' सुट्टी एन्जॉय करण्यासाठी, गर्दीच्या ठिकाणांपेक्षा कोकणातील ६ अज्ञात समुद्रकिनारे!

सुट्टी एन्जॉय करण्यासाठी, गर्दीच्या ठिकाणांपेक्षा कोकणातील ६ अज्ञात समुद्रकिनारे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“हा सागरी किनारा ओला सुगंध वारा…” हे गीत आपल्या सगळ्यांनीच ऐकलं असेलच? समुद्र म्हटलं, की शहराच्या गजबजाटापासून मिळणारी शांतता, वाऱ्यात असलेला मंद असा खारट सुगंध, आकाशात मुक्तपणे विहार करणारे पक्षी, दगडावर जोरात आदळणाऱ्या लाटांचा खळ खळ आवाज आणि रात्रीच्या वेळी पाण्यावर पडणारं चंद्राचं चांदणं हे विचारच मनाला भुरळ घालतात.

त्या अथांग समुद्राला बघितलं, की मनाला अगदी शांती मिळते, पण समुद्र म्हणजे गोवा हेच समिकरण आपण ऐकत आलोय. हल्ली अंदमान, केरळ, आणि कोकणातील काही मोजके समुद्र किनारे सोडले तर पर्यटनासाठीच्या इतर जागा आपल्या ध्यानात येतच नाहीत.

 

Kashid Beach

 

कसा हा, आपलो कोकण म्हणजे काय फक्त २-३ समुद्र किनारे नसता काय. थयसर नारळी ,पोफळी, काजू, आंबे, फणसाच्या बागा, गोड फणसाचे गरे, डोळ्यांक दिपवणारे समुद्रकिनारे अशा भरपूर सुंदर गोष्टी आपल्याक बघूक मिळता.

कोकणातल्या एखाद्या गावात नुसताच फेर फटका मारायला गेलो, तरी आपलं मन प्रसन्न आणि अगदी ताजं तरतरीत होऊन जाईल. कोकण, कोकणातील प्रेमळ माणसं हे आपल्याला एक गोष्ट नेहमी सांगतात की “पुन्ह्यांदा येवा, कोकण आपलाच असा” त्यामुळे जेंका कोकण बघूचा हा त्यांनी हयसर दिलेली ठिकाणं नक्की बघूक होया.

१) वेळास गाव –

 

velas beach inmarathi

 

रत्नागिरी जिल्ह्यात असलेलं हे गाव तिथल्या अत्यंत दुर्मिळ अशा “Olive Ridley” कासवांसाठी प्रसिद्ध आहे. हे कासव परदेशी असून, अंडी घालण्यासाठी या समुद्रकिनाऱ्यावर येतात.

तिथल्या गावकऱ्यांच्या साहाय्याने, त्या अंड्यांचा सौरक्षणासाठी व संगोपनासाठी “सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ” स्थपित करण्यात आले आहे. दरवर्षी मार्च महिन्यात तिथे या मंडळाच्या वतीने कासव महोत्सवाचे आयोजन केले जाते. सह्याद्री निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने तिथे परवडणाऱ्या दरात राहण्याच्या व इतर सोयीचा लाभ आपल्याला घेता येतो.

या गावाला ऐतिहासिक वारसा सुद्धा लाभलेला आहे. हे गाव पेशवाईत सचिव असलेल्या “नाना फडणीसांचे” जन्मस्थान आहे. या गावाच्या आजूबाजूला पर्यटनासाठी महालक्ष्मी मंदिर, बाणकोट किल्ला आणि श्री भैरी रामेश्वरांचे पुरातन मंदिरही आहे.

२) आंजर्ले गाव-

 

हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. तिथला समुद्र किनारा व कड्यावरचा गणपती हि दोन ठिकाणं अगदी प्रेक्षणीय आहेत.

याच बरोबर पर्यटक तिथे जोग नदी, सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग हि ठिकाणं बघण्यासाठी येतात. रिसॉर्टस, बांबूची घरं, ट्री हाऊस, अशा सगळ्या सोयींमुळे आंजर्ले हे आपल्या पर्यटन यादीत वर नक्कीच असायला हवे.

 

३) वेळणेश्वर –

 

 

१७०० वर्ष जूनं असलेलं शंकराचं मंदिर असल्याने या गावाचं नाव वेळणेश्वर पडलंय. या गावाला सुद्धा समुद्रकिनाऱ्याचं वरदान लाभलंय. या समुद्र किनाऱ्याचं वौशिष्ट्य असं, की त्यात कोणतेही दगड नाही. ज्यामुळे पोहणाऱ्याला, कसलाही अडथळा न होता पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटला येतो.

