' वीरूने ९९ धावांवर षटकार ठोकला; तरीही त्याचं शतक झालं नाही, कारण...

वीरूने ९९ धावांवर षटकार ठोकला; तरीही त्याचं शतक झालं नाही, कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक –  ईशान घमंडे 

===

दिल्ली का बाघ… वीरेंद्र सेहवाग… होय, दिल्लीचा वाघच! या माणसाची नजफगढ का नवाब, मुलतान का सुलतान, वीरू वगैरे अनेक नावं प्रसिद्ध आहेत.

पण, वीरू आणि दिल्ली का बाघ या नावांमध्ये जी मजा आहे, ती इतर नावांमध्ये नाही.

वीरेंद्र सेहवाग हे रसायनच वेगळं आहे. एक खेळाडू म्हणून आणि माणूस म्हणून सुद्धा… उगाच नाही त्याची दहशत होती. वीरू फॉर्मात असो अथवा नसो, तो संघात आहे हे ऐकूनच भलेभले गोलंदाज टरकून असत.

अशा या खेळाडूने, कधीही कुठल्या गोष्टीची फिकीर करून, सांभाळून वागणं वगैरे अशक्यच!

 

virendra sehwag-inmarathi

 

‘पाजी मुश्ताक आया तो मैं छक्का मारुंगा’ असं म्हणताच षटकार ठोकून पहिलं त्रिशतक झळकावणं असो किंवा विश्वचषक स्पर्धेत १७५ धावांची खेळी करताना ५० षटकं त्याचा टिकाव सुद्धा न लागणं असो;

स्वतःच्या नावावर लागू शकत असलेला विक्रम किंवा संपूर्ण ५० षटकं खेळून काढण्याचं स्वप्न अशा गोष्टींची सुद्धा त्याने कधी फिकीर केली नाही. तो बेफिकीर होऊन खेळला हीच त्याची ताकद होती.

कारण, तो बिनधास्त आहे म्हणून इतरांना धास्ती वाटत असे. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना आणि भारतीय खेळाडूंना सुद्धा… वीरू कधी काय करेल आणि त्याचा कुठल्या संघावर नेमका काय परिणाम होईल, हे तो स्वतः सुद्धा कधीही सांगू शकला नसता.

फलंदाजांची दहशत असावीच. फिल्मी स्टाईलने सांगायचं झालं तर, ‘डर होना जरुरी हैं’….

 

sir donald bradman inmarathi

 

डॉन ब्रॅडमन, सोबर्स, क्रिस गेल, एबीडी, वॉर्नर, हेडन वगैरे वगैरे अनेक फलंदाज होऊन गेले, आहेत आणि यापुढेही होतील. पण, ‘हा संघात आहे म्हणजे आज आपलं काही खरं नाही’ असं वाटावं असे फलंदाज अगदी हाताच्या बोटावर मोजावेत इतकेच असतील.

वीरू त्यांच्यापैकीच एक होता. म्हणूनच त्याला रोखण्यासाठी ना-ना प्रकारे प्रयत्न केले जात असत. यासाठी निवडण्यात येणारा मार्ग कसाही असो , ध्येय एकच असायचं; वीरूला रोखणं.

 

sehwag inmarathi

 

‘येन केन प्रकारेण’ वीरूपेक्षा वरचढ ठरायचं हे आणि हेच मनात ठेऊन जणू प्रत्येक संघ मैदानावर उतरतोय असं वाटून जायचं. मात्र, एखाद्या खेळाडूवर वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न करणं वेगळं आणि दुष्टपणे त्याचं वाईट चिंतणं वेगळं…

श्रीलंकेच्या संघानं एकदा असाच दुष्टपणा केलाय. फक्त आणि फक्त सेहवागला शतकापासून दूर ठेवण्यासाठी…

ही घटना आहे २०१० मधली… दम्बुलामध्ये भारत, श्रीलंका आणि न्यूझीलंड संघामध्ये तिरंगी मालिका सुरु होती. तिसरा सामना होता भारत विरुद्ध लंका…

संगकारा हा लंकेचा कप्तान होता. एक गुणी खेळाडू एक चांगला कर्णधार म्हणून त्याला आपण ओळखतो. मात्र त्याच्याच कारकिर्दीत हा असा काहीतरी किस्सा घडावा, हे त्याचं दुर्दैव म्हणायला हवं.

