' नेहरूंचा सामाजिक क्षेत्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन : भाबडा की डोळस – InMarathi

नेहरूंचा सामाजिक क्षेत्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन : भाबडा की डोळस

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

डॉ. ह. वि. कुंभोजकर

===

नेहरूंवर भाबडेपणाचे आरोप वरचेवर होत असतात. त्यांनी भाबडेपणाने चीनवर विश्वास टाकला आणि तिबेट देऊन टाकला. त्यांनी भाबडेपणाने यूनोच्या निःपक्षपातीपणावर विश्वास ठेवला आणि काश्मीरचा प्रश्न चिघळत ठेवला, इत्यादी. पण वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांच्या भाबडेपणाचा आरोप मात्र नवा आहे.

जुने दोन आरोप उजवे होते. नवा डावा आहे. आता भाबडेपणात डावे-उजवे करता येते का, हा प्रश्न आपण बाजूला ठेऊ.

नेहरूंच्या भूमिकेचे समर्थन हा या लेखाचा उद्देश नाही. ते अनुषंगिकच आहे, पण डावा आरोप केवळ नेहरूंवर नाही; तो वैज्ञानिक दृष्टिकोनावरही आहे.

 

nehru 2 inmarathi

 

त्यामुळे, डोळस, भाबडे, बनेल, असे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे काही प्रकार असतात काय असा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या आरोपाची चिकित्सा गरजेची ठरते.

‘साप्ताहिक साधने’च्या ३१ ऑक्टोबरच्या अंकात श्री अनंत फडके यांनी “विज्ञान चळवळीची ताकद, मर्यादा आणि भाबडा विज्ञानवाद” या लेखात नेहरूंवर त्यांचा विज्ञानवाद भाबडा होता असा थेट आरोप केला आहे. “सासरे म्हणतात जावई भाबडा, लोक म्हणतात वेडा” अशी ग्रामीण भागात एक म्हण आहे.

तेव्हा नेहरूंच्यावर भाबडेपणाचा आरोप करून त्यांचा (सामाजिक क्षेत्रातील) विज्ञानवाद चुकीचा आहे, असे सौम्य शब्दात त्यांना सुचवायचे नाही ना असा प्रश्न निर्माण होतो.

जीवनाच्या सर्व क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन असणे भारताच्या संविधानाला अपेक्षित असल्याने कोणता वैज्ञानिक दृष्टिकोन चुकीचा आणि कोणता बरोबर हे ठरवणे अधिकच महत्वाचे ठरते.

नेहरू वैज्ञानिक दृष्टीकोन कशाला म्हणतात हे फडके नेहरूंचेच अवतरण देऊन स्पष्ट करतात. मूळ लेखातील अवतरण इंग्रजीत आहे. त्यामुळे येथे त्याचा मराठी तर्जुमा देणे वावगे ठरू नये. चर्चा अधिक लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीही त्याची गरज आहे. भाषांतरात काही चूकभूल झाल्यास संदर्भासाठी मूळ लेख उपलब्ध आहेच.

‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या आपल्या ग्रंथात नेहरू म्हणतात : वैज्ञानिक दृष्टी केवळ विज्ञानाचा उपयोग करतानाच नव्हे, तर जीवनातील सर्वच क्षेत्रातील आपले अनेक प्रश्न सोडवताना आवश्यक आहे.

 

discovery of india inmarathi

 

(वैचारिक) धीटपणा आणि तरीही विज्ञानाची सम्यक् दृष्टी (Critical temper) असणे, सत्याचा आणि नव्या ज्ञानाचा शोध घेणे, कोणतीही गोष्ट पुनःपुन्हा प्रयोग करून पारखून घेतल्याशिवाय न स्वीकारणे, नवीन पुरावे मिळाल्यावर पूर्वीचे निष्कर्ष बदलण्याची क्षमता असणे, पूर्वग्रहातून आलेले सिद्धांत न मानता समोर दिसत असलेल्या वस्तुस्थितीवरच भरंवसा ठेवणे, आणि कठोर मानसिक शिस्त असणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन.

वरील अवतरणात, नेहरूंनी, वैज्ञानिक दृष्टिकोनाची तीन व्यवच्छेदक लक्षणे सांगितली आहेत. (१) कोणतीही गोष्ट पुनःपुन्हा प्रयोगांती पारखून घेणे, (२) असे करताना नवीन पुरावे मिळाल्यास (आणि ते जुन्याशी मेळ खात नसल्यास) आपले जुने निष्कर्ष बदलणे, आणि (३) केवळ वस्तुस्थितीचाच स्वीकार करणे.

दुसऱ्या शब्दात, कितीही थोर व्यक्ती काही सांगत असली किंवा कितीही पवित्र पुस्तकात काही लिहिले असले, तरी ते स्वतःला दिसणाऱ्या वस्तुस्थितीशी विसंगत ठरत असेल तर अमान्य करणे आवश्यक आहे.

नेहरूंच्या या विचारांशी मी पूर्ण सहमत आहे आणि माझ्या कल्पनेपमाणे श्री फडकेही सहमत असावेत. मग विरोध कुठे निर्माण होतो? फडके यांचे म्हणणे आहे, की वैज्ञानिक दृष्टीच्या या कसोट्या केवळ निसर्गाशी संबंधित असलेल्या प्रश्नांपुरत्याच वापराव्यात.

सामाजिक समस्यांना त्या कोणताही बदल न करता वापरणे हा भाबडेपणा आहे. फडक्यांच्या म्हणण्याचा साकल्याने विचार करण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या आरोपातून नेहरूंची कायदेशीर सुटका सहज शक्य आहे, याची येथे नोंद व्हावी.

नेहरूंनी वरील अवतरणात वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय ते सांगितले, तो दृष्टिकोन जीवनाच्या सर्वच क्षेत्रात (आणि म्हणून सामाजिक क्षेत्रातही) ठेवला पाहिजे असेही ते म्हणतात. पण तो सामाजिक क्षेत्रात वापराताना काय काळजी घ्यायला हवी किंवा त्यात काय सुधारणा कराव्यात याबद्दल काहीही म्हटले नाही.

त्यामुळे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्यापूर्वी त्यांना संशयाचा फायदा द्यायला जागा आहे. म्हणजे नेहरूंवर error of omition चा आरोप करता येईल; पण error of commitionचा करता येणार नाही.

