' इडली- सांबारमधील ‘सांबार’चे आरोग्यदायी लाभ तुम्हाला माहित आहेत का? वाचा – InMarathi

इडली- सांबारमधील ‘सांबार’चे आरोग्यदायी लाभ तुम्हाला माहित आहेत का? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येक भारतीय घरात इडली – डोसा, वाफळतं सांबार या गोष्टी आठवड्यातून एकदा तर होतातच. जोड्या स्वर्गात बनतात हे खाद्य पदार्थांच्या बाबतीत इडली/डोसा सांबार या जोडीसाठी अगदी चपखल आहे. या स्वर्गीय जोडीतलं सांबार हे नुसतंच चविष्ट नसतं, तर ते अत्यंत पौष्टिक आणि बहुगुणी आहे. सांबारचे हे पौष्टिक गुण समजल्यावर तुम्हीही व्हाल थक्क –

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीची ओळख असणारं सांबार भात असो की गरमा गरम वाफाळती, मऊसूत कापसासारखी हलकी इडली किंवा खरपूस भाजलेला, बटर पसरलेला कुरकुरीत डोसा. सोबत वाफळतं, भाज्यांचा भरपूर समावेश असलेलं सांबार समोर आलं, की तुम्हालाही डाएट वगैरे विसरायला होतं न? मात्र हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, की मुळात सांबार हाच एक डाएटचा उत्तम पर्याय आहे.

दक्षिणेकडे सहसा गहू वापरला जात नाही. तांदूळ आणि त्यापासून बनणारे पदार्थ हेच त्यांचं मुख्य अन्न आहे. नाष्ट्यातल्या पदार्थात तांदळाला डाळींची जोड असते मात्र जेवणात भाताचेच प्रमाण जास्त असल्यानं आहारात कार्बोदकं भरपूर असतात, त्याच्या जोडीच्या प्रथिनांची गरज सांबार भागवतो.

 

sambar inmarathi

 

डाळ आणि भाज्यांचा समावेश असणारं सांबार जगभरात बनवलं जात असलं, तरीही सांबार बनविण्याची प्रत्येकाची पध्दत वेगळी आहे.

मुळात भारताच्या दक्षिणेतलं मुख्य अन्न असलेलं सांबार आज जगभरात आवडीनं बनवलं जातं आणि खाल्लं जातं. मात्र प्रांताप्रांतात आणि घराघरात हे बनविण्याच्या पध्दती वेगवेगळ्या आहेत.

काही ठिकाणी चिंचेचा कोळ किंचित जास्त घालून आंबट चवीचं सांबार बनतं, तर काही ठिकाणी याला गुळाच्या खड्याची जोड देत त्याची चव आंबट गोड बनवली जाते. काही ठिकाणी कोहळ्यापासून शेवग्याच्या शेंगेपर्यंत भरपूर भाज्या घातल्या जातात, तर काही ठिकाणी केवळ कांदा, टोमॅ्टो आणि शेवग्याची शेंग वापरली जाते.

सांबार आणि शेवग्याच्या शेंगेचं नातंही अतूट आहे. बाकी भाज्या नसल्या एकवेळ चालेल, पण सांबारमधे शेवग्याच्या शेंगांचे तुकडे हवेतच हवेतच. 

तुरीच्या डाळीपासून बनविल्या जाणार्‍या सांबारमधे अनेक पोषणमूल्यं असतात. तुम्ही अगदी नियमितपणे खाता त्या सांबारमधले हे गुणधर्म तुम्हाला कळले तर या आंबटगोड पदार्थाच्या प्रेमात तुम्ही जास्तच पडाल.

प्रथिनाचा खजिना-

 

sambar inmarathi1

 

सांबार हे डाळीपासून बनतं आणि डाळींमधे भरपूर प्रमाणात प्रथिनं असतात. प्रथिनांचा उत्तम पर्याय म्हणून शाकाहारात डाळींना महत्व आहेच.

अंडी, मासे आणि मांस मांसाहारींना प्रथिनांचा पुरवठा करत असतात, मात्र शाकाहारींसाठी डाळ हे वरदान आहे. मसल्सच्या वाढीसाठी, वजन कमी करण्यासाठी प्रथिनयुक्त आहार घेणं गरजेचं असतं.

