' ऑटोमोबाईल क्रांती – पहिल्या अविष्काराच्या जन्माची रंजक कहाणी वाचा! – InMarathi

ऑटोमोबाईल क्रांती – पहिल्या अविष्काराच्या जन्माची रंजक कहाणी वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

सायकल – लहान मुलांसाठी कुतूहल, मोठ्यांसाठी फिटनेसचे साधन, काटकसर करणाऱ्यांसाठी पेट्रोलचे भरपूर पैसे वाचवून थोडं का होई ना, जीवन सोपं करणारी अशी आपली सायकल.

पहिली सायकल आणि सायकल शिकताना पहिलं धडपडणं, सायकल वरून मित्र मैत्रिणींबरोबर शाळेत किंवा सैरसपाट्यावर जाणं, रेस करत असताना पडल्यावर ते गुडघे फुटणे आणि आईचा खाल्लेला ओरडा, अशा आपल्या कित्त्येक आठवणी सायकलशी जोडलेल्या असतात.

माणसाची सगळ्यात पहिली मैत्रीण कोणी असेल तर ती “सायकल”. आणि ती पहिली सायकल कित्त्येकांच्या अगदी जिवाभावाची सुद्धा असते.

 

cycling inmarathi

 

लोक आपली सायकल अगदी जपून ठेवतात, तिला सतत तेल आणि हवा भरून सुरु ठेवतात. ह्या नेहमीच पाहत असलेल्या सायकलचा “कसा बरं शोध लागला असेल” हा विचार कधी आपण केलाय का?

अर्थातच मानवनिर्मित आहे म्हणजे कधी न कधी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शोध लावला गेला असेलच, फक्त आपल्याला ते माहित नाही. चला तर, आज ह्या सायकलच्या शोधाची गोष्ट पाहूया.

आपल्याला जी कोणती वस्तू मिळते तिचे मूळ स्वरूप कायमच वेगळे असते. भरपूर लोकांच्या बुद्धीने तिचे स्वरूप बदलून, आकार देत देत आपल्याला दिसणारी वस्तू बाजारात विकायला येते.

तसंच सायकलचं सुद्धा आहे. सायकलचा पहिला शोध लागला तेव्हाचं सायकलचं स्वरूप हे पूर्ण पणे वेगळं होतं, थोडं फार वर्तमान काळातील व्हील चेयर सारखं.

पहिली सायकल १४१८ साली Giovanni Fontana (de la Fontana) या इटालियन इंजिनियरने बनवली होती. त्यांच्या लाकडी मॉडेलला फक्त लाकडाचीच चार चाकं आणि पुढे जाण्यासाठी एक चेन आणि बसण्याकरता एक सीट होती.

याव्यतिरिक्त त्या सायकलला कोणताही पार्ट नव्हता. पायाने ढकलत ती सायकल चालवावी लागत असे. पण तिच्या वजनामुळे ती सहज पुढे नेणं शक्य नसल्याने हा प्रयोग फसला.

 

bicycle inmarathi

 

तब्बल ४०० वर्षांनी १८१३ साली जर्मनीतील एका श्रीमंत आणि नावाजलेल्या Drais घराण्यातील Karl Von Drais यांनी Fontana वर काम करणे सुरू केले.

त्यात बरेच बदल घडून आणून Drais यांनी त्यांची सायकल जागा समोर आणली. संपूर्ण लाकडापासून बनलेल्या ह्या सायकलला २ चाकं, एक हँडल, आणि एक सीट होती. त्यावर बसून पायाने लोटत लोटत ती सायकल चालवावी लागायची.

हि सायकल संपूर्ण युरोप मध्ये पसंती मिळवू लागली. तिला लोक रनिंग मशीन, Draisienne, dandy horse, hobby horse अशा विविध नावांनी ओळखू लागली.

ह्या सायकलचे वजन २३ किलो असून एका विशिष्ट कारणामुळे या सायकलचा शोध लावण्यात आला होता. १८१५ साली इंडोनेशियातील टॅम्बोरा पर्वतातिल सर्वात मोठा ज्वालामुखी उसळून आल्यामुळे संपूर्ण वातावरणात राखेचे कण मिसळले गेले होते.

ह्यामुळे भौगोलिक तापमान अत्यंत कमी झाले व पिकावर याचा मोठा परिणाम झाला. पीक नष्ट झालं, ज्यामुळे दुष्काळ पसरला, प्राण्यांना खायला चारा नसल्याने गाई, बैल, घोडे सगळे संपुष्टात येऊ लागले.

आणि युरोप मध्ये टांगे आणि बग्ग्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असत, आणि घोड्यांच्या अभावापायी भरपूर समस्या उद्भवत होत्या.

यावर तोडगा म्हणून, Drais यांनी एक प्रयत्न करून दोन चाकांच्या सायकलचा शोध लावला. माणसाला प्राण्यांवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही हा त्यामागील विचार.

पण त्यांच्या सायकलला ब्रेक नसल्याने, पायी चालणाऱ्या लोकांसाठी ती धोक्याची ठरत होती. या गंभीर समस्येमुळे Draisienne वर प्रशासनाने बंदी घातली. आणि पुढे अनेक दशके सायकल जगाच्या दृष्टीआड झाली.

