'एसटीडी बूथ ते १४० कोटींची उलाढाल; अरुण खरात यांनी उभारलंय शून्यातून विश्व!

एसटीडी बूथ ते १४० कोटींची उलाढाल; अरुण खरात यांनी उभारलंय शून्यातून विश्व!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काही ना काही ध्येय उराशी बाळगून जगत असतो. काहीजण ते ध्येय फार कमी काळात गाठतात, तर काहीजणांना आयुष्यभर खस्ता खाऊनही अपेक्षित यश मिळत नाही.

काहीजण उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी सुरुवातीला थोडेफार कष्ट घेतातही, पण कालांतराने वाटेत येणाऱ्या आव्हानांपुढे त्यांचा निग्रह कमी पडतो आणि पदरी पडलेल्या यशात समाधान मानून ते आपली वाटचाल करतात.

मात्र फार थोडे लोक असे असतात, जे सगळ्या प्रकारच्या आव्हानांना तोंड देत शेवटपर्यंत आपले प्रयत्न सोडत नाहीत आणि आपल्या क्षेत्रात यशस्वी होतातच. उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात अशी उदाहरणे सर्वत्र पहावयास मिळतात.

मोठी स्वप्ने पाहणाऱ्या लोकांना जगात अनेकदा थट्टेला सामोरे जावे लागते, पण मोठी स्वप्ने पाहिल्याशिवाय ती पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करता येत नाहीत. “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे” ही उक्ती व्यावसायिक आणि उद्योजकांच्या बाबतीत बऱ्याच वेळेस खरी ठरलेली दिसते.

अरुण खरात यांची कथा अशीच काहीशी आहे. सर्वसामान्य घरात जन्माला आलेले अरुण खरात आज वर्षाकाठी १४० कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. लहान एसटीडी बूथ पासून ते मोठ्या कंपनीच्या मालकीपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आणि नवउद्योजकांसाठी तेवढाच प्रेरणादायी आहे.

 

arun kharat inmarathi1

 

अरुण खरात हे ‘विंग्स ट्रॅव्हल्स’ या कंपनीचे संस्थापक आहेत. ‘विंग्स ट्रॅव्हल्स’ ही एक कार रेंटल कंपनी असून तिचे जाळे संपूर्ण भारतभर मुंबई, पुणे, गुडगाव, चेन्नई अशा जवळपास ४७ शहरांत पसरले आहे. याशिवाय भारताबाहेरही म्यानमार आणि थायलंड मध्ये विंग्स ट्रॅव्हल्स आपली सेवा देते.

अरुण खरात यांचा जन्म पुण्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील पुणे कॅन्टोन्मेन्ट बोर्ड मध्ये कार्यरत होते. १० वी झाल्यानंतर आपले काका सांभाळत असलेले वडिलोपार्जित चपलांचे दुकान पाहून त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय उभारण्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली.

शिकण्याऐवजी एखादा व्यवसाय सुरू करावा असे त्यांच्या मनात होते, पण घरच्यांच्या आग्रहास्तव आधी शिक्षण पूर्ण करावे या उद्देशाने त्यांनी पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतनात यंत्र अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्यांनी SKF Bearings या कंपनीत ३ महिने ट्रेनी इंजिनिअर म्हणून काम केले.

त्यानंतर त्यांना टेल्को म्हणजेच आत्ताच्या टाटा मोटर्स मध्ये संधी मिळाली. तेथेही त्यांनी ९ महिने काम केले. यानंतर अरुण पुन्हा नोकरी बदलून सुदर्शन केमिकल्स या कंपनीत महिना १८०० रुपये पगारावर रुजू झाले.

 

arun kharat inmarathi3

 

नोकरी करत असूनही अरुण खरात मनातून मात्र आपला स्वतःचा व्यवसाय करण्याचेच स्वप्न बघत होते. त्यांना प्रवासाची फार आवड होती आणि जगप्रवास करण्याचे त्यांचे स्वप्न होते. नोकरी सुरू होतीच, त्याबरोबर अरुण यांनी एक लहानशी जागा भाड्याने घेऊन एक एसटीडी बूथ सुरू केला.

कंपनीत ते मोठ्या पदांवरील व्यक्तींना सतत परदेशवारी करताना बघत होते. ते पाहून त्यांचा वाहतूक आणि पर्यटन व्यवसायातील रस वाढला. बूथ बरोबरच वडिलांकडून २००० रुपये उसने घेऊन एक मोठ्या बस ऑपरेटरसाठी बुकिंग एजंट म्हणून काम करायला सुरुवात केली.

काही काळातच त्यांनी रेल्वे तिकीट बुकिंगचीही सुरुवात केली. १९९३-९४ मध्ये त्यांनी सर्वप्रथम कार रेंटल व्यवसायाची सुरुवात केली. त्यांचे पहिले ग्राहक हे त्यांच्याच कंपनीतील वरिष्ठ अधिकारी होते. सुरुवातीला इतर गाड्या भाड्याने घेऊन त्यांनी सुरुवात केली.

