'युद्ध संपलं...पण तो २९ वर्षे छुपं युद्ध लढत राहिला!

युद्ध संपलं…पण तो २९ वर्षे छुपं युद्ध लढत राहिला!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जगात अनेक विचित्र व आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात पण आपल्याला त्याबद्दल माहिती होत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा जपानी सैनिकाबद्दल जो दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्ती नंतर तब्बल २९ वर्ष देशासाठी लढत राहिला कारण त्याला माहीतच नव्हते की जपान ने शरणागती पत्करली आहे आणि युद्ध संपले आहे.

Hiroo Onoda हा एक जपानी नागरिक एका चायनीज ट्रेडिंग कंपनी मध्ये कामाला होता. तो २० वर्षाचा असताना त्याला जपानी आर्मी मध्ये भरती होण्यासाठी बोलावणे आले. त्याने लगेच नोकरी सोडून आर्मीत ट्रेनिंग सुरु केले. त्याला Imperial Army Intelligence Officer म्हणून Nakano school येथे ट्रेनिंग साठी पाठवले. तेथे तो गनिमी कावा, गुप्त माहिती गोळा करणे हे सगळे शिकला. शत्रू राज्यात जाऊन माहिती काढणे आणि शत्रू सैन्याचा पाडाव करण्याचे संपूर्ण ट्रेनिंग त्याने घेतले.

hiroo-onoda-marathipizza
www.pinterest.com

२६ डिसेंबर १९४४ रोजी Onoda ला Lubang island , Philippines येथे पाठवले. त्याचे वरिष्ठ अधिकारी मेजर Yoshimi Taniguchi त्याला ऑर्डर दिल्या होत्या की,

तुला स्वतःचा जीव सहजासहजी देण्याची परवानगी नाही. कितीही वेळ लागला तरी आपले काम न कंटाळता करत राहा. जबाबदारी पासून पळ काढू नको. कितीही दिवस लागले तरी आम्ही तुझ्या पर्यंत पोचेपर्यंत तुला लढत राहायचे आहे. जबाबदारी पार पाडत राहणे हेच तुझे कर्तव्य आहे. जगण्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी तुला मरण्याची परवानगी नाही.

आपल्या वरिष्ठ अधिकार्याच्या ऑर्डर घेऊन Onoda ने त्याच्या आधीच तिकडे गेलेल्या जपानी सैनिकांच्या तुकडी सोबत काम करणे सुरू केले. शत्रूच्या सैनिकांनी हल्ला केल्यावर Onoda ने इतर सैनिकांना मदत मागितली पण त्यांनी त्याला मदत करण्यास नकार दिला. ह्या जपानी सैनिकांवर शत्रू सैन्याचे हार्बर आणि एयरफील्ड नष्ट करण्याची जबाबदारी होती. परंतु जपानी सैनिक ही जबाबदारी पार पाडू शकले नाहीत. २८ फेब्रुवारी १९४५ रोजी शत्रू सैन्याने बेटावर हल्ला करून ताबा मिळवला.

जपानी सैनिकांनी ३-४ च्या तुकड्यात विभागून जंगलात आसरा घेतला. त्यांचे बरेच सैनिक ह्या युद्धात ठार झाले. Onodaच्या तुकडी मध्ये त्याच्याबरोबर Yuichi Akatsu, Siochi Shimada आणि Kinshichi  हे सैनिक होते.  जंगलात राहून आणि गनिमी कावा वापरून त्यांनी शत्रू सैन्याला हैराण करणे सुरू ठेवले.  त्यांच्याकडे पुरेशी अन्नाची रसद नव्हती म्हणून ते जंगलातील नारळ, केळी व इतर फळे खाऊन दिवस काढत होते. शिवाय आसपासच्या शेतांमध्ये धाड टाकून धान्य मिळवत होते.

hiroo-onoda-marathipizza01
http://edition.cnn.com

ऑक्टोबर १९४५ला ते अन्नाच्या शोधात असताना त्यांना स्थानिकांकडून एक पत्रक मिळाले ज्यात संदेश होता की

युद्ध संपले, परत या.

