' सिझेरियन डिलिव्हरी खरंच गरजेची असते का? जाणून घ्या, यामागची १० कारणं… – InMarathi

सिझेरियन डिलिव्हरी खरंच गरजेची असते का? जाणून घ्या, यामागची १० कारणं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘बाळाला जन्म देणं’ हा एका स्त्रीच्या आणि त्या कुटुंबाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण असतो. जेव्हा एक मुलगी आई होते तो तिचा पुनर्जन्म असतो असं म्हणतात. नऊ महिने -नऊ दिवसांचा हा प्रवास ती आयुष्यभर विसरणार नसते.

शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळींवर एका गरोदर स्त्रीची या दिवसात सतत एक परीक्षा सुरू असते. प्रसूती पूर्वकाळात स्त्रीची जितकी चांगली काळजी तिच्या घरच्या व्यक्तींकडून घेतली जाते, तितकं तिला प्रसूती वेदना सहन करण्यास बळ येत असतं असं म्हणायला हरकत नसावी.

एक जीव तयार होतो, तो वाढतो, इतका मोठा होतो, की नवव्या महिन्या पर्यंत गरोदर स्त्रीला चालताना पोटावर एक वजन घेऊन चालावं लागतं आणि ती ते कसं करू शकते? याची उत्तरं विज्ञानात तर आहेत, पण या गोष्टी पुरुषांच्या आकलनापलीकडच्या आहेत.

 

delivery pain inmarathi

 

“नॉर्मल की सिझेरियन डिलिव्हरी करणार ?” प्रसूतीचे दिवस जवळ आले, की हा प्रश्न गरोदर स्त्रीला विचारला जात असतो. नॉर्मल पद्धतीने प्रसूती होण्यासाठी स्त्रीला अर्थातच जास्त वेदना सहन कराव्या लागतात आणि नैसर्गिकरित्या पोटातून कळा येण्याची वाट बघावी लागते. सिझेरियन पद्धतीत त्या तुलनेने वेदना कमी असतात आणि डिलिव्हरी साठी वेळ सुद्धा कमी लागत असतो.

एक काळ होता जेव्हा नॉर्मल पद्धतीने होणाऱ्या प्रसूतीलाच डॉक्टर आणि गरदोर स्त्रीच्या कुटुंबाकडून प्राधान्य दिलं जायचं, पण मागील काही वर्षात सिझेरियन ज्याला की ‘C सेक्शन’ हे सुद्धा नाव आहे ही पद्धत जास्त वापरात येत आहे असं एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे.

काय असावी याची कारणं?

१. सिझेरियन प्रसूतीच्या प्रकारात नॉर्मल पद्धतीपेक्षा जास्त धोका असतो, पण सिझेरियन पद्धतीमध्ये डिलिव्हरीचा दिवस आधी ठरवता येतो हा एक मोठा फायदा लोकांना दिसत आहे असं सांगितलं जातं. अचानक रात्री-अपरात्री दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ नये हा फायदा सुद्धा लोकांना सिझेरियन पद्धतीत जाणवत आहे.

२. प्रसूती वेदना सहन करतांना साहजिकच एक मानसिक ताण सुद्धा स्त्रीला येत असतो. काही स्त्रियांना प्रसूतीची दिलेली तारीख जवळ आली, तरीही पोटातून कळा येत नाहीत. नॉर्मल पद्धतीनेच डिलिव्हरी करायचं ठरवलेल्या स्त्रियांना दवाखान्यात दाखल केले जाते. त्यांच्या शेजारच्या स्त्रीला त्यांच्या आधी कळा येतात आणि डिलिव्हरी सुद्धा होऊन जाते.

“आपल्याला अजूनही कळा का येत नाहीयेत ?” कधी कधी हा प्रश्न डोक्यात सतत येऊन स्त्रियांना त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. या शक्यता सिझेरियन पद्धतीत येत नाहीत.

