' अभिनयाच्या परीक्षेत नापास झालेला हा विद्यार्थी बनला ‘झक्कास’ अभिनेता! – InMarathi

अभिनयाच्या परीक्षेत नापास झालेला हा विद्यार्थी बनला ‘झक्कास’ अभिनेता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येक दिवसागणिक वय वाढतं, वयाच्या आकड्याबद्दल बाळगलेलं मौन सोडायला अखेर शरीर भाग पाडतंच, अनेकांबाबत अगदी खरा असलेला हा समज त्याच्या बाबतीच सपशेल खोटा ठरतो. कॅलेंडरमधली वर्ष सरली, काळानुसार बदल होत गेले, मात्र तो तो तसाच आहे… झक्कास!

 

anil zakkas

 

हा इतका तरुण कसा? हा नेमकं काय खातो? या प्रश्नांतून कधी उत्सुकता दिसते तर अनेकदा मध्यमवयीन प्रेक्षकांना वाटणारा मस्तरही. चाळीस वर्षांपुर्वी जसा होता तस्साच चेहरा, किंबहुना आता आलेलं अनुभवाचं तेज, तरुण अभिनेत्यांनी फिटनेस टिप्स घ्यावात इतकी सुदृढ शरिरयष्टी, साध्याभोळ्या चेह-यावरचे हसरे भाव या त्याच्या व्यक्तीमत्वात तीळमात्रही फरक पडलेला नाही.

अर्थात ‘चीरतरुण’ या संकल्पनेच्या पलिकडे जात आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर तो आपले ‘नायक’त्व सिद्ध करतो.

 

anil kapoor inmarathi

कधी खट्याळ, कधी तडफदार तर कधी प्रत्येकाला आपला वाटणारा हा ‘मिस्टर इंडिया’ संपूर्ण भारतीय प्रेक्षकांच्या मनावर तब्बल चार दशकांहून अधिक काळ राज्य करत आहे.

अर्थात तुमच्या लक्षात आलं असेलच की हा आहे, चंदेरी दुनियेच्या हा चीरतरूण अभिनेता अनिल कपूर.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या AK VS AK या चित्रपटाच्या निमित्ताने खास अनिलशैली आपल्याला पहायला मिळत आहे. अनिल कपूर विरुद्ध अनुराग कश्यप हा ट्विटवरील रंगलेला वाद, त्याचा चित्रपटाशी असलेला संबंध, त्यामागील सत्यता या वादात न पडता चंदेरी पडद्यावर वावरणारं अनिल कपूरचं फ्रेश व्यक्तीमत्व अनुभवण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसतीय हे नाकारता येणार नाही.

 

ak vs ak inmarathi

 

‘कपूर’ या आडनावामुळे अनेकांनी त्याला घराणेशाहीच्याच यादीत चिटकवलं. त्याच्या बॉलिवुड पदार्पणाचं क्रेडिट वडिलांच्या पुण्याईलाही दिलं गेलं, कधी धगधग गर्लशी असलेल्या नात्यावर प्रश्नचिन्ह तर कधी अनुराग कश्यपशी ट्विटरवॉर…

अर्थात या सगळ्या वादांच्या पलिकडे जात नेमका अनिल कपूर कसा आहे? त्याच्या यशामागे फक्त घराणेशाही हे एकमेव कारण आहे का? इतर कपूर्सच्या गर्दीत याने आपलं स्थान नेमकं कसं सिद्ध केलं हे पाहणं प्रत्येक रसिक प्रेक्षकांसाठी गरजेचं आहे.

२४ डिसेंबर १९५९ मध्ये कपूर कुटुंबात एका लहानग्याचा जन्म झाला. आई, वडिल आणि मोठा भाऊ बोनी यांच्या लाडात अनिल घडत होते, त्यापाठोपाठ धाकचे बंधु संजय यांचीही एन्ट्री झाली.

यावेळी अनिल यांचे वडिल सुरेंदर हे चित्रपटसृष्टीच्या ओढीने कुटुंबासह मुंबईत दाखल झाले खरे, पण या शहरातील झगमगाटात त्यांना रिकाम्या खिशाची चिंता भासु लागली. काम शोधण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत होते मात्र पाच-सहा जणांचं कुटुंब पोसणं कठीण होतं, यामध्ये मुख्य प्रश्न होता तो पत्नी आणि लहान मुलांना सुरक्षित निवारा देण्याचा.

