' जे चुकतात, त्यांना आधार मिळाला तर ते उंच भरारी घेऊ शकतात! बघा, विचार करा… – InMarathi

जे चुकतात, त्यांना आधार मिळाला तर ते उंच भरारी घेऊ शकतात! बघा, विचार करा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“हा अगदी वाया गेेला आहे, वाया कसला हा म्हणजे निव्वळ गॉन केस, असला मुलगा पोटी जन्माला आला हे माझेच भोग”… काहीसे परिचित असलेले संवाद कधी ना कधी आपल्याही घरात ऐकु येतात. कुटुंबातील एखादं भावंडं, ग्रुपमधील एखादा टवाळ मित्र यांच्या कानांना या वाक्यांची सवय झालेली असते.

एखाद्याला त्याचा दोष दाखवून देत त्याच्यातील उणीवा अधोरेखित करण्यासाठी चर्चेत आपणही अनेकदा हिरिरीने भाग घेतो. मग कधी धाकट्या भावंडांचं लाल शाईनं रंगलेलं प्रगतीपुस्तक घरभर नाचवतो, तर कधी एखाद्या बेरोजगार मित्राच्या चर्चेचं चवीन चरवण करतो.

 

blame 2

 

अर्थात चर्चा करणं हा मानवी स्वभाव असला तरी आपल्यासाठी असलेल्या या मनोरंजनामुळे आपण एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उध्वस्त करत आहोत, ही बाब तुमच्या कधी लक्षात आली आहे का? नाही? मग वेळीच सावध व्हा.

अवघ्या काही मिनीटात तुमच्या आठवणींना उजाळा द्या आणि विचार करा, की ज्या उत्साहाने आपण एखाद्याचा नाकर्तेपणा दाखवतो, तितक्याच प्रयत्नपुर्वक त्या व्यक्तीला योग्य मार्गावर चालण्याचं बळ देतो का? त्याच्या पाठीवर हात ठेवून,” तु लढ, मी खंबीरपणे तुझ्यासोबत उभा आहे” हे शब्द आपल्याला म्हणावेसे का वाटत नाहीत?

कारण आपल्या दुर्दैवाने वाईटातून काही चांगलं घडू शकेल यावर आपला विश्वासच नसतो. एखादी वाईट सवय किंवा चुकीची संगत लागलेली, व्यक्ती ही कायमच सर्वांसाठी दुर्लक्षित ठरते, प्रत्येकाच्या कुटुंबात, परिचितांमध्ये अशी एखादी व्यक्ती हमखास शोधून सापडते.

बेरोजगार, खर्चिक, व्यसनी, वृद्ध आई-वडिलांची अवहेलना करणारी, कुटुंबाकडे पाठ फिरवणारी व्यक्ती ही आपल्यालेखी कायमच चुकीची असते, अर्थात हे काहीअंशी योग्य आहे, मात्र गैरमार्गावर चाललेल्या या व्यक्तीला आयुष्यात पुन्हा कधी उभं राहण्याचा अधिकार नाही यावर आपण शिक्कामोर्तब करून टाकतो.

अर्थात ही कथा काही नवी नाही, अगदी पौराणिक कथांतूनही याचे दाखले मिळतात.

घनघोर अरण्यात वाटसरुंना धमकावत त्यांना लुटणा-या वाल्या नामक दरोडेखोराला नारदमुनींनी उपदेश केला.

 

valya inmarathi

 

ज्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो लूट करत होता, त्याच कुटुंबियांनीही “आम्ही तुझ्या पापात वाटेकरी होणार नाही” असा थेट इशारा दिला. याचाच अर्थ, वाईट मार्गावर चालणा-या वाल्याला कुटुंबियांचाही आधार उरला नव्हता.

कुणाचाही आधार नसल्याने अखेरिस आपण करत असलेल्या पापाचेे प्रायश्चित म्हणून नारदमुनींच्या पुनरागमनापर्यंत ‘रामनामा’चा जप सुरु केला.

तास, दिवस, वर्ष, तप… किती काळ लोटला याची गणनाच नाही, मात्र वाल्याचा निश्चय मात्र तसुभरही ढळला नाही. वाल्याचं संपुर्ण शरीर रानातील लालमुंग्यांच्या वारुळाखाली झाकलं गेलं, मात्र रामनामात तल्लिन झालेल्या वाल्याला त्याची फिकीर नव्हती. त्याच्या या ध्येयाचं कौतुक करण्यासाठी परमेश्वरही प्रसन्न झाले आणि त्यांच्याच आशिर्वादाने वाल्याचा ‘वाल्मिकी’ हा नवा अध्याय सुरु झाला.

 

valmiki inmarathi

 

ज्या हातांनी जंगलात लूट केली, त्याच हातांनी रामायण लिहीले गेले.

