' नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याने अजिबात दुर्लक्षित करू नयेत अशा ५ गोष्टी

नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याने अजिबात दुर्लक्षित करू नयेत अशा ५ गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लग्न! प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण. लग्न म्हणजे दोन जीव आयुष्यभरासाठीच नव्हे, तर सात जन्मांसाठी एकत्र येऊन तयार झालेले एक पवित्र नाते असते. भारतीय संस्कृतीत प्रचलित असलेल्या १६ संस्कारांमधील विवाह हा एक महत्त्वाचा संस्कार मानला गेला आहे.

विवाह म्हणजे केवळ एकत्र राहणे नाही, तर प्रेम, निष्ठा, कर्तव्य, संयम आणि विश्वास यांनी बद्ध असलेले एक व्रत आहे. विवाहामुळे केवळ मुलगा आणि मुलगी असे दोनच जीव एकत्र येतात असे नाही, तर दोन कुटुंबे एकमेकांशी जोडली जातात. एका लग्नामुळे दोन कुटुंबांतील परंपरा, मूल्ये, आचारविचार यांची देवाणघेवाण होते.

विवाहानंतर जेव्हा दोन भिन्न व्यक्ती एकमेकांच्या सहवासात राहायला सुरुवात करतात, तेव्हा एकमेकांच्या स्वभावाची ओळख व्हायला वेळ लागतो. अगदी प्रेम विवाह केलेला असला तरी आपल्या जोडीदाराच्या प्रत्यक्ष सहवासात आल्यावर त्याची नव्याने ओळख होते.

मुलींच्या बाबतीत तर सासरी गेल्यावर सगळेच चित्र बदलते. आसपासची माणसे, चालीरिती, एकेकाचे स्वभाव, इत्यादी गोष्टी सांभाळून नव्या घरात स्थिरावणे ही एक कसोटीच असते, पण असे असले तरी लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो.

 

marraige inmarathi

 

भारतीय कुटुंबात मुलगा साधारण पंचविशीचा झाल्यावर तसेच मुलगी साधारण २३-२४ वर्षांची झाल्यावर घरात सामान्यतः लग्नाचा विषय सुरू होतो. सध्याच्या युगात आपले शिक्षण आणि त्यानंतर करिअरमधील व्यस्ततेमुळे मुलगा आणि मुलगी या दोघांच्याही लग्नाचे वय सुमारे तीन ते चार वर्षे पुढे गेल्याचे बऱ्याच ठिकाणी पहावयास मिळते.

मुलाच्या दृष्टीने लग्न करण्याच्या आधी प्रापंचिक जबाबदाऱ्या पेलता येतील इतपत स्थैर्य येणे महत्त्वाचे असते. त्यामुळे काहीवेळेस घरच्यांकडून लग्नाचा प्रस्ताव पुढे आल्यास मुलं आढेवेढे घेतात.

मुलींच्या लग्नाच्या बाबतीत पालक बऱ्याचदा घाई करत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर मुलीचे शिक्षण पूर्ण व्हायच्या आधीच तिचे लग्न लावून दिले जाते. अनेकदा मुलींना शिक्षणाच्या जोरावर मिळालेल्या नोकरीत अजून पुढे जाण्याची इच्छा असते. लग्न झाल्यावर मुलीला हे स्वातंत्र्य मिळेलच याची शाश्वती नसते.

 

indian-couple-marathipizza03

 

अशी बरीच उदाहरणे पहावयास मिळतात ज्यात लग्न झाल्यावर प्रापंचिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकून पडल्याने मुली आपले शैक्षणिक किंवा व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करू शकत नाहीत.

प्रेमविवाह हा एक नाजूक विषय आहे. प्रेमविवाह केलेल्या व्यक्तींना बहुतांश वेळा कौटुंबिक किंवा सामाजिक विरोधाला सामोरे जावे लागल्याचे दिसून येते. त्यातही जर विवाह आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय असेल तर या अडचणी अजूनच वाढतात.

अशावेळेस मुलगा आणि मुलगी यांचा परस्परांवरील विश्वास हीच एकमेव गोष्ट असते, ज्यामुळे प्रेमविवाह टिकून राहू शकतो आणि कालांतराने घरच्यांच्या विरोधाची धार बोथट होते. वैवाहिक बाबींमध्ये जात-धर्म याशिवाय मुलाची सांपत्तिक स्थिती हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो.

कोणत्याही मुलीच्या आईवडिलांना आपली मुलगी सुखवस्तू घरात जावी असेच वाटते, जे अतिशय स्वाभाविक आहे. अशा वेळेस जोडप्याने आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यांच्या अनुषंगाने येणारे खर्च आणि आपले उत्पन्न यांचा व्यवस्थित ताळमेळ घालणे गरजेचे असते. दाम्पत्याने पुढे अपत्याचा विचार करता लग्नापासूनच या नियोजनाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे.

