' देवाला भक्तांचा आणि गुरुला शिष्यांचा कधी त्रास होत नसतो : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १३

देवाला भक्तांचा आणि गुरुला शिष्यांचा कधी त्रास होत नसतो : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १३

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १२

मला शिष्य करून घ्या ही आबाने केलेली विनंती जरी तुकोबांनी नाकारली तरी प्रश्नांना उत्तरे द्यायचे कबूल केल्याने आबा तितका बेचैन झाला नव्हता. प्रत्यक्ष प्रश्न विचारण्याचे धाडसही त्याला म्हणूनच झाले. पण, तुकोबा ज्यावेळी उत्तरादाखल बोलू लागले तेव्हा मात्र त्याला ते अतीव संकोचाचे झाले.

तुकोबा बोलत असताना म्हणूनच त्याची मान अखंड खालीच राहिली. इतक्या थोर व्यक्तीने आपल्यासारख्या छोट्या, नवशिक्या, अनोळखी व्यक्तीसाठी इतका त्रास घ्यावा याचा त्याला मोठा भार झाला. त्यात अजून भर ही झाली की तुकोबा आपल्या साधनेचे गुह्यच प्रकट करून सांगू लागले. आजवर आबाने कितीकांच्या भेटी घेतल्या असतील, कुणीही आपण काय केले व कोठे पोहोचलो हे सांगितले नव्हते. वास्तविक साधु, सिद्ध, संत, गुरु म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाला आबाने हा प्रश्न केला होता. त्यावर त्याला मिळणारी उत्तरे उडवाउडवीची असत. तू अजून लहान आहेस, साधना केलीस तरच कळेल, तपे घालवावी लागतात, आधी शिष्य हो, सेवा कर, मग बघू इतकेच नव्हे तर तू मला काय देणार हा प्रश्न सुद्धा विचारला गेला होता.

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

तुकोबांकडे सारेच वेगळे होते. मी पूर्वसिद्ध मार्गाने गेलो, मुक्कामी पोहोचलो. तुम्हीही निघा, धीर धरा, नक्की पोहोचाल असे निर्घोर आश्वासन तुकोबा देत असल्याचे आबाने पाहिले.

अशा स्थितीत पुढे काय करावे असा प्रश्न त्याला पडला. आपल्या मनात अनंत प्रश्न आहेत, एकातून एक निघतच राहतात. विचारले तर तुकोबा सविस्तर उत्तर देणार. त्याचे आता ओझे वाटते! किती त्रास द्यायचा त्यांना?

दुसऱ्या दिवशी मंदिरात जाण्याआधी आबाने आपली अडचण कान्होबांना सांगितली. तो म्हणाला,

मला तुकोबांचे भ्या न्हाई वाटत. पन आपुन त्रास बी किती द्यावा ते कळं ना.

हे ऐकून कान्होबांनी तुकोबांचा एक अभंगच ऐकवला. तो असा :

जेणें नाही केलें आपुलें स्वहित । पुढिलांचा घात इच्छितसे ।।
संचितासी जाय मिळोनिया खोडी ।
पतनाचे ओढीवरी हांव ।।
बांधलें गांठी तें लागलें भोगावें ।
ऐसियासी देवे काय किजे ।।
तुका ह्मणे जपा गांवों जाणे जया ।
पुसोनिया तया वाट चाले ।।

ज्या गावी जाण्याचा आपण जप चालविला आहे त्या मुक्कामी जो आधीच पोहोचलेला आहे त्याला विचारूनच पुढे वाटचाल करायला नको काय? आता तुम्ही काही विचारणा केली आहे आणि काही करणे अजून बाकी आहे. अशा स्थितीत गाठी बांधले आहे तेवढ्यावर जगू पाहाल तर कोणताही देव तुमच्या मदतीला यायचा नाही! इतकेच नव्हे तर जे कमावले आहे त्याची आपल्याच एखाद्या खोडीशी गाठ पडून अवनतीच्या मार्गाला मात्र लागाल! आणि आबा, तुम्हाला काय वाटते तुम्ही केवळ स्वहितासाठी हे सारे करीत आहात? तशी भावनाच ठेवू नका. जो स्वतःचे हित पाहात नाही तो स्वतःचाच नव्हे तर आपल्या मागून येणाऱ्यांचा घातच इच्छीत असतो! तुमच्या ह्या उपक्रमात पुढिलांचे हित आहे हे कधी विसरू नका. आबा, हे तुकोबांचेच म्हणणे मी तुम्हाला सांगितले. तेव्हा आजच्या भेटीतही मोकळेपणे बोला. अहो, देवाला भक्तांचा आणि गुरुला शिष्यांचा कधी त्रास होत नसतो!

