' बालाजी अवतार – “लग्नासाठी” घेतलेले कर्ज भगवान विष्णू आजही फेडत आहेत… – InMarathi

बालाजी अवतार – “लग्नासाठी” घेतलेले कर्ज भगवान विष्णू आजही फेडत आहेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा विनाश आणि धर्माची स्थापना या त्रिसुत्रीवर परमेश्वराने निरनिराळे अवतार घेतल्याचा उल्लेख भगवद्गीतेत आढळतो. त्याचेच एक प्रतिक म्हणजे
भगवान विष्णुचे दशावतार.

जेंव्हा जेंव्हा अधर्माचे ढग दाटून आले तेंव्हा भगवान श्रीविष्णु वेगवेगळ्या अवतारात प्रगटले या आशयाच्या अनेक कथा, कहाण्या आपण ऐकल्या आहेत. कधी कुर्म, कधी वराह, मस्त तर कधी वामन… प्रत्येक अवताराची कथा ही त्या अवताराइतकीच वेगळी, अर्थपूर्ण आहे.

 

dashavatar

 

अर्थात दशावतराच्या अनेक कथा पुस्तकप्रेमींच्या वाचनात सातत्याने येत असल्या तरी बालाजी अवतारामागची कथा मात्र फारशी कुणा ज्ञात नसते. किंबहुना या कथेबद्दल थोडीबहूत माहिती असली तरी त्यामागची पार्श्वभूमी फारशी चर्चिली जात नाही.

तिरुपती बालाजीचे मंदिर ठाऊक नाही असा एकही भारतीय नसावा. भारतीयच काय, पण तिरुपती मंदिरात परदेशी पर्यटकांची संख्या पाहिली की या मंदिराची भव्यता सातासमुद्रापार पोहोचल्याचा अंदाज आल्यावाचून रहात नाही.

त्या ‘लखलखत्या’ दुनियेत भक्तांची गर्दी कधी आपले नवस फेडताना दिसते, तर कधी मुंडण करण्यासाठी आतूर असते.

tirupati inmarathi

 

मात्र या झगमगाटात मंदिरात वसलेल्या बालाजी अवताराची कथा जाणून घेणं गरजेचं आहे. विष्णुने हा अवतार नेमका घेतला तरी कसा? त्यामागे काय प्रयोजन होते? या अवताराची समाप्ती कशी झाली? तिरुपती मंदिराला सधन मानण्यामागे या अवताराचा काही संदर्भ आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी अवताराची कथा समजणं महत्वाचं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

त्यासाठी आपल्याला समुद्रमंथनात डोकवावं लागेल. देव आणि राक्षसांमध्ये युद्ध पेटलं आणि समुद्र मंथनाला सुरुवात झाली. आकाश, पृथ्वी आणि पाताळ हे तिन्ही लोक अक्षरशः ढवळून निघाले, या समुद्रमंथनात अमृत आणि विषाचे कुंभ बाहेर पडले याच्याही अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील, मात्र याच मंथनातून चौदा रत्नांसह देवी लक्ष्मीही प्रगटल्या अशी आख्यायिका आहे.

लोभस रुप, भरजरी साज, रत्नांची आभुषणं आणि चेह-यावर विलसणारं हास्य… लक्ष्मीदेवींचे हे रुप पाहून देव-गणांमध्ये त्यांच्याशी विवाह करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली. आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करू लागला.

 

laxmi inmarathi

 

मात्र लक्ष्मीदेवीच्या मनाचा कौल कुणाचीही पारड्यात पडेना. अशातच निरपेक्ष वृत्तीच्या भगवान विष्णुंच्या गळ्यात लक्ष्मीदेवीने माळ घातली आणि हा विवाहसोहळा संपन्न झाला.

श्रीविष्णुंसाठी लक्ष्मीदेवी ही त्यांची प्राणप्रिय पत्नी असली तरी तिचे स्थान मात्र ह्रदयात नव्हते, याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. भगवान विष्णु हे सृष्टीचे निर्माते असल्याने जगाचे तारण हे त्यांचे आद्यकर्तव्य मानले जाते, त्यामुळे या कार्याला प्राधान्य देत विष्णुंनी लक्ष्मीदेवीला ह्रदयात स्थान न देता आपल्या वक्षस्थळी अढळ स्थान दिले अशी आख्यायिका आहे. पुढील अवतारात याच आख्यायिकेचा संदर्भ आढळतो.

