' तंदुरुस्त असूनही जुन्या काळी लोक “काठी” का वापरायचे? वाचा, ऐतिहासिक संदर्भ… – InMarathi

तंदुरुस्त असूनही जुन्या काळी लोक “काठी” का वापरायचे? वाचा, ऐतिहासिक संदर्भ…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

साधारण ५-७ वर्षांपूर्वी “उंच माझा झोका” ही मालिका फार लोकप्रिय झाली होती. ती इतकी लोकप्रिय होण्यामागची काही कारणं अशी, की त्यांनी तो काळ फार सुंदर रंगवला होता. त्यातील नेपथ्य आणि संवादांनी तर लोकांच्या मनात घर केलंच होतं, पण त्यातील पात्रांचे पोशाख सुद्धा सगळ्यांना अगदी मनापासून आवडले होते.

तुम्ही त्या मालिकेत दाखवल्याप्रमाणे किंवा इतरही जुन्या काळातील कथांवर आधारित सिनेमे बघितले असतील, तर त्यांच्या राहणीमानात अदबेला आणि रुबाबला विशेष स्थान होते हे तुमच्या ध्यानात आलेच असेल. मान देऊन संबोधित करण्यापासून ते त्यांच्या देहबोलीपर्यंत, सगळंच अगदी रॉयल वाटायचं.

 

 

पुरुषांचा पेहराव एकंदर काळा कोट, डोक्यावर पगडी, पांढरं शुभ्र धोतर आणि हातात काठी असा असायचा. त्यामुळे इंग्रजी राहणीमानाचा थोडाफार प्रभाव आपल्यावर सुद्धा झाला होता असं म्हणायला हरकत नाही.

जुनी जीवनशैली आणि वागणूक ही इंग्रजी आणि भारतीय शिष्टाचारांचा समतोल असलेली होती हे आपल्याला ह्या मालिका आणि सिनेमे बघितल्यावर नक्की जाणवतं. बरं कोट, टोपी, पगडी ह्या गोष्टी परिधान करण्यामागील कारण आपण समजू शकतो, पण काठी?

आजवर वृद्धापकाळात किंवा अपंगत्वात आधारासाठी म्हणून काठीचा वापर आपण बघितला होता. पण त्याकाळातील तरणीताठी पुरुष मंडळी सुद्धा हातात काठी घेऊन वावरायची. असे का? हा विचार आपल्या सगळ्यांच्याच मनात आलाच असेल नाही?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

फक्त पुरुषच ही काठी वापरायचे, स्त्रियांकरिता असा विशेष कुठलाच नियम नव्हता. तर ही पुरुष मंडळी हातात काठी घेऊन का वावरायची, या मागील महत्वाची असलेली करणं आपण जाणून घेऊया.

१६-१७ व्या शतकांत जेव्हा विविध देश प्रदेशात राजा महाराजांची सत्ता होती, त्याकाळातील सरकारी पदाधिकारी आपल्या पदाप्रमाणे हातात तलवारी, खंजीर किंवा लहान काठी बाळगत (जशी आज काल आपण पोलिस इन्स्पेक्टर कडे बघतो).

पुढे १७०० च्या सुरुवातीला सामान्य माणसं सुद्धा हातात काठी घेऊ लागली. कारण त्यावेळी प्रवास किंवा गावातल्या गावातच अवगमनाची साधनं उपलब्ध नव्हती. होत्या त्या थेट बग्ग्या, टांगे, घोडा गाड्या. त्यामुळे कुठेही पायदळ जाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि एकट्या माणसाला पायी प्रवास करताना चोर, दरोडेखोर, खिसे कपुंपासून स्वराक्षणाच्या हेतूने कोणते तरी हत्यार वापरणे गरजेचे झाले होते. पण स्वरक्षणासाठी वापरली जाणारी काठी कधी “स्टेटस सिम्बॉल” झाली कोणाला कळलेही नाही.

 

 

अमेरिका, इंग्लंड, मलेशिया, भारत… जिथे जिथे ब्रिटिश सत्ता होती, तिथे तिथे माणसं जवळ काठी ठेवायची. समाजातील स्थानाप्रमाणे सगळ्यांच्या काठ्या वेगळ्या होत्या.

श्रीमंत घरातील पुरुषांच्या काठ्यांना सोन्याचं किंवा चांदीचं हँडल असायचं. त्यांच्या काठ्या सागवान, टिक, मेपल, रेड वूड अशा महाग लाकडांपासून बनलेल्या असायच्या. त्यांच्या काठ्यांवर सोनं, चांदी आणि अमूल्य रत्नांची कारागिरी केलेली असायची.

