' १००% "इको फ्रेंडली" घराची गोष्ट - एक जबरदस्त अनुभव, वाचा!

१००% “इको फ्रेंडली” घराची गोष्ट – एक जबरदस्त अनुभव, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

सध्या आपण नेहमीच म्हणतो की निसर्गाचा ऱ्हास होत आहे, पर्यावरण प्रदूषित होत आहे. पण या सगळ्याच गोष्टींना केवळ माणूसच जबाबदार आहे. वाढतं शहरीकरण, विकास यामुळे खरंतर निसर्गाला धोका उत्पन्न होत आहे.

परंतु या गोष्टी आता माणसाच्या लक्षात येत आहेत, म्हणूनच मग आता नैसर्गिक गोष्टींकडे माणसांचा ओढा वाढला आहे.

नैसर्गिक पालेभाज्या, धान्य यांचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याबरोबरच पर्यावरण पूरक जीवन जगण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावणे. पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत प्रदूषित होण्यापासून वाचवणे यासाठीही प्रयत्न होत आहेत.

 

aare forest inmarathi

 

आपल्या देशात तशी उष्णता खूप असते. म्हणूनच पूर्वीपासून देशामध्ये इथलं वातावरण लक्षात घेऊन त्याप्रमाणेच जीवन जगण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतो.

मग तो अगदी तिथल्या हवामानानुसार खाण्यापिण्यापासून, राहण्यापर्यंत दिसून येतो. पण शहरीकरण वाढलं. अनेक सोयी सुविधा आल्या. जग जवळ आलं, तसं अनेक नवीन गोष्टी सगळीकडेच मिळायला लागल्या.

अर्थातच माणसाला नवीन गोष्टीचे आकर्षण असते. मग जगभर त्याच गोष्टीची चलती चालते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

अशीच एक गोष्ट म्हणजे आता सरसकट सिमेंट काँक्रीटने बांधली जाणारी घरं, इमारती, ऑफिसेस, अगदी रस्तेही. अर्थातच हे सगळं नवीन लाईफ स्टाईलला अनुसरूनच आहे.

पण या अशा राहण्यात आपण निसर्गाचे खूप नुकसान करतो. त्यामुळे विनाकारण उष्णता निर्माण होत आहे. आणि त्यामुळेच ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आता सतावू लागला आहे.

खरंतर सिमेंटची घरं ही भारतातल्या वातावरणाला अनुकूल नाहीत. उन्हाळ्यामध्ये अशी घरं खूप तापतात. त्यामुळे मग पंखे, एसी, कुलर यांची आवश्यकता भासते.

आणि या सगळ्यांसाठी आवश्यक असणारी वीज वापरली जाते, यामुळे अर्थातच आपण ग्लोबल वार्मिंग वाढवायला मदत करतो.

याची जाणीव केरळमधल्या एका व्यक्तीला झाली. सनी नेल्सन या ३३ वर्षांच्या मर्चंट नेव्ही मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने पर्यावरणपूरक जगण्याचा निर्णय घेतला होता.

sunny nelson inmarathi

 

त्यांनी जेव्हा निवृत्ती स्वीकारली, तेव्हा त्यांनी ठरवलं की निवृत्तीनंतरचे जीवन आपल्या मुळगावी कोट्टियुर मध्ये व्यतीत करायचे, जे केरळमधील कुन्नूर जिल्ह्यातील गाव आहे.

सनी यांचा असा विचार होता की गावी जाऊन शेती करायची आणि पुढचं आयुष्य व्यतीत करायचं. पण त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या आई-वडिलांचे जे घर आहे तिथे प्रचंड उकाड्यामुळे राहणे कठीण होते.

उन्हाळा तर अगदी असह्य होतो. त्यामुळे तिथे कुलर लावावाच लागतो. परंतु अशा इलेक्ट्रॉनिक गोष्टींच्या वापरामुळे आपण पर्यावरणाचा नाश करतो आहोत. तसेच विनाकारण जास्त वीज बिल भरत आहोत, हे त्यांच्या लक्षात आले.

यावर काय उपाय करता येईल का हे ते पाहत होते. इच्छा असला कि मार्ग मिळतो म्हणतात ते काही खोटं नाही. त्यांच्या सुदैवाने त्यांना eco friendly घराची माहिती मिळाली. त्यांचं एक ठरलेलं होतं की, शक्यतो घर इको फ्रेंडली बनवायचं आणि ठेवायचंही.

अगदी दररोज घर स्वच्छ करण्यासाठीही त्यांना कोणतही केमिकल वापरायचं नव्हतं. त्यांचं लहान मूल, पाळीव प्राणी हे त्या घरात कसेही खेळले तरी त्यांच्या त्वचेला धोका पोहचू नये, असा त्यांचा विचार होता.

त्यांनी युट्युबवर यासंबंधीचे व्हिडिओ पाहिले, त्यात त्यांना कळलं की, चिखलाने जर घराचे बांधकाम केले तर ते उन्हाळ्यात देखील थंड राहते.

मग त्यांनी अशा घराचा रिसर्च चालू केला आणि त्यांच्या लक्षात आलं की, अत्यंत कमी किमतीत आपल्याला हा पर्याय उपलब्ध होईल. मग लगेच त्यांनी आपल्या कल्पनेतील घरावर काम करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी अर्धा एकर जमीन एप्रिल २०१९ मध्ये खरेदी केली. आणि स्थानिक कामगारांच्या मदतीने घर बांधायला सुरुवात केली. १२५० चौरस फुटांच्या तीन बेडरूमच्या मातीच्या घराची बांधणी त्यांनी केली आहे.