या कथेचं बाळकडू आपल्याला मिळालं असलं तरी ‘वाल्याचा वाल्मिकी झाला’ ही म्हण आपल्यासाठी केवळ कथेपुरती मर्यादित राहते. पुराणातली वांगी पुराणातच असं म्हणून आपण त्याकडे कानाडोळा करतो, मात्र २१ व्या शतकातही अशी अनेक उदाहरणं आपल्या भोवताली दिसतात, मात्र त्यासाठी जरा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे.

वाईटातूनही चांगलं ही बाब सिद्ध करणा-या  गुन्हेगार चार्ल्स शोभराजची चाणाक्ष बुद्धिमत्ता किंवा ड्रग तस्कर पाब्लो एस्कोबारचा बिझनेस सेन्स आपण सहजपणं नाकारणं योग्य नाही. आता ही झाली परिचित उदाहरणं…. पण आपल्याच आजुबाजुला दडलेल्या असतात काही अजब कथा, यापेक्षाही वेगळ्या आणि आपला दृष्टिकोन बदलून टाकणा-या…

गोष्ट काही वर्षांपुर्वीची… वाॅशिंग्टनमधल्या सिएटलमध्ये एका ‘रॉबर्ट’चा जन्म झाला. व्यसनी, हिंस्त्र प्रवृत्तीचे वडिल, पालकांमधील वाद यांमुळे रॉबर्टचं बालपण कायमच भितीच्या छायेत गेलं. तिस-या इयत्तेत शाळा संपली. एकंदरित या सगळ्याच परिस्थितीला कंटाळून वयाच्या तेराव्या वर्षी त्याने घर सोडलं, पाहता पाहता वर्ष सरली आणि अठराव्या वर्षी बांधकाम कामगारांच्या टोळीत तो सामील झाला.

दिवसभर ढोरमेहनत करणं,संध्याकाळी सिगरेट फुंकणं आणि दारू पिऊन रात्रभर बेहोश झोपणं हाच दिनक्रम नक्की झाला. याच दरम्यान तो किटी नामक वेश्येच्या संपर्कात येत तो थेट तिच्या प्रेमातच पडला आणि तिथेच घोळ झाला. लहानपणापासूनच असलेल्या बंडखोर स्वभावामुळे किटीवर हक्क गाजवू लागला. यात प्रवृत्तीमुळे किटीचा आधीचा प्रियकर आणि रोबर्टमध्ये एकेदिवशी चांगलीच जुंपली.

वादाची सुरुवात प्रियकरापासून झाली असली तरी रॉबर्टने प्रचंड प्रतिसाद केला आणि अशातच त्याचाही नकळत या वादात किटीच्या प्रियकराचा खून झाला. दुर्दैवाने बघ्यांच्या गर्दीने कोणतीही पार्श्वभुमी ठाऊक नसताना पोलिसांसमोर साक्ष दिल्याने रॉबर्टची रवानगी तुरुंंगात झाली.

 

jail featured inmarathi

 

बालपणातच मनावर झालेल्या खोलवर परिणामांंमुळे तुरुंगातही त्याची बेदरकार वृत्ती वारंवार दिसून येत होती. कधी डॉक्टरांना तर कधी इतर कैद्यांना मारहाण करणारा रॉबर्ट तुरुंगातही नकोसा झाला. त्यात बारा वर्षाच्या सक्तमजुरीला सामोरं जाताना रॉबर्ट अधिकाधिक निगरगट्ट होत होता याचमुळे त्याच्या शिक्षेत वाढ झाल्याने त्याला दुस-या तुरुंगात हलवण्यात आलं.

या तुरुंगात मात्र रॉबर्टच्या वागण्यात अचानक सकारात्मक बदल दिसून आला. कैंद्यांसाठी असलेल्या कामांत तो सहभाग घेऊ लागला. याव्यतिरिक्त अभियांत्रिकी, संगीत, गणित या विषयात त्याने रुची दाखवली. कदाचित अर्धवट राहिलेल्या शिक्षणाची आसही त्याला याच काळात लागली होती.

तुरुंगाच्या चार भिंतीत का होईना पण आयुष्य रुळांवर येत असल्याची आशा निर्माण होत असतानाच दुधात माशी पडली, आणि लहानश्या वादात रॉबर्टने थेट मेसच्या सुरक्षारक्षकाची हत्या केली. यामुळे पुन्हा नवी केस, पुन्हा नवं तुरुंग.

यावेळी मात्र मरेपर्यंत फाशीची कारावास सुनावण्यात आल्याने बंडखोर रॉबर्ट काळकोठडीत अर्थात अंडासेलच्या खबदाडात जाऊन पडला.

