' कारकुनी कामासाठी आपला जन्म झाला नसल्याची ‘त्यांना’ जाणीव झाली आणि… – InMarathi

कारकुनी कामासाठी आपला जन्म झाला नसल्याची ‘त्यांना’ जाणीव झाली आणि…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

सध्या सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरण आणि नेपोटीझम यामुळे वातावरण बरंच तापलेलं आहे. थेटर्स चालू झाली असली तरी प्रेक्षक सिनेमागृहाकडे वळत नसून, बरेच निर्माते आणि दिग्दर्शक ओटीटी प्लॅटफॉर्मना प्राधान्य देताना दिसत आहे.

अशातच डेव्हिड धवन या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा कुली नं. १ हा सिनेमा ऍमेझॉन प्राईम या प्लॅटफॉर्म वर ख्रिसमसच्या दिवशी रिलीज झाला.

एकतर जुन्या हिट सिनेमाचा रिमेक आणि त्यातून नेपोटीझमला खतपाणी यामुळे लोकांनी या सिनेमाला सुद्धा ठेंगाच दाखवायचं ठरवलं आहे.

पण इतर काही सिनियर आर्टिस्ट बरोबरच आणखीन एक प्रसिद्ध चेहरा या सिनेमात आहे आणि त्या चेहेऱ्यामुळेच हा सिनेमा थोडीफार लोकं बघतील, तो चेहरा म्हणजे इंडस्ट्रीमधले अत्यंत सिनियर, रीस्पेक्टफुल आणि स्वतःच्या मतावर कायम ठाम राहणारे असे उमदा कलाकार परेश रावल!

 

paresh rawal inmarathi

 

स्वतःची वेगळी पोलिटिकल आयडियोलॉजी असून सुद्धा ह्या फिल्म इंडस्ट्री मध्ये थाटात काम करणाऱ्या काही मोजक्या अभिनेत्यांपैकी एक परेश रावल.

तसं बघायला गेलं तर राजकारण हा सुद्धा अभिनयाचा मंच आहे पण परेश भाई हे असे एकमेव कलाकार आहेत ज्यांनी हा बॅलन्स अगदी योग्य साधला आहे.

राजकारणात शिरायला संधी मिळाली म्हणून ना त्यांनी नावज्योत सिंग सिद्धू सारखी स्टेटमेंट केली ना प्रकाश राज सारखी प्रक्षोभक वक्तव्य केली.

मला अमुक अमुक लीडर आवडतो, मी त्याला मानतो म्हणून मी त्याच्या सोबत काम करतो इतकं थेट बोलणारा बहुतेक बॉलिवूडमधला एकमेव अभिनेता म्हणजे परेश रावल.

खासदार असून सुद्धा त्यांनी कधीच आपल्या राजकीय कारकिर्दीत बेजवाबदारपणा दाखवला नाही किंवा पोलिटिकल कनेक्शन असून सुद्धा त्याचा वापर इंडस्ट्री मध्ये केला नाही.

इतका कंपोज्ड कलाकार मिळणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे! मुंबईत एका गुजराती परिवारात जन्म घेतलेल्या परेश रावल यांना लहानपणापासूनच थेटरची आवड होती.

१९७४ साली मुंबईच्या विद्यापीठातून कॉमर्स मध्ये पदवी मिळवल्यानंतर त्यांनी गुजराती नाटकात कामं करायला सुरुवात केली.

१९७९ सालचा मिस इंडिया हा खिताब जिंकणाऱ्या स्वरूप संपत यांच्याशी झालेलं त्यांचं लग्न म्हणजे ‘या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात’ याचं उत्तम उदाहरण आहे.

 

paresh rawal swaroop sampat inmarathi

 

कारण तेंव्हा स्वरूप संपत हे नाव बरंच मोठं झालं होतं, ये जो है जिंदगी या टीव्ही सिरीयल मध्ये एक महत्वाची भूमिका सुद्धा त्यांना मिळाली होती, त्याच सिरीयल मध्ये परेश रावल यांना सुद्धा एक रोल ऑफर केला गेला होता पण त्यानी तो नाकारला!

