' ”पेन्शनवर जगेन, पण शिखर सर करेन”… वाचा या अवलियाची भन्नाट कहाणी! – InMarathi

”पेन्शनवर जगेन, पण शिखर सर करेन”… वाचा या अवलियाची भन्नाट कहाणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या व्यक्तीला जगातील वेगवेगळी पर्वत शिखरं खुणावत असतात. माऊंट एव्हरेस्ट म्हणजे जगातील सगळ्यात उंच पर्वत! जन्मात एकदा तरी माऊंट एव्हरेस्ट सर करावा अशी अनेकांची इच्छा असते, हल्लीच्या काळात ती बऱ्याचदा पूर्णही होते.

एकदा तिकडे जाऊन आल्यावर लोक आयुष्यभर त्याचं कौतुक सांगतात. का बरं सांगू नये, इतका अवघड अशक्य वाटणारा पर्वत चढून आल्यानंतर स्वतःलाच काय भारी वाटत असेल!

एखाद्या गिर्यारोहकाने जगातील १४ उंच पर्वत शिखरं केवळ ६ महिन्यात सर केली आहेत असं सांगितलं तर विश्वास बसणं कठीण आहे.

असं घडलं आहे. हा भीम पराक्रम केला आहे तो नेपाळमधल्या निर्मल पुर्जा या गिर्यारोहकाने. केवळ ६ महिन्यात १४ उंच पर्वत शिखरं त्यांनी सर केली.

 

nirmal-purja-inmarathi

 

पर्वत शिखर सर करणं त्यांच्यासाठी फार कठीण नव्हतं. मात्र, या मोहिमांसाठी लागणारे पैसे जमा करणं, हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

त्यांना लोकांकडून मदत मिळणं अवघड झालं होतं. कारण गिर्यारोहणाच्या क्षेत्रात निर्मल किंवा निम्स पूर्जा हे नाव मोठं नव्हतं. लोकांना सांगावं लागायचं की, त्यांनी स्पेशल फोर्समध्ये गिर्यारोहण केलं आहे. लोकांचा यावर विश्वास बसणं कठीण होतं.

तरीही जमलेल्या पैशातून त्यांनी गिर्यारोहणाची मोहीम आखली. त्यानुसार ७ महिन्यात १४ पर्वत शिखरं पादाक्रांत करायची होती.

दोन वर्षांपुर्वी २३ एप्रिल २०२० मध्ये त्यांनी त्यांची ही गिर्यारोहणाची मोहीम नेपाळमधल्या अन्नपूर्णा या शिखरापासून सुरू केली. तर २९ ऑक्टोबर २०२० मध्ये चीनमधील शीशपांगमा शिखर सर करून आपली मोहीम पूर्ण केली. ६ महिने ६ दिवसात त्यांनी जगातली १४ उंच शिखरं सर केली आहेत. हे करून त्यांनी एक नवीन इतिहास रचला आहे.

 

nims-purja-inmarathi

 

हा एक नवीन विक्रम आता त्यांच्या नावावर जमा झाला आहे. केवळ विक्रम करावा या हेतूने त्यांनी ही मोहीम केली नाही. तर जर आपण मनापासून ठरवलं आणि त्यासाठी तन, मन, हृदय, आत्मा जर त्या गोष्टीत ओतला, तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही.

पूर्जा यांना हेच दाखवून द्यायचं होतं. तसंच नेपाळी लोकांमध्ये गिर्यारोहणाची क्षमता अधिक असूनही त्यांच्याविषयीची फारशी माहिती बाहेर येत नाही. म्हणूनच नेपाळी लोकांची क्षमता दाखवून देणं, हासुद्धा त्यांचा उद्देश होता. तसंच आजकाल जगात वाढलेल्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गात बदल होत आहेत त्याविषयी जागरूकता निर्माण करून देणे हादेखील या मोहिमेमागचा हेतू होता.

