' लहानपणापासून खेळला जाणारा हा खेळ आरोग्यासाठी मोठेपणीही खेळायला हवा! – InMarathi

लहानपणापासून खेळला जाणारा हा खेळ आरोग्यासाठी मोठेपणीही खेळायला हवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बालपणी आपण भरपुर खेळ खेळतो. धावतो, मातीत लोळतो, धडपडतो आणि यामुळे अगदी आनंदी सुद्धा असतो, तब्बेत अगदी ठणठणीत असते. पण मोठे झाल्यावर, जबाबदाऱ्यांमुळे हे सगळे खेळ बंद होतात.

धावणं, पळणं, पडणं सगळंच बंद होतं. यामुळे तब्बेतीच्या वेगवेगळ्या समस्यांचा त्रास सुरु होतो. म्हणून नेहमी खेळत राहायला हवं, थोडं का होईना, ऍक्टिव्ह राहायला हवं.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना घरी यायला उशीर होतो त्यामुळे सकाळी उठणे कठीण जाते किंवा काहींना नुसताच कंटाळा येतो, किंवा आणखीन काही कारणाने सकाळी उठून व्यायाम केल्या जात नाही त्यांच्या साठी आणि ज्यांना आपल्या तब्बेतीची काळजी लागली आहे, त्यांच्यासाठी हा आजचा लेख.

तर अशा मंडळींना अजिबात काळजी करण्याची गरज नाही कारण बालपणीचा एक खेळच आपल्याला यात मदतीला येणार आहे – दोरीवरच्या उड्या मारणे.

 

skipping inmarathi

 

लहान असताना हा बहुतेकांचा आवडता खेळ असायचा. तसाच याही वयात खेळलात तर पुन्हा आवडू लागेल. कारण हा खेळ तर आहेच त्याखेरीज व्यायामाचा प्रकार सुद्धा आहे! असं दोन्ही फायदे तुम्हाला होतील. कसे ते पाहूया.

 

१) हृदयाला स्वस्थ ठेवते

 

heart attack feature InMarathi

 

आजकाल हृदयविकार काही नवीन गोष्ट नाहीत, अगदी कॉमन झालेत. अगदी तरुण माणसाला सुद्धा हार्ट अटॅक आलेला आपण बघतो. आपलं अन्न, वातावरण, ताण या सगळ्या नकारात्मक घटकांमुळे आपल्या हृदयावर अत्यंत विपरीत परिणाम होतो आणि त्याची काळजी आपल्याला घेणं फार गरजेचं असतं.

दिवसातून १५ मिनटं दोरी वरच्या उड्या मारल्याने कोलेस्ट्रॉलचा त्रास कमी होतो, रक्तदाब काही प्रमाणात वाढतो त्यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात.

२) लक्ष केंद्रित करण्यास मदत

ज्यांना कोणाला लो कॉन्सन्ट्रेशनचा त्रास आहे, त्यांच्यासाठी तर दोरीवरच्या उड्या मारणे भरपूर फायद्याचे ठरते.

एका निरीक्षणातून समोर आले आहे की जी अतिशय चंचल व्यक्ती नियमित दोरी वरच्या उड्या मारते तिचे मन हळू हळू शांत होत जाते आणि त्या व्यक्तीला जास्त वेळेसाठी एकचित्त राहण्यास मदत होते.

३) सगळ्या अवयवांमध्ये समन्वय साधला जातो

दोरीवरच्या उड्या मारताना, पाय, मेंदू, हाथ सगळेच अवयव काम करत असतात. त्यामुळे एका निरीक्षणातून असे समोर आले आहे की, दोरीवरच्या उड्या मारल्याने मेंदू व इतर अवयवांमधील कोऑर्डिनेशन अजून सुधारते.

४) स्टॅमिना वाढतो

 

stamina inmarathi

 

दोरीवरच्या उड्या मारल्याने पाय, कंबर, पाठ, सगळे मजबूत होते. आणि आपला स्टॅमिना हा जिमला जाऊन व्यायाम केल्याप्रमाणेच वाढतो. नियमित दोरीवरच्या उड्या मारल्याने थकवा आणि मरगळ नाहीशी होते व तरतरी येते.

५) लवचिकता वाढते

शरीर स्थूल झाले असेल तर हा खेळ खेळल्याने आपले अवयव खुलायला लागतात. आणि शरीराची लवचिकता वाढते, शरीर अकडल्यासारखे वाटत नाही, स्नायू सुद्धा मोकळे होतात.

६) मानसिक स्वास्थ्य सुधारते

मध्यम स्पीड आणि ऊर्जेने हा खेळ खेळल्यास, थोडी हालचाल झाली की आपला ताण उतरतो. कमी स्पीड ने दोरीवरच्या उड्या मारल्याने संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण सुरळीत होते ज्यामुळे आपण तणावमुक्त होऊन आनंदी राहतो.

