्यांचा ‘मूड’ सांभाळण्यासाठी, “कार्यक्रमात मीठाचा खडा नको” असं म्हणतं बिचारे आयोजक या मागणीवर मुकाटपणे मान डोलावतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीविषयी असलेला आकस हा ‘टॅन्ट्रम्स’ या नावाखाली खपवून घेतला जातो.

मात्र यावेळी यशवंत मनोहर यांनी व्यक्तीशी नवे तर थेट सरस्वती देवीलाच टार्गेट केलं आहे.

 

saraswati inmarathi

 

पुरस्कार सोहळ्याच्या रंगमंचावर सरस्वती देवीची प्रतिमा ठेवून त्याचे पुजन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्याचा प्रघात आहे. सर्वच सांस्कृतिक संस्थांतर्फे तो पाळला जातो. मात्र मला पुरस्कार द्यायचा असेल तर हा प्रघातच पाळला जाऊ नये अशी अवाजवी मागणी करण्यात आली.

त्यात गमतीची बाब ही की कार्यक्रमाच्या दिवशीच यशवंत मनोहर यांनी संस्थेच्या एका पदाधिका-याला संदेश पाठवून आपली भूमिका स्पष्ट केल्याने कवी मनोहर यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे खवळलेल्या मनोहरांनी पुरस्कार नाकारण्याचा (त्यांच्या दृष्टिने साधा सोपा) मार्ग अवलंबविला.

अर्थात यावेळी विदर्भ साहित्य संघानेही आपल्या भूमिकेवर ठाम रहात सरस्वती देवीची प्रतिमा रंगमंचावरच ठेवल्याने एकंदरितच आयोजक आणि साहित्यिक यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले.

 

vidarbha sahitya sangh

 

आता प्रश्न उरतो, तो नेमकी कुणाची भूमिका योग्य?

कलावती देवीला दोन सावल्या असतात असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे कोणत्याही यशस्वी कलाकाराला सशक्त कलेच्या वरदहस्तासह अहंकाराचा शाप मिळतोच. तसंच काहीसं या प्रकरणातही दिसून येतं.

एखाद्या पुरस्कारासाठी मी आयुष्यभर जपलेले विचार (इहवादी विचार), माझे लेखन, माझी मूल्य जुगारावर लावू शकत नाही असे म्हणत मी धर्म मानत नसल्याने सरस्वती देवीशी माझा काय संबंध? असा बोचरा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याच कारणासाठी त्यांनी पुरस्कारही नाकारला. याउलट अशा पुरस्कार सोहळ्यांमध्ये देवाधिकांची प्रतिमा न ठेवता सावित्रीबाई फुल्यांसारख्या स्त्रियांच्या प्रतिमा, संविधानाची प्रत ठेवण्याचा अतिरिक्त सल्लाही त्यांनी दिला.

 

saraswati devi inmarathi

 

पुरोगामी विचारवंतांनी त्यांच्या या म्हणण्याचे समर्थन केलं आणि हे त्यांचं वैयक्तिक मत आहे असा पवित्रा घेतला असला तरी एवढ्यावर हे प्रकरण थांबत नाही.

ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर यांना त्यांच्या कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला होता यात शंका नाही, मात्र इतर गुणी साहित्यिकांना बाजूला सारत त्यांच्या नावाची घोषणा करणा-या विदर्भ साहित्य संघाबद्दल त्यांनी माणूस म्हणून कोणताही विचार करू नये? आपली पाठ थोपटणा-यांच्या हातांबद्दल तुम्हाला कोणतीही श्रद्धा, कृतज्ञता वाटू नये इतकं साहित्यक्षेत्र कोडगं झालं आहे का हा प्रश्न पडतोच.

कवी, साहित्यिक यांना संवेदनशील मनाचा माणूस ही दिली जाणारी उपमा किती फोल ठरते याचं हे प्रतिक नव्हे का?

आता मुद्दे राहतात, ते साहित्यिकांच्या अनुभवाचे! अगदी नवख्या, हौशी साहित्यिकांकडूनही हल्ली सर्रास कार्यक्रमांना उपस्थिती लावली जाते. मग, कवी मनोहर हे तर ज्येष्ठ साहित्यिक. वर्षानुवर्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार सोहळे, काव्यमैफली यांचे मंच त्यांच्यासाठी काही नवे नाहीत.

वारंवार कार्यक्रमाचा अनुभव घेतल्यानंतर तेथिल रंगमंचीय व्यवस्था, रंगमंचाचे नियम, पाळल्या जाणा-या काही अघोषित प्रथा या बाबीनवख्या कलाकाराच्याही अंगवळणी पडतात, तितकी साधी बाब एवढ्या ज्येष्ठ कलाकाराच्या विचारांतून निसटावी?

साहित्यिकांचा सन्मान करणा-या आयोजकांकडून त्यांचे हरत-हेचे म्हणणे मान्य केले जाते. अशावेळी एखाद्या व्यक्तीबद्दलचा आकस, नाराजी समजून घेतली जाते, मात्र कार्यक्रमाचे ठिकाण, तेथिल रंगमंचीय व्यवस्था यापासून ते थेट मंचावर कोणाची प्रतिमा असावी वा नसावी यांपर्यंत सगळ्याच (अनावश्यक) बाबींमध्ये पुरस्कार्थीने ‘हम करे सो कायदा’ हा पवित्रा घेणं कितपत योग्य आहे?

 

yashwant manohar inmarathi

 

आयोजकांकडून पुरस्कार्थींना पाहुणे म्हणून निमंत्रित केलं जातं, त्यांची उठबसही त्याच नात्याने केली जाते, मात्र आपल्या घरी आलेल्या पाहुण्याने आपल्याच घराची रचना बदलण्याचा हट्ट करणं ही बाब आयोजकांसाठी किती शरमेची असेल याची कल्पनाही करवत नाही.

बरं, आता मुद्दा राहतो, तो यशवंत मनोहर यांच्या भावनेचा. मी नास्तिक आहे, किंवा मी धर्म मानत नाही म्हणून देवीच्या प्रतिमेला नाकारताना आपल्या भावना जपल्या जाव्यात हा हट्ट करताना याचवेळी आपण आयोजकांच्या भावना पायदली तुडवत आहोत याचा त्यांना विचारही करावासा वाटला नाही?

कलाकार किंवा साहित्यिक हा नेहमीच आपल्या कलेच्या, प्रतिभेच्या बळावर श्रेष्ठ असतो यात शंका नाही. अथय परिश्रमांतून त्यांनी आपली ही प्रतिभा उभारलेली असते हे देखील मान्य, मात्र आपण कमावलेलं मोठेपण टिकवण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून का केले जात नाहीत.

कलाकार मोठा होताना त्यांना प्रोत्साहन देणारे अनेक हातही यशस्वी होत असतात. त्यामध्ये रसिक आणि साहित्यविश्वातील संस्थांचाही समावेश असतो. मग पुरस्कार नाकारत आपण रसिकांचा आणि मुख्यतः तो पुरस्कार जाहीर करणा-या संस्थांचा अवमान करतो ही बाब साहित्यिकांनी विचारतही घेऊ नये हे दुर्दैव नक्की रसिकांचं, साहित्यविश्वाचं की आपल्याच भूमिकेवर ठाम राहण्याचा आटोकाट प्रयत्न करणा-या साहित्यिकांचं?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?