' असं समजून घ्या तुमच्या बायकोला! वाद टळतील, प्रेमही वाढेल – InMarathi

असं समजून घ्या तुमच्या बायकोला! वाद टळतील, प्रेमही वाढेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नवरा-बायकोचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय करमेना! यामध्ये सतत काही ना काही कुरबुरी सुरू असतात. अर्थातच त्या तेवढ्यापुरता मर्यादित असल्या की नात्याला एक वेगळीच रंगत येते, पण जर कुरबुरींचं रूपांतर वादावादी, भांडणात झालं की मग ते नातं नकोस वाटतं. मग हळूहळू एकमेकांना टाळण्याकडे कल वाढतो. त्याचा परिणाम एकूणच आयुष्यावर होतो.

अशी सततची वादावादी, भांडणं टाळायची असतील तर काय करावं? अर्थातच कुठलंही नातं जर टिकवायचं असेल किंवा भांडण टाळायचे असेल तर त्याला एक ठराविक कोणताही सिल्याबस नाही, की बाबा भांडण झालं की असं करावं, तसं करावं. नियम चौथा लागू करावा, नियम पाचवा लागू करावा. असं कुठेही लिहिलेलं नाही.

कधीकधी छोट्या गोष्टींमुळे देखील गैरसमज निर्माण होतात. बऱ्याचदा ते वर्तणुकीतून निर्माण होतात. असे गैरसमज दूर होणे गरजेचे असते, ते दूर झाल्यास नात्यात कडवटपणा राहात नाही.

कुठल्याही वादाचं, भांडणाचं मूळ कारण असतं तो व्यक्तींमधला विसंवाद. नवरा-बायकोचं नातं हे मुळातच खूप नाजूक, एकमेकांच्या जवळचं असतं. त्यामुळेच त्यांच्यात निखळ बोलणं होत नसेल, एकमेकांना वेळ दिला जात नसेल तर वाद नक्की होतील.

 

 

लग्न यासाठीच केलं जातं, की एकमेकांसोबतच सहजीवन हे हसत खेळत व्यतीत व्हावं, पण लग्न होतं आणि मग हळूहळू एक ठराविक साचलेपण नात्यामध्ये यायला लागतं आणि मग खटके उडायला चालू होतात.

तसा बायकांचा स्वभाव असतो तो बोलघेवडा. म्हणजे बोलणं हा त्यांच्या DNA चाच एक भाग असतो. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर, जेवण कधी तयार होईल? या एका वाक्यात उत्तर द्यायच्या प्रश्नाला त्या पंधरा-वीस वाक्य घेऊ शकतात.

कधी कधी तिला काय म्हणायचं आहे हेदेखील नवर्‍यांना समजत नाही. म्हणजे बघा हा, जर पत्नी एखाद्या ठिकाणाची स्तुती करत असेल मग ते हॉटेल असेल किंवा हिलस्टेशन असेल, तर त्याचा अर्थ असतो की तिला तिथे जायचे आहे. म्हणजेच तिच्या जोडीदाराने तिला तिथे न्यावे अशी तिची इच्छा आहे. या गोष्टी मात्र पुरुषांनी समजून घ्यायला हव्यात.

 

couple-inmarathi

 

 

स्त्रियांबरोबर खरेदीला गेलात किंवा तिने जर काही घरी आणलं आणि त्याबद्दल जर ती कौतुकाने बोलत असेल, तर तिने खरेदी केलेल्या गोष्टींचे तुम्हीही कौतुक करावे अशी तिची अपेक्षा असते. उगीच, ‘घे तुला काय घ्यायचं आहे ते आणि चल’, अशी घाई न करता एक दोन वाक्यांमध्ये तिने खरेदी केलेल्या वस्तूंची स्तुती करावी.‘ व्वा !! तुझा चॉईस भारीच असतो’ असं म्हणावं. ज्यामुळे ती तिच्या आवडीची खरेदी आनंदाने करेल.

समजा तिने घेतलेली वस्तू तुम्हाला आवडली नाही तर, लगेच ‘हे काय घेतलंय असलं ?’ असं तोंडावर न सांगता ती वस्तू तिच्यासाठी किती निरुपयोगी आहे हे सांगावं म्हणजे मग तिलाही ते पटेल आणि ती, ती वस्तू खरेदी करणार नाही.

