' फाळणीनंतरही "कराची बेकरी"चं नाव कायम राहीलं, कारण...

फाळणीनंतरही “कराची बेकरी”चं नाव कायम राहीलं, कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अखंड हिंदुस्थानाची झालेली फाळणी हे १९४७ साली भारताला पडलेलं दुःस्वप्न आहे. भारत- पाकिस्तान फाळणीच्या वेळी धार्मिक दंगलीचा आगडोंब उसळला होता. असंख्य लोकांच्या जीवाची आहुती दिली गेली. फक्त दोन देशच नाहीत, तर या फाळणीने संस्कृतींचं, मनांचं क्लेशकारक विभाजन झालं.

घराघरातून लूट, जाळपोळ सुरु होती, धर्मांतर करण्यास लोकांना भाग पाडण्यात येत होतं, डोळ्यांसमोर आया-बहिणींची अब्रू लुटली जात होती, अमानुषपणाचा कळस गाठला गेला होता.

लोकं निर्वासित झाली, संपत्ती- घरदार सोडून केवळ जीव वाचवण्यासाठी आणि आपल्या देशात परत जाण्यासाठी धडपड करू लागली. प्रेतांच्या गाड्या एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ लागल्या. स्थलांतरित लोकांची तर मोजदादच नव्हती.

 

partition 1 inmarathi

 

फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला नरसंहार हा अतिशय क्रूर होता. आजही फाळणीची झळ सोसलेल्या कित्येकांच्या मनात ही जखम भळभळतेय.

फाळणीमुळे भारत- पाकिस्तान या देशांमध्ये कायमची तेढ तर निर्माण झालीच, पण कधीही भरून न निघणारी मानसिक हानी या फाळणीने केली. शेजारचा माणूस मुस्लिम असेल, तर त्याच्यावरदेखील विश्वास ठेवायला हिंदूंचं मन घाबरू लागलं.

फाळणीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतरण झालं, पण फाळणी हे केवळ देशाचं किंवा लोकांचं विभाजन नव्हतं. फाळणीमुळे देशात सांस्कृतिक बदल मोठ्या प्रमाणावर झाले. लोकांप्रमाणे त्यांची नावं, सवयी, आठवणी या देखील एका देशातून दुसऱ्या देशात गेल्या.

किती गंमत असते बघा, फाळणीने देश विभागला, लोकांना देश सोडून जाण्यास भाग पाडलं गेलं, पण याच लोकांच्या आठवणींवर आणि नावांवर मात्र कोणताच राजकीय नेता अंकुश ठेऊ शकला नाही.

 

partition india inmarathi

 

आपली संस्कृती “वसुधैव कुटुम्बकम्” असली, तरीही प्रत्येक व्यक्तीला राजकीय मर्यादा असतात. राष्ट्राचा बंधन असतं, पण नावाला मात्र या देश-कालाच्या मर्यादा नसतात.

शेक्सपियर म्हणतो, “नावात काय आहे?”, पण आजूबाजूला पाहिलंत, तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, “नावातच सगळं काही आहे”. असं म्हणतात, की माणूस गेल्यानंतर एकच गोष्ट उरते ती म्हणजे त्याने “कमावलेलं नाव”. नावं ही माणसाच्या आठवणींशी निगडित असतात, अस्मितेशी निगडित असतात.

एखाद्या राष्ट्राची जडणघडण होताना काही आठवणी या हेतुपुरस्सर पुसून टाकण्यात येतात, काही कालौघात नष्ट होतात, तर काही जपून ठेवल्या जातात. परंतु, मानवी मनातील काही आठवणी या कधीच पुसल्या जात नाहीत, पण त्यांना जीवनात कोणतंच स्थानदेखील देता येत नाही.

भारत-पाकिस्तान या ऐतिहासिक फाळणीतील अनेक अशा आठवणी आहेत. या आठवणींनी देशाच्या सीमा ओलांडून प्रवेश केलाय. फाळणीने काय मिळवलं आणि काय गमावलं याची जाणीव या आठवणी करून देत असतात.

