' गर्दीत राहूनही एकटे वाटणे आरोग्याला घातक आहे. अशा अवस्थेत ही काळजी घ्या! – InMarathi

गर्दीत राहूनही एकटे वाटणे आरोग्याला घातक आहे. अशा अवस्थेत ही काळजी घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणूस हा मुळात कुटुंबवत्सल आहे. निसर्गतःच माणसाची घडण अन्य प्राण्यांपेक्षा वेगळी झाली आहे. विचार करता येण्याच्या देणगीमुळे माणसात सर्वप्रथम कुटुंब आणि त्यानंतर समाज या संकल्पनांचा विकास झाला.

आजकाल आपल्या सगळ्यांचेच जीवन अतिशय धकाधकीचे बनले आहे. विशेषतः महानगरांत राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत हि गोष्ट प्रकर्षाने दिसून येते.

नोकरी-धंदा करणाऱ्याच नव्हे तर अगदी शाळेत जाणाऱ्या लहानलहान मुलांचा दिनक्रमही व्यस्त झालेला दिसून येतो.

दिवसभर डोक्यात चालणारे विविध विचार, वेगवेगळे प्रश्न, त्यांची उत्तरे शोधण्याची खटपट, इतर समस्या, यांमुळे काही वेळेस लोकांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण होते.

 

depressed guy inmarathi

 

आसपास आपले हितचिंतक, नातेवाईक, ओळखीच्या व्यक्ती असूनही डोक्यातील वैचारिक गोंधळामुळे एकाकीपणाची भावना निर्माण होते.

ही भावना बहुतांश वेळा तात्कालिक असते आणि आसपासचे वातावरण बदलल्याने किंवा स्वतःला कोणत्या तरी गोष्टीत व्यस्त करवून घेतल्याने ती दूरही होते.

पण सतत मनात अशी एकाकीपणाची भावना निर्माण होणे शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक ठरू शकते.

माणसाच्या मनात एकाकी भावना निर्माण होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. नैमित्तिक कामाचा दबाव, भांडण, आसपास घडलेली एखादी अप्रिय गोष्ट, केलेल्या कामातून आवश्यक ती गोष्ट साध्य न होणे!

एवढेच नव्हे, तर आसपास असलेले निराशाजनक वातावरण यापैकी कोणत्याही गोष्टीमुळे माणसाच्या मनात एकटे असल्याची भावना बळावू शकते.

आपल्या आसपास काही माणसे असली तरी केवळ डोक्यात एखाद्या अप्रिय भावनेचा उद्रेक झाल्याने एकाकी वाटू शकते. माणसाचा मेंदू हा कायम धोका आणि दुःखदायक भावनांना लगेच प्रतिसाद देतो, त्यामुळेच एकाकीपणाची भावना वाढते.

एकाकीपणाची भावना एखाद्या लहानशा विचारातून निर्माण झाली असली, तरी त्यामुळे डोक्यात अन्य वाईट विचार येण्याची शक्यता असते. यातूनच चिडचिड होते, साध्या गोष्टींमध्येही लक्ष लागत नाही.

जास्त वेळ एकटेपणाची भावना मनात राहणे शरीरालासुद्धा अपायकारक ठरते. सततच्या एकाकीपणाच्या जाणीवेमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, तसेच शरीराच्या एकंदर कार्यक्षमतेवरही प्रभाव पडतो.

निद्रानाश, थकवा, वजन वाढणे या गोष्टी भेडसावू शकतात. एकटेपणा माणसाच्या मनात विविध विचारांचे काहूर निर्माण करतो आणि परिणामी जगण्यातील प्रसन्नता कुठेतरी हरवल्यासारखी होते.

 

sleeping women inmarathi

 

एकाकीपणा हा आजार किंवा शारीरिक दोष नाही, तर तो केवळ एखाद्या दुःस्वप्नासारखा आहे. माणूस एकदा एकाकी झाला की तो त्याच्या गर्तेतून कधीच बाहेर येऊ शकत नाही असे मुळीच नाही.

एकाकीपणावर मात करणे हे सहज शक्य आहे. एकाकीपणाकडे आपल्याला स्वतःला समजून घेण्यासाठीची एक उत्तम संधी म्हणूनही पाहता येते.