पण तरीही सामाजिक क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन कसा वापरायचा आणि नेहरूंनी तो कसा वापरला आहे, फडकेंनी त्याचे उत्तर दिले आहे ते कितपत बरोबर आहे आणि ते बरोबर नसल्यास बरोबर उत्तर काय असू शकते या गोष्टी खोलात जाऊन तपासणे हा या लेखाचा प्रमुख उद्देश आहे.

प्रथम फडकेंचा नेहरूंवर काय आक्षेप आहे हे पाहूया. ते म्हणतात, “(वरील अवतरणात)भारतीय समाजापुढील प्रश्न सोडवण्यासाठी कोणती दृष्टी अंगिकारली आहे, हेही (सांगणे) अभिप्रेत असताना मार्क्सनंतर १०० वर्षांनी मार्क्सचा उल्लेखही नेहरू करत नाहीत.” नेहरूंचे हे वागणे जाणूनबुजून आहे.

कारण, फडकेंच्या मते, नेहरू “भांडवलवादी विकासाचे प्रणेते व वैचारिक-राजकीय नेते होते.” फडकेंचे म्हणणे वरवर पाहता मान्य व्हायला हरकत नाही.

नेहरूंच्या वरील अवतरणात मार्क्सचा उल्लेख नाही हे तर उघडच दिसते आहे. नेहरूना भांडवलवादी विकासाचे प्रणेते म्हणायलाही काही जागा आहे. नेहरूंच्याच देखरेखेखाली भारताची राज्यघटना लिहिली गेली.

ते घटनासमितीचे सदस्य होते. राज्य-घटना एकमताने लिहिली गेली. बहुमताने नाही. त्यावेळी समाजवादाचा उल्लेख घटनेत करावा का याचीही चर्चा झाली होती. त्यावेळी बाबासाहेबानी म्हटले होते, की समाजवाद हे पक्षाचे धोरण असू शकते. देशाचे नाही.

 

ambedkar inmarathi

 

देशातील लोकांना ज्या मार्गाने गेले असता त्यांची उन्नती होईल असे वाटते तो मार्ग स्वीकारण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. या बाबतीत जनतेचे हात (आणि तोंडही) राज्य-घटनेने बांधून ठेवणे योग्य होणार नाही. नेहरूंनी हे मान्य केले.

आज जो समाजवादाचा उल्लेख राज्य-घटनेत आहे तो आणीबाणीच्या काळ्या कालखंडात विरोधीपक्षांना तुरुंगात डांबून घुसडण्यात आला आहे. तो नेहरूंच्या काळातील नाही.

नेहरूंनी ज्या पद्धतीने १९५७ साली नंबुद्रिपाद यांच्या नेतृत्वाखालचे केरळचे साम्यवादी सरकार बरखास्त केले ते पाहता ते “भांडवलवादी विकासाचे प्रणेते व वैचारिक-राजकीय नेते होते ” असा निष्कर्ष फडकेंनी काढला तर त्यांना चुकीचे म्हणता येणार नाही.

पण फडके येथेच थांबत नाहीत. फडक्यांची तक्रार आहे की, नेहरूंचा विज्ञानवाद “हा एक प्रकारचा भाबडा विज्ञानवाद होता.” त्यांनी भाबडा विज्ञानवाद म्हणजे काय हेही सांगितले आहे :

“आर्थिक-सामाजिक प्रश्नांच्या चिकित्सेत उतरताना सर्जनशील मार्क्सवादी वैज्ञानिक चिकित्सापद्धतीचा उल्लेखही न करता फक्त रेनेसॉप्रणित ‘वैज्ञानिक विचारपद्धती आणि दृष्टिकोना’च्या चौकटीत राहून शास्त्रीय उत्तरे मिळतील असे समजणे हा भाबडा विज्ञानवाद आहे.”

अधिक सोप्या भाषेत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल, की, फडकेंच्या मते, सामाजिक क्षेत्रात मार्क्सवादयुक्त वैज्ञानिक विचारपद्धती म्हणजे (डोळस) विज्ञानवाद आणि मार्क्सवादविरहित वैज्ञानिक विचारपद्धती म्हणजे भाबडा विज्ञानवाद.

मार्क्सवाद हे शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचे तत्त्वज्ञान होते. मुक्तीची कल्पना सर्वच धर्मानी संगितली आहे. पण अन्य धर्मांतील मुक्ती माणसाला त्याच्या मृत्यूनंतर मिळणार असते.

मार्क्सवादाने इहलोकातच मुक्तीचे आश्वासन दिले होते. मृत्यूनंतरची मुक्ती मिळते की नाही हे कळायला मार्ग नसतो. त्यामुळे अन्य धर्माची मूठ झाकलेली असते. ती सोय मार्क्सवादाला उपलब्ध नाही.

येथे सारे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी परिस्थिती ! मार्क्सवादाला सत्तर वर्षे प्रयत्न करूनही शोषणमुक्त समाजाचा बाप दाखवता येईना; त्यामुळे, त्याला आपल्या तत्त्वज्ञानाचे श्राद्ध करणे भाग पडले. एकेकाळी अर्धे जग मार्क्सवादाने भारले गेले होते.

पण सत्तर वर्षांच्या मार्क्सवादी प्रयोगानंतर आज एकाही नाव घेण्यासारख्या देशात मार्क्सवादी राजवट अस्तित्वात नाही. याचा अर्थ काय होतो? एका मागून एका देशांत पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे मार्क्सवादी सरकारे कोसळल गेली.

 

marx inmarathi

 

मार्क्सवादाची अशी पीछेहाट का झाली? जगाच्या कामगारांना एक होण्याचे हाक देणारे आपल्या देशाच्या कामगारांनाही एकत्र का ठेऊ शकले नाहीत? त्या देशाची पंधरा शकले का झाली? मार्क्सचे तत्त्वज्ञान प्रामुख्याने आर्थिक होते.

अशा परिस्थितीत चीनने मार्क्सचे आर्थिक तत्त्वज्ञान वाऱ्यावर सोडून केवळ पार्टीची हुकूमशाही तेव्हढी अस्तित्वात राखली; याचा अर्थ काय होतो? जेव्हा आपला सिद्धांत वरचेवर चुकीचे निष्कर्ष देतो तेव्हा तो सिद्धांत तपासून पाहणे आवश्यक आहे की नाही?

