' दीडशे वर्षांपूर्वी एकटीने अडीच लाख किमीचा जगाचा प्रवास करणाऱ्या महिलेची गोष्ट! – InMarathi

दीडशे वर्षांपूर्वी एकटीने अडीच लाख किमीचा जगाचा प्रवास करणाऱ्या महिलेची गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

फिरायला जायची, नवीन ठिकाणांना भेट देण्याची आपल्या सर्वांनाच आवड असते. काहींना हे फिरायला जाणं फक्त आपल्या परिवारातील लोकांसोबत असावं असं वाटतं, तर काहींना जितके जास्त लोक सोबत तितका त्यांचा आनंद वाढत असतो.

विकेंडच्या वन डे ट्रिप मध्ये सुद्धा आपण आजकाल बघतो की, जवळचे नातेवाईक, मित्र, शेजारी यापैकी एकत्र येतात आणि तो दिवस आनंदात साजरा करतात.

 

indian family holiday inmarathi

 

आठवड्याच्या शेवटी केलेली ही धमाल तुम्हाला पुढचा आठवडा काम करण्याची उर्जा देत असते.

वेगवेगळ्या प्रकारची लोक सोबत असली की, ठराविक गोष्टीला त्यांच्या प्रतिसाद देण्याच्या पद्धतीमुळे नकळत काहीतरी विनोदी घडत असतं आणि आपल्याला मजा येत असते.

मोठ्या टुर मध्ये आपण काही फॅमिली एकत्र असलो की, नकळत एकमेकांकडून काही गोष्टी शिकत असतो, काही विषयांवरचं मत जाणून घेत असतो.

मागच्या वर्षात आपण या गोष्टी इतक्या मिस केल्या की, आता त्याची गरज फार प्रकर्षाने जाणवत आहे. अमेरिकेतील एका महिलेने हे कधीच अनुभवलं नाही किंवा मिस केलं नाही.

‘इडा लॉरा’ हे त्या महिलेचे नाव आहे. या महिलेने एकटीने २ वेळेस जगभ्रमण केलं आहे. नऊ वर्ष सतत प्रवास करून तिने हा विक्रम केला आहे.

आपल्यापैकी क्वचितच एखादी व्यक्ती अश्या प्रकारे एकट्याने फिरायला जायला तयार होईल. एकट्याने कधी सिनेमा सुद्धा न बघायला जाणारे आपण वर्ल्ड टुर साठी एकटं तयार होणं हे अशक्यच म्हणावं लागेल.

इडा लॉराने एकटीने ३२,००० किलोमीटर इतका प्रवास हा रोड ने केला होता. याशिवाय २४०००० किलोमीटर इतका प्रवास त्यांनी समुद्र मार्गाने केला होता.

 

ida laura inmarathi

 

या प्रवासात त्यांनी अमेरिका, दक्षिणपूर्व आशिया, आखाती देश, आफ्रिका सारखे देश त्या एकट्याच फिरल्या आहेत. १८४६ ते १८५५ या काळात इडा लॉरा यांनी दोन वेळेस जगभ्रमण केल्याची नोंद आहे. कोण आहेत इडा लॉरा? त्यांनी हे कसं साध्य केलं? जाणून घेऊयात.

इडा लॉरा फेईफर यांचा जन्म १७९७ मध्ये ऑस्ट्रिया या देशात झाला होता. मानव वंश या विषयाच्या त्या थोर अभ्यासिका होत्या. त्या खूप चांगल्या लेखिका सुद्धा होत्या.

त्या काळात एकटीने जगभ्रमण करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. इडा लॉरा यांनी वयाच्या ५ व्या वर्षी पॅलेस्टाईन आणि इजिप्त हा पहिला प्रवास एकटीने केला होता.

इडा लॉरा यांची लिखाणाची शैली लोकांना इतकी आवडत होती की, त्यांनी लिहिलेले काही लेख हे इतर भाषेत भाषांतरीत करण्यात आले आहेत. इडा या बर्लिन आणि पॅरिस च्या भौगोलिक अभ्यासक लोकांच्या समूहाच्या त्या सदस्य होत्या.

इंग्लंडच्या रॉयल जिओग्राफी सोसायटी ने मात्र त्यांचं सदस्यत्व नाकारलं होतं. याचं कारण म्हणजे इडा लॉरा या एक महिला होत्या. महिलांना रॉयल जिओग्राफी सोसायटीचं सदस्यत्व मिळवणं त्या काळात मान्य नव्हतं.

महिलांचं सदस्यत्व मान्य करण्यासाठी १९१३ पर्यंत थांबावं लागलं होतं. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. २७ ऑक्टोबर १८५८ रोजी इडा लॉरा यांचा मृत्यू झाला होता.

सुरुवात कशी झाली?