सामान्य किंवा मध्यमवर्गीय माणसं हलक्या दर्जाच्या लाकडापासून तयार केलेली आणि साधी काळी काठी वापारायचे. अशी काठी आपण चार्ली चॅप्लिन किंवा इंग्लिश क्लासिक सिनेमांमध्ये बघितली असेल. आपल्याकडे, भारतात, सागवान,चंदन, बांबू यांपासून तयार केलेली अगदी साधी, रंग न दिलेली, म्हणजेच मुळ लाकडी रंगाचीच काठी वापरली जायची. मध्यम वर्गीय किंवा उच्च-मध्यम वर्गीयांपासून सगळ्या महत्वाच्या हुद्द्यांवर असलेली पुरुष मंडळी काठ्या जवळ ठेवत.

१८ व्या शतकापासून इंग्लंडमध्ये स्त्रिया सुद्धा काठी सोबत ठेऊ लागल्या. कालांतराने, काठीची जागा सुंदर, नाजूक छत्र्यांनी घेतली. छत्री आणि काठी ही त्या काळातील स्त्री पुरुष पेहरावांचा, संस्कृतीचा अविभाज्य भागच झाली होती. “जेंटलमन आणि जंटल वूमन” यांची व्याख्या काठी आणि छत्री शिवाय अपुरी समजली जायची, इतकं त्यावेळी काठीला महत्त्व होतं.

 

पुरुषांना काठी वापरण्यासाठी बकायदा लायसन्स काढून घेणं अनिवार्य असायचं. सगळ्याच सार्वजनिक ठिकाणी छत्री, काठी आणि कोट ठेवायला स्टॅन्डची सोय असायची.

काळा बरोबरच काठी सुद्धा बदलत गेली. काही काळाने, १९व्या शतकात गाड्या आल्या आणि संरक्षणाच्या साधनांची एवढी गरज उरली नाही, तेव्हा काठी ही गरज नसून फॅशन बनली होती, पण विपर्यास असा की त्याच वेळी काठीत खंजीर, कृपाण आणि पिस्तूल लपवण्यासाठी सोय केली जाऊ लागली, निव्वळ फॅशन म्हणून हा बदल घडवल्या गेला होता. नंतर त्यावर बंदी सुद्धा घातली गेली.

तसं पाहता काठी जवळ ठेवणे काही सोपे नव्हते. कारण काठी कशी वापरावी आणि कशी वापरू नये हे सांगणारे बरेच नियम होते आणि त्यांचे काटेकोर पणे पालन करणे हे सगळ्यांनाच बंधनकारक होते. नियम असे की –

 

 

१. आपल्या पेक्षा उच्च हुद्द्यावरील व्यक्ती समोर जाताना काठी खोलीच्या बाहेरच ठेवावी लागत असे.

२. काठी आत्मसन्मानाचे प्रतीक असल्याने, ओळख असल्याने, ती बाळगणाऱ्याकडून काठीचा कोणत्याही प्रकारे अपमान होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागतसे. जसे – काठी हवेत फिरवायची नाही, काठी काखेत ठेवायची नाही, काठीचा आधार घेऊन उभे राहायचे नाही, काठी दिलेल्या योग्य ठिकाणीच ठेवायची.

३. ज्याने त्याने स्वतःचीच काठी वापरायची.

इतकंच नाही तर काठी वापरण्याच्या विशिष्ट वेळा देखील ठरलेल्या होत्या. सकाळी बाहेर पडताना मोठी काठी, संध्याकाळी किंवा कोणत्या पार्टी, समारंभाला जाताना सजवलेली छोटी काठी न्यायची हा नियम होता.

भारतीयांचा साधेपणावर विश्वास असल्याने, मध्यमवर्गीय माणसं एकाच प्रकारची काठी वापरायची, पण इंग्रजांच्या थेट संपर्कात असलेली बंगाली माणसं, उद्योगपती, मोठे पदाधिकारी हे ब्रिटिश नियमांचे पालन करीत.

दुसऱ्या महायुद्धापर्यंत काठीची परंपरा कायम होती, पण दुसऱ्या विश्वयुद्धानंतर जग बदललं. त्याचबरोबर, राहणीमान, विचारसरणी यासगळ्यांवरच आधुनिकीरणाची छाप पडायला सुरुवात झाली आणि काठी प्रथा हळू हळू संपुष्टात आली.

आजकाल काठी ही अपंगत्व आणि वृद्धत्वाचे लक्षण मानली जाते. कारण आजकाल काठी घेऊन वावरायला कोणाकडे सवडही नाही आणि आवडही नाही. “पण स्वरक्षणासाठी स्त्रियांनी आणि पुरुषांनी सुद्धा पुन्हा एकदा जवळ काठी बाळगण्याची गरज आहे का?” हा प्रश्न मात्र नक्की पडतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?