७) पोटावरची चरबी कमी होते

 

fat burning inmarathi

 

वजन कमी करणाऱ्यांना या गोष्टीचा चांगलाच अनुभव असेल की पूर्ण शरीरावरची चरबी लवकर कमी होते पण पोटावरची काहीही केल्या कमी होतच नाही. तर तुम्हाला सुद्धा हा त्रास सतावत असेल तर रोज 20 मिनिटे दोरीवरच्या उड्या मारा.

कारण याने पोटावरची चरबी झपाट्याने कमी होते. नॉर्मल जेवण करून, कोणतेही विशिष्ट आणि कठीण डायट केल्या शिवाय तुम्हाला तुमच्या पोटाच्या घेरात फरक जाणवेल.

८) हाडं मजबूत होतात

ह्या खेळामुळे हाडांना बळ मिळतं आणि हाडं ठिसूळ होण्याच्या प्रक्रिया झपाट्याने मंदावते. यामुळे चाळिशीनंतर, खास करून स्त्रियांना होणारं ऑस्टिओपोरोसिसचा त्रास टाळण्यास मदत होते.

९) त्वचा नितळ होणे

 

skin care inmarathi

 

इतर व्यायाम प्रकारांप्रमाणे, दोरीवरच्या उड्या मारल्याने घाम येतो व शरीरातील घाण बाहेर पडते. त्यामुळे ऍसिडिटीमुळें, चेहऱ्याची छिद्र बंद असल्यामुळे होणारे पुरळ, पुटकुळ्या, मुरूम टाळण्यास मदत मिळते.

शिवाय दोरीवरच्या उड्या मारल्याने जो रक्तप्रवाह सुरळीत होतो, रक्ताभिसरण नीट होते त्यामुळे चेहऱ्याला पुरेसं रक्त मिळतं आणि ह्या सगळ्या समस्या नाहीशा होऊन त्वचा नितळ राहते.

१०) फुफुस सुदृढ राहते

हा खेळ खेळत असताना आपण खोलवर श्वास घेतो ज्यामुळे पुरेसा ऑक्सिजन पूरवठा होतो व आपलं फुफुस सुदृढ व बळकट होते.

११) वजन कमी होण्यास फायदेशीर

कुठेही जिम न लावता जास्त पैसे खर्च न करता फक्त हा खेळ खेळून व आपल्या आहाराला नियंत्रणात ठेऊन आपण वजन कमी करू शकता. दोरीवरच्या उड्या मारल्याने शरीराचा प्रत्येक अवयव आणि प्रत्येक स्नायू ऍक्टिव्ह होतो. ज्यामुळे वजन घटते.

याशिवाय रोज २० – ३० मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्याने २०० – ३०० कॅलोरीज खर्च केल्या जातात.

 

skipping 2 inmarathi

१२) इतर फायदे

. घरी राहून, आपल्या सोयीनुसार व्यायाम होतो.

. खिशाला परवडेल असा व्यायाम. जिमचा, महागड्या इक्विपमेंट वरचा, जिम ड्रेसचा, पेट्रोलचा सगळाच खर्च वाचतो.

. योग्य पद्धतीने, कमी वेळेपासून सुरु करून वेळ हळू हळू वाढविल्यास कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाहीत. जिम लावून, ती सोडली कि आपलं वजन हे दुप्पट वेगाने वाढतं हा कित्त्येकांच्या अनुभव आहे.

कारण जिम एक हाय इंटेन्सिटी व्यायाम पद्धत आहे आणि जिम सोडल्यानंतर घरी तसाच व्यायाम घरी करणे जमत नाही. पण दोरीवरच्या उड्या मारणे, हळू हळू आपले वजन कमी करते ज्यामुळे पुन्हा वाढण्याचा प्रश्नच नाही.

दोरीवरच्या उड्या सुरु करण्या पूर्वीची काळजी 

१) सरळ उड्या न मारता १० मिनिटं आधी, स्ट्रेचिंग करून वॉर्म अप करा.

२) लहानपणी आणि मोठेपणी उड्या मारणे यात भरपूर फरक आहे. आपल्या शरीरात भरपूर बदल झालेले असतात. त्यामुळे उड्या मारण्याआधी, shock absorbing बूट किंवा मोजे अवश्य घाला. याने तळ पायांना होणारी इजा टाळता येते.

 

skipping inmarthi featured

 

३) व्यायाम करण्याआधी व नंतर लिंबू पाणी किंवा ग्लुकोजचे पाणी घ्या.

४) स्त्रियांनी दोरीवरच्या उड्या मारण्याआधी स्पोर्ट्स ब्रा घालणे अत्यंत गरजेचे आहे. याने आपल्या वक्षस्थळाला सपोर्ट मिळतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?