आमची बांधिलकी सत्याशी की सिद्धांताशी? एकेकाळी पुऱ्या मास्को शहरात ब्रेड फुकट मिळत असे. मार्क्सवादाचा हा मोठा विजय होता. भूक ही माणसाची प्राथमिक गरज आहे.

ती भागवणे शासनाचे पहिले काम आहे. त्यामुळे मास्कोतच काय कोठेही ब्रेडसाठी माणसाला हात पसरावे लागणे मानवजातीलाच लांच्छनास्पद आहे. पण हळू हळू ब्रेड फुकट मिळणे काय, ब्रेड मिळणेच मुश्किल झाले.

काही काळ तर भारतातून रशियाला गहू पाठवावा लागला. सोवियत युनियनमध्ये मार्क्सवादयुक्त वैज्ञानिक दृष्टी जोपासली जात होती. तेथे ‘भाबडा विज्ञानवाद’ नव्हता. तरीही असे झाले.

याचा अर्थ असा होतो, की डोळस वैज्ञानिक दृष्टीसाठी मार्क्सवादाची नव्हे तर अन्य काही गोष्टीची आवश्यकता आहे. नेहरूंना त्याची जाणीव असावी हे त्यांच्या मार्क्सवादाचा उल्लेख न करण्याचे कारण असू शकते.

कोणत्याही क्षेत्रातील कसलेही ज्ञान मिळवायचे असेल, तर कळत अथवा नकळत आपण काही गोष्टीवर विश्वास ठेवत असतो; काही गोष्टी सत्य आहेत असे गृहीत धरत असतो.

असे करणे तर्कशास्त्रीय दृष्ट्या अटळ असते. त्याची करणे काय आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर जिज्ञासूंनी ९ मे २०१५च्या ‘साधना’तील “धर्म आणि विज्ञान” हा लेख पाहावा.

असे गृहीत धरणे विज्ञान, गणित, धर्मशास्त्र, समाजशास्त्र,अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, इत्यादी ज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात अपरिहार्य असते. वैज्ञानिक आणि गणिती या नियमांना गृहीतक किंवा हायपोथेसिस म्हणतो.

धार्मिक माणूस त्याला श्रद्धा, विश्वास, आतला आवाज, आप्तवाक्य, दृष्टांत म्हणतो. प्रत्यक्षात ते शब्द-प्रामाण्य असते. वैज्ञानिक वरचेवर प्रयोग करून, निरीक्षणे नोंदवून, आपले गृहीतक बरोबर आहे ना हे तपासत असतो.

जसजशी नवीन माहिती उजेडात येईल तसतसे वैज्ञानिक ती माहिती आपल्या गृहीतकाशी सुसंगत आहे की नाही हे ताडून पाहत असतो. नवी माहिती गृहीतकाशी सुसंगत असेल तर तो ते गृहीतक अधिक उत्साहाने वापरतो.

विसंगत असेल तर तो आपल्या गृहीतकात योग्य त्या सुधारणा करतो. सुधारणा शक्य नसतील तर तो त्या गृहीतकाचाच पूर्ण त्याग करतो आणि सर्वच गोष्टींचा नव्याने विचार करतो. पण कोणत्याही परिस्थितीत वैज्ञानिकांची त्या गृहीतकाशी भावनिक, किंबहुना अन्य कसलीही बांधिलकी नसते. त्याची बांधिलकी वस्तुस्थितीशी म्हणजेच सत्याशी असते गृहीतकाशी नाही.

न्यूटनने काळ हा निरपेक्ष आहे (Time is absolute) हे गृहीतक स्वीकारून आपली गणिते केली. जोपर्यंत आमच्या ज्ञानाच्या कक्षा मर्यादित होत्या तोपर्यंत या गृहीतकातील चूक लक्षात येत नव्हती. आमची उत्तरे बरोबर येत होती; त्यात किरकोळ चूक असलीच तरीही ती आमच्या आकलनाच्या बाहेर होती.

 

Newton vs Einstein

 

म्हणून गृहितक सत्य मानण्यात आम्हाला काही अडचण नव्हती. पण जेव्हा आमच्या ज्ञानाच्या कक्षा सूर्यमंडळाला भेदून विश्वाचा विचार करू लागल्या तेव्हा उत्तरे जमेनात.

जेव्हा आईन्स्टाईनला न्यूटनच्या गृहीतकातील चूक लक्षात आली तेव्हा आम्ही त्याबद्दल जराही खळखळ नकरता न्यूटनच्या गृहीतकाचा त्याग केला. याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो.

उलटपक्षी धार्मिक मनुष्याची बांधिलकी त्याच्या श्रद्धेशी असते. वस्तुस्थितीशी नाही. तो आपल्या श्रद्धेलाच सत्य मानतो. त्याचे अनुभव श्रद्धेशी विसंगत असतील तर त्या श्रद्धेचा तो त्याग करत नाही; आपली श्रद्धाच कमी पडली असे समजून तो अधिकच श्रदाळू होतो.

एकशे आठ वेळा जप केल्यानेही अपेक्षित यश मिळत नसेल तर तो देवाला दोष देत नाही; तो एक हजार आठ वेळा जप करतो. यालाच धार्मिकता म्हणतात.

म्हणजे नवीन वस्तुस्थिती आढळल्यास जो आपले गृहीतक बदलायला तयार असतो तो वैज्ञानिक आणि जो आपल्या गृहीतकाला कधीच सोडायला तयार होत नाही तो धार्मिक. त्यामुळे, वैज्ञानिक दिवसेंदिवस सत्याच्या अधिकाधिक जवळ जात राहतो आणि धार्मिक अधिकाधिक श्रद्धाळू होत जातो.

धार्मिक माणसाच्या मनात श्रद्धेच्या सत्यासत्यतेबाबत कधीही संभ्रम असत नाही. येथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घेणे जरुरीचे आहे, की या सर्व विवेचनात देवाचा कुठेही संबंध नाही. श्रद्धा देवावरच असण्याची आवश्यकता नाही.

ती एखाद्या जीवित अथवा मृत व्यक्तीच्या विचारावर, त्याने लिहिलेल्या पुस्तकावर, किंवा एखाद्या सिद्धांतावरही असू शकते. म्हणजे निरीश्वरवादी आपल्या सिद्धांताला आंधळेपणाने चिकटून राहत असेल तर त्यालाही धार्मिकच म्हटले पाहिजे.