जाणून घेऊ ही आख्यायिका…

एकदा भृगू ऋषी ब्रम्हदेवाकडे गेले पण ब्रह्मदेवाचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. ते सरस्वतीदेवीशी वार्तालाप करण्यात मग्न होते. आपली दखलही न घेतल्याने मुळातच कोपिष्ट भृगुऋषी ब्रह्मदेवावर कोपले, आणि त्यांनी ब्रम्हदेवाला शाप दिला की पृथ्वीवर तुझी कोणीही पुजा करणार नाही. असं म्हणत त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

brahma sarswati inmarathi

 

तिथून भृगूऋषी श्री महादेव शंकराकडे गेले, मात्र तिथे महादेव पार्वती एकमेकांशी चर्चा करण्यात व्यस्त!

 

shiv parvati inmarathi

 

तिथेही अपमानित झालेल्या भृगुऋषींनी महादेवाला शाप दिला की पृथ्वीवर तुझी केवळ लिंग पूजा होईल.

तिथून ऋषीश्वरांनी आपला मोर्चा श्रीविष्णूंकडे वळवला. श्रीविष्णू शेषशायी होते आणि लक्ष्मीदेवी त्यांची सेवा करत होत्या.

 

vishnu inmarathi

 

मात्र आपले स्वागत न झाल्याने पुन्हा एकदा ऋषीं कोपले. संतप्त ऋषी शाप उच्चारणार इतक्यात श्रीविष्णूंनी त्यांचे चरण धरून माफी मागितली. मात्र कोपलेल्या ऋषींनी त्यांच्या छातीवर लाथ मारली, तरीही श्रीविष्णूंनी त्यांचा राग शांत केला.

 

bhrigu hrishi

 

अखेर राग निवळल्याने भृगुऋषींनी तिथून प्रस्थान केलं.

हा प्रकार पाहून लक्ष्मीदेवी मात्र नाराज झाल्या. “ज्या वक्षस्थळात माझं स्थान आहे, त्याच जागी ऋषीश्वरांनी तुमच्यावर लथ्थाप्रहार केला, याचाच अर्थ त्यांनी हल्ला केला. इतकं असूनही तुम्ही त्यांना शिक्षा केली नाहीत, समज सुद्धा दिली नाहीत.” भगूर ऋषींना सडेतोड उत्तर न दिल्यामुळे नाराज झालेल्या लक्ष्मीदेवींना, विष्णुदेवाने समजवण्याचा प्रयत्न केला मात्र आपला हट्ट न सोडता रागात लक्ष्मीदेवी तिथून निघून गेल्या.

भगवान विष्षुने आपल्यी प्रिय पत्नीचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सगळ्या जागा धुंडाळल्या मात्र नाराज होवून गेलेल्या लक्ष्मीदेवीचा पत्ता लागेना.

अखेर विष्णुंनी आपल्या दिव्यदृष्टीच्या सहाय्याने ताडले की लक्ष्मीदेवी पृथ्वीवर पद्मावती या नावाने जन्म घेणार आहे. अखेर देवीची समजून घालण्यासाठी विष्णुदेवानेही पृथ्वीवर व्यंकटेश्वर या नावाने जन्म घेतला. हे रुप म्हणजेच तिरुपती बालाजी.

विधिलिखीताप्रमाणे काही काळानंतर व्यंकटेश आणि पद्मावती यांचा विवाह निश्चित झाला. या विवाहाचा खर्च आणि आपल्या प्रिय पत्नीला भेट देण्यासाठी व्यंकटेशला (विष्णु) आर्थिक तजवीज करणे भाग होते.

 

 

vishnu wedding inmarathi

 

याबाबत अशी आख्यायिका आहे की, विवाहासाठी आर्थिक तजवीज करण्यासाठी व्यंकटेशाने कुबेराकडे मदत मागितली आणि कर्जाच्या स्वरुपात काही रक्कम घेत विवाह सोहळा संपन्न झाला.

असा समज आहे की, कुबेराकडून कर्ज घेताना भगवान विष्णुंनी कलीयुगाच्या अखेरीपर्यंत हे कर्ज भेडण्याचे आश्वासन दिले होते, हाच समज कायम ठेवून तिरुपती बालाजी या मंदिरात भक्त मोठ्या संख्येने दानधर्म करतात, सोनं अर्पण केलं जातं, रुपयांच्या राशी उभ्या केल्या जातात.