शिक्षेची सवय असलेल्या रॉबर्टला आयुष्यात पहिल्यांदाच एकांतवास जाचु लागला. हातपाय हलवणयापुरती जागा आणि त्यात सोबतीला असलेला अंधार याशिवाय दुसरं जग नव्हतं. हळूहळू त्याचीही सवय झाली पण तरिही मन सुर्यप्रकाश पाहण्यासाठी झुंजत होतं.

आणि एक दिवशी अचानक त्याच्या जगात कुणीतरी प्रवेश केला. जिथेवा-यालाही जागा नव्हती अशा त्या कोठडीत एका पक्ष्यानेे शिरकाव केला होता. का? कसा? कधी? रॉबर्टच काय तर कुणाकडेही याचं उत्तर नव्हतं.

 

bird in jail

 

आपल्याच तंद्रीत असलेल्या रॉबर्टला हालचाल जाणवल्याने त्याने आवाजाचा वेध घेतला आणि चक्क जखमी अवस्थेतील तो चिमुकला पक्षी त्या सापडला. यापुर्वी एखाद्या लहान, नाजुक गोष्टीला हाताळण्याची सवय त्याच्या राकट हातांना कधी नव्हतीच. माणसांसाठी कधीही सहानुभुती, प्रेम या भावना नसलेल्या रॉबर्टला त्या पक्षाविषयी मात्र एका क्षणात आपुलकी निर्माण झाली. नेमका हाच क्षण त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

त्याचं आयुष्यच बदलून टाकायलाच कदाचित त्या पक्षाने प्रवेश केला होता.

कोणताही विचार न करता पक्ष्याच्या पिल्लाला रॉबर्टनं पाणी दिलं आणि आपल्या नव्या सवंगड्याला आपलं मानलं. काही काळानंतर पिल्लु मोठं झालं आणि एकदिवस रॉबर्टचा डोळा चुकवून उडून गेलं. मात्र जाताना रॉबर्टला एक नवी प्रेरणा देऊन गेलं.

काही दिवसांच्या सहवासामुळे पक्षांबद्दल वाटणारं कुतुहल क्षमवण्यासाठी रॉबर्टने कैद्यांना दिली जाणारी काही पुस्तकं मागवून घेतली. पक्षांविषयीची अनेक पुस्तक वाचत त्यांने आपल्याला आवडलेल्या पुस्तकांविषयीच्या नोंदी लिहून काढल्या.

 

book inmarathi

 

त्याचं हे वाचनवेड आणि पक्षीप्रेम पाहून त्याला यासाठी कारागृहातर्फे काही सवलती दिल्या गेल्या आणि त्यातूनच सिगरेटची पाकिटं, पुठ्ठे यांतून रॉबर्टनी पक्षांचे निवारे घडवले. याच निवा-यात हळूूहळू पक्षी पाळण्याचीही त्याला सवलत दिली. पहिल्यांदाच कुटुंबात राहिल्याचा आनंद तो अनुभवत होता.

 

robert inmarathi

 

 

मग मात्र त्याच्या यशाला वा-याचा वेग आला. पक्षांवरील आपली अनेक हस्तलिखीते त्याने प्रकाशनासाठी दिली आणि तुरुंगातील रॉबर्टच्या या हस्तलिखीतांना बाहेरील जगात प्रचंड मागणी मिळाली. त्यानंतर पक्षांच्या आजारावर आधारित एक नवं पुस्तक लिहीलं गेलं, पक्षीतप्रेमी आणि अभ्यासकांसाठी तर हे पुस्तक म्हणजे जणु बायबलं होतं.

त्यानंतर नव्या तुरुंगात पाठवणी झालेल्या रॉबर्टच्या लेखणीला मात्र धार आली.एव्हाना राॅबर्टची पक्षीविषयक पुस्तकं कारागृहाबाहेरच्या जगात लोकप्रिय झाली होती.

थाॅमस गॅड्डीस या लेखकानं राॅबर्टवर लिहीलेलं ‘बर्डमॅन ऑफ अल्काट्राझ’ नावाचं पुस्तक साहित्यविश्वात प्रचंड लोकप्रिय झालं. तुरूंगातील छापखान्यात काम करत त्यानेे वाचन, लेखन सुरुच ठेवलं.

 

birdman book inmarathi

 

चार भिंतीत अडकलेला कैदी रॉबर्ट, जगासाठी पक्षीतज्ञ रॉबर्ट स्ट्रॉड बनला. त्याची कथा लोकांना इतकी भावली की कारागृहाबाहेर त्याच्या आयुष्यावर बेतलेला ‘बर्डमॅन ऑफ अल्कॅट्राज’ हा सिनेमा रिलिज झाला. बर्ट लॅंकॅस्टर या अभिनेत्यानं रॉबर्टची भुमिका इतकी सुंदर वठवली की त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी मानाचं ऑस्कर नामांकनही मिळालं.