ही मोहीम पूर्ण करताना त्यासाठी लागणाऱ्या पैशाची अडचण होतीच, त्यात त्यांच्या आईची तब्येतही खालावली होती. शिवाय काही शिखरं चीन-पाकिस्तान सारख्या देशात असल्यामुळे राजकीय हस्तक्षेपाचा सामनादेखील करावा लागणार होता. या सगळ्यावर मात करत त्यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे.

 

nirmal-purja1-inmarathi

 

२०१२ पासून पूर्जा यांनी गिर्यारोहणाला सुरुवात केली. ते नेपाळच्या गुरखा सैन्यातदेखील काम करायचे. त्यात ‘स्पेशल फोर्स’ सेवेत काम करताना त्यांनी अनेक चढाया देखील केल्या. परंतु या सगळ्याच चढाया कधीच प्रसिद्धीस आल्या नाहीत.

कित्येकदा अडकलेल्या गिर्यारोहकांना त्यांनी रेस्क्यू केले आहे. त्यांना कठीण परिस्थितीतून सुरक्षितरित्या खाली आणले आहे. पण याविषयीची वाच्यता कधी झाली नव्हती. २०१६ मध्ये माउंट एव्हरेस्टवर गेलेले अनेक गिर्यारोहक खराब हवामानात अडकले असताना त्यांना व्यवस्थित आणण्याच्या कामात पूर्जा सहभागी होते.

त्यावेळेस त्यांच्या मनात या मोहिमेची कल्पना आली आणि त्यांना वाटलं की हे चॅलेंज आपण पूर्ण करू शकू.

मग त्यांनी गिर्यारोहणासाठी एक टीम तयार केली आणि मोहीम सुरू केली. सुरुवातीला त्यांनी माऊंट एव्हरेस्ट, मकालू, लोत्शे ही तीन पर्वतशिखरे केवळ पाच दिवसात सर केली होती. ही एक अविश्वसनीय घटना आहे. इतके करूनही त्यांना त्यावेळीदेखील थकवा जाणवला नव्हता.

 

nims-purja-team-inmarathi

 

निम्स पूर्जा यांचं बालपण गरीबीत गेलं. त्यांचं शिक्षणदेखील बोर्डिंग स्कूलमध्ये झालं. वडील अधू असल्यामुळे ते कमावू शकत नव्हते. आई आणि भाऊ कसेबसे घर चालवायचे. शाळेमध्ये त्यांना खेळाचं प्रशिक्षण मिळालं. वयाच्या तेराव्या वर्षी मनात भीती असतानाही त्यांनी नदीचा किनारा पार केला होता.

निम्स पूर्जा यांच्या, मिलिटरी करिअरमध्ये त्यांना बरंच काही शिकायला मिळालं. कुठलीही कठीण परिस्थिती असली तरी फारसं न घाबरता आपण नेहमी जसं वागतो तसंच वागावं, ही शिकवण त्यांनी घेतली. हीच शिकवण त्यांना गिर्यारोहण करताना कामी आली.

खराब हवामान, टीम मेट्समधील मतभेद, पैशांची जुळवाजुळव हे करताना योग्य निर्णय घेणे खूप महत्त्वाचे असते. जे त्यांनी योग्यप्रकारे पार पाडले.

१४ शिखरं पूर्ण करायची त्यांची तयारी होती. परंतु त्यासाठी लागणारे दिवसदेखील एका नोकरदार व्यक्तीसाठी जास्त होते. त्यांच्यासमोर अशी परिस्थिती आली की एक तर सैन्यात राहायचं नाही तर गिर्यारोहण करायचं. शेवटी त्यांनी सैन्यातील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि उर्वरित आयुष्य पेन्शनवर जगायचं ठरवलं.

त्यांचं घरदेखील त्यांनी विकलं. गिर्यारोहणासाठी लागणाऱ्या पैशांची सोय त्यांनी यातून केली. या मोहिमेसाठी लागणारा पैसा ही खूप होता. तो जमा करणे हेच मोठे काम त्यांच्यापुढे होते. त्यामुळे सराव करण्यासाठीदेखील पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यांच्यासारखेच गिर्यारोहण करण्यासाठी उत्सुक असणारी टीम त्यांना मिळाली. त्यांच्या या मोहिमेमुळे नेपाळमधल्या अनेक गिर्यारोहकांना प्रेरणा मिळाली आहे.

