' आत्मनिर्भर व्हायचंय? कमी भांडवलात सुरू केलेले हे स्टार्टअप देतील अमाप नफा

आत्मनिर्भर व्हायचंय? कमी भांडवलात सुरू केलेले हे स्टार्टअप देतील अमाप नफा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतासारख्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या देशात सर्वांनाच नोकरीच्या संधी उपलब्ध होतील असे नाही. त्यातून सरकारी नोकरी मिळणे अजूनच कठीण. शिवाय आता कोरोनाच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक व्यवहार बंद पडले. त्यामुळे देशाचीही आर्थिक घडी बिघडली.

लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. केवळ देशातच नव्हे तर लोकांनी देखील आत्मनिर्भर व्हावं असं त्यांनी सांगितलं.

आता आत्मनिर्भर व्हायचं म्हणजे स्वतः चा काहीतरी व्यवसाय करावा लागणार, पण प्रत्येकालाच हे शक्य होईल का? कारण कुठलाही व्यवसाय करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. मग मुळातच कमी भांडवल असलेल्या लोकांनी व्यवसाय कसा करावा?

कमी पैशातही अनेक स्टार्ट अप सुरू करता येतात. कोणते? बघा

१. घरगुती मेणबत्या, उदबत्या :

 

making candles inmarathi

 

घरगुती पद्धतीने मेणबत्त्या बनवता येतील. त्यांची मागणी बाजारात खूप आहे. वीज गेल्यानंतर, धार्मिक कारणासाठी, वाढदिवसाच्या निमित्ताने, मेणबत्यांना मागणी असते. तसेच आता सणासुदीच्या दिवसातही घर दिव्यांनी उजळण्यासाठी मेणबत्या लावल्या जातात.

आजकाल तर सुगंधी मेणबत्यांचाही ट्रेंड आहे. या मेणबत्त्या कॅण्डल लाईट डिनर, घरात एखादा छोटासा कार्यक्रम असेल तर, हॉटेलमध्ये वापरल्या जातात.

मेणबत्या बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल म्हणजे मेण, दोरा, सुगंधी तेल, मेणबत्यांना आकार देण्यासाठी साचे इत्यादी. यासाठी सुरुवातीला केवळ दहा हजार ते वीस हजार गुंतवून हा व्यवसाय चालू करता येतो.

त्याचप्रमाणे उदबत्यांचा व्यवसाय देखील करता येईल. भारतामध्ये जवळ जवळ प्रत्येक घरातच उदबत्तीचा वापर केला जातो. त्यामुळे त्यांना वर्षभर भरपूर मागणी असते.

त्यांना लागणारे सामानही फार नाही. लाकडाचा भुसा, कोळसा, बांबूच्या काड्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी तेल, इतक्याच गोष्टी लागतात. केवळ काही हजारांमध्ये उदबत्त्यांचा व्यवसाय चालू करता येईल.

२. घरगुती लोणची, पापड :

 

 

भारतीय जेवणात लोणचे आणि पापड हे अविभाज्य पदार्थ आहेत. अगदी आजारी माणसाला देखील तोंडाला चव यावी म्हणून थोडंसं लोणच किंवा पापड दिला जातो. हॉटेलमधून देखील हे पदार्थ आवश्यक असतात.

वेगवेगळ्या पदार्थांची लोणची आणि पापडही करता येतात. त्यामुळे या पदार्थांची मागणी देखील प्रचंड असते. म्हणूनच ज्यांना लोणचे आणि पापड करता येत असतील त्यांनी याचा व्यवसाय करण्याचा विचार करायला हरकत नाही.

३.बटन्स आणि लेस :

कापड उद्योगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बटन्स आणि लेस यांची मागणी सतत आणि नेहमीची असते. या बटन्समध्ये देखील अनेक प्रकार आहेत. प्लास्टिकची, कापडाची, स्टीलची असे अनेक बटन्स बनवता येतात. यासाठी केवळ ही तीस ते पस्तीस हजार रुपये इतकी गुंतवणूक करून व्यवसाय करता येईल.

४. लेसचा व्यवसाय :

त्याचप्रमाणे कापड उद्योगांमध्ये लेस बनवून देणे हा एक व्यवसाय होऊ शकतो. कारण त्याचीदेखील मागणी प्रचंड असते.

वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशन ट्रेंड्स मध्ये निरनिराळ्या लेसेस वापरल्या जातात. या लेसेस तुम्हाला हाताने बनवता येतात किंवा कॉम्प्युटराइज्ड मशीनने. यासाठी इन्वेस्टमेंटदेखील फक्त पंचवीस हजार रुपये ते पन्नास हजार रुपये इतकी आहे.

बुटांसाठी लागणाऱ्या लेसेस ही बनवता येतात. कारण जगात चीननंतर भारतात सगळ्यात जास्त बूट बनतात. त्यामुळे त्याच्या लेसेस बनवण्याचा व्यवसायही करता येईल.

५. होममेड चॉकलेट आणि आईस्क्रीम कोन :

 

 

चॉकलेट खाणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक वरती आहे. तीच गोष्ट आईस्क्रीमलाही लागू आहे आणि सध्या बाजारातील खाद्यपदार्थ घेण्यापेक्षा घरगुती पदार्थांना महत्त्व आहे. म्हणूनच चॉकलेट बनवणे आणि आईस्क्रीमचा कोन बनवणे हा एक व्यवसाय होऊ शकतो.

यासाठी लागणारे भांडवल थोडेसे जास्त आहे. साधारण ५० हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत भांडवल या गोष्टींसाठी लागू शकते.

