'बोट मोडलं होतं, तरी जिद्दीला तोड नव्हती! स्मिथ योद्धयासारखा लढला, पण...

बोट मोडलं होतं, तरी जिद्दीला तोड नव्हती! स्मिथ योद्धयासारखा लढला, पण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान घमंडे 

===

क्रिकेट हा एक असा सांघिक खेळ आहे, ज्यात संघभावनेसोबतच इतर अनेक भावनांचं नेहमीच दर्शन घडत असतं. क्रिकेट खेळताना, राग, लोभ, दुःख, मोह, जिद्द आणि या सगळ्यांच्या बरोबरीनेच समर्पण या भावनेचा कस लागतो.

पितृशोक झाल्यानंतर लगेचंच संघात परतून सचिनने केनियाविरुद्ध झळकावलेलं शतक असो, मुलीच्या जन्मानंतर, पहिल्या बाळाला भेटायला न जाता, बराच काळ धोनीने संघासोबतच थांबणं असो, मोहम्मद सिराजने वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही न जाण्याचा निर्णय घेणं असो, किंवा जबडा जायबंदी असताना अनिलभाईंनी सामना खेळणं असो; क्रिकेटप्रति समर्पणाचे अनेक किस्से आजवर आपण पाहिले आहेत.

 

sachin-kumble-inmarathi

 

क्रिकेटमध्ये केवळ स्वतःपुरता विचार करून चालत नाही. लोभाचे किंवा मोहाचे प्रसंग अशावेळी संघासाठी मारक ठरतात. मात्र, स्वतःचा विचार करण्याआधी संघाचा विचार करणारे खेळाडू, संघभावनेसाठी एक उत्तम आदर्श घालून देतात.

या अशाच यादीतील एक नाव म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ! एक खेळाडू आणि कप्तान म्हणून तो जितका उत्कृष्ट होता, तितकाच संघाचा सदस्य आणि देशाप्रती श्रद्धा असणारा व्यक्ती म्हणून सुद्धा योग्य होता. केविन पीटरसनवर त्याचा असणारा राग, हा यासाठी एक उत्तम पुरावा ठरतो.

 

 

दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेष आणि त्याचा संघावर पडणारा प्रभाव, याला कंटाळून पीटरसनने इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा आदर करणारा स्मिथ, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेबद्दल पीटरसनने चुकीची वक्तव्यं करणं मात्र मान्य करत नाही.

असा हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू, ज्याने स्वतःपेक्षा अधिक विचार केला तो संघाचा… संघाहितासाठी त्यानं स्वतःचं दुखणं सुद्धा बाजूला सारलं होतं.

ही गोष्ट आहे २००९ च्या जानेवारी महिन्यातली… ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील अखेरचा सामना सुरु होता. अखेरचा डाव, दक्षिण आफ्रिकेचा संघ ३७६ धावांचा पाठलाग करतोय. या डावात सलामीवीर ग्रॅम स्मिथ फलंदाजीला आलाच नव्हता.

याचं कारण होतं पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याचा मोडलेला अंगठा…

साहजिकपणे, तो दुसऱ्या डावात फलंदाजीला येणार नाही, असंच सगळ्यांना वाटत होतं. पण, सामन्यातील अखेरच्या दिवसाचे ५० चेंडू बाकी असताना, दक्षिण आफ्रिकेचा ९ वा गडी बाद झाल्यावर जे घडलं, ते निराळंच होतं. दक्षिण आफ्रिकेच्या ड्रेसिंग रूमचा दरवाजा उघडला. संपूर्ण स्टेडियममध्ये नुसताच टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता.

 

graeme-smith-standing-ovation-inmarathi

 

टाळ्यांच्या गजरातच, स्मिथने मैदानावर प्रवेश केला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ही अपेक्षा केलीच नव्हती. स्मिथ डाव घोषित करेल, अशी स्वतःच्या मनाची समजूत करून घेऊन त्यांनी विजयाचा जल्लोष सुरु केला होता. त्यांच्या आनंदावर मात्र विरजण पडलं.

खरं तर दक्षिण आफ्रिका संघाने मालिका आधीच खिशात घातली होती. मात्र, कर्णधार स्मिथने चंग बांधला होता, त ऑस्ट्रेलियाला एकही यश मिळू न देण्याचा.

डाव्या हाताला दुखापत झालेली होती. तरीही डावखुऱ्या स्मिथने लढा द्यायचं ठरवलं होतं. उजव्या हाताच्या कोपरावर देण्यात आलेल्या इंजेक्शनमुळे, त्या हातालाही होत असलेल्या वेदना; ही स्थिती गंभीर होती. मात्र, सामना वाचवण्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करायचा, या एकाच विचाराने त्याला झपाटलं होतं.

 

graeme-smith-inmarathi

 

तळाच्या एण्टीनिला सोबत घेऊन, ताशी १४० किलोमीटर वेगाने येणारे चेंडू तो थोपवत होता. अंगठ्याला वेदना होत असल्यामुळे, बॅट सुद्धा हातात नीट धरता येत नव्हती. बॉल जोरात आदळला, तर ती हातातल्या हातात फिरत होती. तो खेळत असताना, त्याच्या संघासहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील भाव सुद्धा अनेक गोष्टी स्पष्ट करत होते. पण, तरीही स्मिथची जिद्द मात्र अढळ होती.

अखेर जॉन्सनच्या एका चांगल्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. स्मिथ बाद झाला त्यानंतर, सामन्याचे अवघे १० चेंडू बाकी होते.

मालिका तर दक्षिण आफ्रिकेने जिंकलीच होती. पण, मालिकावीर हा पुरस्कार सुद्धा स्मिथने मिळवला. यात त्याच्या ३२६ धावांचा महत्त्वाचा वाटा होता. पण, खऱ्या अर्थाने तो एक वीर ठरला, एक योद्धा ठरला. त्याचं डेडिकेशन पाहून सगळेच अचंबित झाले.

एवढंच कशाला, सहजासहजी खिलाडूवृत्तीचं दर्शन न करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सुद्धा, त्याच्या या जिद्दीला सलाम ठोकला.

 

ponting-smith-inmarathi

 

स्मिथ सामना वाचवू शकला नाही. पण, त्याने त्याच्या असंख्य चाहत्यांसह जवळपास सगळ्याच क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. (जिथे ऑस्ट्रेलियाने सुद्धा, मानवंदना दिली, तिथे इतरांना आदर वाटणं अगदीच साहजिक आहे!) एक कप्तान म्हणून, एक खेळाडू म्हणून आणि एक लढवय्या म्हणून, त्याच्याविषयी आदर आणखी वाढला…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?