' घरच्या घरी, चक्क बाटलीत, तांदूळ पिकवणाऱ्या जोडप्याची जोरदार कहाणी… – InMarathi

घरच्या घरी, चक्क बाटलीत, तांदूळ पिकवणाऱ्या जोडप्याची जोरदार कहाणी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘लॉकडाऊन २०२०’ हा साधारणपणे २०० दिवसांचा काळ आपल्यापैकी कोणीही कधीच विसरणार नाही हे नक्की. या काळात कित्येक लोकांनी आपले छंद जोपासले, तर कित्येक लोकांनी आपल्या छंदातून उत्पन्न कमावण्याचे मार्ग शोधले. ज्यांना कमाईचे मार्ग शोधता आले नाहीत त्यांनी खर्च कमी करून आपल्याला जगण्यासाठी लागणारा कमीत कमी खर्च हा कसा आपल्या आटोक्यात राहील याचा विचार केला.

इंटरनेटचा वापर या काळात कित्येक पटीने वाढला आणि त्या माध्यमातून लोकांनी माहिती मिळवली आणि आपल्या जीवनाची थांबलेली गाडी पुन्हा सुरू केली.

हॉटेल्स बंद असल्याने लोकांनी घरीच विविध पदार्थ तयार करून आपली हौस भागवली. केरळ मधील एका दांपत्याने तर दक्षिण भारतातील अत्यंत आवडीचं खाद्य तांदूळ त्यांनी चक्क आपल्या गच्चीवर पिकवला. आहे ना आश्चर्य?

 

rice inmarathi

 

शेतीचं ज्ञान आपल्यापैकी प्रत्येकाला नसलं, तरीही इतकं तर माहितीच आहे, की तांदूळाचं पीक हे पाण्याखाली घेतलं जातं आणि ते काम इतकं सोपं नाहीये, पण टिटस सॅम जोसेफ आणि त्यांची पत्नी सिलिन यांनी मिळून कोत्तयम या त्यांच्या गच्चीवर मिनरल पाणी वापरून ही कमाल करून दाखवली.

तांदुळाचे पीक घेण्यासाठी त्या दोघांनी आधी १७५ मिलीच्या मिनरल पाण्याच्या छोट्या बाटल्या आणल्या. त्या बाटलीला त्यांनी आडवं कट केलं आणि त्याच्या खालच्या भागात पाणी भरून ठेवलं. दुसऱ्या बाटलीचा असाच भाग कट केला आणि त्यात माती, गायीचं शेण हे भरून ठेवलं आणि त्या बाटलीला खालच्या बाटलीवर उलटं ठेवलं. या प्रक्रियेनंतर त्यांनी आवश्यक ते खत टाकले.

काही दिवसांतच तांदुळाचे रोप येण्यास सुरुवात झाली. कोणत्याही केमिकल्स शिवाय हे शक्य झालं होतं आणि त्यामुळे पूर्णपणे ऑर्गनिक पद्धतीचा हा तांदूळ ते घरी पिकवू शकले याचा त्या दोघांनाही खूप आनंद झाला.

 

 

या प्रक्रियेत त्यांना त्रास झाला तो फक्त झाडांना पाणी देण्याचा आणि या गोष्टीचा की बाटली इतकं वजन सहन करेल का? हे सतत चेक करण्याचा. दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्यासाठी टिटस हे दिवसातून एकदाच झाडांना पाणी द्यायचे.

“पाण्याची थोडी कमतरता असेल, तर झाडांची वाढ बरोबर होत नाही. त्यासोबतच, आम्ही सतत या गोष्टीवर सुद्धा लक्ष ठेवून होतो की, वाऱ्यामुळे बाटली खाली पडू नये. पण, यातील काहीच घडलं नाही. आमच्या प्रयत्नांना निसर्गाने सुद्धा साथ दिली.” असं टिटस पॉल जोसेफ यांनी मीडिया सोबत बोलतांना सांगितलं.

४७ वर्षीय टिटस यांनी पुढे सांगितलं की, ” मागच्या महिन्यात आम्ही दोघांनी मिळून ४ किलो तांदळाचं पीक घेतलं जे, की आम्हाला महिनाभर पुरलं. आता आम्हाला एक विश्वास निर्माण झाला आहे. तांदुळाचे पीक घेण्याचा पुढचा हंगाम हा जून-जुलै मध्ये असेल. आम्ही त्या हंगामाची वाट बघत आहोत.”

टिटस पॉल यांची बातमी स्थानिक वृत्तपत्रात आल्यावर त्यांना कित्येक लोकांनी संपर्क साधून ही पद्धत शिकण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक व्यक्तीला टिटस यांनी आवश्यक ते मार्गदर्शन केलं आहे. तांदूळचं पीक घेतल्यानंतर आता टिटस हे घरच्या घरी मध निर्मिती आणि मासे जगवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहेत.

 

honey bee inmarathi

 

मासेमारी करण्यासाठी टिटस यांनी एक टारपोलिनचं तळं तयार केलं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माश्यांना आणून सोडले आहे. गच्चीवर ठेवलेल्या या एका तळ्यात २०० मासे आहेत आणि एक तळं त्यांनी घरासमोर केलं आहे ज्यामध्ये ५०० मासे आहेत.

टिटस पॉल यांनी यासोबतच गच्चीवर भाजीपाल्याची झाडं सुद्धा लावली आहेत, ज्यामध्ये वांगी, मिरची, बिन्स या भाज्यांचा समावेश आहे. शेजारच्या लोकांनी सुद्धा टिटस पॉल यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि त्यांनी सुद्धा काही भाज्यांचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्या सर्वांमध्ये एक उपयुक्त देवाणघेवाण सध्या सुरू झाली आहे.

टिटस पॉल यांनी हे सांगितलं आहे की, “जर तांदूळ हा गच्चीवर पिकवला जाऊ शकतो, तर कोणत्याही गोष्टीचं पीक हे गच्चीवर घेतलं जाऊ शकतं.”

 

 

सध्या गच्चीवरची बाग, शेती या विषयांवर इतके नवनवीन प्रयोग कळत आहेत, की ‘टेरेस फ्लॅट’ ची मागणी येणाऱ्या दिवसात अधिकच वाढेल अशी शक्यता आहे. एक काळ होता जेव्हा गच्ची ही फक्त गप्पा मारण्यासाठी वापरली जायची. उन्हाळ्यात गर्मी होते म्हणून बरेच जण सर्वात वरच्या मजल्यावरचं घर भाड्याने घेणं सुद्धा टाळायचे.

टिटस पॉल जोसेफ सारख्या लोकांमुळे गच्चीकडे एक मालमत्ता म्हणून बघितलं जाणार हे नक्की. इतक्या वर्ष गच्ची म्हणजे फक्त टेलिफोन टॉवर साठी असते हेच एक समीकरण होतं. काही दिवसांनी खालून जातांना गच्चीवर उसाचे मळे वगैरे आश्चर्य वाटायला नको. गच्चीचा सदुपयोग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पुढचं पीक घेण्यासाठी शुभेच्छा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?