तर, लंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी केली आणि अवघ्या १७० धावांमध्ये त्यांचा डाव आटोपला. भारतीय गोलंदाजांनी समोरच्या संघाची फलंदाजी लोळवावी, हा तसा त्या काळातील दुर्मिळ क्षणांपैकी एक!

त्यामुळे भारतीय संघ मोठ्या खुशीत होता. १७१ धावांचं आव्हान सोपं जाणार यात शंकाच नव्हती. त्यातच वीरूने जोरदार फलंदाजीला सुरवात केली. वीरू हिट झाला तर १७१ धावा म्हणजे ‘किस झाड की पत्ती’…

 

suraj-randiv-inmarathi

 

झालंही तसंच… ३५ व्या षटकातच भारतीय संघाने लंकेच्या धावांची बरोबरी केली. सुरज रणदिव गोलंदाजी करत होता. १७० धावा झाल्या होत्या आणि षटकातील ३ चेंडू बाकी होते.

सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या त्या आपल्या लाडक्या वीरूकडे… तो ९९ धावांवर नाबाद होता.

संघाला जिंकायला १ धाव आणि वीरू त्याच्या शतकापासून १ धाव दूर… एक दुग्धशर्करा योग जमून येणार असं दिसत होतं. पण, लंकेच्या खेळाडूंनी काहीतरी वेगळीच कूटनीती रचली होती.

सेहवागला शतकापासून दूर ठेवण्याचा कट शिजला होता. त्याला बाद करता येईल, याची कदाचित त्यांना खात्री वाटत नसावी.

सुरज रणदिवने चक्क ‘नो बॉल’ टाकला… वीरूने खणखणीत फटका खेळत चेंडू थेट सीमापार धाडला.

भारताला विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज होती. त्यामुळे, सुरज रणदिवच्या हातून चेंडू सुटता क्षणीच भारताने सामना जिंकला. एखाद्या संघाने सामना जिंकला म्हणजे अर्थातच, तिथून पुढे तो चेंडू ‘डेड बॉल’ ठरतो.

 

dead-ball-inmarathi

 

चेंडू डेड झाल्यामुळे, सेहवागने ठोकलेला षटकार ग्राह्य धरला गेला नाही. पर्यायाने, वीरू ९९ धावांवर नाबाद राहिला. त्याचं शतक झालंच नाही. लंकेच्या कूटनीतीचा विजय झाला.

एखाद्या फिरकीपटूने ‘नो बॉल’ टाकणं आणि त्यातही ओव्हरस्टेपिंग करून, पाय तब्बल अर्धा फूट बाहेर ठेवणं ही जवळपास अशक्य बाब आहे. अशी दुर्मिळ गोष्ट घडली कारण, लंकेच्या ‘रड्या’ गोलंदाजाने ती घडवून आणली.

चेंडू टाकणारा हात सूरजचा असला, तरीही यामागे खरा हात होता, तो दिलशानचा… या दोघांनाही नंतर शिक्षा भोगावी लागलीच!

सुरज रणदिववर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली, तर दिलशानला संपूर्ण सामान्याचं मानधन दंड म्हणून द्यावं लागलं…

त्यानंतरही सेहवागने अनेक शतकं फटकावली. अगदी २१९ धावांची तुफानी खेळी करत द्विशतकवीर होण्याचा मानही पटकावला.

पण, एका रडीच्या डावापायी अपूर्ण राहिलेलं ते शतक हा ‘जेंटलमन्स गेम’ म्हटल्या जाणाऱ्या क्रिकेटवर पडलेला एक धब्बाच ठरला…

 

viru-sanga-inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?