 

child delivery inmarathi

 

३. ‘लांबलेली प्रसूती’ हे सुद्धा एक कारण आहे जेव्हा डॉक्टर सिझेरियन डिलिव्हरी करावी असं सांगत असतात. ज्या स्त्रियांना जुळे होणार असतात किंवा जे मूल हे आकाराने जास्त मोठं असतं, त्यांना प्रसूती दरम्यान कोणता त्रास होऊ नये म्हणून सुद्धा डॉक्टर सिझेरियन पद्धतीने प्रसूती करतात.

४. गर्भाची स्थिती सध्या कशी आहे? यावर सुद्धा प्रसूतीची पद्धत ठरत असते. मूल पोटात असतांना त्याचं डोकं योनीकडे असेल, तर नॉर्मल पद्धतीने प्रसूती करणं कधीही सोपं असतं.

काही मूल हे पोटातच त्यांची स्थिती बदलत असतात. त्यांचे पाय हे योनीकडे आलेले असतात. ज्या स्त्रियांना जुळे किंवा तीळे असतात त्यांच्यासाठी ही परिस्थिती जास्त अवघड होऊ शकते. त्या सर्व प्रकारात सिझेरियन पद्धतीला प्राधान्य दिले जाते.

 

 

५. गर्भाला ऑक्सिजनचा पुरवठा होत नसेल, तर भविष्यातील बाळाला होऊ शकणारा धोका बघून सिझेरियन पद्धत अवलंबली जाते.

६. आजार टाळण्यासाठी: काही बाळांना जन्म घेतांना काही आजार आहेत हे कळलेले असतं. जसं की, होणाऱ्या बाळाला काही वेळेस हृदयाची समस्या असू शकते. काहींच्या मेंदू मध्ये पाणी हे अपेक्षेपेक्षा जास्त असू शकते. अशा बाळांना सिझेरियन पद्धतीने जन्म देणं कधीही सुरक्षित असतं.

७. रिपीट सिझेरियन: पहिल्या बाळाच्या वेळी जर सिझेरियन पध्दत वापरली असेल, तर दुसऱ्या वेळी सुद्धा त्याच पद्धतीचा अवलंब होतांना दिसतो. तसंच व्हावं असं गरजेचं नाहीये, पण स्त्री च्या तब्येतीकडे बघून हा निर्णय घेतला जातो.

 

८. गरोदर स्त्रियांना जर एक वर्ष किंवा आधीपासून हृदयाचा आजार असेल किंवा अति रक्तदाबाचा त्रास होत असेल किंवा डायबेटिस असेल तर त्यांना सुद्धा सिझेरियन डिलिव्हरी पद्धत जास्त उपयोगी असं डॉक्टर मानतात.

९. नाळ पडणे किंवा बाळाभोवती गुंडाळली जाणे या दोन्ही परिस्थितीत बाळाला होणारा रक्तपुरवठा कमी झालेला असतो. अशावेळी बाळाच्या तब्येतीला असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन डॉक्टर सिझेरियन पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतात.

१०. बाळाचं डोकं जर आकाराने मोठं असेल आणि ते योनी कडून व्यवस्थित बाहेर येऊ शकणार नाही असं डॉक्टरांच्या लक्षात आलं, तर ते सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी करण्याचं ठरवत असतात.

या दहा कारणाव्यतिरिक्त सुद्धा अनेक कारण असू शकतात ज्यामुळे स्त्री सिझेरियन पद्धतीनेच प्रसूती व्हावी यासाठी आग्रही असते.

नॉर्मल पद्धतीपेक्षा ही पद्धत थोडी जास्त खर्चिक असते, पण स्त्रियांच्या तब्येतीनुसार निर्णय घेऊ देणं हे प्रत्येक कुटुंबाचं कर्तव्य असतं. बाळाला जन्म देण्यासारखी सुंदर गोष्ट नाहीये. त्याबद्दल प्रत्येक जोडप्याने आपल्या शंका आणि प्रश्नांची उत्तरं वेळोवेळी डॉक्टरांकडून जाणून घ्यावीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?