 

जगभर त्याच्या नावाची चर्चा असताना ख-या रॉबर्टला मात्र सुटकेची आशाही नव्हती. “माझं आत्मवृत्ती प्रकाशित करा” ही एकच आशा मनात ठेऊन रॉबर्ट रात्री निजला तो कायमचाच…

 

 

robert death inmarathi

 

त्यानंतरही त्याची काही हस्तलिखितं प्रकाशित झाली. बेरोजगार, व्यसनी गुन्हेगार ते प्रसिद्ध पक्षीतज्ञ लेखक (ऑर्निथाॅलाॅजिस्ट) रॉबर्टचा हा प्रवास केवळ प्रेरणादायी नसून आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात घातलं जाणारं अंजन आहे.

आपल्या दृष्टिने वाया गेलेली व्यक्ती आयुष्यात कधीतरी खूप मोठी होऊ शकते, फक्त त्याला बळ देण्यासाठी आपले हात कणखर हवेत हे सिद्ध करणारं उदाहरण प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचायलाच हवं.

अर्थात केवळ परदेशातच नव्हे तर भारतीयांमध्येही अशी अनेक उदाहरणं सापडतात. भावनगरचे रहिवासी भानुभाई पटले १९९२ साली मेडिकलच्या उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले. त्यांच्यासोबत असलेल्या मित्राने आपला पगार त्यांच्या खात्यात टाकण्याची विनंती केली, आणि भानुभाईंनी होकारही भरला. मात्र अनधिकृतपणे फॉरेन एक्सेेंज रेग्युलेशन अॅक्टच्या उल्लंघनासाठी त्यांना १० वर्ष कारावास ठोठावण्यात आला.

शिक्षण अपुर्ण राहिल्याची खंत आणि कोणतीही चुक नसताना भोगावी लागणारी शिक्षा यांमुळे त्यांनी आपली जिद्द न सोडता तुरुंगात अभ्यासाला सुरुवात केली आणि आठ वर्षात तब्बल ३२ डिग्री मिळवल्या.

 

bhanubhai inmarathi

 

त्यांच्या या जिद्दीचं कौतुक करत तुरुंगातून बाहेर पडताच त्यांना सरकारी नोकरी देण्यात आली मात्र काम करत त्यांनी पुन्हा नव्या नव्या अभ्यासक्रमाचे शिक्षण सुरु केले. लिम्बा बुक ऑफ रेकॉर्डसारख्या अनेक यांदीत त्यांची नोंद असली तरी अडथळ्यांची शर्यत कायम असतानाही मेहनत कायम श्रेष्ठ ठरते हे त्यांनी सिद्ध केलं.

जेसिका लालचा खून करणाऱ्या मनु शर्मानं गुन्हा केला पण तिहार कारागृहात शिक्षा भोगतांना त्यानं तिथल्या बेकरीचा टर्न ओव्हर पाच कोटींवर नेऊन ठेवला होता, यांसारखी अनेक उदाहरणं आपल्या सभोवतालीही दिसतील.

अर्थात या उदाहरणांत संबंधित गुन्हेगाराचा गुन्हा लपत नाही किंबहूना तो लपवणं किंवा त्याला प्रोत्साहन देणं हा उद्देश नाही, ते योग्यही नाही, मात्र एकदा चूक करणा-याला त्याची शिक्षा संपल्यानंतरही गुन्हेगाराच्याच भुमिकेत पाहणंं म्हणजे त्या व्यक्तीच्या सुधारण्याच्या प्रक्रियेत अडथळा म्हणून उभं राहणं नव्हे का?

यासाठी कोणत्याही गुन्हेगाराला शोधण्याची गरज नाही, तर आपल्या कुटुंबात, परिचितांमध्येही एखाद्या वाट चूकलेल्याला उभारीसाठी दिलेला एक हात त्याला जन्मभरासाठी मोलाचा ठरु शकतो.

यासाठी अवघड असं काही शिकण्याची गरज नाही, तर केवळ त्या व्यक्तीबद्दल असलेला आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. वाट चूकलेल्या व्यक्तीला कायम दोष देण्यापेक्षा त्याची चुक त्याला समजावून ती निभवण्याची ताकद देणं जास्त महत्वाचं असतं. एकदा घडलेली चूक पुन्हा घडू नये आणि त्या चुकीतून बोध घेत त्याला पुन्हा एकदा सर्वसामान्य आयुष्य जगण्याची हिंमत दिली जाणं गरजेचं आहे.

 

hands inmarathi

 

निंदकाचे घर असावे शेजारी ही बाब जरी खरी असली तरी दोषारोपाच्या पलिकडे जा त्या व्यक्तीला आयुष्य पुर्ववत करण्याची संधी दिली गेली पाहिजे.

रॉबर्टच्या कथेप्रमाणे त्याची कथा यशोगाथा म्हणून लिहीली जाऊ शकते, केवळ तुमच्या प्रोत्साहनामुळे….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?