एकटे वाटत असताना स्वतःला आवडणाऱ्या आणि सहज करता येऊ शकणाऱ्या गोष्टी जसे की कोडे सोडवणे, चित्र काढणे, लिहिणे, वाचन करणे यावर भर दिला पाहिजे.

स्वतःला या गोष्टींमध्ये रमवून घेतल्याने आपल्याला स्वतःमधील अनेक नव-नवीन गुणांची जाणीव होऊ शकते. यातूनच माणूस स्वतःवर प्रेम करायला शिकतो.

एकदा का स्वतःच स्वतःचे मित्र बनलो की एकाकीपणाची भावना आपोआपच नाहीशी होऊ शकते. आपल्या आसपास आपल्या ओळखीचे अनेक लोक असतात, जसे की आपल्या घरातील व्यक्ती, नातेवाईक, मित्रमंडळी, वगैरे.

पण त्यातही काही लोक असे असतात ज्यांच्याशी आपले जास्त घनिष्ट संबंध असतात, मनातील कोणतीही गोष्ट आपण त्यांच्याशी बोलू शकतो. तसेच काही व्यक्तींचा प्रभावच असा असतो, कि त्यांच्याशी बोलल्यावर मन प्रफुल्लीत झाल्यासारखे वाटते.

एकटेपणा जाणवत असताना अशा जवळच्या व्यक्तींशी संवाद साधण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. मनातल्या गोष्टी न बोलल्याने मनावरील दडपण वाढत जाते आणि याचेच पर्यवसन नैराश्यातही होऊ शकते.

एकाकीपणात आपल्या मनातील गोष्टी समोरच्याशी बोलल्यामुळे मन हलके होते. सध्या आपण सगळेजण सोशल मिडिया मोठ्या प्रमाणावर वापरतो.

काही अभ्यासांमधून असे निष्कर्ष आले आहेत, की जास्त प्रमाणात सोशल मिडिया वापरल्याने लोकांचा एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क कमी होतो आणि लोकांना अचानक एकटेपणा जाणवू लागतो. यालाच FOMO किंवा Fear of Missing Out असे म्हणतात.

 

fomo

 

सोशल मीडियामुळे जग जवळ आले असले तरी त्याचा अतिवापर काही वेळेस नैराश्याकडे नेऊ शकतो. सोशल मिडिया हे देखील एकाकीपणाचे कारण ठरू शकते. यासाठी काही काळ सोशल मिडियापासून दूर राहणे फायदेशीर ठरू शकते.

मनाची प्रसन्नता कायम राखण्यामध्ये व्यायाम खूप मोलाची भूमिका बजावतो. व्यायामामुळे नुसते शरीरच तंदुरुस्त राहत नाही, तर आपले मनही ताजेतवाने होते.

एकाकीपणा जाणवत असताना आपल्या मनाची दारे कोणीतरी बंद करून घेतली आहेत असे अनेकदा वाटते. आतल्या आत वेगळीच घुसमट जाणवते.

अशा वेळेस बाहेर फिरायला जाणे, व्यायाम करणे यामुळे आपले मन गुंतून राहते. शरीर ताजेतवाने झाल्यार आपसूकच उत्साह वाटू लागतो आणि एकाकीपणाची भावना नाहीशी होते.

नियमित व्यायाम करणे शरीराबरोबरच मानसिक स्वास्थ्यासाठीही हितकारक आहे.

या सगळ्या उपायांबरोबरच पाळीव प्राण्यांशी खेळणे, आपला छंद जोपासणे, संगीत ऐकणे, अशा अनेक लहान सहान गोष्टीसुद्धा एकाकीपणा दूर करण्यास मदत करतात.

 

girl listen to songs inmarathi

 

आधी सांगितल्याप्रमाणे एकाकीपणा हा कधीच कायम टिकणारा नसतो. ती एक मनाची अवस्था असते, ज्यातून बाहेर पडणे सहज शक्य असते. आपल्या आजकालच्या वेगवान आयुष्यात जगताना अशा साध्या गोष्टींकडे काही वेळेस दुर्लक्ष केले जाते.

रोजचे काम आणि व्यस्त दिनक्रमातून काही मिनिटे स्वतःसाठी जगणे, हे आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी गरजेचे आहे. “मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण” असे तुकोबा म्हणतात ते उगाच नाही!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?