सायकलचा शोध बऱ्याच लोकांना भावला होता. त्याकाळात बरेच जण त्यावर आणखीन अभ्यास आणि संशोधनही करत असतील.

पण पायडल, गेयर आणि चेन असलेल्या velocipede म्हणजेच त्यांच्या सायकलचं पेटंट 1866 साली अमेरिकेत स्थायिक झालेल्या, Pierre Lallement नावाच्या एका फ्रेंच सुताराला मिळालं.

त्यांचा बग्गी, टांगे इत्यादी बनवण्याचा व्यवसाय होता.

पण पेटंट मिळण्याआधी १८६४ साली जेव्हा Lallement आपल्या सायकलची जाहिरात एका प्रदर्शनात करत होते तेव्हा पॅरिसच्या एका मोठ्या उद्योगपतींच्या मुलांनी Aime आणि Rene Olivier यांनी आपल्या शाळकरी मित्र Georges de la Bouglise यांच्या बरोबर आपल्या स्वतःच्या velocipede ची निर्मिती सुरु केली.

आणि त्यांचाच एक लोहार मित्र Pierre Michaux त्यांना सायकल निर्मितीला लागणाऱ्या साहित्य पुरावठ्याचं नियोजन करू लागला. आणि पेडल असलेली त्यांची ही सायकल एकदम सुपर डुपर हिट ठरली.

 

bone shaker cycles inmarathi

 

पण तिची चाकं सुद्धा लाकडी असल्याने चालवणाऱ्याला भरपूर झटके बसायचे, हाडं खिळखिळी झाल्यासारखी वाटायची म्हणून लोक या सायकलला “बोन शेकर” म्हणू लागले.

पण १८७०  पर्यंत सगळेच या बोन शेकरला कंटाळले होते. म्हणून ग्राहकांच्या मागणीला लक्षात घेऊन पुन्हा एकदा सायकलचे मॉडेल बदलण्याची तयारी सुरु झाली.

एव्हाना धातुशास्त्रात बरीच प्रगती झाल्यामुळे सायकल हि पूर्ण धातूंपासून बनवता येऊ शकत होती. हि सायकल लाकडी सायकल पेक्षा हल्की ठरणार होती. बदल करता करता जन्माला आली “पेनी फार्दीन्ग”.

ह्या सायकलला स्टीलची चाकं होती आणि रबरची टायरट्यूब होती. पायडल, ब्रेक, गेयर, आणि आरामदायी सीट ह्या सगळ्या सुधारणा करून ही सायकल बनवली गेली.

पण या सायकलचे समोरचे चाक ३.५ -४  फूट मोठे आणि मागचे चाक त्या तुलनेत फारच लहान होते.

हि सायकल आपण चार्ली चाप्लिनच्या बऱ्याच सिनेमांमध्ये बघितली असेल. हि सायकल सुद्धा बरीच लोकप्रिय होऊ लागली. या सायकलच्या बाजारात येण्यामुळे बरेच सायकलिंग क्लब, समूह, रेस क्लब यांचा उदय झाला.

 

cycle inmarathi

 

आणि पेनी फार्दीन्गचं एक फॅड आलं. पण ह्या सायकलच्या मोठ्या चाकामुळे कोणत्याही सामान्य व्यक्तीला हि सायकल सहज येण्यासारखी नव्हती. ब्रेक दाबल्यावर, समोरचे मोठे चाक अचानक थांबून जायचे, ज्यामुळे सायकलस्वाराचा तोल हमखास जायचा.

या मॉडेल मध्ये सुधारणा म्हणून १८७१ साली ब्रिटनच्या John Kemp Starley यांनी “एरियल” नावाची “सेफ्टी सायकल” लोकांपुढे ठेवली.

या सायकलच्या चाकांना स्पोक होते जे सगळ्या झटक्यांचे शॉक शोषून घेऊन सायकल चालवणे जरा सुरक्षित बनवू लागले.

पुढे १८८५ साली Starley यांनीच “रोव्हर” नावाची समान उंचीच्या चाकांची सायकल बाजारात आणली. ज्यामुळे सायकलिंग आता मौजेची गोष्ट झाली होती. सायकल मध्ये झालेल्या या सगळ्यात मोठ्या सुधारणेमुळे बऱ्याच लोकांचा कल सायकलिंग कडे वळला होता.

सायकल त्यांना एकप्रकारे स्वावलंबी असल्याची भावना प्रदान करू लागली, ज्यामुळे १८९९ पर्यंत सायकलचा खप वाढून १ मिलियन, इतका झाला. चालवायला सोपी असल्याने सायकलिंग करण्यात स्त्रियांचा सुद्धा समावेश होऊ लागला.

 

starley cycle inmarathi

 

ज्यामुळे मॉडेल मध्ये अजून बदल करून लेडीज मॉडेल्स बाजारात येऊ लागली. आणि सायकलची लोकप्रियता आणखीनच वाढत गेली.

अशी ही साधी, सोपी, आणि स्वस्त सायकल ऑटोमोबाईल क्षेत्राची प्रेरणा बनली आणि पुढे यात बरीच प्रगती होऊन शोध लागले व मोटारगाड्या, फटफट्या यांचे उत्पादन सुरू झाले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?