परंतू ह्या सैनिकांना वाटले की आपल्याला पकडण्यासाठी हा शत्रूचा कावा आहे. म्हणून त्यांनी त्या संदेशावर विश्वास ठेवला नाही. त्यांचा पूर्ण विश्वास होता की जपान युद्धामध्ये हरुच शकत नाहीे किंवा शरणागती पत्करणे अशक्य आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल – पण त्या सैनिकांना हिरोशिमा व नागासाकी वर झालेल्या अणू हल्ल्याविषयी काहीही कल्पना नव्हती. शिवाय काहीच दिवसांपूर्वी त्यांच्यापैकी एका तुकडीला बडतर्फ करण्यात आले होते त्यामुळे युद्ध संपले आहे अशी पुसटशी शंकाही त्यांना आली नाही.

वर्षाच्या शेवटी स्थानिकांनी ह्या सैनिकांच्या त्रासाला कंटाळून बोइंग बी 17 मधून जंगलात पत्रके टाकली. ह्या पत्रकात जपानी जनरल Yamashita ह्यांनी सैनिकांना सरेंडर करण्याची आज्ञा केली. जनरलची आज्ञा सुद्धा त्यांना खरी वाटली नाही. त्याचाही त्यांना संशय आला आणि युद्ध संपले, जपान हरले ह्यावर त्यांचा विश्वास बसला नाही. जपान युद्ध जिंकले असते तर सैन्याची माणसे आपल्याला परत न्यायला आली असती असा त्यांचा ग्रह होता. जपान हरू शकत नाही आणि ज्या अर्थी आपले वरिष्ठ आपल्याला परत न्यायला आले नाहीत त्या अर्थी अजून युद्ध संपले नाही असे त्यांना वाटले. त्यांचा असा समज होता की शत्रू त्यांच्या गनिमी काव्याला कंटाळून त्यांना पकडण्यासाठी हा डाव खेळत आहे.

hiroo-onoda-marathipizza02
http://cultstories.altervista.org

जेव्हा ह्या सगळ्याचाही उपयोग झाला नाही तेव्हा आणखी पत्रके आणि जपानमधून वर्तमानपत्रे मागवून जंगलात टाकली. त्यांच्या फॅमिली कडून फोटो, पत्रे सुद्धा पाठवली. इतकेच नव्हे तर जपान मधून प्रतिनिधी पाठवून लाऊडस्पीकर वर घोषणा केल्या. परंतु ह्या प्रत्येक गोष्टीस शत्रूचे कारस्थान समजून Onoda आणि त्याच्या साथीदारांनी आपला हेका व जबाबदारी सोडली नाही. अशीच काही वर्षे निघून गेली. जेव्हा प्रत्येक स्थानकाला त्यांनी साध्या कपड्यांमध्ये रोजचे व्यवहार सुरळीत पणे करताना पाहिले, तेव्हाही त्यांचा विश्वास बसला नाही. त्यांनी त्या स्थानिकांना शत्रूचे सैनिक समजून त्यांच्यावर गोळीबार केला.  इतकेच नाही तर त्यांच्या स्वतःच्या सैन्यातील लोकांवर सुद्धा विश्वास राहिला नाही.  जे सैन्यातील लोक त्यांना शोधण्यासाठी येत होते , त्यांच्यापासून सुद्धा ही माणसे पळ काढत असत.

अशीच ५ वर्षे जंगलात घालवल्यावर Akatsu ने शरण जाण्याचे ठरवले. पण त्याने हे बाकीच्यांना सांगीतले नाही व तो एकटाच निघून गेला. त्याने शरणागती पत्करली हे बघून Onoda व त्याचे साथीदार आणखी सावध राहू लागले. Akatsu शत्रूच्या हाती लागला तर आपणही पकडल्या जाऊ असे त्यांना वाटले. जंगलात आणखी ५ वर्षे काढल्यावर  Shimada ठार मारला गेला. आणि Onoda व kozuka हे दोघेच उरले.  पुढे १७ वर्ष दोघेच जंगलात राहून आपली जबाबदारी पार पाडत होते.  अजूनही त्यांना वाटत होते की जपानी सैन्य आले तर ते त्या बेटांवर ताबा मिळवू शकतील. कारण त्यांना ऑर्डरच होती की पुढील ऑर्डर मिलेपर्यंत त्यांनी तिथेच थांबून आपले काम करत राहावे.