एकंदरच एका स्ट्रगलिंग ऍक्टर बरोबर एका मिस इंडिया राहिलेल्या सेलिब्रिटीने लग्न करणं तशी खूप मोठी गोष्ट होती, आणि त्या दोघांनी ते लग्न टिकवून ही गोष्ट लोकांच्या मनात रूढ केली की आपल्या पार्टनरच्या केपेबलिटीवर विश्वास ठेवला तर सगळं काही सुरळीत होत!

असं नाही की परेश यांना काहीच कामं मिळत नव्हती, थेटर क्षेत्रात आजही त्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं ते याचसाठी की त्यांनी सिनेमा मिळाल्यानंतर सुद्धा नाटक करणं सोडलं नाही, आणि कदाचित त्यामुळेच त्यांच्यातला ऍक्टर हा सदैव इम्पृव्ह होत गेला आणि इतक्या तरतऱ्हेच्या भूमिका परेश यांच्या वाट्याला आल्या.

त्यांच्या स्ट्रगलच्या काळात त्यांनी बँक ऑफ बरोडा या बँकेत सुद्धा नोकरी केली, पण कारकुनी कामासाठी आपला जन्म झालेला नाही याची त्यांना जाणीव झाली म्हणून ते त्या क्षेत्रात जास्त काळ रमले नाहीत!

वेगवेगळी गुजराती नाटकं करतानाच ते सिनेक्षेत्रात सुद्धा यायचा प्रयत्न करत होते, तेंव्हा १९८४ मध्ये आलेल्या केतन मेहता यांच्या होली या सिनेमात त्यांना सहाय्यक अभिनेता म्हणून रोल मिळाला.

पण १९८६ साली आलेल्या “नाम” या सिनेमाने आणि महेश भट यांच्या “सर” सिनेमाने परेश यांना एक वेगळीच ओळख दिली.

 

paresh in sir inmarathi

 

परेश रावल यांची आणखीन एक खासियत म्हणजे त्यांनी कधीच त्यांच्या इमेजची चिंता नाही केली, १०० हुन अधिक सिनेमात खलनायक साकारणाऱ्या परेश रावल यांनी कधीच स्वतःला त्याच साच्यात बसवलं नाही, सदैव काहीतरी नवीन भूमिका ते करत राहिले.

दौड, बडे मियाँ छोटे मियाँ, आक्रोश, टेबल नंबर २१ अशा कित्येक सिनेमात त्यांनी ज्या पद्धतीने निगेटिव्ह रोल साकारला आहे त्यासमोर मोठमोठे ऍक्टर्स सुद्धा फिके पडतील.

खलनायक एका वेगळ्याच पद्धतीने रंगवण्याचा त्यांचा अंदाज काही औरच आहे. विनोदी भूमिका आणि कॉमिक टायमिंग यामध्ये तर परेश रावल यांचा हात कुणीच धरू शकत नाही.

अंदाज अपना अपना, हेरा फेरी, हलचल, हंगामा, मालामाल विकली, आवारा पागल दिवाना, हलचल, वेलकम अशा अगणित चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिकांची तर गणनाच करता येणार नाही!

केतन मेहता दिग्दर्शित सरदार या सिनेमात त्यांनी साकारलेली वल्लभभाई पटेल यांची भूमिका त्यांची आजवरची सर्वात उत्कृष्ट भूमिकांपैकी एक आहे.

 

sardar inmarathi

 

अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या सिनेमाची चर्चा झाली, बेन किंगस्ले यांनी साकारलेल्या गांधी या पात्राच्या बरोबरीनेच परेश रावल यांच्या सरदार या भूमिकेचं नाव घेतलं जाऊ लागलं!

