' या प्राण्यात सापडला कोरोना व्हायरस, म्हणून डेन्मार्कने घेतलाय एक भयंकर निर्णय! – InMarathi

या प्राण्यात सापडला कोरोना व्हायरस, म्हणून डेन्मार्कने घेतलाय एक भयंकर निर्णय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण २०२०च्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलोय, हे वर्ष सुरवातीपासूनच सगळ्यांसाठी फारच जड होतं. या वर्षी नाकतोड्यांपासून, चक्री वादळ, पूर, भूकंप ते ही जीवघेणी महामारी सगळंच अनुभवून झालंय. हे सगळे बिंदू एकमेकांशी जोडले, तर एक भयावह चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभं ठाकेल.

माणूस हा प्रकृतीचाच एक भाग आहे, एक घटक आहे हे आपण विसरत चाललोय का किंवा पूर्णपणे विसरलोच आहोत? हा प्रश्न यामुळे उद्भवतो. निसर्गनियमाच्या विरुद्ध जाऊन, निसर्गाच्या हद्दीत केलेल्या घुसखोरीमुळे बिघडलेले निसर्गाचे संतुलन आपल्याच अंगावर बेतले आहे.

कोरोनाचंच घ्या, प्रयोगशाळेत या विषाणूबद्दल संशोधन करताना हा विषाणू पसरला, तर काही रिपोर्ट सांगतात वटवाघळातून तो माणसांत पसरला. कोरोना येण्याआधी इबोला, सार्स, चिकनगुनिया यांसारखे व्हायरस सुद्धा प्राण्यांपासूनच माणसापर्यंत पोहोचले आहेत. या सगळ्या अनैसर्गिक आपदा आपणच आपल्यावर ओढवून घेतल्या आहेत हे म्हणायला हरकत नाही.

 

corona inmarathi

वाढत्या जनसंख्येमुळे लागणारी जागा, अन्न, वस्तू आपण निसर्गापासून अक्षरशः ओरबाडून घेतो आहोत. आपल्याला लागणाऱ्या वस्तूंच्या हव्यासापायी आपण जैविक संपदेला हानी पोहचोवत चाललोय, जवळ जवळ नष्टच करत चाललोय. या भूतलावर असलेल्या इतर जीवांचं अस्तित्व नाकारणाऱ्या माणसाच्या मानसिकतेची कीव करावी तेवढी कमी.

जंगलं भुईसपाट होण्यामुळे, मांसाहाराच्या वेडापायी, आपल्या आवडत्या फर, लेदर कोट्सच्या प्रेमापायी आपण प्राण्यांच्या थेट संपर्कात येतोय हे आपल्याला काळातच नाहीये.

प्राण्यांमध्ये किती तरी विषाणू असतात आणि त्यांचे शरीर त्या विषाणूंशी झुंज द्यायला सक्षम असते, पण हेच विषाणू माणसाच्या शरीरात शिरताच आपला जीव घेतात.

संपूर्ण जगात थैमान घालून आता कोरोनाचा म्युटेटेड म्हणजेच उत्परिवर्तीत विषाणू डेन्मार्कच्या “मिंक” प्राण्यात आढळून आलाय. ज्यामुळे तिथे असलेल्या मिंक फार्म्स आणि फर इंडस्ट्री वर आता संकटाचा डोंगरच कोसळलाय.

 

mink inmarathi

 

डेन्मार्कचे पंतप्रधान Mette Frederiksen यांनी स्थानीय वृत्त पत्राशी संवाद साधताना ह्या गोष्टीवर प्रकाश टाकला. डेन्मार्क येथे जून ते ऑक्टोबर २०२० दरम्यान आढळलेल्या ७८० कोरोना रुग्णांपैकी २१४ नागरिक या म्युटेटेड कोरोनाच्या चपेटीत आलेले आढळले. यातील २०० नागरिक हे उत्तर ज्युटलँड भागातले आहेत.

डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथील Statens Serum Institute ने हा अहवाल जाहीर केलाय. या अहवालानुसार डेन्मार्कच्या उत्तरेस असलेल्या मिंक फार्म्स वरून हा आजार माणसांत पसरल्याचे कळते.