 

nims-purja1-inmarathi

 

अन्नपूर्णासारख्या अवघड पर्वतावर जिथे हिमस्खलन आणि बर्फाळ वादळ यामुळे, केवळ ३८% गिर्यारोहक मोहीम पूर्ण करतात. तिथे पूर्जा यांनी गिर्यारोहकांना जास्त माहीत नसलेला जवळचा मार्ग निवडला अशीही त्यांच्यावर टीका झाली.

तसेच निम्स पूर्जा यांनी आपल्याजवळील ऑक्सिजनचा जास्त वापर एव्हरेस्ट चढताना केला. त्यांच्या मोहिमेत जेव्हा जेव्हा इतर गिर्यारोहक अडकलेले दिसले त्यावेळेळी त्यांनी कशाचीही पर्वा न करता इतरांना वाचवण्यासाठी धडपड केली.

मानवी जीवनापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नसतं. जर उंच ठिकाणी एखाद्या माणसाची वाचण्याची शक्यता असेल आणि त्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असेल तर त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा.

त्या माणसाला तिथेच सोडून आलो तर मी स्वतःलाच कधी माफ करू शकणार नाही. असं त्यांना याविषयी वाटतं.

२०१९ मध्ये माउंट एव्हरेस्टवर झालेली गिर्यारोहकांची गर्दीही त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली होती.

 

mount-everest-2019-inmarathi

 

त्यानंतर जुलैमध्ये त्यांनी नेपाळमधील ८००० मीटर्स उंचीवरील ६ पर्वत शिखरं ३१ दिवसात पूर्ण केली. नंतर पाकिस्तानातील ८००० मीटर्स उंचीवरील ५ पर्वत शिखरे २३ दिवसात पूर्ण केली. त्यानंतर कांचनगंगा आणि ब्रॉड पीकसारखी अवघड ठिकाणंदेखील झटपट पूर्ण केली.

नंतर K2 सारखं महत्त्वाचं शिखर देखील सहज पार केलं. ८००० मीटर उंचीवर गेल्यावर बरेच जण दमतात. पण निम्स यांना मात्र तेवढ्या उंचीवर वेगळीच ऊर्जा मिळते. तिथे ते सगळ्यात पुढे असतात.

मोहिमेतील शेवटचा टप्पा हा चीनमधील होता. त्याकाळात चीनने शिखर चढायला बंदी केली होती. ही चढाई करायला त्यांना परवानगी मिळत नव्हती. पण ही परवानगी मिळावी म्हणून निम्स पूर्जा यांनी खूप प्रयत्न केले. आणि शेवटी चिनी अथॉरिटीने त्यांना परवानगी दिली. त्यांनी शेवटचं शीशपांगमा हे शिखर पूर्ण करून सात महिन्यातील मोहीम त्यांनी केवळ ६ महिने ६ दिवसात पूर्ण केली.

पूर्जा हे एक वेगळंच रसायन आहे. त्यांच्यात एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आहे. ते स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी झटतात. त्यांना आव्हान स्वीकारायला आवडतं.

त्यांची मोहीम पूर्ण झाली त्यावेळेस त्यांना घ्यायला त्यांची आई आली होती. तिच्या डोळ्यातील आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसत होता. त्यांच्या संपूर्ण टीमचं विमानतळावर स्वागत झालं आणि त्यांच्या स्वागताला बराच मोठा जनसमूह जमला होता.

तर असा हा अवलिया निम्स पूर्जा. ज्यांनी एक नवीन आदर्श संपूर्ण मानवजातीसमोर ठेवला आहे. एक अशक्य विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. आणि त्यांना विश्वास आहे की विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. आता यापुढे त्यांचा विक्रम कोण मोडेल हे पहावे लागेल.

 

nims-purja2-inmarathi

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?