शिवाय त्यांच्या या अफाट कारकिर्दीनिमित्त आणि त्यांच्या योगदानाबद्दल भारताकडून पद्मश्री पुरस्कार दिला गेला. ‘ओ छोकरी’ आणि ‘सर’ सारख्या सिनेमातल्या कामासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

हेरा फेरी मधलं बाबुराव गणपतराव आपटे हे पात्र त्यांच्या अफाट कॉमिक टायमिंग मुळेच अजरामर झालं, त्यावर आजही बरेच जोक्स मिम्स बनतात, त्यातले कित्येक संवाद आजही सगळ्यांना तोंडपाठ आहेत ते केवळ आणि केवळ परेश रावल यांच्या लाजवाब अदाकारीमुळे!

 

baburao aapte inmarathi

 

शिवाय त्यांच्याच गुजराती नाटकावर आधारित असलेला ओह माय गॉड या सिनेमामुळे त्यांना बऱ्याच लोकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. या सिनेमात कृष्णाची भूमिका अक्षय कुमार ने केली असून बऱ्याच वर्षांनी लोकांना त्यांची जोडी पाहायला मिळाली.

या सिनेमात श्रद्धा अंधश्रद्धा यावर इतकं परखडपणे भाष्य केले गेले की काहींना ते अगदी मनापासून पटलं तर काहींच्या ती कथा अगदी जिव्हारी लागली.

पण तरीही यात परेश रावल यांनी साकारलेला कानजी लालजी मेहता हे पात्र विसरणं कठीणच आहे!

दोन महिन्यापूर्वीच आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी परेश रावल यांच्यावर आणखीन एक महत्वाची जवाबदारी सोपवली.

नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा (दिल्ली) इथल्या इन्स्टिट्यूटच्या चेयरपर्सन पदावर परेश रावल यांची नेमणूक केली गेली असून एकंदरच कलाक्षेत्रात एक समाधान पाहायला मिळत आहे.

 

nsd inmarathi

 

कलाक्षेत्र आणि राजकारण हे कधीच वेगळं नव्हतं, आपल्या देशातल्या या इन्स्टिट्यूटची अवस्था आणि त्या बाबतीत असलेली तिथल्या लोकांची उदासीनता, तसेच या इन्स्टिट्यूटच्या पदाचा होणारा गैरवापर हे सगळंच आता काही प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा आहे.

कारण परेश रावल यांचा स्पष्टवक्तेपणा, शिस्त आणि उत्तम डिसीजन मेकिंगचा नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे. एका डिझर्वींग माणसाची या पदी निवड होणं ही गोष्ट एक वेगळाच आनंद देणारी आहे.

आपल्या देशात कायम विनोदी अभिनेत्यांना मुख्य अभिनेत्याचा दर्जा दिला जात नाही याची खंत परेश रावल यांनी पदोपदी व्यक्त केली आहे, पण त्याचा त्यांनी स्वतःच्या करियरवर कधीच परिणाम होऊ दिला नाही!

उलट त्यांनी खलनायक आणि विनोदी भूमिका इतक्या साकारल्या आणि त्या अशा पद्धतीने साकारल्या की इतर मेनस्ट्रीम अभिनेत्यांसमोर परेश रावल हे स्वतःच एक ब्रँड बनले.

 

paresh rawal 3 inmarathi

 

आजही कुली नंबर १, रेडी, वेलकम सारखे तद्दन कमर्शियल सिनेमे केवळ आणि केवळ परेश रावलसारख्या अभिनेत्यांमुळे लोकं आवडीने बघतात.

स्पष्टवक्तेपणा, पोलिटिकल आयडियोलॉजी याचा कशावरही परिणाम होऊ न देता फिल्म इंडस्ट्री मध्ये एवढं मोठं नाव कमावणाऱ्या परेश भाईंना मानाचा मुजरा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?