' बायकोने दिलेल्या चॅलेंजमधून तयार झाली किचनमधील सर्वात उपयुक्त वस्तू! – InMarathi

बायकोने दिलेल्या चॅलेंजमधून तयार झाली किचनमधील सर्वात उपयुक्त वस्तू!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या घरकामात आपण सगळेच सध्या आधीपेक्षा जास्त मदत करत आहोत. स्वयंपाकघर हा प्रांत आता सर्वांसाठीच खुला झालेला आहे.

‘वर्क फ्रॉम होम’ हे कल्चर सुरू झालं आणि ते कधी काही प्रमाणात का होईना पण ‘वर्क फॉर होम’ झालं हे आपल्याला कळलं सुद्धा नाही.

आज आपण ऑफिस मध्ये कोणत्याही पोस्ट वर काम करत असलो तरीही घरी असल्यावर आपण सगळेच एक विनम्र विद्यार्थी म्हणून स्वयपाक घरातील कामं शिकत आहोत आणि आपल्या परीने योगदान देत आहोत.

घरात मदत करतांना जर का आपल्याकडून काही नवीन शोध लागला किंवा एखादं उत्पन्नाचं साधन निर्माण झालं तर त्याहून मोठा दुसरा आनंद नाहीये.

मुंबईत राहणाऱ्या एका दाम्पत्यासोबत असंच झालं. घरातली एक वस्तू खराब झाली आणि ती दुरुस्त करण्याच्या प्रयत्नाने त्यांना एक बिजनेस मॉडेल मिळालं. ज्यामुळे त्यांचं पुढचं आयुष्यच बदलून गेलं.

श्री. सत्य प्रकाश माथुर यांची ही सत्य कथा आहे.

 

satya prakash mathur inmarathi

 

१९६० च्या दशकात सत्य प्रकाशजी हे मुंबईतील सीमेन्स इंडिया कंपनीत काम करायचे. एके दिवशी त्यांना घरातून एक असा आवाज आला की, “ते मिक्सर बिघडलंय. दुरुस्त करून आणा आधी…”

स्वातंत्र्योत्तराच्या त्या काळात भारतात मिक्सर हे सगळे परदेशातून इम्पोर्ट केलेलेच असायचे. सत्य प्रकाश यांच्या घरी सुद्धा Braun मिक्सी या जर्मन ब्रँडचं मिक्सर होतं जे की बिघडलं होतं.

इंजिनियर असलेल्या सत्य प्रकाश यांना मिक्सर बघून हे लक्षात आलं होतं की, हे परदेशातील मिक्सरची पाते, मोटर ही भारतीय मसाल्याच्या पदार्थांसाठी बनलेलंच नाहीये.

आपल्याकडे मिक्सर मधून काढलं जाणारं दोसा पीठ, डाळीची चटणी, खोबरं हे थोडीच जर्मन मंडळी थोडीच त्यांच्या मिक्सर मधून काढत असतील. तिकडे तर ज्यूस वगैरे सॉफ्ट गोष्टींसाठी मिक्सर चा वापर होत असावा.

भारतीय किचन मधून निदान दोन-तीन दिवसातून एकदा तरी जेव्हा ३ लेवल वर मिक्सर फिरण्याचा आवाज येतो, तेव्हाच इथे कोणी तरी राहतं असं आपल्याला वाटतं.

सत्य प्रकाश यांनी बिघडलेलं मिक्सर दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला. पण, मिक्सर काही केल्या दुरुस्त होत नव्हतं. मोटर बदलता येत नव्हती. पार्ट्स उपलब्ध नव्हते आणि जर्मनीहून मागवण्याची किंमत अर्थातच परवडणारी नव्हती.

त्यांच्या पत्नी माधुरी माथुर यांनी सत्य प्रकाश यांना चॅलेंज केलं की, “तुम्ही पण इंजिनियर ना. करा की मग हे दुरुस्त…”

 

mixer 2 inmarathi

 

नवऱ्याला जेव्हा असं चॅलेंज येत असतं तेव्हा तो काहीही करायला तयार होत असतो. मिक्सर दुरुस्त तर फार छोटी गोष्ट आहे. सत्य प्रकाश यांनी बघितलं की, मिक्सर ची मोटर दुरुस्त करणं काही सोपं नव्हतं.

त्या ऐवजी सत्य प्रकाश यांनी चॅलेंजचा मान ठेवत एक असं मिक्सर तयार केलं ज्याची की मोटर ही जर्मन मिक्सर पेक्षा पॉवरफुल असेल.

मोटर अश्या पॉवरची निवडली होती जी की भारतीय खाद्य पदार्थांसाठी योग्य होती. त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. माधुरी माथूर यांना आपल्या नवऱ्याने तयार केलेलं मिक्सर अर्थातच खूप आवडलं.

माथुर दांपत्याने असं वाटलं की, भारतीय पदार्थ तयार करतांना मिक्सर ची ही समस्या इतर लोकांना सुद्धा नक्कीच येत असेल.

दोघांनी विचार पक्का केला आणि १९६३ मध्ये श्री. सत्य प्रकाश माथुर यांनी ‘पॉवर कंट्रोल अँड अप्लायन्सेस’ नावाची मिक्सर तयार करण्याची कंपनी सुरू केली. सत्य प्रकाश हे काम करत असलेल्या सीमेन्स इंडिया मधून त्यांना चार कलीग ने सुद्धा त्यांना जॉईन केलं.

