' “मला लग्नानंतर इस्लाम कबूल न केल्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागली…” – InMarathi

“मला लग्नानंतर इस्लाम कबूल न केल्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागली…”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वेगळ्या धर्मातल्या मुलीशी विवाह केल्यानंतर अनेकदा त्या मुलीला आपला धर्म बदलण्यासाठी भाग पाडलं जातं. धर्मांतरासाठी छळवाद मांडला जातो. यालाच रोखण्यासाठी “धर्मपरिवर्तन विधेयकावरुन” सध्या बऱ्याच चर्चा चालू आहेत.

नुकतंच उत्तरप्रदेश कॅबिनेटने या अध्यादेशाला मंजुरी दिली. अध्यादेशानुसार, धर्मपरिवर्तन करण्यास जबरदस्ती करणाऱ्यास एक ते पाच वर्षे कारावासाची शिक्षा व १५ हजार रुपये दंड असणार आहे. तसेच, अल्पवयीन व अनुसूचित जाती / जमातीमधील महिलांच्या धर्मांतरणासाठी तीन ते दहा वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंड असणार आहे.

यावरूनच वाद चालू असताना, दिवंगत संगीतकार वाजिद खान याच्या पत्नीने एका पत्रातून विवाहानंतर तिला धर्मांतर करण्यासाठी किती बळजबरी केली गेली याबद्दल लिहिले आहे. याच धर्मांधतेमुळे त्यांच्यातलं नातं संपुष्टात आलं असं तिने म्हट्लं आहे.

तिने काय लिहिलंय? 

 

 

“माझे नाव कमलरुख खान आहे. मी प्रसिद्ध दिवंगत संगीतकार वाजिद खान यांची पत्नी आहे. लग्न करण्याच्या आधी १० वर्ष आमचे प्रेमसंबंध होते.

मी पारशी आहे आणि तो मुस्लिम होता. आज-काल म्हटलं जातं त्याप्रमाणे आम्ही कॉलेजमधलं प्रेमी युगुल होतो. काही काळाने आमचा विवाह झाला. आम्ही प्रेमाखातर स्पेशल मॅरेज ॲक्‍टनुसार विवाह केला (या कायद्यानुसार विवाहानंतरही व्यक्तीचा स्वधर्म पाळण्याचा हक्क दिला अबाधित राहतो) आणि याचसाठी सध्या चालू असलेली धर्मांतरविरोधी कायद्यासंदर्भात चर्चा माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आजच्या युगातसुद्धा आंतरधर्मीय विवाहात महिलेला धर्मांतरासाठी पूर्वग्रहदूषित नजरा, दुःख आणि विषमता या अग्निदिव्यातून जावं लागतं. माझा हा अनुभव मला सांगायचा आहे.

पारशी घरातील माझं पालन-पोषण लोकशाही तत्त्वांवर आधारलेले होतं. विचारस्वातंत्र्य आणि साधक बाधक चर्चा या आमच्या घरातल्या नियमित गोष्टी. आमच्या घरात शिक्षणाला सर्वतोपरी प्रोत्साहन दिलं जायचं. विवाह झाल्यावर माझ्या सासरी स्वातंत्र्य, शिक्षण आणि लोकशाही मूल्य या गोष्टी निषिद्ध होत्या. तिथल्या वातावरणात सुशिक्षित, विचारी आणि स्वावलंबी स्त्री असणं अजिबात मान्य नव्हतं. तिथे माझ्या धर्मांतराला मी विरोध करणे ही अवमानकारक वागणुकी होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kamalrukh Kahn (@kamalrukhkhan)

मी नेहमीच सगळ्या धर्मांच्या विचारप्रणालींचा आदर ठेवत आले आहे, पण माझ्या इस्लाम धर्म स्वीकारण्याच्या विरोधामुळे आमच्या पती-पत्नीच्या नात्यात फूट पडली, त्या विखारामुळे आमचे वैवाहिक जीवन नष्ट होऊ लागले आणि माझ्या मुलांनाही याची झळ बसत होती.

पतीसाठी,  सासरच्यांसाठी माघार घेऊन इस्लाम स्वीकारण्याच्या आड माझी प्रतिष्ठा आणि स्वाभिमान येत होता. असे धर्मांतरण माझ्या नीतिमूल्यांमध्ये कदापि बसत नाही. माझ्या सुसंस्कारित मुलांसमोर- १६ वर्षांची अर्शी आणि ९ वर्षाचा रेहान – यांच्यासमोर मला खोलवर रुजलेल्या सडक्या पितृसत्ताक संस्थेचे उदाहरण ठेवायचे नव्हते.