ऑक्टोबर १९७२ ला म्हणजेच तब्बल २७ वर्षानी Kozuka फिलिपिनो पोलिसांकडून ठार झाला. जपानी सैन्याला एव्हाना खात्री झाली होती की Onoda व त्याचे साथीदार इतकी वर्ष जंगलात राहणे कठीण असल्याने  ठार झाले असतील. पण जेव्हा त्यांना Kozuka ची बॉडी मिळाली तेव्हा त्यांना वाटले की कदाचित Onoda सुद्धा जिवंत असेल. जपानी सैन्याने त्याला शोधण्यासाठी जंगलात लोक पाठवले. पण एव्हाना त्याला जंगलात लपून बसण्याची चांगलीच प्रॅक्टिस झाली असल्याने तो त्यांनाही सापडला नाही. त्याने आपले मिशन सुरुच ठेवले.

hiroo-onoda-marathipizza03
www.youtube.com

शेवटी १९७४ मध्ये Mario Suzuki ह्या एका कॉलेजच्या विद्यार्थ्याने जेव्हा जगाच्या सफरीवर जायचे ठरवले तेव्हा त्याने Onoda, पांडा आणि स्नोमॅन ह्या तिघांना शोधण्याचे ठरवले. त्याने त्या बेटावरील जंगलात onoda ला शोधण्यास सुरुवात केली आणि आश्चर्यकारकरित्या, ज्याला शोधण्याचा हजारो लोकांनी असफल प्रयत्न केला त्याला ह्या विद्यार्थ्याने शोधून काढले.  Suzuki ने त्याला सत्य सांगून समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण onoda ने त्याचे काहीही ऐकले नाही. शेवटी Suzuki ने जपान ला परत जाऊन ही बातमी सांगितली. Major Taniguchi तेव्हा सैन्यातून रिटायर झाले होते. त्यांनी त्या बेटावर जाऊन onoda ला सत्य सांगितले की ३० वर्षांपूर्वीच युद्ध संपले व जपान ने शरणागती पत्करली.  म्हणून आता onoda ने फिलिपाईन्स ला शरण जावे.

हे कळल्यानंतर onoda ला प्रचंड धक्का बसला. वयाची २९ वर्षे जंगलात फक्त वाट बघून त्याने वाया घालवली आहेत ह्या विचाराने त्याचे डोके सुन्न झाले. पण हळू हळू तो ह्या सगळ्यातून बाहेर पडला आणि शेवटी १०मार्च १९७५ ला वयाच्या ५२व्या वर्षी onoda कसा बसा इतकी वर्षे सांभाळून ठेवलेला आर्मी चा युनिफॉर्म घालून जंगलाबाहेर पडला आणि फिलिपाईन्स चे राष्ट्रपती Ferdinand Marcos ह्यांच्यापुढे शरणागती पत्करली. राष्ट्रपती मार्कोस जपानमध्ये प्रसिद्ध होते. त्यांनी Onoda ला त्याच्या गुन्ह्यांची माफी देऊन जपानला परत पाठवले.

hiroo-onoda-marathipizza04
www.nytimes.com

आपल्याला वाटेल Onoda हा हेकेखोर माणूस आहे. पण आपण हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेम, देशासाठी वाटेल ते करण्याची जिद्द आणि हार न मानण्याची वृत्ती होती. म्हणूनच तो प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा देशासाठी कर्तव्य बजावत राहिला.

सच्चा सैनिक कायमच देशासाठी आपलं आयुष्य वेचायला तयार असतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?