१९६५ मध्ये माथुर कुटुंबीयांनी मिळून मिक्सर साठी योग्य असणारी इलेक्ट्रिक मोटर आणि डिझाईन यावर खूप काम केलं.

१९७० पर्यंत सुमीत मिक्सर हे ‘एकच जाड कोरड्या पदार्थांसाठी आणि ज्यूस साठी सुद्धा’ या पद्धतीने विकलं जायचं. मिक्सर तयार करतांना आणि विकताना त्यासोबतच विकाव्या लागणाऱ्या भांड्यांचा सुद्धा खूप विचार करावा लागत असतो.

Sumeet (सुमीत) हे आपल्या मिक्सर चं नाव त्यांनी फायनल केलं. विशिष्ठ पद्धतीने मिक्सर वर हे नाव लिहिलेलं असायचं. आपल्या पैकी प्रत्येकाने हे मिक्सर कधी न कधी नक्की बघितलं असेल. काही जणांकडे आजही हे मिक्सर वापरलं जात असेल.

 

sumeet mixer inmarathi

 

हे इतक्या विश्वासाने सांगायचं कारण हे की, १९८० च्या दशकात ‘पॉवर कंट्रोल अँड अप्लायंसेस’ या कंपनी ने दर महिन्यात ५०,००० मिक्सर विकण्याचा एक विक्रम केला होता.

किती तरी वर्षांपर्यंत ‘Sumeet’ हा मिक्सर चा एकमेव ब्रँड होता. घरकामातील अत्यावश्यक गोष्ट म्हणून लवकरच ‘मिक्सर’ ही गोष्ट नावारूपास आली. प्रत्येक गृहिणी साठी मिक्सर असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झाली.

ब्रँड कसा तयार केला?

‘सुमीत’ हा ब्रँड तयार करण्यासाठी माथुर दांपत्याने एकत्र येऊन काम केलं. माथुर यांनी जाहिरात करण्यासाठी लोन काढलं आणि त्यांनी स्वतःच ‘Sumeet’ हा लोगो डिझाईन केला.

‘सुमीत’ हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ ‘चांगला मित्र’ असा होतो. लोकांनी सुमीत मिक्सरला लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला आणि काही ग्राहकांना काही चांगल्या प्रतिक्रियेत लिहिलं आहे की,

” Sumeet हे आम्ही १९७४ मध्ये विकत घेतलेलं मिक्सर आहे. इतक्या वर्षात आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या ब्रँडचे मिक्सर वापरले आहेत, पण सर्वात चांगला अनुभव आम्हाला ‘सुमीत’ कडून मिळाला आहे. भारतीय पदार्थांसाठी आणि त्यातल्या त्यात दक्षिण भारतीय पदार्थांसाठी तर Sumeet हा सर्वोत्तम पर्याय आहे.”

भारतातील लोकांसाठी आणि जगभरातील भारतीयांसाठी आजही सुमीत हा एक विश्वासार्ह ब्रँड आहे.

५६ वर्षांपूर्वी निर्माण झालेला हा ब्रँड आजही तितकाच तरुण आहे आणि आज सुमीत मिक्सर ची जवाबदारी ही त्यांचा मुलगा श्री. अजय माथुर हे सांभाळतात.

सुमीत मिक्सर आणि त्यानंतर बाजारात आलेल्या मिक्सर मध्ये हा फरक आहे की, Sumeet मिक्सर हे कोणत्याही मार्केट रिसर्च शिवाय आणि मार्केटिंग च्या पद्धतीनुसार बाजारात आणलं गेलं नव्हतं.

 

sumeet mixer featured inmarathi

 

 

या मिक्सरचा शोध किंवा त्याची निर्मिती ही केवळ एका गरजेपोटी झाली होती.

श्री. सत्य प्रकाश माथुर यांच्या निधना नंतरचा काही काळ हा सुमीत मिक्सर साठी कठीण होता. कारण, तोपर्यंत बाजारात आलेल्या नवीन कंपन्यांनी सुमीतच्या डिझाईन्स ची कॉपी करून सारखीच वस्तू कमी दरात द्यायला सुरुवात केली होती.

यातून योग्य ती शिकवण घेऊन आज Sumeet हे इंडक्शन कुकर, रोटी मेकर आणि एअर कुलर सारख्या वस्तूंचं उत्पादन सुरू करून मार्केट मध्ये आपलं स्थान टिकवलं आहे.

ऑनलाईन शॉपिंग च्या या काळासोबत सुमीत ग्रुप ने स्वतःचं रूप सुद्धा बदललं आहे. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सुमीत इंडियाच्या वेबसाईट वरून आजही सुमीत चे मिक्सर आपल्याला मिळू शकतात.

‘मेक इन इंडिया’ आणि ‘वोकल फॉर लोकल’ च्या या काळात आपणही भारतीय उत्पादनांना प्रथम प्राधान्य देऊया आणि आपलं घर हे जास्तीत जास्त भारतीय वस्तूंनी सजवूया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?