कारण अनेक भक्तांमध्ये असा समज आहे की विष्णुला अद्याप कुबेराचं कर्ज फेडायचं असून हे कर्ज फेडण्यासाठी भक्तांकडून हातभार लावला जातो. म्हणूनच आज तिरुपती बालाजी हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखलं जातं.

 

tirumala tirupati inmarathi

 

व्यंकेटश अर्थात विष्णुला गोविंदा, तिरुपती, बालाजी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. तिरुपतीच्या मंदिरात किंवा तिरुमला पर्वतावर गोविंदा, गोविंदा हा गजर आसमंतात भरून राहतो.

सिनेसृष्टीतील कलाकारांपासून सामान्यांपर्यंत सा-यांचाच तिरुपती मंदिराकडे ओढा असतो. मंदिरातील भव्यता, बालाजीचे सुवर्णरुप, तिरुपती संस्थानाचे काही कठोर नियम या सा-याचा एकदातरी अनुभव घ्यावा यासाठी भक्तांची धडपड असते.

बालाजीच्या मस्तकावर चंदन लावण्याची प्रथा असो वा मंदिरातील गर्भगृहात चोवीसतास अखंड तेवणारी ज्योत, मंदिरातल्या प्रत्येक भागाशी एक स्वतंत्र कहाणी सांगितली जाते.

 

lord vishnu inmarthi

 

अनेकांच्या मते या सा-या आख्यायिका आहेत, त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा वैयक्तिक प्रश्न असला तरी त्यातून मिळणारा संदेश ज्याला कळला तोच खरा विष्णुभक्त.

हा कथा केवळ पौराणिक आख्यायिका नसून शतकानुशतके तिरुपती मंदिराची वास्तु भक्तांना काही सुचवू पहात आहे. कथेचे सार सांगते की, विवाहाच्या प्रसंगासाठी आर्थिक विवंचनेत अडकलेल्या व्यंकटेशाला कुबेराने मदत केली, त्यासाठी ब्रम्हदेवासह शंकरानेही साक्ष देत कर्ज मान्य झाले, मात्र ते ऋण आजही फिटलेले नाही किंबहुना त्या परोपकाराची आठवण पुसू न देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आपल्या संकटकाळात कोणीही केलेल्या मदतीचा कधीही विसर पडू न देण्याची शिकवण हिंदु धर्मात सांगितली जाते. या संस्काराचे मुळ कदाचित या कथेत दडले आहे. व्यंकटेश-पद्मावतीच्या विवाहाला किती काळ लोटला याची गणना नाही. मात्र आपल्या कुबेराचे ऋण भेडण्याची प्रथा कलियुगातहीही पाळली जाते याचाच अर्थ ‘कृतज्ञता’ ही शिकवण विष्णुदेवाकडून आजही आपल्याला मिळते.

लाखो भक्तगण तिरुपती मंदिरात जे दान करतात, त्यामागे ‘देवाचे ऋण भेडण्यास आपलाही हातभार’ हा एकमेव उद्देश नसून भगवान विष्णुच्या शिकवणीचे पालन हा देखील महत्वाचा भाग आहे.

 

gold inmarathi

 

केवळ मंदिराच्या चार भिंतीतच नव्हे तर आपल्या दैनंदिन आयुष्यातही कृतज्ञता जपली जाणं गरजेचं आहे. आपले जन्मदाते, संस्कार करणारी वडिलधारी माणसं, विद्या देणारे शिक्षक या आणि आपल्या कठीण काळात आपल्याला मदतीचा हात देणारी प्रत्येक व्यक्ती यांच्या उपकारांची परतफेड केल्यानंतरही जे त्याची जाण ठेवतात, आयुष्यभर त्यांना मान देतात त्यांनाच भगवान विष्णुंचाा खरा संदेश गवसला असं म्हणता येईल.

या सा-या आख्यायिकांवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न मात्र

शतकानुशतके भक्तांच्या कैवारासाठी तिरुपती मंदिरात उभा असलेला बालाजी अनेकांचे आराध्यदैवत आहे हे मान्य करायलाच हवे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?