' “कॉट कुंबळे, बोल्ड द्रविड” ही नेमकी काय ‘भानगड’ आहे, तुम्हाला ठाऊक आहे का? – InMarathi

“कॉट कुंबळे, बोल्ड द्रविड” ही नेमकी काय ‘भानगड’ आहे, तुम्हाला ठाऊक आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान घमंडे

===

‘राहुल… नाम तो सुना ही होगा…’ या डायलॉगला साजेसा असा राहुल द्रविड, आणि जम्बो म्हणजेच अनिलभाई, अर्थात अनिल कुंबळे… कर्नाटकच्या संघाकडून रणजी ट्रॉफी खेळले आणि पुढे अनेक वर्षं भारतीय संघातील महत्त्वाचे खेळाडू देखील बनून गेले हे दोघे!

‘ज्याचा चेंडू स्पिनच होत नाही असा लेगस्पिनर’, ‘अरे ही कसली फिरकी’, ‘हा तर नुसते स्ट्रेटरवन टाकतो’ अशी सुद्धा ज्याची खिल्ली उडवली गेली, त्या अनिल कुंबळेच्या नावावर आज कसोटीत ६१९ बळी आहेत.

 

anil-kumble-10-wickets-00-marathipizza

 

मुरलीधरन आणि वॉर्न या दोन दिग्गज गोलंदाजाच्या खालोखाल सर्वाधिक गडी बाद करण्याच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कसोटीच्या एका डावात सगळ्याच्या सगळ्या दहा फलंदाजांना तंबूत धाडण्याची किमया, आजवर फक्त दोन जणांना करता आली आहे. जिम लेकर बरोबर आज अनिलभाईचं नाव या विक्रमात सुद्धा सामील आहे.

 

jim-laker-anil-kumble-inmarathi

 

त्याची गुगली भल्याभल्यांना खेळता आली नाही, यात शंकाच नाही. त्याच्या फिरकीच्या तालावर त्यानं अनेकांना नाचवलं. (अगदी स्वतःच्याच संघातील यष्टिरक्षकांना सुद्धा!)

राहुल द्रविड या जेंटलमनबद्दल तर जेवढं बोलावं तितकं कमीच आहे. ज्ञानेश्वर माउलींनी पसायदानात ‘जो जे वांच्छिल तो ते लाहो’ असं लिहिलं आहे; द्रविडचं मात्र थोडं वेगळं होतं… मी ऐकलेला, पाहिलेला, वाचलेला द्रविड ‘जो जे वांच्छिल, तो ते सांगो’ या प्रकारातील होता.

‘आज सलामीवीर जखमी आहे, जरा सलामीला जातोस का?’, ‘सध्या भारतीय संघात चांगला यष्टीरक्षक नाही, शिवाय एक अधिक फलंदाज खेळवण्याची गरज आहे. जरा हे ग्लोज चढवतोस का?’ अशा प्रश्नांना त्यानं नाही असं उत्तर कधीच दिलं नाही.

 

dravid-keeping-inmarathi

 

जी जबाबदारी संघव्यवस्थापन अंगावर टाकेल, ती इमानेइतबारे पार पाडायची, एवढं एकच त्याला ठाऊक होतं. राहुल द्रविडने पार पाडली नाही, अशी कुठलीच जबाबदारी नसेल कदाचित!

हे दोघेही त्यांच्या जागी महान आहेत. दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीत भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सुद्धा सांभाळली आहे. मात्र, या दोघांचं एकत्र नाव घ्यायचं तर ते हमखास एका गोष्टीसाठी घेतलं जातं; ती म्हणजे त्यांची भागीदारी… होय होय, कुंबळे आणि द्रविड यांची भागीदारी!

फलंदाजाच्या बॅटची कड चाटून गेलेला कुंबळेचा बॉल आणि तो झेलायला राहुल द्रविड स्लिपमध्ये उभा असणार. सहसा हे झेल कधी सुटले नाहीत.

त्यांच्या जोडीने असंख्य करामती करून दाखवल्या. कुंबळेने घेतलेल्या ६१९ विकेट्समध्ये द्रविडचा महत्त्वाचा वाटा आहे. तसंच, २०१ कसोटी झेलांचा विक्रम द्रविडच्या नावावर असण्यात कुंबळेच्या फिरकीची महत्त्वपूर्ण साथ आहे. या दोघांची ही अभेद्य भागीदारी संघासाठी सुद्धा खूपच महत्त्वाची होती. Caught Dravid Bowled Kumble हे एक समीकरणच बनून गेलं होतं म्हणा ना!