याचबरोबर गावा जवळ अंजनगड किल्ला, ज्याला गोपाळगड म्हणून सुद्धा ओळखतात, थाटात उभा आहे. गावकऱ्यांसाठी व पर्यटकांसाठी हा किल्ला विशेष आकर्षण ठरवतो.

या गावाला महाशिवरात्रीच्या वेळेस भेट देणे उत्तम ठरते. कारण वेलणेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्री निमित्त मोठा उत्सव असतो, जत्रा भरते. त्यामुळे शिवभक्त असाल तर किल्ला व मंदिर दोन्ही ठिकाणी नक्की भेट द्या.

 

४) कोंडूरा समुद्र किनारा –

 

 

अतिशय सुंदर आणि दोन पर्वतांच्या मधोमध स्थित कोंडूऱ्याचा किनारा तुम्हाला प्रेमात पाडल्या शिवाय राहणार नाही. शांत आणि स्वच्छ असलेल्या ह्या समुद्र किनाऱ्याचे वौशिष्ट्य असे की दोन पर्वतांमध्ये असल्यामुळे तो त्रिकोणी आहे.

पांढरी चमकदार वाळू, विविध अकाराचे शंख-शिंपले आणि तेथील गोल, गुळगुळीत खडे आणि दगड सगळं अगदी इंग्लिश सिनेमांसारखं रोमांचक आणि जादुई वाटतं.

याशिवाय आणखीन एक आकर्षक गोष्ट म्हणजे इथे भरपूर प्रवासी पक्षी बघायला मिळतात. फार वर्दळ नसून, वातावरण अगदी शांत असल्यामुळे निसर्गाच्या कुशीत शिरल्याचा अनुभव होतो. सोलो ट्रिप, आणि अध्यात्मिक मेडिटेशन आणि पक्षी निरीक्षण कारण्यासाठी कोंडूरा एक उत्तम ठिकाण आहे.

५) कोर्लई समुद्र किनारा –

 

 

 

पोर्तुगीजांनी राज्य केलेल्या भागा पैकी एक कोर्लई. अलिबागपासून २० किलोमीटर अंतरावर स्थित या गावात आपल्याला पोर्तुगीज संस्कृतीची छाप बघायला मिळते. ७००-८०० रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन लोकांची वस्ती असलेलं हे गाव त्याच्या कोर्लई किल्ला व लाईट हाऊस साठी ओळखले जाते.

हा किल्ला एका बेटावर स्थित असून, पोर्तुगीजांनी ३०० वर्षांपूर्वी याची रचना केली होती. म्हणून तो एक आकर्षक पर्यटन स्थळ बानू शकतो असे म्हणण्यास हरकत नाही.

इथला समुद्र किनारा जरा लहान असून, तिथे फक्त काही मोजके मासेमार आपलं काम करीत असतात. कमी पैशात एक शांत आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे गाव बघायला मिळू शकतं.

६) केळशी –

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली एकमेव याकूब बाबा दरगाह, सिद्धिविनायक मंदिर आणि पेशवे कालीन महालक्ष्मी मंदिर ही केळशीची मुख्य आकर्षक ठिकाणं आहेत.

आंबे, सुपारी, नारळ या झाडांनी नटलेला समुद्र किनारा केळशीच्या सौंदर्यात आणखीन भर घालतो. हे गाव दापोली पासून ३४ किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे.

गावात राहण्यासाठी हॉटेल, लॉज अशी सोय नाही त्यामुळे दापोलीत आपल्याला मुक्कामास थांबावे लागते. त्सुनामीमुळे निर्माण झालेले मोठाले मातीचे ढीग आपल्याला अचंबित केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे निसर्गप्रेमींनी केळशीला एकदा भेट नक्की द्यायला हवी.

किती ही ठिकाणं सांगितली तरी कोकण काही संपत नाही. वरील ठिकाणांव्यतिरिक्त हेदवी, तोंदवळी – तळाशिल, कर्दे पुरातन कुणकेश्वर शंकर मंदिर, निवती, खावणे समुद्र किनारा, मिठबाव येथील गजबादेवी मंदिर, रेडी समुद्र किनारा आणि तेथील यशवंतगड, भगवान परशुरामांचं मंदिर असलेला आडे समुद्र किनारा अशी कित्येक ठिकाणं कोकणाला “आपलं लाडाचं कोकण बनवतात”.

कोकणातील समुद्र किनारे हे अगदी स्वच्छ आहेत, त्यामुळे आपल्या मौजेखातर तिथल्या नैसर्गिक संपदेला कोणतीही हानी होणार नाही, याची काळजी घेऊन कोकणाचा मनमुराद आनंद लुटायला कोकण ट्रिप नक्की काढा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?