अद्याप कामाची शाश्वती नसल्याने भाड्याचे पैसे साठले नव्हते, अशातच त्यांनी राज कपूर या आपल्या चुलत भावाकडे मदतीचा हात मागितला. पृथ्वीराज कपूर आणि त्यांचे कुटुंबिय हे मुंबईतील बडं प्रस्थ, चित्रपटसृष्टीत येणा-या अनेकांना सहकार्य करणा-या कपूर कुटुंबियान आपल्या या भावाला मदत केली नाही तरच नवल!

 

anil kapoor inmarathi featured

 

मात्र स्वाभिमानी सुरेंदर यांनी आर्थिक मदत न घेता केवळ निवा-यासाठी विचारणा केली आणि राज कपूर यांच्या गॅरेजच्या जागेत सुरेंदर यांनी आपल्या कुटुंबकबिल्यासह मुक्काम हलवला.

त्यानंतर सुरेंदर यांनी मिळेल ते काम केलं स्विकारलं, काही हिरॉइन्सचे मॅनेजर तर कधी प्रॉडक्शन टिम मेंबर, अखेरिस जमवलेली पुंजी पणला लावून ते एका चित्रपटासाठी सह निर्माता म्हणून काम केलं. याच चित्रपटाने त्यांच्या नशिबाचं दार उघडलं. प्रसिद्धी मिळाली नसली तरी आर्थिक बळ मिळाल्याने कपूर कुटुंब गॅरेजच्या जागेतून अखेरिस चाळीतील एका खोलीत रहाण्यासाठी आले.

शिक्षण पुर्ण करतानाच वडिलांप्रमाणेच चित्रपटसृष्टीत काम करत आपलं स्थान निर्माण करण्याचा निर्णय अनिल यांनी घेतला होता. तोपर्यंत सुरेंदर यांचं बस्तान बसलं होतं, मोठा भाऊ बोनी कपूरही याच क्षेत्रात धडपड करत होते, करिअरसाठी अनुकूल परिस्थिती असूनही कोणाच्याही मदतीशिवाय त्यांना हा मार्ग पार करायचा होता.

याच स्वावबंली विचाराने त्यांनी पुण्यातल्या फिल्म अण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या नामांकित संस्थेची प्रवेश परिक्षा दिली.

 

pft inmarathi

 

मात्र पहिल्याच प्रयत्नांत त्यांचा अर्ज नाकारण्यात आला. अभिनयाची पार्श्वभुमी असूनही पहिल्याच प्रयत्नांत पदरी आलेल्या अपयशाने ते निराश झाले. पराभवाला सामोरं जाण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.

 

anil kapoor inmarathi

 

आपल्याला काहीच जमणार नाही, वडिल, बंधू, चुलते या सगळ्या दिग्गजांचं नाव आपण मोठ करू शकणार नाही अशा अनेक नैराश्यग्रस्त विचारांनी त्यांनी हा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र काही महिन्यातच त्यांना आपली चूक उमगली. याला कारण ठरली ती त्यांचा बालपणीचा एक आठवण.

वयाच्या बाराव्या वर्षी अनिल यांना एका चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. शुटिंगही पुर्ण झालं, मात्र निर्मात्यांच्या काही आर्थिक कारणांमुळे हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही.” त्या चित्रपटासाठी झटणारे हजारो कलाकार, आज इतक्या वर्षांनंतरही खचून न जाता काम करत आहेत, मग केवळ एका परिक्षेत अपयश मिळाल्याने आपण का हार मानायची? ” या एकाच विचाराने त्यांनी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं ते कधीही मागे वळून न पाहण्यासाठी.

प्रत्यक्षात अनिल कपूर यांचं आयुष्यच एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी असं. काही कॉमन मित्रांच्या गर्दीत तेंव्हाची प्रसिद्ध मॉडेल सुनिता यांच्याशी ओळख झाली. मात्र दोघांमधील आर्थिक तफावत लक्षात घेता अनिल यांनाच मैत्रीचा हात पुढे करण्याची भिती वाटत होती.

मात्र अखेर दोघांच्याही पुढाकाराने, पुढचामागचा कोणताही विचार न करता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि इतकंच नव्हे तर निर्णयाच्या दुस-या दिवशी १० नातेवाईकांच्या उपस्थितीत ते  लग्नाच्या बेडीत अडकले.