मुलीच्या बाबतीत लग्नानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात. सासरी गेल्यावर सासू-सासरे, दीर-जाऊ, नणंदा या सगळ्यांशी जुळवून घेणे हे मुलीच्या दृष्टीने थोडे कसरतीचे असते. घरातील इतर मुलांकडेही लक्ष द्यावे लागते.

 

family inmarathi

 

हल्लीच्या जमान्यात “सासुरवास” होईल एवढी वाईट वागणूक मुलीला मिळत नसली, तरी गैरसमजातून मतभेद निर्माण होऊ शकतात. अशा वेळेस मुलीचा संयम फार महत्त्वाचा ठरतो आणि बहुतांश वेळेस मुली तो दाखवून देतातही.

ज्याप्रमाणे मुलीने आपल्या संयमाने आणि वागणुकीने नवीन नाती दृढ केली पाहिजेत, त्याप्रमाणेच मुलाच्या आईवडीलांनी आणि भावंडांनीसुद्धा आपल्या घरी नव्याने आलेल्या मुलीला सन्मानाने वागवले पाहिजे.

बऱ्याच ठिकाणी सासू सुनेमध्ये असणारा तणाव हे घरगुती कलहाचे कारण ठरते आणि काही प्रसंगी त्याची परिणीती घर तुटण्यातही होण्याचा संभव असतो. यामध्ये मुलाने समजूतदारपणाची भूमिका घेऊन कोणाही एकाची बाजू न घेता प्रश्न सोडवणे महत्त्वाचे ठरते.

लग्नानंतर सहजीवनाला सुरुवात झाल्यावर मुलगा आणि मुलीला एकमेकांच्या सवयी नव्याने माहीत होत असतात. नवरा-बायको दोघेही एकमेकांना कितीही अनुरूप असले, तरी त्यांच्या सवयी आणि आवडीनिवडी तंतोतंत कधीच जमू शकत नाहीत. यातून काही वेळेस आपापसांतील कुरबुरींना सुरुवात होते. अगदी ओला टॉवेल बेडवर टाकणे, पसारा वेळच्या वेळी न आवरणे अशा किरकोळ गोष्टीसुद्धा धुसफूस होण्यासाठी पुरेशा ठरतात.

लग्नाआधी किंवा अगदी लग्नानंतरही जोडीदार एकमेकांशी संवाद जेवढा जास्त वाढवतील, तेवढी एकमेकांच्या सवयींची जास्त माहिती होते आणि भविष्यातले अनावश्यक वादही टाळता येतात.

 

fights after marraige InMarathi

 

भिन्न स्वभावांच्या व्यक्ती एकत्र आल्यावर मतभेद नक्कीच होऊ शकतात, पण शब्दाला शब्द वाढण्यापेक्षा काही वेळेस बाळगलेले मौन बरेच उपयोगी पडते. शेवटी सहजीवनात एकमेकांना सांभाळून घेऊन वाटचाल करणे हेच अपेक्षित असते.

आज एकविसाव्या शतकात स्त्रिया सगळ्यांच क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. नवऱ्याने नोकरीधंदा करून घरासाठी पैसे कमवावे आणि बायकोने चूल आणि मूल सांभाळावे ही संकल्पना आता जवळपास संपल्यात जमा आहे.

नवरा-बायको दोघेही कामावर जात असताना घरातील नैमित्तिक कामांची जबाबदारी कोणी आणि किती प्रमाणात घ्यायची हा प्रश्न बऱ्याच जणांना भेडसावतो. यात सून कमावती असली तरीही तिने घरातील सगळी कामे केलीच पाहिजेत असाही आग्रह सासू-सासऱ्यांकडून धरला जातो. खूपदा गृहकलहाची सुरुवात या मुद्द्यानेच होते.

 

cooking inmarathi 1

 

नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे असल्यास दोघांनीही घरातील कामे योग्य रीतीने वाटून घेणे कधीही इष्ट ठरते. सुरुवातीला यात काहीसा त्रास झाला तरी कालांतराने याची सवय होते आणि नवरा-बायकोपैकी कोणातरी एकावर भार पडत नाही.

आसपासच्या त्रयस्थ व्यक्ती आपल्या प्रत्येक कृतीत उणीव शोधण्याचा प्रयत्न करणारच, पण कितीही झाले तरी सुखदुःखाच्या प्रसंगी साताजन्मांची गाठ बांधलेले पती-पत्नीच एकमेकांसाठी आधार असतात. भारतीय संस्कृतीत लग्नाला संस्काराचे स्थान असल्यामुळेच, की काय आज जगभरच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचे प्रमाण कमी आहे.

आयुष्य म्हटले, की त्यात चढउतार आलेच. पण पतीपत्नींची परस्परांची साथ जर भक्कम असेल, तर त्यांना कोणत्याही संकटाला लीलया सामोरे जाता येऊ शकते.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सहजीवन सुखकारक होणे अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळे लग्न झालेल्यांनी आणि करू इच्छिणाऱ्यांनी परस्परांमधील संवाद वाढवून एकत्रपणे यावर काम केल्यास वैवाहिक जीवन अधिकाधिक सुखकर होईल यात शंकाच नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?