' शनिवारची बोधकथा : कथा वाचल्यानंतर तुमचा इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल...

शनिवारची बोधकथा : कथा वाचल्यानंतर तुमचा इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एखादी व्यक्ती, तिच्या भावना आणि तिचं वागणं या सगळ्यांचा आपण काढत असलेला अर्थ नेहमीच बरोबर असतो असं नाही. आपण आपल्या नजरेतून एखाद्या व्यक्तीकडे पाहतो आणि त्यानुसारच मत बनवून मोकळे होते.

हे असं करणं नेहमीच योग्य ठरत नाही. माणसाचा चेहरा वाचता आला, म्हणजे मग त्याचं मन सुद्धा जाणता आलं असं नेहमी होत नाही. मनातील भावना समजून घेणं ही एक निराळी कला आहे. सगळ्याच व्यक्तींना ती अवगत नसते.

आजची बोधकथा ही याचबद्दल भाष्य करणारी आहे.

आजही तो झोपेतून अचानक जागा झाला. नेहमीप्रमाणेच खडबडून! पहाटेचे दोन वाजले होते. आजूबाजूला निरव शांतता आणि त्यामुळे अधिकच खिन्न झालेलं मन… त्याचे डोळे सताड उघडे होते.

आता पुन्हा त्याला झोप येणं अशक्यच होतं. खरंतर आज त्याला एवढा वेळ झोप लागली, याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याचं विचारचक्र सुरु झालं. “एरवी तर डोळ्याला डोळा लागत नाही.” असं म्हणत, तो मनातल्या मनात स्वतःशीच बोलू लागला.

या विचारांमध्ये चुकीचं काहीच नव्हतं. रात्ररात्रभर त्याला झोप न लागणं आताशा नेहमीचं झालं होतं. तो त्याच्या सवयीचा भाग बनून गेला होता. आजही डोळे टक्क उघडे होते आणि विचारांना गती आली होती.

 

insomnia-animated-inmarathi

 

दिवसभराच्या कामाचा थकवा, शिणवठा तर जाणवत होताच; पण तरीही झोप मात्र येत नव्हती. निद्रादेवीने त्याच्यापासून जणू काडीमोड घेतला होता. झोपेची वाट पाहत तो तसाच पडून राहिला.

पहाटेचा पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडू लागला, तरीही त्याला झोप आली नव्हतीच! आज संध्याकाळी वेळ काढून डॉक्टरकडे जायचंच असा त्यानं मनाशी निश्चय केला.

त्याची समस्या दूर होईल की नाही, याविषयी त्याच्या मनात शंका होतीच. पण, तसं असूनही त्यानं डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं मनाशी निश्चित केलं.

डॉक्टरांची वाट बघत बसलेला असतानाही तो थोडासा खिन्नच होता. चेहरा हसरा ठेवण्याचा प्रयत्न आणि मनात सुरु असलेले विचार या दोन्ही गोष्टींची सांगड घालत असताना त्याची तारांबळ उडत होती.

 

smiley-ball-inmarathi

 

आजूबाजूला बसलेली इतर मंडळी त्याच्याकडेच बघत आहेत, असं त्याला वाटत होतं. याच विचारांमध्ये मग्न असताना त्याला डॉक्टरांनी आत बोलावलं. चेहऱ्यावरील खिन्न भाव झटकून तो उठला.

प्रसन्न चित्ताने त्यानं आत प्रवेश केला. डॉक्टरांच्या समोर जाऊन बसल्यावर त्यानं एक स्मितहास्य केलं. कुठल्याही रुग्णाकडे बघून, त्याच्या समस्येविषयी प्राथमिक अंदाज बांधू शकणाऱ्या डॉक्टरांना आज मात्र कुठलाही निष्कर्ष काढता आला नाही.

डॉक्टरांनी काही विचारण्याआधीच त्यानं तेवढ्याच प्रसन्न चित्ताने त्याची समस्या सांगितली.

इतका प्रसन्न आणि हसरा चेहरा ठेऊ शकणारी व्यक्ती रात्री नीट झोपू शकत नाही, हे ऐकून डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले. क्षणभर विचार करून त्यांनी काही उपाय सुचवण्याचं ठरवलं.

 

Tired-Doctor

 

डॉक्टरांनी उपाय सुचवला, मात्र झालं भलतंच. या उपायाने काहीही फरक पडत नाही असं उत्तर त्यांना मिळालं. एक-दोन नव्हे तर अनेक उपाय डॉक्टर सुचवत होते;

पण प्रत्येक उपाय ऐकून झाल्यावर ‘त्याचं’ उत्तर एकच होतं, “हा उपाय करून झालाय”

आता मात्र डॉक्टर हतबल होऊ लागले. या संवादामधून काय साध्य होईल हे त्यांनाही कळेनासं झालं, आणि तरीही त्यांचा संवाद सुरूच होता.

डॉक्टर : तुम्ही जवळपास सगळेच उपाय करून बघितलेत असं दिसतंय.

तो : होय डॉक्टर… सगळंच करून झालंय. झोपेच्या गोळ्या, इतर औषधं, योग, प्राणायाम एवढंच काय तर कुठलाही उपाय फळत नाही, म्हणून तांत्रिक-मांत्रिक, गंडे-दोरे हे सुद्धा झालं. पण गुण नाही…

डॉक्टर : मग, आता मी फक्त एकच उपाय सुचवू शकतो.

तो : सांगा ना… तेही करून बघेन.

डॉक्टर : आपल्या गावात एक नवी सर्कस आली आहे. खूपच भन्नाट आहे. रोजच्या कामाच्या व्यापातून वेळ काढून नक्की बघावी अशी! या सर्कशीचं खास आकर्षण, म्हणजे ‘लंबूटांग विदूषक’… लोकांना पोट धरून हसवण्यात त्याचा हात कुणीच धरू शकत नाही. तुम्ही ही सर्कस बघायला नक्की जा. ‘लंबूटांग विदूषकाचे’ कारनामे बघून तुमच्या आयुष्यातील ताण-तणाव नक्कीच दूर होईल.

इतका वेळ प्रसन्न असलेला त्याचा चेहरा, डॉक्टरांच्या या बोलण्यानंतर मात्र उतरला. तो खिन्नपणे डॉक्टरांकडे पाहू लागला.

त्याचा उतरला चेहरा पाहून डॉक्टरांनी प्रश्न केला, “काय झालं? उपाय पटला नाही का?”

यावर क्षणाचाही विलंब न करता ‘त्यानं’ उत्तर दिलं,

मीच तो ‘लंबूटांग विदूषक’

 

mera-naam-joker-inmarathi

या कथेचं तात्पर्य असं, की इतरांना आनंदी ठेवणारी, इतरांसाठी झटणारी, व्यक्ती ही नेहमीच आनंदी असेलच असं नाही.

व्यक्ती जशी दिसते, बाहेरून जशी वाटते तशीच असेल असे नाही. त्यामुळे पटकन कुठलेही मत बनवणे योग्य नाही. त्यामुळे नेहमीच वरवरचा विचार करून कुणाही व्यक्तीविषयी मत बनवणे योग्य नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?