आजकाल स्त्रिया नोकरी करीत आहेत, घर सांभाळत आहेत. हे सगळं करताना तिची थोडी दमछाक होते. त्यामुळे एखाद्या वेळेस जेवणातला एखादा पदार्थ बिघडला की लगेच तिला, ‘तुला जेवण बनवता येत नाही’ असे रागारागाने म्हणू नये किंवा तिच्या स्वयंपाकाची तुलना तुमच्या आईच्या स्वयंपाकाशी करू नये.

 

housewife inmarathi

 

‘माझ्या आई सारखा हा पदार्थ तुला कधीच जमणार नाही’ असे म्हणून तिला हिणवू नये. यामुळे ती दुखावली जाते. आपण करत असलेलं काम व्यर्थ आहे, अशी तिची भावना होते. आणि विनाकारण सासरच्या मंडळींबद्दल तिच्या मनात राग राहतो.

आता कामामुळे दोघेही बिझी असतात. नवरा शक्यतो बाहेरच्या कामांमध्ये, ऑफिसमध्ये व्यग्र असतो, तर बायको घर, मुलं यामध्येच बिझी असते. यावेळेस दोघांनाही स्वतःचा असा वेळ काढावा लागतो.

महिन्यातून एखाद्या दिवशी अगदी थोडा वेळ तरी नवरा बायकोने एकमेकांसाठी घालवावा. यावेळेस एखादं जेवण बाहेर करावं. एकमेकांच्या आवडीची खरेदी करावी. यावेळेस घर, समस्या, मुलं, भविष्य याविषयी फारसं न बोलता तिची आवड, ती करत असलेलं काम याविषयी बोलावं. ती आपली बायको आहे, केवळ आपल्या मुलांची आई नाही हे लक्षात ठेवून तिच्याशी वर्तन करावं.

 

Couple-Talking Inmarathi

 

बायकोला खुश करण्यासाठी प्रत्येक वेळेस तिच्या होकारात हो मिळवायलाच असं नाही, पण तिच्या प्रत्येक कृतीला लगेचच नाही असंही म्हणू नये. एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नाही तर ती शांतपणेही समजावून सांगता येते किंवा त्याबाबत काहीतरी तडजोड करता येते.

ती जेव्हा तुमच्याशी काहीतरी बोलते आणि काहीतरी सांगते तेव्हा ते किमान नीट लक्ष देऊन तरी ऐकावं. तिच्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात, हे जर तिच्या लक्षात आलं तर तुमच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होईल.

ती तर घराची काळजी घेतेच, मात्र त्यामध्ये नवऱ्याचा थोडाफार तरी जरी सहभाग असला तरी तोही तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो कधी-कधी मुलांना शाळेत नेणे, त्यांचा अभ्यास घेणे, स्वयंपाकात थोडीफार मदत करणे इत्यादी गोष्टी केल्या तरी बायको नक्कीच खुश होते.

प्लीज, थँक्यू सारख्या शब्दांचाही नातं सुरळीत राहण्यासाठी खूप उपयोग होतो. प्रसंग पाहून हे शब्द उच्चार केल्यास त्याचा फायदा होईल.

 

cute couple feature inmarathi

 

बऱ्याचदा नवरे आजारी पडल्यावर शक्यतो डॉक्टरकडे जाण्याचे टाळतात. त्यांना डॉक्टरकडे जाणे म्हणजे कमीपणाचे वाटते, मी कमजोर नाही हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि बायको डॉक्टरकडे जाऊन तपासून घेण्याचा हट्ट करत असते. यावेळेस ती तुमची कमजोरी दाखवत नसून, ती तुमची काळजी करत आहे हे लक्षात घ्यावे.

मुळात बायकांना हार्मोनल चेंजेसचा खूप सामना करावा लागतो. मासिक पाळीच्या वेळेस, गरोदरपणात, मेनोपॉजच्या वेळेस स्त्रियांच्या हार्मोन्स पातळीमध्ये बदल होत असतो. त्याचाच परिणाम त्यांच्या एकूण वर्तणुकीवर होतो. यावेळेस स्त्रियांना शक्यतो समजूतदार जोडीदार हवा असतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस तिला चुकीचे ठरवणे योग्य नसते. थोडं समजून उमजून वागल्यास तीदेखील तितक्याच आनंदाने संसार करेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?