वैज्ञानिकाची कशावरही श्रद्धा नसते. तो नेहमीच साशंक बनून आपली गृहीतके वरचेवर तपासत असतो. त्याच्या दृष्टीने कोणताही सिद्धांत अंतिम नसतो. कोणतेही पुस्तक पवित्र नसते. कोणतीही व्यक्ती श्रद्धेय नसते.

धर्म आणि विज्ञान दोन्ही माणसाला पडत असलेल्या समस्या सोडवण्यासाठीच निर्माण झाले. धर्माचा जन्म चाळीस हजार वर्षांपूर्वी झाला असावा. विज्ञानाचा चारशे वर्षांपूर्वी. पण विज्ञानाची उत्तरे, निदान काही क्षेत्रात तरी धर्माच्या उत्तरापेक्षा अधिक अचूक ठरत गेली.

पूर्वी एखाद्या माणसाला साप चावला, की त्याला देवळात नाहीतर एखाद्या अवलियाच्या दर्ग्यात आणून ठेवत. आज त्याला विष-विरोधक सिरमचे इंजेक्शन देण्यासाठी दवाखान्यात आणतात. कारण अँटी-व्हेनम सिरमचे इंजेक्शन देवापेक्षा अधिक विश्वसनीय ठरते असा त्याला अनुभव येतो.

मध्य-युगीन युरोपात प्लेगची साथ आल्यावर लोक देवाची प्रार्थना करण्यासाठी चर्चमध्ये जमत. पण तरीही देव त्यांचे काही ऐकत नसे. युरोपची निम्याहून अधिक लोकसंख्या प्लेग मध्ये दगावली होती.

 

plague inmarathi

 

आता कोविद-१९ची साथ त्याहूनही अधिक पसरली आहे. पण लोक देवाकडे पाहायलाही तयार नाहीत. आजारापासून वाचण्यासाठी, उलट, ते देवळे, मशिदी आणि चर्च याना टाळे ठोकतात आणि प्रयोगशाळेतील वैज्ञानिकांची लवकर प्रतिबंधक लास शोधून काढा अशी प्रार्थना करतात.

ज्या क्षेत्रात विज्ञानाचे उत्तर अधिक प्रभावी होऊ लागले त्या क्षेत्रातून देवाचे हळूहळू उच्चाटन होत गेले.

निसर्गाचे ज्ञान मिळवण्याच्या क्षेत्रात विज्ञानाने थोड्याच काळात मिळवलेले हे आश्चर्यजनक यश पाहिल्यावर, सामाजिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी विज्ञानाचीच पद्धत वापरण्याचा प्रयत्न करावासा माणसाला वाटणे स्वाभाविक आहे.

पण दोन्ही क्षेत्रात काही मूलभूत फरक असल्याने त्यात अनेक अडचणी उद्भवतात. विज्ञानाच्या यशाचे रहस्य ज्या दृष्टिकोनातून विज्ञान आपल्या गृहीतकाकडे पाहते त्या दृष्टिकोनात दडलेले आहे, पण समाजाच्या प्रश्नांचा विचार करताना हा दृष्टिकोन जपणे इतके सहज साध्य नसते.

विज्ञानात एक गोष्ट मूलभूत महत्त्वाची आहे, ज्याबाबत तडजोड होऊ शकत नाही. तेथे बांधिलकी वस्तुस्थितीशी असते. गृहीतकाशी नसते. आणि हे गृहीतक कोणी मांडले याच्याशी तर मुळीच नसते. त्यामुळे गृहीतक वस्तुस्थितीशी फारकत घेत असेल तर त्यात योग्य त्या दुरुस्त्या करायला वैज्ञानिक नेहमीच तयार असतात.

प्रसंगी ते त्या गृहीतकाचा त्यागही करतात. पण हे जे विज्ञानात शक्य आहे ते बऱ्याच अंशी सामाजिक प्रश्न सोडवताना शक्य होत नाही. आणि त्याची अनेक करणे आहेत.

विज्ञानात गृहीतकाचा जनक आणि त्याचा वापर करणारा वैज्ञानिक यांचे एक जैविक नाते असते. बऱ्याच वेळा तो वैज्ञानिकच त्या गृहीतकाचा जनक असतो. सामाजिक क्षेत्रातील गृहीतकात सामान्य माणूस जी गृहीतके वापरत असतो, ती त्याला दुसऱ्या कोणीतरी दिलेली असतात. त्यांचा जनक कोणीतरी वेगळाच असतो.

बहुतेक वेळी तो माणूस त्याचा नेता असतो अथवा त्याला पूज्य असतो. समान्य माणूस केवळ त्या व्यक्तीवर श्रद्धा ठेऊन त्याचा अनुयायी झालेला असतो. त्यामुळे ज्या खुल्या मनाने वैज्ञानिक आपल्या गृहीतकाकडे पाहत असतो त्या खुलेपणाने सामान्य माणूस आपल्या गृहीतकांकडे पाहू शकत नाही.

तो त्याकडे भक्तिभावाने पाहत असतो. त्याला कारणेही अनेक असतात. एक तर त्याच्याकडे सारासार विचार करून निर्णय घ्यायला वेळ नसतो; बऱ्याच वेळा तेव्हढी त्याची बौद्धिक कुवत नसते, त्याचे त्यासाठी प्रशिक्षणही झालेले नसते आणि त्याची मानसिकता पण नसते. स्वतः विचार करून योग्यायोग्य ठरवायला जे धैर्य (ज्याचा नेहरूंच्या अवतरणात उल्लेख आहे) लागते ते फारच थोड्या लोकांच्याकडे असते.

ज्यांच्याकडे ते असते ते नेते किंवा तत्त्वज्ञ होतात. हे तत्त्वज्ञ प्रत्यक्षात धर्मसंस्थापकच असतात आणि बहुतेक नेते जाणता अजाणता (बहुतेकवेळा जाणताच) त्या तत्त्वज्ञानाचा ‘उपयोग’ करत असतात.

नेतृत्व करणाऱ्याला लोकांचे पाठबळ हवे असते आणि त्यासाठी ते गृहीतक आणि त्यावर उभारलेले तत्त्वज्ञान मांडणारा तत्त्वज्ञ याना सोडणे इतके सहज शक्य असत नाही.

एकदा अनुयायी रूपी वाघावर नेता स्वार झाला की, मग त्याला खाली उतरता येत नाही. शिवाय खाली उतरण्याची तशी जरुरीही नसते.