 

sunny nelson house inmarathi

 

त्यांना बांधकामाचा खर्च केवळ वीस लाख रुपये आला तर फर्निचरसाठी केवळ तीन लाख रुपये खर्च झाले. फक्त जागा घेण्यासाठीच त्यांनी कर्ज घेतले.

सनी यांना इतका कमी खर्च का आला?

सनी यांनी आपलं घर बांधण्यासाठी ज्या विटा वापरल्या त्या लॅटाईट विटा होत्या. ज्या तिथल्याच स्थानिक कामगारांनी बनवल्या होत्या. तिथलीच माती, वाळू, सिमेंटमिश्रित त्या विटा बनवल्या होत्या.

तिथे पूर्वी त्याच विटा वापरून घरं बनवली जायची. या विटा केवळ उष्णतारोधक नाहीत तर इकोफ्रेंडली देखील आहेत. म्हणूनच सनी यांनी या विटा वापरल्या.

एक वीट बनवण्यासाठी त्यांना ६० रुपये खर्च झाला. त्या कामगारांनी आधी मंदिरांमध्ये देखील काम केलं होतं, म्हणून त्यांच्याकडून घरातल्या पिलरवर थोडंसं नक्षीकाम करून त्याचे वेगळे पैसे त्यांनी कामगारांना दिले.

सनी यांनी ठरवलं की घराच्या बाहेरील भिंती प्लास्टर करायच्या नाहीत किंवा कोणताही रंग द्यायचा नाही. त्या विटांचा मूळ रंग जो आहे त्याने पण एक वेगळेच डिझाईन तयार झाले आहे आणि जे नैसर्गिक वाटते.

छत बनवण्यासाठी त्यांनी उष्णता प्रतिरोधक चिकण मातीच्या फरशा वापरल्या. त्या गावातील लोक आपली जुनी घर पडताना या चिकण मातीच्या फरश्या जपून ठेवतात.

 

mud house inmarathi

 

कारण त्या तिथे खूप मौल्यवान समजल्या जातात. त्याच लोकांकडून सनी यांनी प्रत्येकी पाच रुपयाला फरश्या विकत घेतल्या. त्यांना हायप्रेशर कॉम्प्रेसर वापरून धुऊन घेतलं आणि त्यावर पेंटिंग केलं.

त्यामुळे त्या अगदी नवीन दिसू लागल्या. दुसऱ्या प्रकारच्या फरश्या वापरल्या असत्या तर त्या प्रत्येकी ४५ रुपयाला पडल्या असत्या.

घरातल्या आतल्या भिंतीचे प्लास्टर हे चिखलाचे बनले आहे. यासाठी त्यांनी ‘वास्तुकाम आर्किटेक्ट’ यांचा सल्ला घेतला. त्यासाठी कोणत्या प्रकारचे चिखल वापरायचे?

कोणतं प्लास्टर जास्त काळ टिकेल? कमी खर्चात हे शक्य आहे का? याचा सगळा सल्ला त्यांना वास्तूकाम आर्किटेक्ट कडून मिळाला. तसेच घरातले फ्लोरिंग देखील रेड ऑक्साईड टाइल्सने बनवले आहे.

या टाइल्सही इको फ्रेंडली आहेत, तसेच त्या कुठल्याही प्रकारचे हवामान सहन करणाऱ्या आहेत आणि त्यांची देखभाल करण्यासाठी कमी खर्च येतो.

स्वयंपाकघरातही त्यांनी कमीत कमी लाकडाचा वापर केला आहे. किचन ट्रॉलीज बनवण्यासाठी त्यांनी लाकडाऐवजी फेरोसिमेंट स्लॅब पॅनल वापरले आहेत.

याचाच वापर त्यांनी वॉर्डरोब, शेल्फ बनवण्यासाठी ही केला आहे. याला लाकडाच्या रंगाने पेंट केलं आहे आणि चमकदार फिनिशिंग दिसावी म्हणून पॉलिश केलं आहे.

mud house 2 inmarathi

 

घराचे बांधकाम जून २०१९ मध्ये चालू केले आणि ते फेब्रुवारी २०२० पर्यंत पूर्ण झाले. त्याच वेळेस ते आपल्या पत्नी मुलासह घरात राहायला गेले. त्यानंतर मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. त्यांच्याकडे त्यावेळेस फक्त दोन पंख होते.

पण ते म्हणतात की त्या कडक उन्हाळ्यातही आम्हाला क्वचितच या पंख्यांचा वापर करावा लागला. नवीन घर, शांतता आणि थंडावा यामुळे आम्हाला आमचा लॉकडाऊन सुसह्य झाला.

खरंच अशा पद्धतीचे घर बांधणे आणि त्यामध्ये राहणे याचा अनुभव नक्कीच वेगळा असणार आहे.

शहरातल्या काय किंवा खेड्यातल्या काय, लोकांनी जर पर्यावरणाचा विचार करायचा ठरवला आणि त्यानुसार राहायचं ठरवलं तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे नक्कीच मार्ग मिळेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?