 

caught-dravid-bowled-kumble-inmarathi

 

आजही तो सुवर्णकाळ आठवला की मन भूतकाळात रमून जातं. द्रविडची चपळाई आठवते, कुंबळेचे फ्लिपर्स आठवतात. पण, CAUGHT KUMBLE BOWLED DRAVID अशी सुद्धा गम्मत झाली होती, असं तुम्हाला सांगितलं तर? विश्वास बसत नाहीये ना? मग ऐकाच नेमकं काय घडलं होतं ते!

द्रविड जेव्हा बाप झाला, तेव्हा त्यानं त्याच्या या मित्राला मेल केला. या मेलमध्ये त्यानं म्हटलं होतं,”कॉट द्रविड बोल्ड कुंबळे” ही परंपरा आता कायम राहणार.”

हे काही कुंबळेला फारसं रुचलं नाही. उत्तरादाखल कुंबळेने केलेला मेल अधिकच रंजक आहे.

“नाही, असं होणार नाही. यापुढे ‘कॉट कुंबळे बोल्ड द्रविड’ ही परंपरा सुरु होईल.”

मेलच्या माध्यमातून या दोघांमध्ये झालेला हा संवाद फारच गाजला. स्वतः कुंबळेनं याविषयी अनेकदा भाष्य केलं आहे. याविषयी बोलताना तो म्हणतो की,”माझ्या मुलाला क्रिकेट खेळायचं असेल, तर त्यानं गोलंदाज अजिबात होऊ नये. त्यानं खुशाल फलंदाजी करावी.”

असं त्याला का वाटतं याचं गमतीशीर स्पष्टीकरण सुद्धा त्यानं दिलं आहे. “६१९ गडी बाद करणं हे काही सोपं काम नाही. एक गोलंदाज होऊन माझ्या मुलानं एवढी मोठी मजल मारणं हे मोठं आव्हान आहे. मात्र, माझ्या फलंदाजीची सरासरी फक्त १८ आहे. ती ओलांडणं सहजशक्य आहे.”

‘कुंबळेचा मुलगा फलंदाज आणि द्रविडचा मुलगा गोलंदाज’ असं झालं असतं तर अनिलभाईंनी मांडलेलं समीकरण कदाचित पाहायला सुद्धा मिळालं असतं. मात्र त्याच्या मुलाने फक्त फोटोग्राफीच्या विषयात वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळत असल्याचं ऐकिवात नाही.

 

anil-kumble-son-inmarathi

 

शिवाय राहुल द्रविडच्या मुलाने सुद्धा त्याचाच कित्ता गिरवत बॅटच हाती धरली आहे. त्यामुळे ‘कॉट कुंबळे बोल्ड द्रविड’ हे अनिलभाईचं म्हणणं सत्यात उतरण्याची शक्यता नाही.

पण, कुंबळेच्या स्पष्टीकरणातील एक गोष्ट मात्र विचार करण्यासारखी आहे. त्याच्या मुलाने गोलंदाज होऊ नये असं त्याला वाटणं. मुलाची वडिलांशी होणारी तुलना कुठेतरी खटकतेच!

सुनील गावस्कर यांचा मुलगा रोहन असो किंवा आज मैदानावर स्वतःला सिद्ध करू पाहत असलेला अर्जुन तेंडुलकर! रोहन कधीही सुनील होऊ शकणार नव्हता, किंवा अर्जुन सुद्धा कधीही सचिन होऊ शकत नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीने खेळू द्यावं. जगू द्यावं.’बाप तसा बेटा’, ‘बाप से बेटा सवाई’ किंवा ‘याला काही बापासारखं कर्तृत्व दाखवता येणार नाही’ अशा विचारांमध्ये त्यांना अडकवू नये.

बरं अशी तुलना फक्त क्रिकेटमध्येच होते असं नाही. सगळ्याच क्षेत्रांमध्ये होते. तसं होऊ नये अशी माफक अपेक्षा…

असो, विषय थोडासा भरकटला… ‘कॉट कुंबळे बोल्ड द्रविड’ हे स्वप्न तर सोडाच, CAUGHT DRAVID BOWLED KUMBLE या समीकरणाला आजही तोड नाही. अशी जोडी आणि भारतीय संघासाठी ही अशी भागीदारी पुन्हा होणं जवळपास अशक्यच!

 

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?