सामाजिक शास्त्रातील गृहीतकांच्या स्वरूपामुळे नेत्याला त्या गृहीतकाचे, ते त्याला चुकीचे आहे हे कळले तरी, समर्थन करणे तितकेसे कठीणही जात नसते. हे का कठीण नसते ते आपण पाहणारच आहोत.

समाजिक विज्ञानातील गृहीतक आणि नैसर्गिक विज्ञानातील गृहीतक यांच्या स्वरूपातील पहिला मोठा फरक म्हणजे निसर्गाला स्वतःचे मन नसते. त्यामुळे निसर्ग आपला स्वभावधर्म बदलत नसतो. निसर्गाचे निरीक्षण करून आपण एखादा सिद्धांत मांडला तर त्याचा निसर्गाच्या वर्तनावर परिणाम होत नसतो.

टॉलेमीच्या सिद्धांताऐवजी कोपर्निकसचा सिद्धांत शास्त्रज्ञांनी वापरायचे ठरवले म्हणून कोपर्निकसला खोटे पाडण्यासाठी पृथ्वीने आपली गती बदलली असे होत नाही.

ती पूर्वी ज्या कोणत्या प्रकारे फिरत होती त्याच प्रकारे ती फिरत राहते. पण सामाजिक क्षेत्रात तसे घडत नाही.

सरकारने आपला महसूल वाढावा म्हणून इलेक्ट्रिक गिझरवर टॅक्स वाढवला तर लोक गॅसवर चालणारा गिझर वापरायला सुरवात करतात आणि टॅक्स वाढवण्याचा सरकारचा उद्देश, बराचसा, निष्फळ होतो.

कर वाढवले तर वाढीव कल्याणकारी योजना राबवता येतात; पण त्याच वेळी करात वाढ झाल्याने नफा कमी होतो म्हणून उद्योजक उत्पादन कमी करतो आणि परिणामी कर वसुली कमी होते आणि सर्वांचेच अहित होऊ शकते. सामाजिक वर्तनाच्या या वैशिष्ट्यामुळे कोणत्याही सामाजिक सिद्धांताचे अपेक्षित परिणाम होण्याची खात्री नसते.

कारण ज्या सामाजिक वर्तनावरून नियम बनवला असतो त्या समाजाच्या वर्तनातच नियमाच्या अंमलबजावणीने, किंबहुना अंमलबजावणीच्या शक्यतेनेच फरक पडत असतो.

त्यामुळे नियम तयार होत असतानाचा समाज आणि नियमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळेचा समाज एक असत नाही. त्यामुळे अपेक्षित यश मिळतेच असे नाही.

सामाजिक प्रश्न वैज्ञानिक प्रश्नापेक्षा आणखीही एका बाबतीत वेगळे असतात. विज्ञानाच्या नियमात नैतिक प्रश्न गुंतलेला नसतो. न्यूटनचे गतीचे नियम कोणताही नैतिक प्रश्न निर्माण करत नाही.

अणु-बॉम्ब तयार करावा की, न करावा हा प्रश्न नैतिक जरूर असतो. पण तो प्रश्न विज्ञानाचा नाही. E = mc2 या समीकरणात कोणतीही नीतिमत्ता गुंतलेली नसते. याच्या उलट सामाजिक प्रश्न नीतिमत्तेशी आणि न्यायाच्या कल्पनेशी जोडलेले असतात.

प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते अर्थ शास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनीच हा प्रश्न उपस्थित केलेला होता. तुमच्याकडे एकच जागा आहे आणि तीन उमेदवार आहेत. तिघापैकी कोणाचीही नेमणूक तुम्ही करू शकता. पण एकाचीच नेमणूक होऊ शकते.

 

amertya sen inmarathi

 

तिघेही सारख्याच पात्रतेचे आहेत. तिघेही अतिशय गरजू आहेत. कोणाला नेमायचे? सेन यांनी प्रश्नांची गुंतागुंत थोडी अधिक वाढवली. पहिला सगळ्यात गरीब आहे. गरिबी हा निकष वापरला तर त्यालाच जागा देणे न्यायाचे ठरेल.

पण दुसरा नुकताच दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकला आहे. पहिल्याला दारिद्र्याचा अनुभव होता. दुसऱ्याला दारिद्र्याचा अनुभव नव्हता. त्याच्या मित्राने त्याला फसवले आणि तो दारिद्र्याच्या खाईत लोटला गेला. त्याचे दुःख मोठे आहे. ते निवारण करणे अधिक नैतिक होईल.

तिसरा सर्वात गरीबही नाही आणि सर्वात दुःखीही नाही. पण त्याला जुनाट व्याधी आहे. नोकरी मिळाली थोडा पैसा मिळाला तर तो आपल्या आजारावर इलाज करू शकतो.

अशा प्रश्नावर एकमेव आणि सर्वांचे समाधान करेल असे उत्तर असू शकत नाही. सामाजिक न्यायाचे बहुतेक प्रश्न असेच असतात. आज राखीव जागांच्या प्रश्नावर एकमत होऊ शकत नाही याचे प्रमुख कारण तेच आहे.

सामाजिक क्षेत्राचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे जनतेचे दीर्घकालीन हित आणि वर्तमानकालीन गरज हे परस्पर विरोधी असू शकते.

२००० साली दिल्लीमध्ये फार मोठी हिंसक निदर्शने झाली. शेकडो सार्वजनिक वाहने हिंसक जमावाच्या रागाची शिकार झाली. कारण? सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय!

दिल्ली हे जगातील एक सर्वात प्रदूषित शहर आहे. दोन हजार साली एका जनहित याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने सुमारे नव्वद हजार छोट्या उद्योगांना, ते हवा प्रदूषित करतात या कारणासाठी, बंद करण्याचे आदेश दिले.

त्यामुळे सुमारे दहा लाख कामगार बेकार होणार होते. आता पर्यावरण महत्त्वाचे की, दहा लाख लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न? डाव्या आणि उजव्या विचारप्रणालीतील संघर्ष, काही प्रमाणात, याच स्वरूपाचा आहे. उद्याच्या सर्वांच्या भविष्यात सुधारणा व्हावी यासाठी आज काहींना त्याग करावा लागेल हे म्हणणे सोपे आहे.

