क्रिकेटमधील ‘देवाला’ मी पाहिलं नाही पण ऐकलं आहे. तो अनुभवही अविस्मरणीयच..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : उत्कर्ष जोशी
===
क्रिकेट म्हणजे भारतीयांचा धर्म आणि सचिन म्हणजे देव, साऱ्या भारतीयांचं श्रद्धास्थान.
तोच सचिन ज्याने कित्येक विश्वविक्रम केले, तोच सचिन ज्याला आऊट झालेलं बघितल्यावर कित्येक लोकं मॅच बघायची सोडून द्यायचे, तोच सचिन ज्याला निवृत्ती घेताना पाहून कित्येकांना हुंदके अनावर झाले!
आज १६ नोव्हेंबर, हाच तो दिवस जेंव्हा क्रिकेटचा देव शेवटचा ग्राऊंड वर खेळताना दिसला. याच दिवशी सचिनने निवृत्ती जाहीर केली आणि त्याला दिलेल्या निरोप सोहळ्याच्या वेळेस कित्येक भारतीय आणि क्रिकेटप्रेमी ढसा ढसा रडले.
त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी आणि खासकरून सचिन फॅन्ससाठी अशा या कधीही विसरता न येणाऱ्या दिवसानिमित्त उत्कर्ष जोशी ह्यांनी लिहिलेला विशेष लेख इनमराठीच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.
===
एखाद्या व्यक्तीला तुम्ही पाहता, अनुभवता आणि मग प्रेमात पडता. पण कधी एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष न पाहता, फक्त ऐकून ऐकून तिच्या प्रेमात पडला आहात?
दुसरी ते नववी माझ्या घरी केबल कनेक्शन नव्हतं. कॉम्प्युटर गेम्स , डीव्हीडी प्लेयर आणि रेडिओ यावर ती सात आठ वर्षे अगदी मजेत गेली.
पण केबल कनेक्शन काढण्या आधी जे काही समजायचं जाणतं वय होतं, त्या तेव्हढ्याशा वयात जे क्रिकेट पाहिलं, अनुभवलं, त्यात फक्त ‘सचिन’ हा एकच शब्द ऐकला.
त्यामुळे साहजिकच केबल गेलं आणि निदान काही वर्षे क्रिकेट माझ्यापुरत फक्त ‘सचिन’ म्हणूनच राहिलं.
मला आठवतंय तिसरीत असताना तो अजरामर वर्ल्डकप झाला जेव्हा केबल नसून सुद्धा काही अँटेना इकडे तिकडे फिरवून आम्ही तो वर्ल्डकप पहिला. आणि नेमकं पाकिस्तान मॅच च्या वेळी टीव्हीवर मुंग्याचं वारूळ.
तरीही देव पावला आणि कसंबसं आपल्या इनिंगला मुंग्या मागे सरल्या आणि मॅच दिसू लागली.
मॅच कसली हो फक्त सचिनच दिसू लागला. आजही आठवतोय शोएब च्या शॉर्टपिच वर फक्त बॅट मध्ये घालून थेट स्टॅण्डस मध्ये भिरकवलेला तो चेंडू.
त्यानंतर मात्र अँटेना प्रकरणही बंद झालं आणि आला फिलिप्स चा रेडिओ. “त्या स्पीकरच्या आत घुसव तुझा कान” असं आईनं ओरडूनही मी रेडिओ सोडत नव्हतो.
फक्त सचिनला खेळताना ‘ऐकण्यासाठी’. तो रोमन्सच वेगळा हो! सचिनची अनेक शतकं मी ‘ऐकली’ ! माझ्या आजूबाजूला शेजारील बहुतांशी घरात केबल कनेक्शन होतं .
त्यामुळे कधीकधी त्यांचा खूप हेवा वाटायचा पण तुम्हाला खरं सांगतो, केवळ एखाद्याबद्दल ऐकून त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणे म्हणजे काय हे तुम्हाला रेडिओ शिकवेल.
कदाचित सचिन चा स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह, हुक, पूल ‘पाहून’ तुम्ही त्याच्यावर प्रेम करत असाल.
पण मी तर यातलं काहीच धड पाहिलं नव्हतं, आणि तरीही कमेंटेटर च्या तोंडून सचिनची बॅटिंग ऐकताना सगळं शरीर कान होऊन यायचं.
