' गर्दी टाळून पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल, तर या ऐतिहासिक लेण्यांना भेट द्याच! – InMarathi

गर्दी टाळून पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल, तर या ऐतिहासिक लेण्यांना भेट द्याच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पर्यटन ही आपल्या सर्वांच्या आवडीची गोष्ट आहे. वातावरणात थोडा बदल झाला, की आपण सगळेच जवळपास कुठेतरी फिरून येण्याचे प्लॅन्स करत असतो.

निसर्गाने महाराष्ट्राला भरभरून सौंदर्य प्रदान केलं आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, गड किल्ले, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान ही सर्व ठिकाणं म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली नैसर्गिक संपत्ती म्हणता येईल. ही ठिकाणं नसती, तर सगळ्यांचे वीकेंड खूप निरस गेले असते. कोरोनामुळे सध्या आपण या परिस्थितीचा अनुभव घेतच आहोत.

फक्त महाराष्ट्राचा जर का विचार केला, तर निसर्गरम्य ठिकाणं ही मुबलक पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहेत असा एक अंदाज व्यक्त होऊ शकतो.

मराठवाडा आणि तिथून पुढे विदर्भात वाढत जाणाऱ्या तापमानामुळे त्यामानाने निसर्गाची दाहकता जास्त बघायला मिळते असं म्हणता येईल, तरीही अजिंठा, वेरूळ लेणी ही दोन ठिकाणं जगभरातील पर्यटनप्रेमी लोकांचं एक प्रमुख आकर्षण आहे.

या व्यतिरिक्त औरंगाबादमधील बीबी का मकबरा, पान चक्की ही ठिकाणं लोकांच्या परिचयाची आहेत, पण या सर्व निसर्गरम्य ठिकाणात एक ठिकाण कायमच दुर्लक्षित झालं आहे. त्या ठिकाणाचं नाव आहे ‘पितळखोरा लेणी’.

 

pitalkhora leni inmarathi2

 

औरंगाबाद जिल्ह्यातील पितळखोरा लेणी ह्या स्थापत्यशास्त्राचा एक नमुना आहे. तिसऱ्या आणि चौथ्या शतकात गौतम बुद्धांनी या ठिकाणी बसून ध्यानधारणा केल्याचं सांगितलं जातं.

कन्नड तालुक्यापासून जवळ असलेल्या पितळखोरा लेणी या औरंगाबाद-चाळीसगाव रस्त्यावर आहेत. हिनयान बुद्धिस्ट काळात या लेणी तयार झाल्या आणि त्यामध्ये गौतम बुद्धांच्या शिकवणी चित्र स्वरुपात रेखाटण्यात आल्या असा आपला इतिहास सांगतो.

पितळखोरा लेणी मधील काही भाग हा ‘महायान’ काळातील सुद्धा आहेत अशी नोंद आहे. पितळखोरा लेण्यांना ‘Brazen Glen’ या नावाने सुद्धा ओळखलं जातं.

दगडावर कोरल्या गेलेल्या या प्राचीन काळातील सर्वोत्तम नक्षीकामाला अजिंठा आणि एलोरा लेणी इतकी प्रसिद्धी मिळाली नाही हे त्या जागेचं दुर्दैव म्हणावं लागेल.

रचना कशी आहे?

 

pitalkhora leni inmarathi3

 

या लेणी बेसाल्ट दगडाने तयार करण्यात आलेल्या आहेत. १४ लेण्यांपैकी ४ प्रार्थना स्थळं आहेत. इथे गौतम बुध्दांचं स्तूप आहे आणि इतर ९ लेण्या या विहार म्हणजेच बौद्ध भिक्खू यांच्या राहण्यासाठी जागा होत्या.

पितळखोरा लेण्यांची बांधणी ही दोन भागांमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या भागात १० लेणी आहेत आणि दुसऱ्यामध्ये ४ लेण्या आहेत. या सर्व लेण्यांची रचना ही इतर बुद्ध लेण्यांसारखीच आहे.

लेण्यांच्या जवळच एक सुंदर पाण्याचा धबधबा आहे. या धबधब्याच्या पुढे आल्यानंतर काही मूर्ती आहेत, ज्यामध्ये यक्ष, सैनिक, हत्ती आणि गजलक्ष्मी यांचा समावेश आहे.

पाणी साठवून ठेवण्यासाठी पितळखोरा लेण्यांमध्ये एक विशेष रचना करण्यात आली आहे. हे बघताना आपल्याला त्या काळातील लोकांच्या दूरदर्शीपणाचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.

लेण्यांमधील खांबांवर असलेलं गौतम बुध्दांचं रेखीव चित्र हे अजिंठा लेण्यांमध्ये आहे तसंच आहे. पितळखोरा लेण्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे असलेल्या ९ हत्तींच्या आणि एका घोड्याची मूर्ती.

 

pitalkhora leni inmarathi

 

यासोबतच तिथे ‘चौरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका माणसाची सुद्धा प्रतिकृती बघायला मिळते. या ठिकाणी सापडलेले इतर दगडांचे अवशेष हे नवी दिल्लीच्या नॅशनल म्युझियम मध्ये ठेवण्यात आले आहेत.

पितळखोरा लेण्यांची देखभाल करण्याचे काम हे सध्या ASI (Archeological Survey of India) ही संस्था बघते. या संस्थेनेच या लेण्यांमध्ये एका लोखंडी पुलाचं बांधकाम केलं आहे. या पुलामुळे लोकांना लेणी व्यवस्थितपणे बघता येते.

 

pitalkhora leni inmarathi1

 

कधी भेट द्यावी?

ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ पितळखोरा लेण्यांना भेट देण्यासाठी सर्वात चांगला आहे असं सांगितलं जातं. याचं कारण असं, की लेण्यांच्या लगत असलेल्या टेकड्या पाऊस पडल्यानंतर खूप सुंदर दिसतात. या टेकड्यांवर तयार होणारं हिरवंगार आच्छादन हे खूप नयनरम्य असतं.

जवळपास राहणारे कित्येक लोक पाऊस पडत असतांना देखील या ठिकाणी वर्षाविहार करण्यासाठी येतात.

कसं पोहचावं?

 

pitalkhora caves inmarathi

 

महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणाहून औरंगाबादला बस किंवा ट्रेनने पोहोचता येऊ शकतं आणि तिथे पोहोचल्यावर टॅक्सीने चाळीसगाव रोडवरील या लेण्यांना भेट देऊ शकता. इथे कोणतेही प्रवेशमूल्य घेतले जात नाही.

हीनयान आणि महायान या दोन्ही पंथातील लोकांचा उल्लेख असल्याने पितळखोरा लेणी खूप महत्वाच्या मानल्या जातात. निसर्गप्रेमी लोकांनी औरंगाबाद जिल्ह्यातील या लेण्यांना अवश्य भेट द्यावी.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?