पण हे त्याग करणारे ‘काही’ कोण असायला हवेत हे कसे आणि कोण ठरवणार? “कुणाच्या पाठीवर कुणाचे ओझे?” पर्यावरणाच्या जागतिक परिषदेत इंदिरा गांधींनी प्रगत राष्ट्रांना सुनावले होते. “तुमचे पर्यावरण सुधारावे म्हणून भारतीयांचे जीवनमान सुधारणारे प्रकल्प बंद मी करू शकत नाही.”

सामाजिक क्षेत्रात वैज्ञानिक पद्धत वापरण्यात चौथी अडचण हितसंबंधांची असते. तशी ती सर्वच क्षेत्रात असते. कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताला चर्चने विरोध करण्याचे कारण केवळ धार्मिक नव्हते.

 

kopernikus inmarathi

 

धर्मग्रंथात चूक असू शकते असे एकदा मान्य केले की, सगळा धर्मच संशयाच्या फेऱ्यात सापडतो. आणि त्यामुळे धर्माचार्यांच्या सत्तेलाच आव्हान मिळते. तेव्हा सूर्यकेंद्री सिद्धांत बरोबर की, चूक हा मुद्दा गौण होता. तो सिद्धांत न मानणे हे चर्चचे अधिकार अबाधित राहाण्यासाठी आवश्यकच होते.

सरकारी उद्योग चालवण्यामागचा पंतप्रधानांचा उद्देश वेगळा असतो आणि सरकारी बाबूंचा आणि कामगारांचा उद्देश वेगळा असतो. पंतप्रधानांना देशाची प्रगती साधायची असते आणि बाबूंना स्वतःची. सामाजिक क्षेत्रातील निर्णय यशस्वी आणि अयशस्वी ठरण्यात, किंबहुना ठरवण्यात वेगेगळ्या समाजघटकांचे हितसंबंध गुंतलेले असतात. आणि ते परस्पर विरोधी असतात. त्यामुळे आणखी गुंतागुंत वाढते.

सामाजिक क्षेत्रातील बहुतेक संघर्ष हितसंबंधांचे असतात. संघर्षाचे खरे कारण हितसंबंध असले तरी तो नेहमीच तात्त्विकतेचे रूप घेऊन येत असतो. भांडणारा प्रत्येकजण तो तत्त्वासाठी भांडतो आहे असाच दावा करत असतो. आज शेतकऱ्यांच्या नावावर जे आंदोलन सुरु आहे त्यामध्ये हे प्रकर्षाने दिसून येते.

तत्त्वासाठीचे भांडण म्हणजे माझे गृहीतक खरे की, तुझे गृहीतक खरे यातला झगडा. गृहीतक खरे अथवा खोटे असत नाही. ते केवळ गृहीतक असते. ते स्वीकारायचे की नाही हे ते किती आणि कोणत्या प्रश्नांची उत्तरे देते यावर अवलंबून असते.

सामाजिक प्रश्नाच्या बाबतीत प्रत्येकजण आपल्याला सोयीस्कर तेच पाहत असतो. नव्या गृहीतकाचा स्वीकार अथवा प्रचलित गृहीतकाचा त्याग इतक्या सहजासहजी होत नाही याचेही कारण तेच असते.

कुणी मार्क्सच्या विधानातील चूक काढली तर ज्याने कधी मार्क्स वाचलाही नाही तोही तुमचे म्हणणे काय आहे हे कळण्यापूर्वीच तुमचे म्हणणे स्वीकारत अथवा नाकारत असतो.

(या विवेचनात तुम्ही तुमच्या आवडी-निवडी प्रमाणे मार्क्सच्या जागी गांधी अथवा गोळवलकर या शब्दाचा उपयोग करू शकता. कुणाचे नाव वापरले जाते हे गौण आहे. मुद्दा महत्वाचा आहे.)

कार्ल मार्क्स असे म्हणतो हा समज त्याच्या दृष्टीने यासंबंधी निर्णय घेण्यास पुरेसा असतो. सामान्य माणसाच्या या दुबळेपणाचा उपयोग बहुतेक नेते स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी करत असतात. प्रत्यक्षात मार्क्स काय म्हणाला याच्याशी त्या नेत्यालाही काही देणे-घेणे नसते.

पण अमुक थोर व्यक्तीने तसे म्हटले आहे हे ऐकले की, ते म्हणणे लोक फारशी खळखळ नकरता स्वीकारत असतात हे नेत्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. “देवाने मला या दहा आज्ञा दिल्या आहेत असे मोझेस म्हणतो, ही त्याची थाप आहे” असे ब्रूनो म्हणाला होता. ब्रूनोला जिवंत जाळले गेले. त्यामुळे नेत्यांचे चुकीचे निर्णयही बराच काळ सामान्य जनतेला सहन करावे लागतात. एकच उदाहरण देतो.

जेव्हा समाजवादाचा डंका जगभर ऐकू येत होता आणि अल्पकाळ चाललेल्या जनता पक्षाचा पराभव करून इंदिरा गांधी पुनः भारताच्या पंतप्रधान झाल्या होत्या, त्या काळातली गोष्ट आहे.

इंदिराजींनी आणीबाणीच्या काळात संविधानामध्ये समाजवाद या शब्दाचा समावेश केला होता. नेहरूंच्यासारखी ‘भाबडी’ वैज्ञानिक दृष्टी त्यांच्याकडे नव्हती.

 

indira gandhi featured inmarathi

 

१९८० मध्ये हिंदुस्थान फर्टिलायझर कॉर्पोरेशनचा कारखाना पश्चिम बंगाल मध्ये सुरु (?) झाला. बाराशे कामगार खत निर्माण करण्यासाठी रोज कामावर येत होते. पण एक किरकोळ गडबड झाली होती. खताचे स्थिर रसायन तयार होत नव्हते. त्यामुळे खताचा एक दाणाही तयार होत नव्हता.

पण त्यामुळे काहीच फरक पडत नव्हता. कारण समाजवादाचे कवच नेत्याचे संरक्षण करत होते. कामगारांचे पगार वेळेवर होत होते. विशिष्ट काळानंतर कामगारांना बढत्याही मिळत होत्या. बोनसही मिळत होते. कायद्याप्रमाणे तो त्यांचा अधिकारच होता.

एक दिवसही उत्पादन न करता, बाराशे कर्मचारी असलेला हा खत कारखाना एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल बारा वर्षे चालू होता. कारण फॅक्टरी ऍक्टप्रमाणे कारखाने बंद करता येत नव्हते. हा कायदा बदलला पाहिजे याची निकड सरकारला नव्हती. कारण समाजवादी विचारसरणीत ते बसत नव्हते. हा ‘तत्त्वा’चा प्रश्न होता.

