' पदर खोचून घेतली गगनभरारी, वाचा विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय स्त्रीची गाथा! – InMarathi

पदर खोचून घेतली गगनभरारी, वाचा विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय स्त्रीची गाथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

स्त्रीनं करिअर करणं ही आजही तिच्यासाठी अडथळ्यांची शर्यत आहे.‌ लग्नाआधी शिक्षण, नोकरी करणं हे कितीतरी सोपं असतं…पण लग्नानंतर शिक्षण पूर्ण करणं हे थोडं कठीण असतं. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, घरकामं, त्यात मध्येच गरोदरपण, बाळंतपण आलं तर विचारुच नका.

नोकरी करणं तेही तसंच. बाळ लहान असताना त्याची जागरणं, आजारपणं हे सगळं असतंच शिवाय एकत्र कुटुंब असेल तर ते ताणतणाव असतात, घरकामं, पाहुणे रावळे, सणवार, कधी कामवाली बाई आली नाही तर ते आवरणं, स्वयंपाक, धुणी भांडी, फरशा पुसणं हे सारं सांभाळत नोकरी करणं म्हणजे तारेवरची कसरत असते.

 

vidya balan inmarathi

 

काही स्त्रीया अशा असतात की ही सारी आव्हानं पेलून जगावेगळं करिअर करतात.. आता तर बहुतेक सर्व क्षेत्रात स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. असं एकही क्षेत्र नाही जिथं महिलांचा सहभाग नाही. नाईट शिफ्ट, पेट्रोकेमिकल इंजिनिअर, वैमानिक ही पुरुषांची मक्तेदारी असलेली क्षेत्रं, पण तिथंही महिला शब्दशः भरारी घेतात. अशाच एका वेगळ्या वाटेवरची गगनभरारी घेणाऱ्या एका महिलेची यशोगाथा! 

एक आता आपण पाहतो, नौसेनेत हेलिकॉप्टरच्या आघाडीत पण पहिल्या फळीत महिलांना मानाचं स्थान प्राप्त झाले आहे. हा प्रवास इतका सहज सोपा होता का? नाही..

सुरुवातीला तर मुलींना शिक्षणही वर्ज्य मानलं जायचं, पण त्यातूनही जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्या काळच्या कर्मठ वातावरणात स्त्री शिक्षणाची गंगोत्री खरोखर‌ भगीरथ प्रयत्न करुन आणली. मुली शिकू लागल्या. विधवा विवाहाचा पण महर्षी कर्वे यांनी पुरस्कार केला. हे सगळं स्त्रीयांसाठी भयंकर मोठं स्थित्यंतर होतं.

सातवीपर्यंत असलेलं मुलींचं शिक्षण हळूहळू दहावी- बारावी करत पदवीपर्यंत पोहोचलं. पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या मुलींची संख्या पण वाढू लागली, पण हे करत असताना मुलींना फक्त सहावारी साडीची मुभा मिळाली. बाकीची बंधनं तशीच होती.

नोकरी करतानाही शाळा मास्तरीण ही सोयीची आणि सुरक्षित नोकरी समजली जायची. कारण सणावाराला असणाऱ्या सुट्ट्या, मे महिना, दिवाळी सुट्टी हे हक्काचे सुट्टीचे दिवस असतं. म्हणजे एकंदरीत घराकडं जराही दुर्लक्ष न होता पैसा देत असलेली नोकरी म्हणजे शाळा शिक्षिका.

 

 

 

नंतर हळूच पोस्ट आॅफीस, बँक इथवर स्त्रीया दिसू लागल्या होत्या. अगदी त्यांची वेशभूषा पण ठरलेली.. काॅटन किंवा वायलच्या साध्या साड्या, दोन वेण्या. हातात बांगड्या हव्यातच. त्या बांगड्यांच्या गर्दीत घड्याळाची टिकटिक.

पण अशाही परिस्थितीत एक बाई होती…जिला वेड होतं गगनभरारीचं. जिला महत्त्वाकांक्षा होती उंच उडायची. वयाच्या केवळ २१ व्या वर्षी तिनं आपल्या महत्त्वाकांक्षेला पंख लावले आणि आकाशात उंच झेप घेतली. या सर्व सामान्य स्त्रियांपेक्षा वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचली. जगभरात तिची असामान्य कामगिरी अधोरेखित झाली.

ही वेगळ्या वाटेवरची वेगळी कथा आहे सरीता ठकराल यांची! भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्याही आधीची ही गोष्ट. १९१४ साली दिल्लीत जन्मलेल्या सरीता ठकराल यांची स्वप्नं लहानपणापासून असामान्य होती. आकाशभरारीचं वेड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं.

१९२९ साली दिल्लीमध्ये ब्रिटिश सरकारने चालू केलेल्या फ्लाईंग क्लबमध्ये त्यांनी विमान उड्डाण करायचं प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. गंमत नाही विमान उडवणं. टोराटोरा किंवा जायंट व्हीलमध्ये म्हणजे आकाशपाळण्यात बसल्यावर पोटात कसा गोळा येतो…मग विमान उडवताना काय होत असेल बरं? पण त्यांनी हिंमतीने प्रवेश घेतला…आणि नुसताच घेतला नाही तर एक हजार तास विमान उडवलं पण!

 

 

तिथंच त्यांची भेट पी.डी.शर्मा यांच्याशी झाली. दोघेही विवाहबद्ध झाले. लग्नानंतर बहुतेक स्त्रियांचं करिअर संपतं किंवा काही काळासाठी थांबतं. कारण संसाराची जबाबदारी पेलताना प्राधान्यक्रम अर्थातच घराला दिला जातो, पण जर कुटुंबातील लोकांची साथ असेल तर हे आव्हानही सुकर होतं. नेमकं हेच सरीताच्या बाबतीत झालं.

तिच्या पतीला तिनं कमर्शिअल पायलट व्हायला हवं असं वाटत होतं. त्यांच्या प्रोत्साहनामुळे सरीताने जोधपूर फ्लाईंग क्लबमध्ये प्रवेश घेतला. तिथं रीतसर प्रशिक्षण घेऊन‌ सरीता आपलं पहीलं व्यावसायिक उड्डाण करण्यासाठी लाहोर येथे गेल्या. तेव्हा लाहोर भारतात होतं. फाळणी होऊन अजून देशाचे भारत पाकिस्तान असे तुकडे झाले नव्हते.

सरीता वगळता सर्वांचं मन साशंक होतं. एकतर बाईची जात..दुसरं म्हणजे पायलट म्हणून पहीलंच विमानोड्डाण करणार.. ट्रेनिंग दिलं तरी काय झालं! ‌पण सरीतानं आत्मविश्वासाने साडीचा पदर खोचला.. केसांचा अंबाडा बांधला डोळ्यांवर चष्मा घातला आणि आत्मविश्वासाने विमानात प्रवेश केला.

 

 

एक कणभर भीतीचा लवलेश नव्हता त्यांच्या हालचालीत. विमानाने झेप घेतली आणि हा इतिहास रचला.. एका भारतीय स्त्रीनं विमान उडवलं.. आजही ही गोष्ट ऐकताना किती अभिमान वाटतो.

बाईच्या पाठीशी कुणी घरचा माणूस पहाडासारखा उभा असेल तर जग जिंकणंही अशक्य नाही हे यावरुन समजतं. आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे.. हेच खरं नाही का?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?