६. प्लास्टिक वस्तूंना पर्यायी गोष्टींचा व्यवसाय :

 

 

सध्या प्लास्टिकमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. आपले नैसर्गिक स्त्रोत त्यामुळे प्रदूषित होत आहेत. म्हणूनच प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी आता वेगवेगळ्या कल्पना अस्तित्वात येत आहेत. ज्यामध्ये जूट बॅग, पेपर बॅग यांचा समावेश आहे. यांचाही एक व्यवसाय म्हणून विचार करता येऊ शकतो.

अगदी सण-समारंभ पार्टीमध्ये वापरल्या जाणाऱ्या युज अँड थ्रो डिशेश देखील आता इको फ्रेंडली बनत आहेत. तर अशा इको-फ्रेंडली डिशेस आणि जूट बॅग, पेपर बॅग बनवणे यांचा व्यवसाय करता येईल. यासाठी लागणारी इन्वेस्टमेंट ही पन्नास हजार रुपयांपासून करता येईल.

७. सौंदर्यवर्धक आणि आरोग्यवर्धक प्रोडक्ट :

 

 

हल्ली नैसर्गिक गोष्टी वापरण्याकडे लोकांचा कल झाला आहे. केमिकलयुक्त गोष्टींमुळे शरीराला आणि त्वचेला हानी पोहोचते म्हणूनच केमिकलयुक्त साबण वापरणे आता लोकांना नको वाटते. घरगुती तत्वावर होममेड साबण बनवण्याचा व्यवसायही करता येऊ शकतो.

साबण ही गोष्ट अशी आहे की ती वारंवार लोकांना लागते म्हणून, त्याला सतत बाजारात नेहमीच मागणी असेल.आणि त्याला विशेष काही सामग्री लागत नाही. ग्लिसरीन, काही वनस्पती, तेल, साबण बनवण्याचे साचे यांचीच गरज असते. सुरुवातीला घरगुती तत्त्वावर हा व्यवसाय करता येऊ शकतो. नंतर लोकांच्या प्रतिसादावर त्याचे प्रमाण वाढवता येते.

हीच गोष्ट खोबऱ्याच्या तेलाबाबतीतही लागू आहे. खोबर्‍याचे तेल खाण्यासाठी आणि केसांसाठी, मालिशसाठी वापरले जाते, पण ते शुद्ध मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात खूप नारळाची झाडे आहेत ते खोबऱ्याचे तेल तयार करण्याचा व्यवसायाचा विचार करू शकतात.

८. कचऱ्याचा पुनर्वापर :

कचरा विकून देखील भरपूर श्रीमंत होता येतं हे अलीकडेच एका मुलीने दाखवून दिले आहे. मोठमोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांच्या मध्ये बराच कचरा तयार होत असतो. कंपन्यांना तो नकोच असतो. कोणी पैसे देऊन घेऊन जात असेल तर कंपन्या तो कचरा द्यायला लगेच तयार होतात. त्यामुळे ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना यामध्ये संधी मिळेल.

उदाहरणच द्यायचं म्हणजे एखाद्या कंपनीतून जर लोखंडाचा कचरा होत असेल तर तो तुम्ही केवळ १०-१२ रुपये किलो याप्रमाणे विकत घेऊ शकता. आणि ज्या कंपनीला लोखंडाची आवश्यकता आहे त्या कंपनीला २५ रुपयाला तो कचरा विकू शकता.

बाजारात त्याचा भाव पस्तीस रुपये किलो असू शकेल. त्यामुळे ती कंपनी बाजारातून कचरा घेण्यापेक्षा तुमच्याकडून कचरा घेईल. हे करण्यासाठी मात्र थोडा बाजाराचा रिसर्च करावा लागेल. कुठल्या क्षेत्रात संधी आहे ती शोधावी लागेल. यासाठी तीन लाख रुपयांपर्यंतची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल.

९. भेटवस्तू देण्याचा व्यवसाय :

 

 

कुठल्याही सण-समारंभाला, वाढदिवसाला आपल्याकडे काहीतरी भेटवस्तू देण्याचा प्रघात आहे, परंतु कधीकधी वेळेअभावी लोकांना भेटवस्तू विकत घेणे जमत नाही किंवा परगावी असल्यामुळे देखील भेटवस्तू देणे शक्य होत नाही.

आपल्याकडे भेटवस्तू देण्यासाठी काही आयडीया असतील आणि वस्तू असतील, तर भेटवस्तू देण्याचा व्यवसाय करता येऊ शकतो. शिवाय याची सुरुवात २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून करता येऊ शकतो.

 

१०. हॉटेलसाठी हाऊसकिपिंग सर्व्हिस :

 

waiter tip inmarathi1

 

फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, भारतात १५ दशलक्ष हॉटेल रूम आहेत. त्यामुळे हॉटेल्सना रूम्स स्वच्छ- आकर्षक ठेवणे गरजेचे असते.

प्रत्येक हॉटेल मालकाला हे करणे जमेलच असे नाही. त्यामुळे असे हॉटेल स्वच्छ करून देण्याचा व्यवसाय करता येऊ शकतो. यासाठी फक्त लोकांशी संवाद साधण्याची कला अवगत असावी लागते आणि यासाठी लागणारी माणसे देखील सांभाळून ठेवावी लागतात. सर्वसाधारण तीन लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून हा व्यवसाय करता येऊ शकतो.

याशिवाय सध्या असलेल्या कोरोनाच्या संकटात आवश्यक असणाऱ्या मास्क, सॅनिटायझर, हँडवॉश, पी पी इ किट, फेस शील्ड, हॅन्ड ग्लोज इत्यादी गोष्टींची विक्री करण्याचा ही व्यवसाय करता येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?