इंदिरा गांधींचा हा निर्णय बदलायला भारताला बारा वर्षे लागली. भारत १९९१ साली दिवाळखोरीच्या कड्यापर्यंत येऊन ठेपला आणि सरकारला रोजचा खर्च चालवण्यासाठी सोने गहाण ठेवण्याची पाळी आली.

सरकारची विश्वसनीयता इतकी रसातळाला गेली होती की, गहाण ठेवलेले सोने कर्ज फिटेपर्यंत अन्यत्र पण भारतातच ठेवायलाही जागतिक बँक राजी नव्हती. ते इंग्लंड सारख्या “थर्ड पार्टी”कडे जहाजातून पाठवावे लागले. जेव्हा भारतावर शहाणे होण्याची सक्तीच झाली तेव्हाच सरकारने आपले धोरण (गृहीतक) बदलले.

सक्तीचे शहाणपण अपुरेच असते. पण तरीही त्याचा देशाला बराच फायदा झाला. चीनला हा शहाणपणा यायला तीस वर्षे लागली आणि रशियाला सत्तर वर्षे लागली.

चीनमध्ये माओच्या काळात सात कोटी आणि रशियामध्ये स्टालिनच्या काळात पाच कोटी लोकांचे मार्क्सवादावरील धार्मिक श्रद्धेसाठी बळी दिले. पोपने “इन्क्विझिशन”च्या काळात घेतलेले बळी या तुलनेत काहीच नव्हते. राजाच्या स्वास्थ्यासाठी सामान्य माणसाचा बळी देण्याची प्रथा केवळ लोककथेपुरती मर्यादित नाही.

गणितात किंबहुना सर्व विज्ञानातच जेव्हा असे गुंतागुंतीचे गंभीर प्रश्न निर्माण होतात तेव्हा मूलभूत तत्त्वांच्या निकषावर प्रश्न तपासून पाहण्याचा प्रघात आहे. तसे केल्याने गुंतागुंत उकलण्यास मदत होते आणि उत्तरे मिळण्याची शक्यता वाढते. तेव्हा विज्ञानाच्या मूळ तत्त्वाच्याकडे जाऊया.

आपण पाहिले की, ज्ञान मिळवण्याची सुरवात गृहीतकापासून होते. या गृहीतकाचा उपयोग करताना दोन घटक कार्य करत असतात.

१. गृहितकाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन

२. गृहीतक निवडण्याची तुमची पद्धत. सामाजिक क्षेत्रातील गृहीतकाकडे निकोप दृष्टीने पाहण्यातील अडथळ्यांचा आपण आढावा घेतला. मग दृष्टी निकोप नसतानाही योग्य गृहीतकाकडे जाण्याची शक्यता निर्माण करणारा मार्ग कोणता?

वैज्ञानिक क्षेत्रात जी प्रस्थापित गृहीतके असतात ती शास्त्रज्ञांच्या बहुमताने ठरतात. ही गृहीतके त्या विषयातील बहुतेक तज्ज्ञांना मान्य असतात. आपण त्याला वस्तुनिष्ठ सत्य मानतो. पण प्रत्यक्षात ते वस्तुनिष्ठ नसते, ते बहुमताचे व्यक्तिनिष्ठ सत्य असते. त्यामुळे आजचे बहुमत उद्याचे अल्पमत बनू शकते.

विश्वाची उत्पत्ती ‘बिग बँग’ ने झाली. का? तर बहुसंख्य खगोलशास्त्रज्ञांचे त्यावर एक मत आहे. ही थेअरी चुकीची आहे असे मानणारे किंवा त्यात सुधारणा सुचवणारे शास्त्रज्ञ आहेत. पण ते आज घटकेला तरी अल्प मतात आहेत.

 

big bang theory inmarathi

 

म्हणजे विज्ञानातले प्रश्नही लोकशाही मार्गानेच सोडवले जातात. विज्ञानातही नवा शोध लागला, नवे तत्त्व सापडले तर ते मान्यताप्राप्त संशोधन-पत्रिकेत प्रसिद्ध व्हावे लागते. ते बहुसंख्य तज्ज्ञांनी स्वीकारावे लागते. ही विज्ञानाची पद्धत आहे. हे तज्ज्ञ विज्ञानात “स्टेक होल्डर’ असतात. तेव्हा सिद्धांत बरोबर की चूक हे ‘स्टेक होल्डर’च्या बहुमताने ठरते.

सामाजिक प्रश्नात स्टेक होल्डर सामान्य जनता असते. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील प्रश्न वैज्ञानिक पद्धतीने सोडवणे म्हणजे सामान्य जनतेच्या बहुमताने सोडवणे. जनता आपले मत कसे बनवते ते आपण पहिले आहे. तरीही नाइलाजास्तव तीच पद्धत आपल्याला स्वीकारावी लागते. या पद्धतीतील त्रुटी कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे यावर बराच विचार झाला आहे आणि लोकशाही यशस्वी करण्यासाठी काय केले पाहिजे यावर अनेक ग्रंथ लिहिले आहेत.

पण त्याची चर्चा येथे अपेक्षित नाही. सामाजिक क्षेत्रातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा कमीत कमी धोक्याचा मार्ग कोणत्या-ना-कोणत्या स्वरूपात लोकशाही अस्तित्वात असणे हाच होऊ शकतो.

तो मार्ग परिपूर्ण आहे म्हणून नव्हे, तर तोच कमीत कमी दूषित आहे म्हणून ! यासाठी लोकशाही पद्धतीने निर्णय घेणे हाच एकमेव वैज्ञानिक मार्ग आहे. नेहरूंनी तोच निवडला. नेहरूंचा दोष इतकाच, की आर्थिक क्षेत्रात लोकशाही आणण्याचे पूर्ण धाडस त्यांना दाखवता आले नाही. पण त्याबाबत त्यांना दोष देणे हे पश्चात शहाणपण आहे.

नेहरूंच्या काळात सोवियत सूर्य तळपत होता. साम्यवादाचे मातीचे पाय अजून दिसू लागले नव्हते. पण ते दिसू लागल्यावरही नेहरूंच्या आर्थिक धोरणातले दोष काढून टाकण्यास आज नेहरू गेल्यानंतर पंचावन्न वर्षांनीही किती अवघड झाले आहे.