तंतूमय-

प्रथिनांशिवाय सांबारमधे मुबलक प्रमाणात चोथा असतो. सांबारमधे असणार्‍या भाज्या ही गरज पूर्ण करतात. याशिवाय ॲण्टिऑक्सिडंटची गरजही या भाज्यांच्या समावेशामुळे पूर्ण होते.

पारंपरिक सांबारमध्ये टोमॅटो, शेवग्याची शेंग, भेंडी, कोहळा, वांगं, भोपळा यांचा सढळ समावेश असतो. या सगळ्याच भाज्या फ़ायबर असणार्‍या आहेत.

 

vegetables shopping InMarathi

 

फ़ायबर पचायला बराच वेळ लागतो. पोट भरल्याची भावना फ़ायबरमुळेच येते आणि जास्त खाणं टाळता येतं. हृदयासाठी आणि कोलेस्ट्रॉलसाठी हाय फ़ायबर फ़ूड उत्तम असतं.

ॲन्टिऑक्सिडंटस-

भरपूर पाणी असलेलं डाळीचं वरण हा सांबारमधला मुख्य घटक आहे. यात विविध जीवनसत्वं, खनिजं, आयर्न, झिंक, फ़ोलाईट आणि मॅग्नेशियम असतं.

भाज्या आणि डाळींसोबत यात जो मसाला वापरला आतो तोही पोषणमूल्यांचा खजिना आहे. चिंचेचा कोळ, हळद, कडिपत्ता, लाल मिरची आणि मोहरी या सगळ्यात अगणित औषधी गुण आहेत.

 

sambar inmarathi2

 

सर्वात महत्वाचं म्हणजे हे मसाल्याचे पदार्थ अन्न पचायला मदत करणारे आहेत. पचनक्रियेत यांची महत्त्वाची भूमिका असते. याशिवाय वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही यांची मदत होते.

पचनास हलके-

सांबारमधे मुबलक प्रमाणात असणारं पाणी आणि फ़ायबरमुळे ते पचनास हलकं असतं. मल मृदू करणासाठी सांबारमधलं पाणी मदत करतं, तर यातलं फ़ायबर मल विसर्जन क्रिया सहज करतं.

वजन कमी करण्यासाठी मदतीचं-

सांबारमधे प्रथिनं मुबलक प्रमाणात असतात हे आपण पाहिलं. या प्रथिनांची मदत वजन कमी करण्यासाठी होते. मुळात पचन सुरळीत झाल्यानं ब्लोटिंगचा त्रास होत नाही आणि शरीरातून टाकाऊ घटकांचा योग्य पध्दतीने निचरा झाल्यानं वजन कमी होण्यास मदत होते.

डिटॉक्स-

 

sambar inmarathi3

 

कधी कधी तुम्हाला हलकं काही खायचं असतं, मात्र चवीत तडजोड कराची नसते, अशावेळेस भरपूर भाज्या घातलेलं बाऊलभर सांबार योग्य पर्याय आहे. विश्वास नाही बसत? मग यातले घटक पुन्हा एकदा पहा- प्रथिनयुक्त डाळ, पाणी, भरपूर सिझनल भाज्या आणि पचनक्रिया सुलभ करणारे मसाल्याचे घटक. फक्त मीठाचा वापर कमीत कमीत करावा.

नुसतंच सांबार खायचं नसेल, तर एक किंवा दोन इडल्या सोबत घ्याव्यात. भातापेक्षा इडलीचा पर्याय कधीही उत्तम. कारण, भात हे केवळ कार्बोदकं देतं, तर इडलीमधे असणारी डाळ तिचं पोषणमूल्य वाढवते.

असं हे बहुगुणी सांबार भारतानं जगाला दिलेली आरोग्यपूर्ण पौष्टिक भेट आहे.

हे लक्षात ठेवा-

 

cooking inmarathi 1

 

डाळ शिजतानाच त्यात कधीही भाज्या घालू नयेत. सांबारमधल्या भाज्या या योग्य प्रमाणात शिजलेल्या असतील तरच त्या चांगल्या लागतात.

टोमॅटो आणि चिंचेचा कोळ दोन्ही वापरणार असाल तर साखर किंवा गूळ घालायालाच हवा.

सांबारची चव जास्त वाढविण्यासाठी फ़ोडणीतही थोडा सांबार मसाला घालावा, मात्र तो जळणार नाही याची काळजी घ्या.

सांबार ताजं केलेलं आणि गरमा गरम असेल तरच त्याची चव चांगली लागते. कधीही सांबार आधी करून ठेऊ नये.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?