डेन्मार्क हा मिंक फरचा जगातील सगळ्यात जास्त उतपादन करणारा देश आहे. जगातील ४०% फर हे डेन्मार्कच्या १५०० मिंक पालन करणाऱ्या व्यावसायिकांकडून जागतिक बाजारपेठांमध्ये निर्यात केले जाते. चायना आणि हाँग काँग हे डेन्मार्क कडून सगळ्यात जास्त मिंक फर आयात करणारे देश आहेत.

मिंक हा प्राणी थोडा मुंगूसासारखा असतो. ज्या पद्धतीने मेंढीपासून मिळालेली लोकर उबदार कपडे बनवण्यासाठी महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे मिंक पासून मिळणारं फर हे थंडीत वापरण्याचे कोट्स, जॅकेट्स आणि स्वेट शर्ट्स बनवण्याच्या कामास येते.

संशोधकांनुसार, मिंक प्राण्यात आढळून आलेले म्युटेटेड कोरोनाचे विषाणू हे कोरोनाच्या लसी पुढेही बळकट ठरतील इतके घातक आहेत. तो विषाणू इतका जास्त बदलला आहे, की त्यावर संशोधन करून नवीन लस निर्माण करायची म्हटलं तर याला अजून किती वेळ लागेल हे सांगता येणे कठीण आहे आणि लस आली जरी तरी ती ह्या विषाणूला निष्क्रिय करू शकेल का? याची शक्यता जवळ जवळ शून्यच आहे.

जास्त माणसांना यांचा संसर्ग झाल्यास, सध्या आहे त्यापेक्षाही बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते.

समोर आलेल्या ह्या खळबळजनक माहितीमुळे, डेन्मार्कच्या प्रशासनाने, डेन्मार्कच्या मिंक फार्म्सवर असलेले १७ मिलियन म्हणजेच १ करोड ७०  लाख मिंक मारण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आजीविकेसाठी मिंक फार्मिंगवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना मोठं नुकसान होणार आहे.

आधीच जगातिक बाजारपेठा ठप्प त्यात मिंक प्राण्यात आढळून आलेला कोरोना या सगळ्यामुळे त्या व्यावसायिकांचे भरपूर हाल होतात आहे, पण मानवप्रजाती वाचवण्यासाठी मिंक प्राणी मारावे लागणारच.

 

mink inmarathi1

 

या निर्णयामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई सुद्धा डेन्मार्क प्रशासन करेल हे आश्वासन व्यावसायिकांना प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

डेन्मार्कला हा निर्णय अमलात आणताना सुमारे ७८५ मिलियन डॉलर इतकं नुकसान होण्याची शक्यता असण्याचा हा आकडा सरकारकडून जाहीर करण्यात आला.

डेन्मार्कचे फूड मिनिस्टर Mogens Jensen यांच्या म्हणण्यानुसार, “सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये जिथे फक्त ४१ संसर्ग झालेल्या फार्म्सच्या तुलनेत हा आकडा अतिशय वेगाने वाढून आज २०७ इतका झाला असून, पाहता पाहता ज्युटलँडच्या वेस्टर्न पेंइन्सुलाचा संबंध भाग ह्या विषाणूच्या विळख्यात आलाय.”

आत्तापर्यंत डेन्मार्क मध्ये एकूण ५०,५३० इतके कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले असून ७२९ मृत्यू झाले आहेत. तिथल्या स्थानिकांच्या मते, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने सगळ्याच मिंक्स संपवण्याचा योग्यतो निर्णय घेतलाय.

 

mink inmarathi2

 

एखाद्या देशात आढळणारी प्रजाती संपूर्ण नष्ट करून टाकायची म्हणजे निसर्गाच्या रचनेत केवढा मोठा बदल होईल ह्याची आपल्याला कल्पनाही नाही.

“अन्नसाखळी” हे आपण कधी ना कधी ऐकले असेलच. प्रत्येक प्राणी निसर्गाच्या या साखळीचा भाग असतो. या साखळीपैकी एक जरी घटक कमी झाला, तरी कोणत्याही प्रकाराने ही साखळी विस्खळीत झाली, तर निसर्गाचं संतुलनच बिघडेल.

माणूस आपली मर्यादा सोडून वागलाच नसता, निसर्गाच्या रचनेत बळजबरीने, फक्त आपल्या फायद्यासाठी बदल घडवून आणलेच नसते, तर हे सगळे रोग, महामारी या  नैसर्गिक आपदा कदाचित आपल्यावर आल्याच नसत्या.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?