इडा लॉरा यांनी लहानपणीच हे ठरवलं होतं की त्यांना इतकं पर्यटन करायचं आहे. इडा लॉरा यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांचे दोन्ही मुलं सेटल होईपर्यंत वाट पहावी लागली होती.

 

ida laura 2 inmarathi

 

एका ब्लॉग मध्ये त्यांनी हे लिहिलं होतं की, “लहानपणीच मला जग बघायची खूप इच्छा होती. एखाद्या व्यक्तीच्या हातात ट्रॅव्हल बॅग जरी दिसली तरी मी ती व्यक्ती नजरेआड होईपर्यंत त्या व्यक्तीकडे बघत असायची. कधी कधी मला त्या ट्रॅव्हल बॅग चा हेवा वाटायचा.”

जेव्हा एखादी गोष्ट घडण्यासाठी तुम्ही इतका ध्यास घेतात, तेव्हा ते घडतंच. इडा लॉराबद्दल तेच झालं. १८४६ मध्ये त्यांच्या पहिल्या जगभ्रमण करण्याचा योग आला.

या ट्रिप मध्ये त्यांनी युरोप ते दक्षिण अमेरिका, मग चीन, भारत, पर्शिया, रशिया, ऑट्टोमॅन एम्पायर, ग्रीस आणि मग व्हिएन्ना असा प्रवास केला होता.

हा अनुभव इतका थक्क करणारा होता की, त्यानंतर इडा लॉरा यांनी एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव “अ वूमन’स जर्नि राउंड द वर्ल्ड ” हे होतं.

 

ida book inmarathi

 

१८५१ ते १८५५ या दरम्यान इडा लॉरा यांनी दुसऱ्यांदा जगभ्रमण केलं होतं. ही ट्रिप करण्यासाठी त्यांनी ३०० गिल्डर्स (सोन्याची नाणी जे की आधी हॉलंड, जर्मनी आणि ऑस्ट्रिया मध्ये वापरलं जायचं) हे रॉयल म्युझियम ऑफ व्हिएन्ना ला विकले होते.

आपल्या जगभ्रमण करण्याचा पूर्ण खर्च हा त्यांनी लिखाणातून आणि काही वनस्पतींच्या या विक्रीतून साध्य केला होता!

इडा लॉरा यांचा शेवटचा ट्रॅव्हललॉग हा १८६१ मध्ये २ भागात प्रकाशित झाला होता. ऑस्कर फेफर या त्यांच्या मुलाने हा ट्रॅव्हललॉग सादर केला होता.

या लॉग मध्ये इडा लॉरा यांचं पूर्ण आत्मचरित्र लोकांसमोर आणण्याचं काम त्यांच्या मुलाने करून दाखवलं होतं.

१८९२ मध्ये व्हिएन्ना मधील आदरणीय व्यक्तींच्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं होतं. व्हिएन्ना सोसायटी फॉर एज्युकेशनच्या वतीने हा पुढाकार घेतला होता.

इतक्या मोठ्या कर्तृत्वाचं जगभरातून कौतुक झालं होतं. इडा लॉरा यांच्या या कार्याचा गौरव म्हणून म्युनिक (जर्मनी) मधील एका रस्त्याचं नाव हे इडा फेफर स्ट्रीट हे नामकरण २००० साली करण्यात आलं होतं.

इडा लॉरा यांच्यात वयाच्या १२ व्या वर्षी ८० व्या वर्षी इतका समजूतदारपणा होता अशी एक नोंद आहे. नेपोलियन यांच्याकडे त्यांच्या विजयोत्सव साजरा करत असतांना पाठ फिरवणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती होत्या.

 

ida laura 3 inmarathi

 

त्यामुळेच त्या काळाच्या पुढे होत्या असं म्हणता येईल. आपल्या नवऱ्याला आपल्या प्रवासाच्या आवडीबद्दल इडा लॉरा यांनी या शब्दात सांगितलं होतं, “माझं दुसऱ्या एका गोष्टीवर प्रेम आहे आणि तुम्हाला हे माहीत असलं पाहीजे.”

आपल्या विचारांमध्ये इतकी सुस्पष्टता असल्याने आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याने इडा लॉरा ह्या जगभ्रमण एकट्याने साध्य करू शकल्या हे नक्की.

आपल्या जीवनप्रवासातून त्यांनी हे दाखवून दिलं की, आपण ठरवलं तर किती गोष्टींसाठी ‘आत्मनिर्भर’ होऊ शकतो हे ‘इडा लॉरा’ यांनी इतक्या वर्षांआधीच आचरणात आणलं होतं.

स्त्रियांना कमकुवत समजणाऱ्या आणि त्यांच्यावर बंधन लादू पाहणाऱ्या आपल्या समाजातील काही लोकांसाठी ‘इडा लॉरा’ यांचं उदाहरण हे एक अंजन आहे असं म्हणता येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?