जीवाचं रान करून मी संपूर्ण वैवाहिक आयुष्यात याविरुद्ध लढले आहे. ज्याचे परिणाम.. मला कुटुंबातून बहिष्कृत करणे, माझ्या धर्मांतरासाठी भीतीदायक कटकारस्थान रचणे, घटस्फोटासाठी कोर्टात खेचणे इथपर्यंत पोहोचले होते.

वाजिद हा अतिशय प्रतिभाशाली संगीत रचनाकार होता, त्याने संपूर्ण आयुष्य संगीतासाठी वाहून घेतले होते. त्याच्या पश्चात मला आणि माझ्या मुलांना वाजिदची उत्कटतेने आठवण येते. कधी कधी असं वाटतं की, ज्याप्रमाणे संगीताच्या बाबतीत त्याने धर्माधिष्ठित पूर्वग्रह ठेवले नाहीत, त्याप्रमाणे त्यानी आम्हाला देखील वागणूक दिली असती तर फार सुखद ठरले असते.

त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या धर्मांधतेमुळे आम्हाला त्या कुटुंबाशी समरस होता आले नाही. त्याच्या अकाली मृत्यूनंतरही मला त्याच्या कुटुंबीयांकडून छळवणूक सहन करावी लागत आहे. माझ्या मुलांच्या वारसा हक्कावर त्याच्या कुटुंबीयांनी ताबा मिळवला आहे, ज्या विरोधात मी आजतागायत लढते आहे. मी धर्मांतराला ठाम नकार दिल्याबद्दलचा द्वेष हेच यामागचे एकमेव कारण आहे. पोटच्या मुलाच्या मृत्यूने सुद्धा या खोलवर रुजलेल्या धर्मांध द्वेषाला तसूभरही ढळू दिले नाही.

आंतरधर्मीय विवाहात धर्मांतराचा पायी उठलेल्या विखारी वृत्तीमुळे, माझ्याप्रमाणे भरडल्या जाणाऱ्या स्त्रियांकरता धर्मांतराला विरोध करणारा कायदा आता देशपातळीवर पारित केला जावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. आपल्या हक्कांसाठी पाय रोवून उभ्या राहणाऱ्या स्त्रियांचा अनेक प्रकारे अपप्रचार सुद्धा केला जातो.

 

 

या धर्मांतराच्या दुष्टचक्रात “परधर्माचा पराकोटीचा द्वेष” हाच खरा शत्रू आहे. “आमचा धर्म तो एकमेव सत्य ,आमचाच प्रेषित तो एकमेव प्रेषित” असा गाजावाजा सतत सार्वजनिकरीत्या बडवत राहणे हे केवळ तिरस्कारास पात्र आहे.

वस्तुतः धर्म हा कुटुंबात दरी निर्माण करणारा नसून एकमेकांमधील विविधतेचा गौरव करणारा असावा. या धर्मांतर विरोधी कायद्यामुळे उद्भवलेल्या चर्चेतून, समाजात खोलवर रुजलेल्या पितृसत्ताक संस्थेला छेद दिला जावा, ज्याद्वारे बहुतांशी स्त्रियांवरच धर्मांतराची बळजबरी केली जाते.

सर्वांनी या धर्मांतराच्या मोहिमेचे सुप्त हेतू ओळखून घेतले पाहिजेत- जे  ‘इतर धर्मांविरुद्ध द्वेष पसरविणे आणि याविरोधात लढा देऊ पाहणाऱ्या स्त्रियांना, पती व कुटुंबापासून विभक्त करणे‘ हेच आहेत. सर्व धर्म दैवी अध्यात्माचा मार्ग दाखवतात. “जगा आणि जगू द्या” हा सर्वांचा धर्म व्हायला हवा.

लग्नानंतर धर्मांतर करण्यासाठी केल्या जाणाऱ्या जबरदस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. आज कमलरूख खानसारख्या अनेकजणी समाजात या छळवादाला सामोऱ्या जात आहेत. तुम्हाला याविषयी काय वाटतं? हा कायदा देशभर लागू केला जावा का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?