' टाटा सुमो हे नाव महाकाय सुमोंमुळे पडलं आहे की आणखी काही, वाचा रंजक इतिहास! – InMarathi

टाटा सुमो हे नाव महाकाय सुमोंमुळे पडलं आहे की आणखी काही, वाचा रंजक इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपला महाराष्ट्र हा ऑटोमोबाईल क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे. बजाजची रिक्षा असेल किंवा टाटाचा अवजड ट्रक असेल, मर्सिडीज कार असेल किंवा शेतकऱ्यांचा मित्र महिंद्रा ट्रॅक्टर असेल ही सगळी वाहनं आपल्या महाराष्ट्रातच बनतात.

या बलाढ्य ऑटोमोबाईल क्षेत्रामुळे हजारो लोकांना महाराष्ट्रात कामाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कित्येक छोटे आणि मध्यम उद्योग हे या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात उभे राहिले आहेत.

सामान्य माणसांना याबद्दल कमी माहिती असते कारण ऑटोमोबाईल क्षेत्र हे फार कमी वेळेस चर्चेत असतं.

 

automobile inmarathi

 

आपण फक्त पुणे जिल्ह्याच्या प्रायव्हेट सेक्टरचा विचार केला तर लक्षात येईल की टाटा मोटर्स किंवा टेल्को या ग्रुपची सुरुवात पुण्यातून झाली आणि त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात एक औद्योगिक वातावरण निर्माण झालं.

पुणे हे सध्या फक्त शिक्षणाचं नाही तर ऑटोमोबाईल क्षेत्राचं सुद्धा माहेरघर म्हणून नावारूपास आलं आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्राची महाराष्ट्रात झालेल्या या भरभराटीसाठी आपण ‘सुमंत मुळगावकर’ या मराठी माणसाला धन्यवाद दिले पाहिजेत. सुमंत मुळगावकर हे नाव सर्वांच्या परिचयाचे आहेच.

पण, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हे सांगणं की, या माणसाच्या कार्याचा गौरव म्हणून टाटा मोटर्स या प्रतिष्ठित ग्रुप ने आपली परंपरा बाजूला ठेवून त्यांच्या पहिल्या SUV गाडीला एका व्यक्तीच्या नावाच्या अद्याक्षरासोबत जोडलं.

ती गाडी आहे टाटा सुमो. १९९४ मध्ये लाँच झालेली ही SUV गाडी मिल्ट्री च्या वापरासाठी डिझाईन करण्यात आली होती. १९९७ पर्यंत १ लाख टाटा सुमो विकल्या गेल्या होत्या.

‘रिअर व्हील ड्राईव्ह’ म्हणजेच मागच्या चाकांमध्ये गाडी पुढे नेण्याची क्षमता असलेल्या या कारला ‘ऑफ रोड’ चालवणे सुद्धा सहज शक्य आहे.

हे टाटा सुमोचं वैशिष्ट्य होतं, ज्यामुळे फक्त जीप वर थांबलेल्या या सेगमेंटचं रूप पालटून टाकलं आणि भारतीयांना एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला.

‘टाटा सुमो’ नावातील ‘सुमो’ ही तत्कालीन टाटा मोटर्स चे मॅनेजिंग डायरेक्टर, पद्मभूषण श्री. सुमंत मुळगावकर सरांच्या नावातील अद्याक्षरं आहेत. 

 

sumo inmarathi

 

Sumo हा शब्द सुमंत – Sumant मधील Su आणि मुळगावकर – Moolgaonkar मधील Mo हे एकत्र करून देण्यात आलं आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण आहे.

टाटा या प्रतिष्ठित ग्रुप कडून एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा इतका मोठा गौरव होण्याची ही पहिलीच वेळ होती.

आपल्यापैकी ज्यांनी पण टाटा मोटर्स, पिंपरीला भेट दिली असेल त्यांना त्या प्लांट मधील सुमंत मुळगावकर सरांची खुर्चीवर बसलेली बसलेली मूर्ती नक्की डोळ्यासमोर येईल.

त्या पूर्ण जागेत फक्त २ जणांच्या मूर्ती आहेत. पहिले म्हणजे जमशेदजी टाटा आणि दुसरे आपले सुमंत मुळगावकर सर. यावरूनच त्यांच्या कार्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.

टाटा सुमो लाँच झाल्यावर असा समज होता की सुमो म्हणजे जपानी कुस्तीपटू ‘सुमो wrestlers’ सारखी मजबूत गाडी म्हणून हे नाव टाटा ग्रुप ने सुमो हे नाव दिलं आहे.

पण, त्यांचा टाटा सुमोच्या नावाशी काहीच संबंध नाहीये. काय योगदान आहे सुमंत मुळगावकर यांचं या पूर्ण प्रवासात? जाणून घेऊयात.

५ मार्च १९०६ मध्ये मुंबई मध्ये जन्मलेल्या सुमंत सरांनी आपलं इंजिनियरिंग शिक्षण हे इंपेरियल कॉलेज ऑफ लंडन मधून १९२९ या वर्षी पूर्ण केलं होतं.

त्यांच्या करिअर ची सुरुवात त्यांनी CP सिमेंट वर्क्स – आजच्या ACC सिमेंट मधून इंजिनियर म्हणून केली होती. १९३० मध्ये जॉईन केलेल्या या ग्रुप च्या ११ कंपन्यांचे ते १९४४ मध्ये प्रमुख म्हणून काम बघत होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जेव्हा अवजड मशीन्स भारतात येणं बंद झालं होतं, तेव्हा त्यांनी १९४६ मध्ये सिमेंट ग्राइंडिंग मशीन पहिल्यांदा भारतात बनवली होती.