कान्होबांच्या ह्या बोलण्याने आबाचा मूळ निश्चय पक्का झाला आणि संध्याकाळी जेव्हा देवळात सगळे जमले तेव्हा तो तुकोबांनी काही म्हणायच्या आतच पांडुरंगाकडे तोंड करून हात जोडून उभा राहिला आणि बोलू लागला,

द्येवा, पांडुरंगा माजं भाग्य थोर म्हनूनच मी तुझ्या ह्या गावी आलो. नांव आईकलं तरी पाह्यलावर कळलं की तेजस्वी मानूस म्हंजी काय. ज्ञानी मानूस असतु कसा, दिसतु कसा, बोलतु कसा, वागतु कसा त्ये समदं म्यां इतं पाह्यलं. त्येंच्या म्हंजी तुकोबांच्या डोळ्यातच माया हाय. त्येंनी तुज्याशी बोलाया सांगितलं त्ये बरं जालं. तू खरा न्हाईस असंच मला वाटतुया. तवां तुज्याशी बोललो म्हनून तुला तरास जाला आसं व्हायाचं न्हाई. अडचन आता इतकीच झालीया की तुकोबांना तू भेटलास आसं त्ये म्हनतात. तू न्हाईस आसं जे म्यां म्हनतु त्ये म्हंजी चूकच जालं की. तर मला बी तुला भेटायचं हाय. तुकोबा म्हनतात तुला भेटाया त्ये डोंगरावर जाऊन ऱ्हायले. मी बी तयार हाये त्याला. फकस्त इतकंच म्हनतु की डोंगरावर गेलो म्हणून काई तू मला भेटाया यायचा न्हाईस. तितं जान्या आगुदर त्येंनी खूप कष्ट केले आसनार. साधना केली आसनार. त्याबिगर ह्ये तेज आलेलं न्हाई. तर इट्टला, मला येक सांग की तुला भेटायचं आसंल तर म्या कसा आभ्यास सुरू करू? कुटनं सुरुवात करू?

इतके बोलून आबा तुकोबांकडे वळून म्हणाला,

द्येवा, मला पांडुरंगास तुमच्यावानी भेटायचं हाय. तर म्या काय कराया हुवं त्ये त्यास्नी इचारलंय. आता तो म्हनंल तसं करीन.

आबाच्या आजच्या प्रश्नाला तुकोबांनी आधी अभंगातूनच उत्तर दिले –

बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त । तया सुखा अंतपार नाही ।।
येऊनी राहील अंतरी गोपाळ । सायासाचे फळ बैसलिया ।।
राम कृष्ण हरि मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारी वेळोवेळा ।।
तुका ह्मणे ऐसे देईन मी दिव्य । जरी होईल भाव एकविध ।।

आबा, पांडुरंगाला भेटायचं आहे ना तुम्हाला? अहो, तोच तुमच्या अंतरात येऊन बसेल! त्याला शुद्ध चित्त फार आवडते. ते तसे होण्यासाठी तुम्ही निवांत बसा आणि नामजप करा. याने तुम्हाला जे सुख लाभेल त्याला अंतपार नसेल. मी सांगतो आहे ते सोपे नाही हो… आपले मन शुद्ध करणे म्हणजे मनातले अनंत विचार नष्ट होऊन एक भाव तयार होणे. नामजपाचे दिव्य कराल तरच ते तुम्ही साधाल.

हे बोलता बोलता तुकोबा आबाकडे पाहात होते. त्याचा चेहेरा उतरत चालला होता. तो पाहून तुकोबांनी विचारले,

तयार आहात ना तुम्ही हे करायला?

आबाने थोडा वेळ घेतला, धीर केला आणि म्हणू लागला,

म्या आधीच म्हनलो की तुमी सांगाल ते करीन. पन येक सांगतु की जे मला नको त्येच तुमी माला कर म्हन्ता आहात. हरि म्हना इट्टल म्हना, त्ये ह्या दगडाचं नाव हाय. तुम्हांस्नी ज्ये भेटलं ते काईतरी येगळं हाय. ह्यो इट्टल म्हंजी फकस्त येक दगड हाय. कुनी बी येक दगड घेतुया, त्याला शेंदुर लावतुया आन मारूती म्हनतुया. तसाच हा इट्टल. आपल्यावानी दिसंल असा बनिवलेला येक दगड. त्येचं नाव घेत म्यां रातदिन बसायचं? द्येवा, तुमचं चित्त शुद्ध हाय ह्ये कुनी सांगावं लागत न्हाई. ज्यानं तुमच्याकडं पाहावं त्यानं त्येच म्हनावं. तसं हाय म्हनून तुमचं नांव आसं दूरपावतु जालंया. पन त्येच्याशी ह्यो इट्टलाचा संबंद काई न्हाई अासं मला तरी वाटतुया. द्येवा, ह्यो दगडाचं नाव घेन्यापरीस म्यां तुमचंच नाव अधिक आनंदानं घीन. तुमी माज्या समोर आहा. तुमची आठवन म्हंजी शुद्ध मनाची आठवन. ती म्या आनंदानं करीन. पन ह्यो दगड, त्याला लोक इट्टल म्हनतात, पांडुरंग म्हनतात त्येचं नांव घ्यायचं माज्या मनास पटंना. तरी पन द्येवा, मी ठरवलं हाय की तुमी म्हनाल त्ये आयकायचं. दुसरा काही मार्ग नसंल तर म्यां हरि हरि करंन. तुमच्यावर माजा ईश्वास हाय. ह्यो दगडाच्या द्येवार आजिबात न्हाई.

हे ऐकून तुकोबा शांतपणे म्हणाले –

पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ।।
सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं देव ते चि जाले ।।
उदका भिन्न पालट काई । गंगा गोड येरां चवी काय नाहीं ।।
तुका ह्मणे हें भाविकांचें मर्म । येरीं धर्माधर्म विचारावे ।।

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?