“कराची बेकरी” ही अशीच एक आठवण! सध्या हे नाव पुन्हा चर्चेत आहे कारण, शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी “कराची” या नावावर आक्षेप घेत हे नाव बदलावं अशी मागणी केली आहे.

 

karachi bakery inmarathi

 

“कराची हे पाकिस्तानात असल्यामुळे, तुम्ही पाकिस्तानला पाठिंबा देत असल्याचं निदर्शनास येतं” असं ते म्हणाले.

कराची स्वीट्स संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. हैद्राबाद, बंगलोर, मुंबई अशा अनेक ठिकाणी त्यांची दुकानं आहेत. भारत- पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर २०१९ साली देखील या बेकरीला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.

काय आहे या नावाचा इतिहास? बघूया..

फाळणीच्या वेळी सिंधी बांधव देखील भारतात आले. त्यापैकीच एक होते, खानचंद रमनानी. फाळणीनंतर हैद्राबादमध्ये आल्यावर त्यांनी स्वतःचा बेकरी व्यवसाय चालू केला.

१९५३ साली त्यांनी हा व्यवसाय सुरु केला. पाकिस्तानातील कराची इथून ते भारतात आले होते. आपल्या गावाची आठवण म्हणून त्यांनी बेकरी व्यवसाय सुरु करताना “कराची बेकरी” हे नाव ठेवले.

 

karachi bakery inmarathi2

 

व्यवसाय करण्याची चुणूक त्यांच्यामध्ये होती आणि म्हणूनच त्यांनी वेगळी शक्कल लढवून ही बेकरी नावारूपास आणली. त्याकाळी जेव्हा उत्तर बेकरीज फक्त ब्रेड, नान आणि इतर बिस्किट्स विकायच्या, तेव्हा त्यांनी बाजारात “फ्रुट बिस्किट्स” आणले. आता तुम्ही ऑनलाईनदेखील ही बिस्किट्स घेऊ शकता.

प्रत्येक शहरात एक तरी “वर्ल्ड फेमस” बेकरी असते. हैद्राबादमध्ये तशी “कराची बेकरी” आहे. कराची बेकरीमधील “फ्रुट बिस्कीट” खूपच कमाल आहेत. याच बिस्किटांमुळे अल्पावधीत त्यांना प्रसिद्धी मिळाली.

वाजवी किंमत आणि उत्तम गुणवत्ता यामुळे बाजारात आजही त्यांची प्रसिद्धी टिकून आहे. ग्राहकांची मागणी काय आहे हे त्यांनी नेहमीच उत्तमप्रकारे हेरलं. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी “एगलेस बिस्किट्स”देखील बाजारात आणली.

“आम्ही छोट्याश्या जागेत बेकरी सुरु केली होती. २ रुपये प्रति किलो बिस्किट्स आम्ही विकायचो. आता त्याचीच किंमत ३०० च्या घरात गेली आहे.” असे तिथे काम करणारे सांगतात.

वाजवी किंमत आणि उत्तम गुणवत्ता यामुळे बाजारात आजही त्यांची प्रसिद्धी टिकून आहे.

 

karachi bakery inmarathi1

 

“कराची बेकरी” ही फाळणीतून जन्माला आलेली आणि आपल्या देशात रुजलेली, टिकलेली आठवण आहे. रमनानी आपल्या गावच्या आठवणी कधीच विसरू शकले नाहीत आणि म्हणूनच भारतात आल्यानंतर, सुरु केलेल्या व्यवसायात या आठवणीचं बीज रुजवायचा त्यांनी प्रयत्न केला. हे नाव पाकिस्तानी माणसांनी ठेवलेले नाही.

“कराची” हे नाव रमनानी यांचा भूतकाळ दाखवतं. शेवटी कितीही झालं तरी, सीमा माणसाच्या आठवणी नष्ट करू शकत नाही. फाळणीकाळात सिंधी बांधवांना आपले मूळ गाव सोडावे लागले, पण इथे आल्यानंतर त्यांनी भारताच्या प्रगतीत मोलाची भर टाकली. कराची बेकरी हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?