१९४९ मध्ये सुमंत मुळगावकर सरांनी टाटा इंडस्ट्रीज चा डायरेक्टर म्हणून पदभार स्वीकारला. त्यासोबतच ते टाटा लोकमोटिव्ह अँड इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड (TELCO) हे इनचार्ज म्हणून काम बघत होते.

 

sumant moolgaonkar inmarathi

 

भारतात अवजड उद्योगाची सुरुवात करणारा तो काळ होता. १९६६ मध्ये टाटा स्टीलचे वाईस चेअरमन आणि टाटा एक्सपोर्टस लिमिटेड, टाटा कन्सल्टिंग चे चेअरमन अशी अत्यंत जवाबदरीचे पद ते एकाचवेळी भूषवत होते.

यापैकी टाटा एक्सपोर्ट्स ही कंपनी भारतात तयार होणाऱ्या वस्तूंचा एक्स्पोर्ट वाढवण्याच्या हेतूने झाली होती. तर, टाटा कन्सल्टिंग ही इंजिनियरिंग प्रोजेक्ट्स ला सेवा पुरवणारी कंपनी होती.

टाटा मोटर्स पुणेचा कारभार बघताना त्यांच्या एका सवयीची खूप चर्चा झाली होती. सुमंत सर हे रोज कंपनीतून दुपारच्या जेवणाच्या वेळी गायब व्हायचे. सगळे त्यांचे कलीग त्यांना शोधायचे, पण ते कधीच लंचला कोणाला भेटत नसत.

जेवणाच्या वेळेच्या नंतर ते उशिरा जागेवर परतायचे. टॉप मॅनेजमेंट पर्यंत ही गोष्ट पोहोचली. काहींना अशी शंका आली की, सुमंत सर हे रोज एखाद्या डीलर ने आयोजित केलेल्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवणासाठी जात असावे.

खात्री करून घेण्यासाठी एक दिवस एका कर्मचारी ने सुमंत सरांचा लंच ब्रेक मध्ये पाठलाग केला.

सुमंत सरांची कार ही एका ढाब्या समोर पार्क केलेली होती. ते त्या ढाब्यात बसून ट्रक ड्रायव्हर्स सोबत जेवण करत होते आणि त्यांच्याकडून टाटा च्या ट्रक बद्दल त्यांचा विचार जाणून घ्यायचे.

लंच नंतर ते डायव्हर कडून ऐकलेल्या तक्रारीच्या नोट्स तयार करायचे. स्वतः त्यावर विचार करायचे आणि योग्य आणि शक्य असलेल्या सुधारणा डिझाईन आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम ला करण्यास सांगायचे.

 

sumo 2 inmarathi

 

माणसं उगीच मोठ्या पोस्टवर जात नाहीत. हे सुमंत सरांनी त्यांच्या वागणुकीतून दाखवून दिलं होतं. त्यांच्या या टेक्निकल ज्ञान आणि व्यवस्थापकीय कौशल्य बघून त्यांना भारत सरकारने प्लॅनिंग कमिशनचे सदस्य म्हणून नेमलं होतं.

त्यासोबतच ते इंजिनियरिंग कॅपेसिटी अँड सर्वे कमिटी, गव्हर्नमेंट हाऊसिंग फॅक्टरी अँड मशीन टूल डेवलपमेंट चे ते चेअरमन होते. मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अँड डिफेन्सचे ते सल्लागार सुद्धा होते.

प्रोडक्शन क्षेत्रातील योगदान बघून त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ प्रॉडक्शन इंजिनियर्स कडून Sir Walter Puckey या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

सुमंत सरांनी शिक्षण घेतलेल्या इंपेरियल कॉलेज, लंडन ने त्यांना Honorary Fellow आणि Honorary Life Member या उपाधी प्रदान केल्या होत्या.

टाटा ग्रुप ला आणि उद्योग जगताला दिलेल्या या योगदानामुळेच टाटा मोटर्स ने त्यांच्या पहिल्या SUV गाडी टाटा सुमो ला हे नाव देण्याचं ठरवलं.

टाटा मोटर्स ला सुमंत सरांच्या कामाच्या पद्धतीमुळे आजही त्यांच्या वाहन आणि इतर उद्योगात सुधारणा करत राहण्याच्या कल्पना सुचतात. टेल्को हे त्यांच्यासाठी फक्त कंपनी नसून एक विश्व होतं.

भारत औद्योगिक क्षेत्रात जगात अग्रस्थानी असू शकतो या गोष्टीवर त्यांचा गाढ विश्वास होता.

 

sumant sir inmarathi

 

आपल्या कामासोबतच सुमंत सरांना नेचर फोटोग्राफी ची आवड होती. सर एक पर्यावरण प्रेमी सुद्धा होते. याच कारणामुळे टाटा स्टील, जमशेदपुर आणि टाटा मोटर्स, पुणे या दोन्ही प्लॅन्ट मध्ये आपल्याला खूप वेगवेगळया प्रकारची झाडं सुद्धा बघायला मिळतात.

१ जुलै १९८९ रोजी सुमंत मुळगावकर सरांनी जगाचा निरोप घेतला. बॉम्बे हाऊस या टाटा ग्रुप च्या मुंबई येथील मुख्यालयात आजही या दिवशी त्यांची आठवण काढली जाते.

एका आयुष्यात इतकी पदं सार्थपणे भूषवणारे आणि आपल्याला उद्योगाची दिशा दर्शवणारे सुमंत मुळगावकर सर हे कायमच वंदनीय असतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?