१९९६-९७ मध्ये त्यांनी व्यवसायासाठी प्रथम फियाट आणि मग अँबेसिडर अशा दोन सेकंड हँड गाड्या विकत घेतल्या. त्या काळात अरुण यांचा दिनक्रम अगदी भरगच्च असायचा. दुपारी ३ पर्यंत कंपनीत काम केल्यावर संध्याकाळी काही तास ते आपल्या वडिलोपार्जित दुकानात जायचे. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आपल्या एजन्सीचे काम करत असत.

जर व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल, तर त्यात पूर्णपणे झोकून देऊन उतरले पाहिजे याची अरुण यांना जाणीव होतीच. यासाठी त्यांनी सुदर्शन केमिकल्समधील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णपणे व्यवसायात उतरले. दरम्यान त्यांनी पुण्यात बिझनेस मॅनेजमेंटच्या अर्धवेळ पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. तेथेच त्यांची भेट भारती यांच्याशी झाली आणि १९९५ मध्ये त्यांनी लग्न केले.

 

arun kharat inmarathi2

यानंतरच्या काळात त्यांना पाहिले मोठे काम मिळाले. इ-फंड्स इंटरनॅशनल या कंपनीसाठी कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्याचे कंत्राट त्यांना मिळाले. त्यासाठी अरुण पुण्याहून मुंबईला गेले. त्या वेळेस एकूण ३ गाड्या वापरून त्यांनी काम सुरू केले. चालकांना विश्रांतीसाठी तसेच ऑफिससाठी त्यांनी मुंबईत एका चाळीत खोली भाड्याने घेतली.

हळू हळू त्यांच्या उद्योगाचा विस्तार होत होता. अशातच त्यांना ट्रॅकमेल या आणखी एका BPO कंपनीचे कंत्राट मिळाले. ‘विंग्स ट्रॅव्हल्स’ आता आपले पंख पसरून झेपावू लागले होते. २००१ मध्ये ‘विंग्स ट्रॅव्हल्स’ची वार्षिक उलाढाल १ कोटींच्या घरात पोचली. तसेच ३० वेगवेगळ्या कंपन्यांना ७०-८० गाड्यांच्या साहाय्याने वाहतूक सेवा यशस्वीपणे दिली जाऊ लागली.

यानंतरच्या वर्षांत अरुण यांच्या कंपनीने आपला प्रगतीचा आलेख उंचावतच ठेवला. २००८-०९ मध्ये त्यांची उलाढाल ६० ते ७० कोटी रुपये एवढी होती ज्यातून ७० वेगवेगळ्या कंपन्यांना वाहतूक सेवा पुरवली जात होती.

अरुण यांनी इतरांप्रमाणे सरधोपट मार्गाने न जाता अनेक वेगवेगळ्या संकल्पना आपल्या व्यवसायात आणल्या. त्यांनी आपल्या कंपनीत मालक-चालक ही योजना सुरू केली.

 

arun kharat inmarathi4

 

या योजनेत चालकाला आपली स्वतःची गाडी घेण्यासाठी विंग्स ट्रॅव्हल्स मदत करते. चालक केवळ २०-२५% भांडवल गुंतवून गाडी घेईल आणि बँकेने कर्जाऊ दिलेल्या उर्वरित रकमेसाठी विंग्स ट्रॅव्हल्स हमीदार राहील. ३ वर्षांत चालक कर्जाची रक्कम फेडून गाडीचा मालक होऊ शकतो.

याबरोबरच विंग्स ट्रॅव्हल्सने केवळ महिला चालकांकडून चालवली जाणारी ‘विंग्स सखी’ ही सेवा तसेच एलजीबीटी समुदायातील चालकांकडून चालवली जाणारी ‘विंग्स रेनबो’ अशा अभिनव सेवा उपलब्ध करून दिल्या.

अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे आधीच्या काळात केवळ कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीपुरते मर्यादित असलेल्या विंग्स ट्रॅव्हल्सने सध्याच्या ओला-उबर च्या आधीच २००६ मध्ये पुण्यात सर्वसामान्य लोकांसाठी कॅब सर्व्हिस सुरू केली होती.

 

arun kharat inmarathi

 

सध्या विंग्स ट्रॅव्हल्सच्या ताफ्यात सुमारे ४७५ स्वतःच्या मालकीच्या गाड्या आहेत. मालक-चालक योजनेअंतर्गत ८०० हून अधिक तर इतर कंत्राटी पद्धतीने चालवायला घेतलेली सुमारे ५५०० वाहने कार्यरत आहेत. यंदाच्या वर्षीच अरुण यांनी बुक माय कॅब ही कंपनी विकत घेतली, ज्यामुळे आता विंग्स ट्रॅव्हल्सचा विस्तार भारतभर झाला आहे.

नजीकच्या काळात मॉरिशस, आशिया-पॅसिफिक भागातील देश आणि पुढे जाऊन अमेरिका आणि ब्रिटन येथे कंपनीचा विस्तार करण्याचा अरुण यांचा मनोदय आहे.

शून्यातून विश्व उभे करणे म्हणजे काय, हे अरुण यांच्याकडे पाहून कळते. ध्येयासक्ती माणसाला किती यशस्वी बनवू शकते याचे विंग्स ट्रॅव्हल्स हे एक उत्तम उदाहरण आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?