 

anil sunita

 

मात्र पुढची कथा याहूनही रंजक आहे. लग्नानंतर तिस-या दिवशी अनिल यांना शुटिंगसठी बोलवण्यात आलं, कामाची गरज असल्याने नकार देण्याचा प्रश्नच नव्हता, त्यामुळे अनिल शुटिंगसाठी रवाना झाले आणि त्याच दिवशी ठरवलेल्या प्लॅननुसार त्यांची पत्नी सुनिता या एकट्याच हनिमुनसाठी निघाल्या. अर्थात हा आमच्या दोघांमधील विश्वास, एकमत होतं याबाबत अनिल यांनी अनेकदा खुलासा केला होता.

१९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटाने बॉलिवुडमध्ये या लखनने प्रवेश केला आणि कधी तो इथला नायक झाला हे कळलंच नाही.

एकेकाळी ऑडिशनसाठी पायपीट करणा-या अनिल यांना जिनमे मेरी जंग, मी.इंडिया, विरासत या चित्रपटांनी फिल्मफेअर क्रिटिक्स पुरस्कार मिळवून दिला. ताल, जुदाई, पुकार, हम आपके दिल मे रेहते है या चित्रपटांनी पुरुषही किती संवेदनशील असू शकतो याची जाणीव प्रेक्षकांना करून दिली.

 

anil kapoor roles inmarathi

 

एकीकडे करिअर आणि संसार यांची गाडी उत्तम गतीत धावत असताना काही वाद, प्रतिवाद, गॉसिप कथेत शिरले नाही तर ते अभिनेत्याचं आयुष्य कसलं?

बोनी कपूर यांच्याशी झालेले कौटुंबिक वाद तर कधी दाऊदच्या भेटीमुळे माजलेली खळबळ, पेज थ्री वर अनिल कायमच झळकत होते. 

कधी किमी काटकर तर कधी धकधक गर्ल यांच्याशी अनिल यांचं नाव जोडलं गेलं. मात्र माधुरी दिक्षीत आणि त्यांच्या नात्याची चर्चा वर्षानुवर्ष रंगली, आजही हा विषय चवीनं चघळला जातो.

 

kimi anil inmarathi

 

तेजाब, बेताब, राम लखन यांसारख्या अनेक चित्रपटांत माधुरी आणि अनिल ही जोडी प्रेक्षकांना भावली. शुटिंगदरम्यान त्यांच्यातील निखळ मैत्रीचं अनेकांनी कौतुकही केलं,

 

anil-kapoor-madhuri-dixit-inmarathi

 

मात्र शेवटी फिल्मी गॉसिप्सनी आपलं काम केलंच. त्यांच्या नात्यांबाबत सुरु असलेल्या गॉसिपमुळे अखेरिस सुनिता कपूर अचानक मुलांसह शुटिंगच्या ठिकाणी दाखल झाल्या. प्रत्यक्षात या ठिकाणी कोणताच वाद झाला नाही, मात्र मुलासोंबत हसणा-या या हॅपी फॅमिलीचं चित्र बिघडू नये यासाठी माधुरीने स्वतःहून अनिल यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.

तब्बल १८ वर्षांनी म्हणजेच गेल्यावर्षी टोटल धमाल चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर झळकली.

madhuri dixit inmarathi

 

मात्र या घटनेमुळे अनिल आणि सुनिता यांच्या संसारात कोणताही वाद निर्माण झाला नाही. आजही ही हे कुटुंब हॅपी फॅमिली म्हणूनच ओळखलं जातं.
अनिल यांची मुलगी सोनम देखील चित्रपटसृष्टीत आपलं नशिब आजमावताना दिसते.

कोरोनाच्या संकटकाळात अनिल यांचं एक नवं रुप प्रेक्षकांना पाहता आलं, घरापासून दुरावलेल्या अनेक स्थलांतरितांना त्यांनी मदतीचा हात देऊ केला.

 

anil dance inmarathi

 

फिटनेस फ्रीक, चीरतरुण, हॅंडसम यांपासून ते वन, टु का फोर म्हणत आपली सिग्नेचर स्टेप पुढील अनेक पिढ्यांना शिकवणारा हा ‘नायक’ वयाच्या नव्वदीतही असाच तरुण दिसेल ही प्रेक्षकांची अपेक्षा खरी ठरल्याशिवाय राहणार नाही.
===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?