त्याचे जिते जगते उदाहरण म्हणून सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे बोट दाखवता येईल. पंतप्रधान नरसिंह रावांनाही ते पूर्ण जमले नाही आणि आजचे राज्यकर्तेही ते काम चाचपडतच करत आहेत.

 

farmer protest inmarathi

 

‘नेकेड इकॉनॉमिक्स’ या ग्रंथाचा लेखक चार्ल्स व्हीलन म्हणतो, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकारणात प्रतिनिधित्व, असल्या उदात्त आणि चोखंदळ गोष्टीपेक्षा ट्रेन वेळेवर धावणे, हे गरीब देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचे नाही काय? नाही. सत्य याच्या अगदी उलट आहे.” (१९७५ साली आणीबाणीचे समर्थन करताना “आता रेल्वे वेळेवर सुटतात” हेच सांगितले होते. किंबहुना त्या कारणासाठी आणीबाणीचे समर्थन करणारे विचारवंत आजही आढळतात.)

अमर्त्य सेन यांनी दारिद्र्य आणि समाजकल्याण या विषयावर बरेच संशोधन केलेले आहे. त्यांच्या मते जगातील सर्वात भीषण दुष्काळ चुकीच्या धोरणाने पडले आहेत अन्नधान्याच्या कमतरतेने नाहीत. सेन ज्याला चुकीची धोरणे म्हणतात ती प्रत्यक्षात चुकीची गृहीतके असतात.

१९४२ साली बंगाल मधील दुष्काळात चाळीस लाख लोक मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे. त्यावेळी भारताच्या अन्यभागात विपुल अन्नधान्य उपलब्ध होते.

अमर्त्य सेन म्हणतात, “जे देश स्वतंत्र आहेत, जिथे निवडणुका नेमाने होतात, जिथे विरोधी पक्ष टीकाकाराची भूमिका वठवू शकतो, जिथे पत्रकारितेला शासनाच्या शहाणपणाविषयी शंका घायची मुभा आहे, आणि ती सेन्सारशिपपासून बऱ्यापैकी मुक्त आहे; त्या देशात दुष्काळ कधीही आपला प्रभाव दाखवू शकला नाही.”

आमची लोकशाही आदर्श नाही. त्यात अनेक त्रुटी आहेत. तरीही भारत स्वतंत्र झाल्यापासून येथे एकही भीषण दुष्काळ आपला प्रभाव दाखवू शकला नाही. उलट शोषणमुक्त समाज निर्माण करण्याची शपथ घेऊन सत्तेवर आलेल्या माओच्या चीनमध्ये पोथीनिष्ठ तत्त्वज्ञान जबरदस्तीने राबवण्याचा प्रयत्न केला गेला.

परिणामी १९५८ ते १९६१ च्या दरम्यान झालेल्या ‘कल्चरल रेव्होल्यूशन’च्या काळात जगाच्या इतिहासातील सर्वात भीषण दुष्काळाची नोंद झाली आहे. त्यात चीनमध्ये सुमारे तीन कोटी लोक अन्नाविना मेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (आणि अशाही स्थितीत चीनला भारताशी युद्ध करायला माओला कोणी अडवू शकत नव्हते.)

भारतात लोकशाही, दुर्बल अवस्थेत का होईना, अस्तित्वात राहिल्याने पोथीनिष्ठा कमीप्रमाणात राहिली. त्यामुळे जे साम्यवादी रशियात वा चीनमध्ये झाले ते भारतात होऊ शकले नाही. हे पोथीनिष्ठतेला तिलांजली देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्यामुळे होते.

उलट साम्यवादी रशियात पोथीनिष्ठेला वेळीच बंधन न घातल्याने रशियाचे विघटन झाले. ज्यावेळी तिच्या नेत्यांनी काही व्यावहारिक निर्णय घेतले त्यावेळी फार उशीर झाला होता. लोकशाहीमध्ये विरोधी मताला शत्रू न मानल्याने गृहीतकात सतत संशोधन होऊ शकते. हीच पद्धत विज्ञान अवलंबते.

रॉबर्ट बॅरो या अर्थशास्त्रज्ञाने सुमारे शंभर देशांचा अभ्यास करून अगदी प्राथमिक अवस्थेतील लोकशाही आणि सशक्त आर्थिक वाढ यांचा सरळ संबंध दाखवून दिला आहे. कार्ल मार्क्सने आपले काम लोकशाही इंग्लंडमध्ये केले.

तेथे साम्यवादी राजवट आली नाही तरीही लोककल्याणकारी राज्य निर्माण होऊ शकले. मार्क्सच्या प्रभावापासून भांडवलवादी अमेरिकाही मुक्त नाही. अमेरिकेत मक्तेदारीवर अंकुश आहे.

 

america inmarathi

 

शेतकऱ्यांना पीक न काढण्याबद्दल सबसिडी दिली जाते. ग्रामीण भागात कित्येक मैल ड्रायविंग केल्यावरही जेथे कोणते वाहन भेटत नाही असे रस्तेही चांगल्या स्थितीत आढळतात.

बुडणाऱ्या बँकेला सरकारी मदतीने वाचवले जाते. सामान्य माणसाला ‘ओबामा केअर’ योजने खाली दिलासा मिळतो. यातील कोणतीही कृती पोथीनिष्ठ भांडवलवादात बसत नाही. या गोष्टीना आधार दिलाच तर मार्क्सवाद देईल. पण तेथे मार्क्सला प्रेषित मानत नाहीत.

अनेक आर्थिक सिद्धान्तापैकी मार्क्सवाद एक आहे. त्यातील काही घेणे जरूरीचे असेल, तर ते घेता येईल; चुकीचे असेल, तर टाकता येईल; सुधारणा आवश्यक असेल, तर सुधारता येईल. तो सिद्धांत वापरलाच पाहिजे अशी सक्ती नाही.

आपले प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात योग्य सिद्धांत कोणता हे सिद्धांत वापरणाराच ठरवू शकतो. त्यामुळे कोणता सिद्धांत वापरायचा, किती प्रमाणात वापरायचा, किंवा अजिबात वापरायचा नाही याचा निर्णय वापरणाऱ्यांच्या बहुमतावरच सोडणे श्रेयस्कर असते.

त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक पातळीवर अधिकात अधिक लोकशाही आणणे हीच डोळस वैज्ञानिक पद्धती ठरते. अन्य कुठलीही नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?