सचिन नव्वदीच्या पार गेला की प्रत्येक चेंडूचं समालोचन ऐकताना समालोचकाचा आवाज जराही चढला किंवा ‘it has gone high in the air’ ऐकू आलं की हृदयाचा ठोका चुकायचा आणि शतक झाल्यावर तर हार्टबीट झिंगाट व्हायच्या!
शाळेतही दुसया दिवशी मॅच च्या गप्पांमध्ये सचिन च्या खेळाची चर्चा व्हायची, काही क्रिकेटकिडे फिल्ड प्लेसमेंट, टेक्निक यावर चर्चा करायचे आणि माझ्याकडे ‘सचिन शॉलेट खेळला’ यापलीकडे बोलायला काहीच नसायचं.
कारण सचिनवर प्रेम करायला मला तेवढं पुरेसं होतं. त्यानंतर एकदाचं आमच्याकडे केबल कनेक्शन आलं आणि ऑस्ट्रेलिया सोबतची सिरीज सुद्धा सुरू झाली.
साडेतीनशे पार टार्गेट नेऊन ठेवून ऑस्ट्रेलियन खेळाडू ‘आता बघा कशी जिरवतो तुमची’ अशी मुद्रा घेऊन ग्राउंड वर आले पण इथे आमच्या हिरोने एन्ट्री घेतली.
माझ्या घरच्या टीव्हीवर सचिन ने येणं म्हणजे माझ्यासाठी काहीतरी अचाटच गोष्ट होती. बरं आल्या आल्या दणादण सेंच्युरी! हर्षवायू म्हणजे दुसरं काय असतं हो.
तेवढ्यात ‘आवाज नीचे’ म्हणत MSEB ने एन्ट्री घेऊन विजेने एक्झिट घेतली. मग काय, पुन्हा रेडिओ झिंदाबाद! सचिन एव्हाना दीडशे पार पोहोचला होता.
रेडिओवर सगळं ऐकताना तेच जुनं प्रेम पुन्हा उफाळून आलं. एवढ्यात लाईट आले, रेडिओ बंद करून आणि टीव्ही लावतो तर सचिन बाद….मॅच सुद्धा हातची गेली.
अंधश्रद्धाळू मनाने अशी काहीशी समजूत करून घेतली की मॅच टीव्हीवर पहिली नसती तर जिंकलोही असतो कदाचित. पण मी खुश होतो सचिन साठी.
त्यानंतर सचिन च्या अनेक इनिंग पहिल्या. एका इस्त्रीवाल्या च्या दुकानात पुन्हा रेडिओवरच सचिनची वन डे डबल सेंच्युरी ‘ऐकली’.
पण घरी टीव्ही, हातात मोबाईल आल्याने हळू हळू क्रिकेट किंवा सचिन च्या इनिंग्ज पाहण्या बद्दल बेफिकीर होऊ लागलो. हायलाईट मध्ये पाहीन अशी समजूत काढू लागलो.
म्हणता म्हणता तो दिवस आला.सचिन च्या रिटायरमेंट च्या दिवशी नेमकी कॉलेजमध्ये वायवा होती. न्यूज आली की वेस्ट इंडीजला गुंडाळालय मॅच संपली. सचिन रिटायर होतोय आणि मी त्याला शेवटचं पाहुही शकत नाही?
मग खिशातल्या रेडिओची आठवण झाली. “माय लाईफ…बिटविन ट्वेन्टी टू यार्ड्स फॉर ट्वेन्टिफॉर इयर्स…” आणि खरंच रडू आवरेनासं झालं. असं वाटलं सचिनला मी पुरेसं पाहिलंच नाही.
डोळे भरून त्याच्या इनिंग्स पुरेशा बघितल्याच नाहीत. त्याच्या रूपाने नव्वदीच्या दशकातल्या मुलांचं बालपण संपलं.
आजही अधाशा सारखा नेटवर सचिनच्या जुन्या इनिंग शोधून पाहतो आणि मनाची समजूत काढतो. पण माझ्या तर सचिन प्रेमाच्या कहाणी ची सुरुवातही रेडिओने झाली आणि सांगताही. थँक यू सचिन…!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.